Monday, October 24, 2016

रब्बी हंगामासाठी बी-बियाणे उपलब्धतेबाबत
काटेकोर नियोजन व्हावे- जिल्हाधिकारी काकाणी
हंगामातील पीक क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करण्याचेही निर्देश
नांदेड, दि. 24 :- आगामी रब्बी हंगामासाठी प्रामुख्याने हरभरा, भुईमूग आणि ज्वारी या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न व्हावेत. रब्बा हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी आवश्यक अशा बियाण्याच्या उपलब्धतेबाबत कृषि विभागाने काटेकोर नियोजन करण्यात यावे. बी-बियाण्यांच्याबाबत शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, त्यांच्या पुरेश्या उपलब्धतेबाबत वेळीच नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी हंगामाच्या नियोजनांसाठी कृषि विभाग आणि बी-बियाणे पुरवठादारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक झाली.
बैठकीत बी-बियाण्याच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, अनुदानित बियाण्याची उपलब्धता आणि खुल्या बाजारातील बियाणे याबाबतही मार्गदर्शन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, मोहिम अधिकारी ए. जी. हांडे, तंत्र अधिकारी एस. बी. शितोळे, बी-बियाणे खत विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे, महाबीजचे व्यवस्थापक के. एल. सावंत तसेच राष्ट्रीय बिज निगम, कृभको यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
रब्बी हंगामात हरभरा, भुईमूग आणि ज्वारी यांच्या क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. हरभरा  बियाण्याच्या उपलब्धतेबाबत अनुदानित आणि खुल्या बाजारातील विक्री याबाबत पारदर्शकता ठेवण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देशित केले. रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्धतेबाबत महाबीज, कृषि विभाग, घाऊक विक्रेते आणि तालुकास्तरावरील यंत्रणांनी संपर्क-समन्वय ठेवावा. जेणेकरून शेतकऱ्यांची अडचण होणार नाही. त्यासाठी वेळोवेळी माहितीची देवाण-घेवाण करावी, असेही त्यांनी सांगितले. खतांचा पुरवठा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतही यावेळी चर्चा झाली.
हरभऱ्याचे अनुदानित बियाण्याचे वाटपात अडचणी येऊ नयेत यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर आणि सात-बारा, आधार कार्डच्या नोंदी घेऊन प्रति शेतकरी तीस किलोचे वाटप करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या अनुदानित बियाण्याचा दर ऐंशी रुपये प्रतिकिलो असा आहे. तर खुल्या बाजारातील विक्रीबाबत शेतकऱ्यांनी संबंधित छापील किंमतीची खात्री करून बियाणे घ्यावे. बियाणे खरेदीची पावती घ्यावी व ती जपून ठेवावी. बी-बियाणे व खतांच्या दुकानात कृषि तसेच विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक लावण्यात आले आहेत. त्यामुळे बी-बियाण्याच्या उपलब्धतेबाबत अडचणी आल्यास संबंधितांकडे किंवा तालूका कृषि अधिकारी, पंचायत समितीच्या कृषि अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषि विभागाच्यावतीने बैठकी दरम्यान करण्यात आले.
जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रात अडीच लाख हेक्टरपर्यंत वाढ व्हावी, त्यातही पिक-पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात यावे, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. काकाणी व्यक्त केली.

0000000
मतदारांना प्रभावित करणाऱ्या गैरप्रकारांवर
संशयास्पद व्यवहारांवर नजर राहणार
जिल्हाधिकारी काकाणी यांचे जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती बैठकीत निर्देश

नांदेड, दि. 24 :- विधानपरिषद आणि नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी मतदारांना प्रभावित करणाऱ्या गैरप्रकारांवर, आर्थिक बळाचा वापर, संशयास्पद आर्थिक व्यवहार, दारुचा अवैध वापर यांच्यावर नजर राहणार आहे. त्यासाठी आज जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न  झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक झाली.
बैठकीस नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी, नगरपरिषद प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, आयकर विभागाच्या सहायक आयुक्त वृंदा मतकरी, अग्रणी बँकेचे प्रतिनिधी श्री. वरणकर आदींची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या नांदेड प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा तसेच नऊ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी  तथा जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, तर नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठीही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीद्वारे सनियंत्रण केले जाणार आहे.
 या दोन्ही निवडणुकांच्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. यामध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी विविध यंत्रणांवर जबाबदाऱ्या सोपविण्याचे नियोजन करण्यात आले. विशेषतः संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर बँक आणि आयकर विभागाच्या समन्वयाने नजर ठेवणे, जिल्ह्यात पाहणीसाठी फिरते तसेच स्थानिक पथकांची  नियुक्ती करणे, तसेच निवडणूक काळातील शांतता-सुव्यवस्थेसाठी अवैध अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करणे, त्यासाठी माहितीची देवाण-घेवाण समन्वयनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. अवैधरित्या मद्यविक्री किंवा विहीत कालमर्यादेनंतरही मद्यविक्री, अवैध साठे शोधणे, प्रचार-प्रसिद्धी दरम्यान विरूपणास प्रतिबंध करणे यासाठीच्या नियोजनाबाबतही निर्देशित करण्यात आले.
निवडणूक काळातील आर्थिक व्यवहारांबाबत व्यावसायीक, व्यापारी तसेच अन्य प्राधिकरणांनी, व्यक्तींनी बँकीग नियमन तरतुदीनुसार सोबत दस्तऐवज, अनुषांगीक माहिती ठेवावी. बँकींग नियमावलीनुसार मोठ्या स्वरुपाच्या आर्थिक व्यवहारासाठीची विहित पद्धतीचा काटेकोर अवलंब करावा, जेणेकरून अशा नियमित व्यवहारांबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नाही,असेही आवाहन सनियंत्रण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष
जिल्ह्यात  निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा 1077 हा दुरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर येणाऱ्या तक्रारीबाबत संबंधित यंत्रणांना दर दोन तासांनी अद्ययावत माहिती देण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देशित केले. या तक्रारीबाबत  केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवालही वेळोवेळी सादर करण्यात यावा, अशा सुचनाही बैठकीत देण्यात आल्या.

0000000

Friday, October 21, 2016

नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे
जिल्हा निवडणूक कार्यालयाचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- विधानपरिषदेच्या नांदेड प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आहे. या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्‍ट्र विधान परिषदेमधील स्‍थानिक प्राधिकारी मतदार संघातील रिक्‍त जागाचा निवडणुकीचा कार्यक्रम बुधवार 19 आक्‍टोबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार नांदेड स्‍थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी निवडणूक अधिसूचना बुधवार 26 ऑक्टोंबर 2016 रोजी काढण्यात येणार आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार 2 नोव्हेंबर. नामनिर्देशन पत्राची छाननी गुरुवार 3 नोव्हेंबर. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शनिवार 5 नोव्हेंबर आणि निवडणुकीसाठी मतदान शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत होईल. निवडणुकीची मतमोजणी मंगळवार 22 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होईल. या निवडणुकीसाठी आज शुक्रवार 21 ऑक्टोंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 पर्यंत आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वाहनाच्या वापरावरील प्रतिबंध, वाहनांचा गैरवापर, दौरे त्यासाठी शासकीय वाहनांचा वापर, तसेच या काळातील मद्यविक्री त्याचे वितरण, निवडणूक काळातील प्रचार, सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे विरूपणास प्रतिबंध यासह आदर्श आचारसंहितेत अंतर्भूत असलेल्या अनेकविध बाबींबाबत पालन करण्याबाबत विविध राजकीय पक्ष, इच्छूक उमेदवार तसेच यंत्रणांना आवाहन करण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काटेकोर पालनाबाबत विविध यंत्रणांद्वारे संनियंत्रण आणि नोंदी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या राजकीय पक्ष व त्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीतही उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी उपस्थितांना निवडणूक कार्यक्रम व आचारसंहितेबाबत माहिती दिली. 

000000
राज्य उत्पादन शुल्क विभागाची
अवैध दारु व्यवसायाविरुद्ध मोहिम
नांदेड, दि. 21 :- अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस विभागातील स्थानीक गुन्हा शाखेचे व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी-कर्मचारी  यांनी  हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अवैध दारु व्यवसायाविरुद्ध विशेष संयुक्त मोहिम नुकतीच राबविली.  
मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा, भोकर तालुक्यातील गोरगोटवाडी तांडा, उंदरी तांडा, जाहूर तांडा, राजुरा तांडा, कोडग्याळा तांडा, वंडगीर तांडा येथे 9 प्रतिबंधात्मक गुन्हे नोंद केले आहे. त्यामध्ये 650 लीटर रसायन व 90 लीटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली असून एकूण 18 हजार 975 रुपयाचा मुद्देमाल पकडण्यात आला. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी डी. एन. चिलवंतकर, एस. एस. खंडेराय, श्री घुगे, हिप्परगेकर, फुलारी, मंडलवार, त्रिमुखे तसेच पोलीस विभागाचे अधिकारी श्री. नेटके, वाघमोडे, कर्मचारी मोहम्मद रफी, किरतवाड, इंगोले, आनकाडे, राठोड, भालेराव, दासरवार, शिल्पा कांबळे, श्री. जाधव आदी कर्मचारी या कारवाईत सहभागी होते.  

0000000
कापुस, तुर किड नियंत्रणासाठी
कृषि विभागाचा संदेश
            नांदेड, दि. 21 :-  जिल्ह्यात कापुस व तुर पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. कापुस व तुर पिकाच्या किड संरक्षणासाठी शेतकऱ्यांना कृषि कार्यालयामार्फत पुढील प्रमाणे संदेश देण्यात आला आहे.
            कापसावर पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी डाईफेनथिरॉन 50 डब्लु. पी. 1.2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आकस्मीत मर नियंत्रणासाठी झाडाच्या खोडापासून 1 ते 1.5 फुट अंतरावर बांगडी पद्धतीने कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीयम 15 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
            फुलोरामधील तुरीसाठी लिंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही 500 मिली प्रती हेक्टर या प्रमाणे फवारणी करावी. मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे लावावेत.

0000000
नांदेड विधान परिषद निवडणुकीची मतदार यादी प्रसिद्ध
            नांदेड, दि. 21 :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्‍ट्र विधान परिषदेमधील स्‍थानिक प्राधिकारी मतदार संघातील रिक्‍त होणा-या जागा भरण्‍यासाठीचा निवडणुकीचा कार्यक्रम बुधवार 19 आक्‍टोबर रोजी जाहीर केलेला आहे. त्यानुसार नांदेड स्‍थानिक प्राधिकारी मतदार संघासाठीची मतदार यादी तयार करण्‍यात आली असून ही आज शुक्रवार 21 ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 पर्यंत आक्षेप, हरकती मागविण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेली यादी जिल्‍हधिकारी कार्यालय नांदेड, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका कार्यालय, जिल्‍हा  परिषद व जिल्‍हयातील सर्व तहसिल कार्यालय, पंचायत समिती आणि नगर परिषद कार्यालय येथे  प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे. या यादीबाबत आक्षेप किंवा हरकती असल्‍यास त्‍या गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालय ( निवडणूक शाखा ) नांदेड येथे  सादर कराव्‍यात, असे आवाहन नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
विधान परिषद निवडणुक 2016
मतदार यादी गोषवारा

अ.क्र.
तालुका
मतदार यादी भाग क्र.
पुरुष
स्‍त्री
एकूण
01
नांदेड जि.प.
01
43
36
79
02
नांदेड  मनपा
02
42
43
85
03
माहूर
03
10
09
19
04
किनवट
04
09
10
19
05
हिमायतनगर
05
09
10
19
06
हदगाव
06
10
09
19
07
भोकर
07
08
11
19
08
मुदखेड
08
10
09
19
09
अर्धापूर
09
09
09
18
10
लोहा
10
10
09
19
11
कंधार
11
08
10
18
12
नायगाव
12
10
09
19
13
उमरी
13
08
11
19
14
धर्माबाद
14
10
10
20
15
कुंडलवाडी
15
09
09
18
16
बिलोली
16
09
10
19
17
देगलूर
17
14
12
26
18
मुखेड
18
07
11
18
एकूण
235
237
472

000000
पोलीस हुतात्मा दिनानिमित्त हुतात्मा स्मृतीस अभिवादन
नांदेड, दि. 21 :- पोलीस हुतात्मा दिनानिमित्त आज येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून, हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. यावेळी सशस्त्र सलामीही देण्यात आली. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर यानिमित्त शिस्तबद्ध आणि धीरगंभीर वातावरणात अभिवादन संपन्न झाले.
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. भारतीय पोलीस दलातील विविध राज्यातील आणि विविध पोलीस-दलातील अधिकारी व जवान कर्तव्यावर हुतात्मा झाले, त्यांच्या स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
सुरवातीला सहाय्यक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी हुतात्मा दिनाचे औचित्य प्रकट केले. विविध दलातील सुमारे 473 हुतात्मा पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नामोल्लेख करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सलामी शस्त्र मानवंदनेसह जिल्हाधिकारी श्री. काकाणी, पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. पंडित, उपअधीक्षक श्री. बनकर आदींसह विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हुतात्मा स्मारक पुष्पचक्र तसेच पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून, हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. पोलीस निरीक्षक शामलाल राठोड यांनी परेड कमांडर म्हणून संचलन केले.

0000000












वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...