Tuesday, October 25, 2022

 जिल्ह्यातील 1982 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 166 बाधित गावात सद्यस्थितीत 1 हजार 982 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 74 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 822 गावांवर विशेष लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार 183 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

000000

Sunday, October 23, 2022

 गोरगरिबांची दिवाळी गोड करता आली याचे समाधान

- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

·       शिधा पोहचविण्यासाठी प्रशासन अहोरात्र घेत आहे परिश्रम - आमदार बालाजी कल्याणकर

·       जिल्ह्यातील 5 लाख 97 हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यातील गोरगरिबांच्या घरीही दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिधा ही विशेष योजना राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहचविण्यात यश मिळविले आहे. स्वस्त धान्य दुकानातून जे लोक धान्य घेतात त्यांना अवघ्या शंभर रुपयात 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ व 1 लिटर पामतेल असे किट शासनाने उपलब्ध करून दिले. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचविले जात आहे. जिल्ह्यातील या आनंदाचा शिधा वाटपाचा प्रातिनिधीक शुभारंभ करतांना आत्मिक समाधान व आनंद आहे. गोरगरीबांच्या घरातही महाराष्ट्र सरकारने दिवाळीची दिलेली ही गोड भेट असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. 

नांदेड येथील आनंदनगर परिसरातील रास्त भाव दुकान क्र. 89 येथे यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार किरण अंबेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना सारख्या आव्हानात्मक काळातही केंद्र सरकारने गोरगरीबांच्या घरी धान्य पोहचेल याची काळजी घेतली. सर्व खासदारांचा निधी हा लोककल्याणासाठी आणि विशेषत: जनतेच्या आरोग्याच्या सुविधेवरच प्राधान्याने खर्च करण्यात आल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. 

आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. या विस्तारात वाड्या-पाड्यांपर्यंत ही आनंदाची शिधा वेळेत पोहचविण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आमच्या सर्व बांधवांच्या घरी ही गोड दिवाळी भेट पोहचविली जात आहे. वाहतुकीच्या अडचणीमुळे जर कुठे अडथळा झाला तर प्रशासनाने त्यावर तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

आनंदाचा शिधा हा अत्यंत महत्वाकांक्षी व लोककल्याणाच्या दृष्टिने आवश्यक असा निर्णय शासनाने घेतला. ऑनलाईन नोंदणीसाठी यात असलेला अडसर लक्षात घेता शासनाने तो दूर केला असून आनंदाचा शिधाचे वाटप आता युद्धपातळीवर पूर्ण होईल यात शंका नाही. अनेक तालुक्यांसाठी सद्यस्थितीत चारही वस्तु प्राप्त असून काही तालुक्यांसाठी एखादी राहिलेली वस्तू तीही तात्काळ पोहचविली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

साखर, रवा, चणाडाळ, पामतेल या वस्तु असलेले आनंदाचा शिधाचे किट खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात द्रोपदाबाई शिवाजी पिंगलवाड, संतोष चांदू साबळे, जयश्री गंगाधर मोकनपिल्ले, पारुबाई गायकवाड, चंद्रकलाबाई सोनसळे यांना देण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे 2 हजार रेशन दुकानांद्वारे 5 लाख 97 हजार 812 शिधापत्रिकाधारकांना ही आनंदाची शिधा वाटप केली जात आहे.

000000









Saturday, October 22, 2022

 शेतकऱ्यांपर्यंत बदलत्या पीक पद्धतीचे नियोजन पोहचणे आवश्यक

 -  जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- पोकरा योजनेअंतर्गत शेती आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विहिरी मिळाल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून केळी, हळद, फळे, भाजीपाला पिकांचे नियोजन करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि अधिकाऱ्यांनी बाजारपेठे संदर्भातही शेतकऱ्यांत जागृती करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

 

कृषि विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी नुकताच आढावा घेतला. या आढावा बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदेजिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचकेश्रीमती माधुरी सोनवणे प्रकल्प उपसंचालकआत्मातसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारीसर्व तालुका कृषि अधिकारीनिवडक शेतकरी गटाचे प्रतिनिधी व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

अलिकडल्या काळात सेंद्रीय व नैसर्गिक शेती करणाऱ्या अनेक शेतकरी आपल्या शेतात उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करून बाजारपेठेशी जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शेतकऱ्यांना बाजारपेठ व त्यांचा व्यवसाय अधिक सुकर व्हावा, ज्या व्यक्तींना असे नैसर्गिक उत्पादन हवे आहे त्या ग्राहकांशी थेट जोडल्या जाता  यावे यादृष्टिने विद्यापीठ स्तरावर (इनक्यूबेशन सेंटर) एक स्वतंत्र केंद्र असून तेही मदतीला तत्पर आहेत. यांच्याशी समन्वय साधणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

 

यावेळी जिल्ह्यातील निवडक सेंद्रीय / नैसर्गिक शेती करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आपल्या उत्पादनांची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांना दिली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रात्यक्षिकात नांदेड तालुक्यातील मौजे पिंपरी महिपाल या गावातील आशाबाई बाबुराव चंदेल, सयाबाई शिवाजीराव सूर्यवंशी यांना  हरभरा प्रकल्प बियाणे किट प्रतिनिधीक स्वरूपात वाटप केले. मौ. खडकुत येथील शहाजी बळीराम कंकाळ व प्रभु जैयवंता कंकाळ यांना करडई मिनिकिट वाटप करण्यात आले.  

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानकृषि यांत्रिकीकरण योजनाराष्ट्रीय शाश्वत शेती योजनाप्रधानमंत्री कृषि सिंचन योजनानानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा)मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पप्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) आदी योजनेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना 100 टक्के अनुदानाच्या ज्या योजना असतील त्यात प्राधान्याने सहभागी करून घ्यावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी दिल्या.

00000



 संयुक्त राष्ट्रसंघ दिन संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वज समवेत उभारावा  

नांदेड (जिमाका) दि. 22 :- संयुक्त राष्ट्रसंघ दिन 24 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजासमवेत उभारण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्देश दिले आहेत. ज्या शासकीय कार्यालयात दररोज राष्ट्रध्वज उभारण्यात येतो त्या कार्यालयावर 24 ऑक्टोंबर या संयुक्त राष्ट्रसंघदिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज भारतीय ध्वज संहिता 2002 च्या परिपत्रकानुसार राष्ट्रध्वजाच्या बरोबर उभारण्यात यावा. 

 

संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही बाजुला फडकविता येतो. सामान्यत: ध्वजस्तंभाच्या समोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्यादृष्टीने त्यांच्या अगदी डावीकडे राष्ट्रध्वज असावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.

00000

Friday, October 21, 2022

 आधारभूत किंमत खरेदी योजनेत नोंदणी

करण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 21 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान/भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी गुरुवार 10 नोव्हेंबर 2022  पर्यन्त मुदतवाढ दिलेली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 

नोंदणीसाठी चालू हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड व शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचा आहे.

00000

 निवृत्तीवेतन धारकांना पेन्शन मिळण्यासाठी

बँकेतील कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी किंवा अंगठा आपल्या नावासमोरच्या रकान्यात करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून बँकांना अद्याक्षर निहाय यादी पाठविण्यात आली असून ही स्वाक्षरी दिनांक 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत करावीअसे आवाहन कोषागार अधिकारी अभय चौधरी यांनी केले आहे.

 

याचबरोबर बायोमॅट्रीक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखल करण्याकरिता http://jeevanpramam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सादर  करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदरील यादीत जर कोणी स्वाक्षरी  किंवा अंगठा उमटवलेला नसेल अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर 2022 चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाहीयाची नोंद घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 दिवाळी सणानिमित्त नवीन वाहन नोंदणीसाठी

सुट्टीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- दिवाळी सणानिमित्त नवीन वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय शनिवार 22 व रविवार 23 ऑक्टोंबर 2022 रोजी नवीन वाहन नोंदणी व कर वसुली कामकाजासाठी सुरु राहणार आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000  

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...