Wednesday, December 3, 2025

 वृत्त क्रमांक 1263

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जिल्हा परिषदेत साजरा           

नांदेड, दि. 3 डिसेंबर : जिल्हा परिषद नांदेड येथे हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन करून जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन 3 डिसेंबर रोजी जगभर साजरा करण्यात येतो. या दिनाची 2025 या वर्षीची थीम “सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग-सर्वसमावेशक समाज घडविणे” अशी आहे. 

यावेळी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) राजकुमार मुकावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दत्तात्रय गिरी, कृषी अधिकारी निलकुमार एैतवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, माधव सलगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती वंदना फुटाने, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, तसेच विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या व श्री गुरूगोविंद सिंघजी निवासी अंध विद्यालय समर्थनगर धनेगाव या विद्यालयातील अंध दिव्यांग विद्यार्थी-कर्मचारी यांच्या उपस्थिती होती.   

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळांतील मुख्याध्यापक-व्यवस्थापकीय अधीक्षक यांची नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली होती. शाळा, कार्यशाळेमध्ये दिव्यांग कल्याण विभागाची दृष्टी, ध्येय, उद्दिष्टे आणि धोरणात्मक लक्ष इत्यादी बाबत विस्तृतपणे सादरीकरण करण्यात यावे विभागाच्या योजना, कार्यक्रम, विभागाचे धोरणे, कायदे, नियम तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि संबंधित अधिनस्थ कार्यालये यांची रचना, स्वरूप, भूमिका, जबाबदाऱ्या आणि कार्य इत्यादीबाबत दिव्यांगांमध्ये जागृती होण्यासाठी विविध कार्यशाळा आणि कार्यक्रमांचे आयोजन करावे. भविष्यात दिव्यांग मुले जन्माला येऊ नयेत या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन, दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण​ विकास याबाबत मार्गदर्शन करून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.

00000






 वृत्त क्रमांक 1262

कोणत्या हंगामात शेतात काय पेरायच, कधी विकायचं,

शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ॲप  !

नांदेड, दि. 3 डिसेंबर : कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार हे एआय ॲप राज्यभर सुरु केले आहे. त्यात शेतीविषयक, हवामानासंदर्भात माहिती, पीकविषयी सल्ला, पिकांना द्याव्या लागणाऱ्या खतांच्या मात्रांचा अंदाज आणि कीडरोगाविषयी माहितीसह बाजारभाव पाहण्याची सुविधा आहे. हे ॲप राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या सहकार्यातून महाविस्तार ॲप सुरू करण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती मिळणार आहे. 

महाविस्तार ॲप कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी  मराठी भाषेतील चॅटबॉट देण्यात आला आहे. या चॅटबॉटला शेतकरी प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे शेती कामात निश्चित मदत होणार आहे.

मला प्रश्न विचारा : चॅटबॉट देणार माहिती

यात चॅटबॉट एक संगणकीय प्रणाली आहे. त्यात संवाद करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. चॅटबॉट्सचा उपयोग विविध सेवा देण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, मदत करण्यासाठी किंवा विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी केला जातो. त्यामुळे वेळ आणि श्रम वाचतो. शेतकऱ्यांना सहज शेतीची माहिती मिळणार आहे.

फवारणी, खत, हवामानाचा अंदाज

हवामान बदलाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर आव्हाने उभी आहेत. हवामान बदलांना तोंड देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती दिली जाणार आहे. अॅपमध्ये हवामान अंदाज, पीक लागवड, लागवडीची पद्धत, कीड व्यवस्थापन, कीड व्यवस्थापनाच्या पद्धती, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीकसल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती मिळणार आहे.

ॲपमध्ये फार्मर आयडी टाकून करा लॉगिन

मोबाईलमध्ये ॲप घेण्यासाठी फार्मर आयडी टाकून लॉगिंन करता येते. तसेच फार्मर आयडी नसल्यास मोबाइल नंबर टाकूनही लॉगिन करता येते. या अॅपच्या माध्यमातून ही सर्व माहिती मिळते.

काय आहे महाविस्तार ॲप ?

कृषी विभागाने तंत्राच्या मदतीने महाविस्तार हे ॲप शेतक-यांच्या प्रगतीसाठी तयार केले आहे. त्यात शेतीविषयक संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे. या अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती महाविस्तार अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑडिओ आणि व्हिडीओ पद्धतीने शेतीपूरक मार्गदर्शन मिळणार आहे. शेतक-यांसाठी महाविस्तार अॅपमधून बाजारभाव, हवामान अंदाज समजणार आहे. एका क्लिकवर चॅटबॉटवर शेतकऱ्यांच्या सर्व समस्याची उत्तरे अचूक मिळणार आहेत.

पेरणीपासून शेतमाल विक्रीपर्यंतचा सल्ला.

खरीप पेरणीपासून हवामान अंदाज, पिकांना वेळोवेळी द्यावे लागणारे खताचे डोस, फवारणी, हवामान बदल, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीक सल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती या ॲपवर मिळणार आहे. शेतीमाल विक्रीचा सल्लाही दिला जाणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आजच महाविस्तार एआयॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000



  वृत्त क्रमांक 1261

नांदेड तहसील प्रशासन व लिंबगाव पोलीसांची अवैध वाळू उत्खननाविरोधात संयुक्त मोठी कारवाई

49 लाखांचा मुद्देमाल नष्ट, 20 लाखांचे इंजिन जप्त

नांदेड, दि. 3 डिसेंबर : आज 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या निर्देशानुसार नांदेड तहसील प्रशासन व लिंबगाव पोलीसांच्या पथकाने पहाटे मोठी कारवाई केली. एकूण 49 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट तर 20 लाख रुपये किंमतीची 5 इंजिन जप्त करून लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली.

नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, मोहसीन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, संजय खेडकर, महेश जोशी, मनोज जाधव, तलाठी मारोती श्रीरामे, मनोज सरपे, महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे यांच्या पथकाने पहाटे 5 वाजता विष्णुपुरी, कल्लाळ परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उत्खनन करणारे इंजिन व बोटी नदीमार्गे पळून गेल्याचे निदर्शनास आले.

पथकाने तात्काळ पाठलाग करून बोरगाव तेलंग परिसरात गोदावरी नदीमध्ये 3 बोटी आणि 5 इंजिन जप्त करण्यात यश मिळविले. मजुरांच्या साहाय्याने 3 बोटी स्फोट करून नष्ट करण्यात आल्या तसेच 25 तराफे जागेवरच जाळून नष्ट करण्यात आले. 5 इंजिन जप्त करून लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली.

कारवाईदरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोधनकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. सय्यद तसेच पोलीस कर्मचारी रमण बैनवाड, श्री. मोरे, श्री. गर्दनमारे, श्री. तेलंग, पो. का. देशमुख आदींचे पथक उपस्थित होते.

अवैध वाळू उत्खननाविरोधात कठोर व सततची कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. 

00000






 वृत्त क्रमांक 1260

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन 

कृषि विभागामार्फत कृषिनिष्ठ पुरस्काराचे होणार वितरण

नांदेड दि. 3 डिसेंबर:- श्रीक्षेत्र माळेगांव यात्रा येथे कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेडमार्फत भव्य कृषिप्रदर्शन, फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धा तसेच सन 2025-26 यावर्षामध्ये कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सन 2025-26 चे 16 शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून साडीचोळी, शॉल, फेटा, मोमेन्टो देऊन करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 

यावर्षी कृषि विभाग, जिल्हा परिषद नांदेडमार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषि प्रदर्शनचे आयोजन केले असून बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, विविध कृषि औजारे, ट्रॅक्टर, यंत्रे, सुक्ष्मसिंचन, कृषि विज्ञान केंद्रामार्फत मातीपरिक्षण प्रयोगशाळा, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, सेंद्रीय शेती, देशीवाण, किटकनाशके वापराबाबत मार्गदर्शन इत्यादीबाबतचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये बियाणे कंपन्याकडून विविध पिकांचे लाईव्ह सॅम्पल ठेवण्यात येणार आहेत. यात्रेचा कालावधी दिनांक 18 ते 22 डिसेंबर 2025 असणार आहे. 18 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन होऊन कृषि निष्ठ पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. स्टॉल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील. यादरम्यान बहुतांश यात्रेकरू व शेतकरी स्टॉलला मोठया प्रमाणात भेटी देतात. उत्पादनाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची व सुधारीत तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिध्दी करण्याची चांगली संधी याप्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषदमार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषिप्रदर्शनचे आयोजन केले असून बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, विविध कृषि औजारे, ट्रॅक्टर, यंत्रे, सुक्ष्मसिंचन, कृषि विज्ञान केंद्रामार्फत माती परिक्षण प्रयोगशाळा, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, सेंद्रीय शेती, देशीवाण, किटकनाशके स्टॉल उभारण्यात येणार आहेत. सर्व कंपनी प्रतिनिधीनि आपला अर्ज कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेड कार्यालयात 7 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावा.

यात्रेत कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेडमार्फत जिल्हास्तरीय फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शनाचा स्टॉल उभारण्यात येतो. या प्रदर्शनात जिल्हयातील फळे व भाजीपाला घेणारे शेतकऱ्यांनी आपले शेतातील भाजीपाला व फळे पिकांचे उत्कृष्ट नमुने आणावेत. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्यांच्या नमुन्यातून प्रत्येक वाणातुन उत्कृष्ट नमुन्यास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येईल व विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येईल.

श्रीक्षेत्र माळेगांव यात्रेत कृषिविभागामार्फत जिल्हास्तरीय फळे, भाजीपाला व मसाला पिकेस्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रथम, द्वितीय व त्रितीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना अनुक्रमे 4 हजार 3 हजार व 2 हजार रुपये याप्रमाणे बक्षीस देण्याचे नियोजन आहे.

दिनांक 22 डिसेंबर 2025  रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषि प्रदर्शनात भाग घेतलेल्या विविध कंपन्यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक प्राप्त करणाऱ्या कंपन्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 1259

क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांचा दौरा 

नांदेड दि. 3 डिसेंबर:- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी वंदे भारत एक्सप्रेसने रात्री 10.50 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 11 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम. 

गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.50 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून वाहनाने जिल्हा क्रीडा संकुल नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12 वा. जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे आगमन व विभागीय युवा महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 12.30 वा. जिल्हा क्रीडा संकुल पाहणी व आढावा बैठक व राखीव. सायं. 4.30 वा. जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडकडे प्रयाण. सायं. 5 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आगमन व राज्य क्रीडा महोत्सव उद्धघाटन कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. सायं. 6.50 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून तख्त सचखंड श्री हुजूर साहीब, गुरुद्वारा नांदेडकडे प्रयाण. सायं. 7 वा. तख्त सचखंड श्री हुजूर साहीब, गुरुद्वारा नांदेड येथे आगमन व राखीव. रात्री 8 वा. तख्त सचखंड श्री हुजूर साहीब गुरुद्वारा नांदेड येथून लातूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण करतील. 

00000

वृत्त क्रमांक 1258

जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी 74.75 टक्के मतदान

291 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले
सामान्यासह दिव्यांग, वयोवृध्द, तृतीयपंथी, महिलांनी उत्साहात केले मतदान
लोहा येथे सर्वात जास्त तर हदगाव नगरपरिषदेसाठी सर्वात कमी मतदान
नांदेड दि. 3 डिसेंबर:- जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी तसेच थेट अध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. जिल्ह्यातील 291 मतदान केंद्रावर 92 हजार 48 पुरुष तर 90 हजार 354 महिला व इतर 7 असे एकूण 1 लाख 82 हजार 409 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
अध्यक्ष पदासाठी 71 तर सदस्य पदासाठी 873 उमेदवारांसाठी जिल्ह्यातील सामान्यासह नागरिकांसह दिव्यांग, वयोवृध्द, तृतीयपंथी, महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला.
सकाळपासूनच जिल्ह्यात 10 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीसाठी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यत मतदान सुरु होते. सामान्य नागरिकांसह महिला, दिव्यांग, वयोवृध्द, तृतीयपंथी यांनी उत्साहाने मतदान केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणूकीसाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीने निवडणूक कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली होती. जिल्हा प्रशासनाचे सुयोग्य नियोजनामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, शांततेत मतदानाची प्रक्रीया पार पडली.
मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजेपर्यत जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीत पुढीलप्रमाणे मतदानाची टक्केवारी आहे. देगलूर- 71.31 टक्के , बिलोली- 75.62 कुंडलवाडी- 79.39, उमरी-71.53, मुदखेड-73.55, भोकर- 75.27, हिमायतनगर-77.71, किनवट – 74.27, हदगाव- 65.80, लोहा- 81.80, कंधार-76.02 टक्के असे एकूण 74.75 टक्के मतदान झाले.
काल सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील लोहा,कंधार, मुदखेड, भोकर, उमरी येथील विविध नगरपरिषदातील मतदान केंद्राना भेटी देवून पाहणी केली. जिल्ह्यात मतदानासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत व सुरळीत पार पडले.
00000






वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...