Thursday, September 25, 2025
वृत्त क्रमांक 1009
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा
एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही
शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार
- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी
नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा
नांदेड, दि. 25 सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा अतिवृष्टीग्रस्त पाऊस होऊन शेती, रस्ते, पुल यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची जास्तीतजास्त मदत शेतकऱ्यांना त्वरीत मिळून देणार असल्याची ग्वाही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन मंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व धीर दिला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे अश्वस्त केले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील धानोरा, अर्धापूर तालुक्यातील चिंचबन, नांदेड तालुक्यातील नांदुसा, लोहा तालुक्यातील शेवडी, भेंडेगाव या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी श्री. राठोड यांनी केली. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी शासन स्तरावर मांडून त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोहा तालुक्यातील खराब झालेल्या पुल, विहिरी, रस्ते याचीही पाहणी केली.
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा
जिल्ह्यात ऑगस्टपासून आतापर्यंत तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच गोदावरी नदीत मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरु असून यामुळे शहरातील सखल भाग पाण्याखाली जाऊन अनेक घरात पाणी शिरले आहे. यामुळे 450 लोकांना सुरक्षीतरित्या निवाऱ्यात हलवले आहे. गोदावरी नदीच्या बॅकवाटरमुळे शेतीचे बरेच नुकसान जिल्ह्यात काही गावांमध्ये झाले आहे. या सर्व बाबींचा आढावा श्री. राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून आज जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत घेतला.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी जेनित चद्रा दोन्तुला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नुकसानीच्या मदत जाहीर झालेल्या याद्या प्रत्येक गावात प्रसिद्ध करा. खचलेल्या व बुजलेल्या विहिरींचा अहवाल शासनाला पाठवा. शहरात पाणी शिरलेल्या घरांचे पंचनामे तात्काळ करुन पात्र लोकांना आठवडाभरात मदत करा. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पुर्वरत करण्यावर प्राधान्याने भर द्या. पुराच्या पाण्याचे कायमस्वरुपी नियोजन करण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार योजनेतील कामे प्राधान्याने करण्यावर भर द्या. दुरूस्त व नादुरूस्त झालेल्या रस्त्याचे प्रस्ताव शासनाला पाठवा. मृत जनावरांच्या मदतीबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लावा, असे निर्देश मंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
बैठकीत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्याबाबतच्या मागण्या शासनाकडे मांडल्या. जिल्ह्यात ऑगस्ट ते आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीची, नुकसानीची, मदतीची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे दिली.
00000
Wednesday, September 24, 2025
वृत्त क्रमांक 1008
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत
'भूमी अदालतीचे' 30 सप्टेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 24 सप्टेंबर :- जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने 'भूमी अदालतीचे' आयोजन मंगळवार 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत होणार आहे. अदालतीचे ठिकाण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे राहील. संबंधित नागरिक आणि अपीलकर्त्यांनी सुनावणीच्या दिवशी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत घेऊन उपस्थित राहावे. जेणेकरून प्रकरणांचा योग्य आणि अंतिम निपटारा करणे सोपे होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती सिमा देशमुख यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत "सेवा पंधरवडा" साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने प्रलंबित भूमी अभिलेख प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याच्या उद्देशाने विशेष
'भूमी अदालतीचे' आयोजन केले आहे. या भूमी अदालतीमध्ये जिल्ह्यातील प्रलंबित अपील प्रकरणांवर सुनावणी
घेऊन त्यांचा जलदगतीने निकाल लावण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी संबंधित
अपीलार्थी आणि उत्तराथी (प्रतिवादी) यांना सुनावणी बाबत सुचना देण्यात आल्या असून सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन पूर्ण
झाले आहे. संबंधित नागरीक व अपीलार्थी आणि उत्तराधी (प्रतिवादी) यांनी आपले
प्रकरणाचे संपुर्ण अभिलेखासह हजर राहूण प्रकरणाचा निपटारा करून घ्यावा. या
उपक्रमामुळे नागरिकांना पारदर्शक आणि जलद न्याय मिळेल तसेच त्यांचा वेळ आणि
संसाधने यांची बचत होण्यास मदत होईल, असे जिल्हा अधीक्षक
भूमी अभिलेख कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
वृत्त क्रमांक 1007
केवायसी व प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजनेच्या
प्रतिसादासाठी ग्रामपंचायत पातळीवर महामेळावा संपन्न
नांदेड, दि. 24 सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यातील नायगाव व हदगाव येथे नुकतेच 18 सप्टेंबर रोजी विशेषवित्तीय साक्षरता मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यावतीने करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व पात्र बँक ग्राहकांनी प्रधानमंत्री जनधन खाते उघडावे तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यात सहभागी व्हावे. आपले बँक खात्याचे री-के वायसी व नामांकन करण्यासाठी आपल्या बँक शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.
या मेळाव्यासाठी भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदिप कुमार हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक अनिरुद्ध चौधरी, आयडीबीआय बँकेचे सरव्यवस्थापक पुनीत गोस्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांच्या सुचनेनुसार देशभरात जनधन योजनेला दहा वर्षे झाले आहेत. त्यानिमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर जनधन बचत खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यांचे 100 टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत जन सुरक्षा योजनांचे लाभ पोहचले पाहिजेत तसेच नामांकन सुविधा व री-केवायसी या मुख्य उद्देशाने या ग्रामपंचायत पातळीवरील मेळव्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
या अभियानाचा भाग म्हणून 18 सप्टेंबर रोजी नायगाव व हदगाव येथे ग्राहक मेळावा व रीकेवायसी कॅम्पचे आयोजन सर्व बँकांनी मिळून केले होते. या कार्यक्रमास भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी बँक खाते व त्याचे महत्व उपस्थित लाभार्थ्यााना समजून संगितले तसेच या मेळाव्याबाबतची भारतीय रिझर्व बँकेची भूमिका विषद केली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी सायबर सिक्युरिटी व ऑनलाईन बँकिंग करताना घ्यावयाची काळजी याबाबत विश्लेषण केले. तसेच स्टेट बँकेचे सरव्यवस्थापक यांनी नामांकन सुविधा व रूपे कार्ड याचे महत्व सांगितले.
या मेळाव्याच्या आयोजनात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण बँकेच्या नांदेड विभागात 65 शाखा असून नांदेडमध्ये असलेल्या 236 बँकमित्र (Business Correspondent) यांच्या मार्फत या मेळाव्याच्या निमित्ताने एक आठवड्यापासून अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत प्रत्येक शाखेने व बीसी यांनी ग्रामपंचायत स्तरावर मेळावे आयोजित केले व त्यामधून री-केवायसी व प्रधानमंत्री सुरक्षा योजनाची माहिती गावागावातील खातेदारांना दिली गेली. नांदेड जिल्ह्यात ग्रामीण बँकेचे एकूण 4.26 लाख खाते री-केवायसीसाठी पात्र होते. या एकाच दिवशी 24007 बँक खात्याचे री-केवायसी रिझर्व बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप कुमार यांचा मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले तर मागील आठ दिवसात मिळून 33,340 री-के वाय सी चे काम पूर्ण केले गेले त्यामुळे असे एकूण 1,11,998 रीकेवायसी ग्रामीण बँकेने पूर्ण केले आहे.
नांदेड जिल्ह्यात भारतीय रिजर्व बँकेचे वरिष्ठ अधिकारी येऊन जन धन बँक खाते व त्याला उपलब्ध असलेल्या सामाजिक सुरक्षा योजना यांची माहिती सांगतात. याबाबतीत बँक ग्राहकामधून जनजागृतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी राहिली आहे. या मेळाव्यानंतर देखील संदीपकुमार यांनी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी उपस्थित ग्राहकांच्या शंकाचे समाधान केले. या मुळे खऱ्या अर्थाने बँक आपल्या दरी आल्याची भावना ग्राहकांमध्ये दिसून आली.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहाय्यक
सरव्यवस्थापक व नियोजन वित्तीय समावेशन विभाग प्रमुख संतोष प्रभावती, भारतीय रिजर्व बँकेचे नांदेड जिल्ह्याचे लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर अरुण बाबू
यांनी मार्गदर्शन केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी लीड बँक मॅनेजर सोनकांबळे,
विभागीय व्यवस्थापक नरेंद्र खत्री, सहाय्यक
विभागीय व्यवस्थापक प्रशांत राठोड यांनी परिश्रम घेतले. शाखा
व्यवस्थापक सर्वश्री राजेश मंडलिक, आनंद मुनेश्वर, चन्द्रशेखर वनखेडे, दिपंकर पाटील, आशुतोष कांबळे, अजिंक्य देशमुख, भारत नाईक, मानव कांबळे, महादेव
पावणे इ. यांनी मदत केली.
0000
वृत्त क्रमांक 1006
मुख्यमंत्री माझी
लाडकी बहिण योजनेच्या
पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 24 सप्टेंबर :- जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांनी वेबपोर्टल http://ladakibahin.maharashtra.gov.in वर प्रत्यक्षात ई-केवायसीची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार अधिनियम 2016 च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने शासन अधिसुचनेनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेंअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमुद केले आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ईकेवायसी ekyc करावयाचे आहे.
लाडकी बहीण या योजनेचे त्याअनुषंगाने मुख्यमंत्री-माझी वेब पोर्टल http://ladakibahin.maharashtra.gov.in या वर सदरची e-KYC ची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिलेली आहे. ही प्रक्रिया मोबाईल वरुनही सोप्या पध्दतीने करता येते. सदर प्रक्रिया अत्यंत सोपी असून सहज व सुलभ असून महिला स्वतःचे मोबाईलवरूनही ही प्रक्रीया पुर्ण करु शकतील अशी प्रणाली शासनाने विकसित केली आहे.
त्यानुसार या वेब पोर्टलवर स्वतः लाभार्थ्यांना प्रत्यक्षात e-KYC बाबत करावयाची कार्यवाहीची सविस्तर तपशिल यासोबत देण्यात आला आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीनी e-KYC चालू अर्थिक वर्षात संबंधित महाराष्ट्र शासन परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 या दिनांकापासुन 2 महिन्यांच्या आत पुर्ण करणे बंधनकारक आहे. या कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी Aadhar Authentication केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.
या योजने अंतर्गत दरवर्षी जुन महिन्यापासुन 2 महिन्यांच्या
कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक राहील. अशा सुचना
शासन परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 अन्वये शासनाने दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन महिला व
बाल विकास विभागाचे परिपत्रक 18 सप्टेंबर
2025 मधील निर्देशानुसार
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांनी माहितीच्या फ्लोचार्ट
नुसार वेब पोर्टल वर http://ladakibahin.maharashtra.gov.in
या वर प्रत्यक्षात e-KYC बाबत कार्यवाही करण्याचे आवाहन
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000
वृत्त क्रमांक 1005
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आज घेणार आढावा
नांदेड दि. 24 सप्टेंबर :-राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे उद्या 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता सां.बा. नांदेड परिमंडळ, अधीक्षक अभियंता महावितरण नांदेड परिमंडळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद कृषी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी महसूल, कार्यकारी अभियंता, सां.बां विभाग नांदेड, कार्यकारी अभियंता महावितरण नांदेड, कार्यकारी अभियंता जलसंपदा नांदेड, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, नांदेड, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, सर्व तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, विषयाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तरी संबंधित अधिकारी यांनी या बैठकीस आवश्यक त्या माहितीसह उपस्थित राहावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
00000
वृत्त क्रमांक 1004
नांदेड जिल्ह्यासाठी 24 ते 26 सप्टेंबर या तीन दिवस यलो
तर 27 सप्टेंबर रोजी ऑरेज अलर्ट जारी
नांदेड दि. 24 सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २४ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २४, २५ व २६ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. तर २७ सप्टेंबर या दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. २४ व २५ सप्टेंबर २०२५ हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व २७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या गोष्टी करा
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
0000
वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...


.jpeg)


.jpeg)