Thursday, November 10, 2016

मराठी साहित्य सृष्टीच्या समृद्धतेत
दिवाळी अंकामुळे भरच - गवळी
जिल्हा ग्रंथालयात प्रदर्शनाचे उद्घाटन
नांदेड , दि. 10 :- दिवाळी अंकांनी मराठी साहित्य सृष्टीला समृद्ध केले. दिवाळी अंकातूच अनेक नवोदितांना साहित्यिक क्षेत्रात ओळख मिळाली, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी आज येथे केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गवळी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कथा-कथनकार दिगंबरराव कदम होते. जिल्हा ग्रंथालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमास कवी महेश मोरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती.
            उद्घाटनपर भाषणात श्री. गवळी म्हणाले की , माहिती तंत्रज्ज्ञान युगाचा स्पर्श होण्याआधी, ग्रंथ आणि त्यातही दिवाळी अंक हेच साहित्यीक मेजवानीचे साधन होते. विशेषतः मराठीत दिवाळी अंकाची परंपरा मोठी आहे. दिवाळी अंक ही मराठी साहित्यीक विश्र्वाचे वैशिष्ट्य आहे. पुर्वी दिवाळी अंक विविध साहित्य प्रकारांनी नटलेले असत. आता मात्र विविध विषयांना वाहिलेली दिवाळी अंक उपलब्ध होऊ लागले आहेत. वाचन प्रेमींसाठी दिवाळी अंक आजही मेजवानी ठरतात. दिवाळी अंकातून लिहीत्या झालेल्या नवोदितांना साहित्य विश्र्वातही प्रवेश मिळतो, ओळख मिळते, असा अनुभव आहे. त्याअर्थाने दिवाळी अंकांचे मराठी साहित्य समृद्ध करण्यात मोठे योगदान आहे, असेच मानावे लागेल.
यावेळी कवी श्री. महेश मोरे यांनी कविता सादर करून वाचनप्रेम, दिवाळी अंक यावर मार्मिक सादरीकरण केले. कथा-कथनकार श्री. कदम यांनी विनोदीबाज असलेली ग्रामीण कथा सादर करून, उपस्थितांना खळखळून हसविले.
सुरवातीला ग्रंथालयशास्त्राचे जनक रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शन आयोजनाबाबतची भुमिका विशद केली. प्र. के. सुर्यवंशी यांनी सुत्रसंचालन केले. अजय वट्टमवार यांनी आभार मानले. तत्पुर्वी जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहातील दिवाळी अंक प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी दोनशेहून अधीक दिवाळी अंकाची वैशिष्ट्यपुर्ण मांडणी करण्यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   458 क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांचा दौरा  नांदेड दि. 30 एप्रिल :- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्य...