Friday, January 26, 2024

 वृत्त क्र. 84

 

खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाचे

सर्वेक्षण ठरेल संपूर्ण देशातील आदर्श मापदंड

- राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे

 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वेक्षणाची आढावा बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाबाबत अचूक माहिती सर्वेच्या माध्यमातून यावी यासाठी राज्य मागासवर्ग आयोग दक्ष आहे. ग्रामपातळी पासून ते महानगरापर्यंत युद्धपातळीवर केले जाणारे सर्वेक्षण हे अचूक माहितीवर व प्रत्यक्ष घरोघरी जाऊन केले जात असल्याने याला अनन्य साधारण महत्त्व आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात व अत्यंत अल्पावधीत होणारा हा सर्वे संपूर्ण देशापुढे एक आदर्श मापदंड ठरणार असून यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि प्रगणक कटिबद्ध होऊन काम करीत आहेत या शब्दात राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी गौरव केला.

 

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण व विविध शासकीय योजना, धरण, प्रकल्प, सिलिंग कायद्याअंतर्गत झालेले जमीन अधिग्रहण याबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

नांदेड जिल्ह्यात मनपा क्षेत्रात महानगरपालिका सर्वेक्षण करत असून एकुण 920 प्रगणक यासाठी नेमले आहेत. 16 अधिकारी यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. नगरपरिषदा, ग्रामीण भागात सर्वेक्षणाचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असून यासाठी एकुण 3 हजार 905 प्रगणक व इतर मनुष्यबळ कार्यरत आहेत. काही तांत्रिक अडचणी जशा समोर येत आहेत त्या तात्काळ दूरही केल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यात बराचसा भाग दूर्गम व डोंगराळ भागात असल्याने त्याठिकाणी कव्हरेजचा प्रश्न असून त्यावर मात करून हा सर्वे पूर्ण केला जात आहे. सर्वेक्षण करतांना जर कोणाचा फोन आला तर तो उचलल्यास पुन्हा पहिल्यापासून काही मोबाईलवर सर्वे करण्याची गरज निर्माण होत आहे. हे लक्षात घेता ऑनलाईन सर्वेक्षण सुरू असतांना कॉल न घेता सर्वे पूर्ण झाल्यावर संवाद साधावा, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्याचा एकत्रित विचार करून सर्व प्रश्न व सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर केल्या जात असल्याचे प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी सांगितले.

00000







वृत्त क्र.  83 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते

मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण

 

·         भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

·         सगरोळीच्या अश्व पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

·         राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव 

नांदेड (जिमाका), दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वरिष्ठ अधिकारी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिकांची उपस्थिती होती. 

ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यात पोलीस निरीक्षक माणिक बेंदरे, होमगार्ड कार्यालयाचे राम बाळकृष्ण पिंजरकर व अरुण तेजराव परिहार यांचा पदक, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलीस विभागाकडून उत्कृष्ट तपास कार्य करण्यात आलेल्या पोलीस उप अधीक्षक सुशील नायक, श्वान शेरु, बालाजी अंबलवाड, गजानन पल्लेवाड, रमेश शंकरराव खाडे यांचा पदक, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा कारागृह विभागातील महिला शिपाई श्रीमती अर्चना डाखोरे यांचा उल्लेखनिय कार्य केल्याबाबत प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. 

कौशल्य विभाग, रोजगार, उद्योजगता व नाविण्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टूंडट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात एमजीएम कॉलेज ऑफ कॅम्प्युटर सायन्स ॲड टेक्नालॉजीचे मनोज विजयकांत वसमतकर, रुतुज राजेश देवडवार, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टीट्युटचे साईनाथ नामदेव आरसुळे, रोहित सुनिल पाईकराव, श्रीनिवास माळवदकर, शेख फिरदोस बशिर, एमजीएम महाविद्यालयाचे वरद उमेश जिंतुरकर, यश संजय महाजन, शिवप्रसाद फार्मसी महाविद्यालयाच्या श्रीमती गीता माणिकप्रभू बिजलवाड यांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यावेळी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत नायगाव तालुक्यातील सीएससी, मिनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट, कहाळा चे उद्योजक विजय विश्वांभर पांचाळ यांना प्रथम पुरस्कार स्मृती चिन्ह, पुष्पगुच्छ आणि 15 हजार रुपयांचा धनादेश तर नांदेड तालुक्यातील समर्थ इंडस्ट्रीज, खुपसरवाडी येथील उद्योजक संतोष गंगाधरराव अमिलकंठवार यांना द्वितीय पुरसकार स्मृती चिन्ह, पुष्पगुच्छ आणि 10 हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

सगरोळी येथील सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले. यात अश्व पथकाने केलेल्या संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत व मराठवाडा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. 

यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप व परेड कमांडर विजय कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस बल, सशस्त्र सीमा बल, जलद पतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, उपविभाग नांदेड शहर पथक, पोलीस शहर वाहतुक पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक, राष्ट्रीय छात्रसेना, सैनिकी शाळा, स्काऊट पथक, एसपीसी प्लाटून मनपा हायस्कूल, केंद्रीय विद्यालय एसपीसी पथक, पोलीस बॅन्ड पथक, अश्व पथक, डॉग स्काड, मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, अग्नीशामक वाहन, 108 रुग्णवहिका, पोलीस विभागास प्राप्त नवीन वाहने बोलरो निओ यांचा पथसंचलनात सहभाग होता.

000000

छायाचित्र: पुरुषोत्तम जोशी, सदा वडजे



















 

Thursday, January 25, 2024

वृत्त क्र. 82

 नांदेडचा मानबिंदू असलेला पक्षी कोणता ?

▪️निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्वेमध्ये सहभाग घ्या 
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, आसना, मन्याड, लेंडी सारख्या नद्यांच्या काठावर विविध पक्षांचा अधिवास आपण पाहतो. जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि पानथळ भागात प्रामुख्याने तांबट, वेडा राघू, भारतीय नीलपंख, चित्रबलाक, काचाक्ष, पिंगलाक्ष, सुगरन, विनकर, जांभळा सूर्यपक्षी, लाल मनोली पोपट, ठिपक्यांची मनोली, कवडा खंड्या हे पक्षी आढळतात. या पक्षांमधून नांदेडचा मानबिंदू असलेल्या पक्षाची सर्वांनुमते निवड व्हावी व जिल्ह्याला नवीन ओळख मिळावी यादृष्टिने पक्षीमित्रांनी असा निवडीबाबत आग्रह धरला आहे. ही निवड सर्वांनुमते व्हावी यादृष्टिने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://nanded.gov.in/bird-of-nanded-
या संकेतस्थळावर प्रातिनिधिक पक्षी निवडीसाठी ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व नांदेड जिल्हाप्रेमींनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 81

 जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन 

नांदेड (जिमाका) दि. 25  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.  

 

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

 

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

00000 

वृत्त क्र. 80

 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई

§  ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दरवर्षी 26 जानेवारी,15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

0000

वृत्त क्र. 79

 पशुधनाची ऑनलाइन टॅगिंग व नोंदणी करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासन निर्णयानुसार दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रती लिटर 5 रूपये अनुदान देय आहे.  पात्र पशुधनास कानात टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावशक आहे. त्यानुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्था मार्फत पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. सर्व पशुपालक / शेतकरी यांनी आपल्या सर्व  पशुधनास टॅगिंग व ऑनलाईन नोंदणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे  उपायुक्त राजकुमार पडिले यांनी केले आहे.

 

पशुधनास टॅगिंग व नोंदणी शेतकरी / पशुपालक यांच्याकडून उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत  असून आज अखेर पुढीलप्रमाणे अतिरिक्त नोंदणी करण्यात आल्या. पशुधन नोंदणी 5.73 लक्ष, पशुपालक नोंदणी 1.96 लक्ष, पशुपालक हस्तांतरण नोंदणी 3.20 लक्ष, पशुधनाच्या नोंदीत बदल 1.84 लक्ष, कानातील टॅग बदल नोंदी (टॅग बदल) -5 हजार 795, पशुपालकांच्या नावातील बदल 0.50 लक्ष. तसेच अतिरिक्त 56 लक्ष टॅग नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील सर्व पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्याचे कामकाज अभियान स्वरुपात राबविण्याबाबत शासन स्तरावरुन सूचित केले आहे.

 

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...