Tuesday, September 27, 2022

 सेवा पंधरवडा निमित्त तृतीयपंथीयांना

मतदान ओळखपत्राचे वितरण

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- शासनामार्फत देण्यात येत असलेल्या सेवा नागरिकांपर्यंत कालमर्यादेत पोहोचविण्यासाठी 'सेवा पंधरवाडा' उपक्रम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्त आज 32 तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच तृतीयपंथीय यांची नॅशनल पोर्टलवर नाव नोंदणी करण्यात आली.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड  आणि कमल फाउंडेशन नांदेड व राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वझर, ता. मुखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने तृतीयपंथीयाच्या सर्वतोपरी विकासासाठी सांगवी येथे गौरी बकस यांच्या निवासस्थानी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

 

यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. तेजस माळवदकर , समाज कल्याणचे श्री. दवणे , कमल फाउंडेशन नांदेड अध्यक्ष अमरदीप गोधने, वझर येथील राजा रामभाऊ उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुनिता सदाशिव शिंदे, तृतीयपंथांच्या गुरु गौरी बकास व  तृतीयपंथी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0000 




 गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेतील

अर्जाच्या त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 27 :-  गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेचे सन २०२२-२३ या वर्षातील अर्ज कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे. सदर पात्र अर्ज, त्रुटी पूर्तता अर्ज व अपात्र अर्ज याची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. अर्जदारांनी यादीनुसार 14 ऑक्टोंबर 2022 पर्यंत त्रुटीतील कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

0000

Monday, September 26, 2022

 कोविडसह इतर संकटे कायमचे दूर होऊ दे

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रार्थना

शारदीय नवरात्र महोत्सवास माहूरगडावर उत्साहात प्रारंभ

नांदेड (जिमाका) दि. 26 :- गत दोन वर्षे कोविड-19 मुळे अनेक धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने काही निर्बंध आपल्याला पाळावे लागले. व्यापक लसीकरण आणि नियोजनातून कोविडवर आपल्याला मात करता आली. यावर्षी पासून सर्व धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाले असून कोविडसह जे काही आरोग्याची संकटे आहेत ती कायमची दूर व्हावीत अशी प्रार्थना मी श्री रेणुकादेवीच्या चरणी केल्याची भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली. माहूरगडावर श्री रेणुकादेवीची सपत्निक पुजा आज त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह संस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना

आज दिनांक 26 रोजी श्री रेणुकामातेची वैदिक महापुजा व घटस्थापना संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे सचिव किर्तीकिरण एच. पुजार हेही सपत्निक पूजेत सहभागी झाले. याचबरोबर कुमारीकापुजन, सुहासिनीपुजन, प्रथेप्रमाणे गणेशपुजन, कलशपुजन, पुण्याहवाचण, मातृकापुजन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष विजय डोंगरे, तहसिलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, अरविंद देव, अशिष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढील दहा दिवस प्रथेप्रमाणे पुजेसह विविध कार्यक्रमांचेही माहूरगडावर आयोजन करण्यात आलेले आहे. भक्तांना ऑनलाईन दर्शन व विविध कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती संस्थानच्यावतीने करून देण्यात आली आहे. shrirenukadevi.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
0000








 उद्योजकांसाठी कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यातील उद्योजकांसाठी निर्यात गुंतवणुक वृध्दी कार्यक्रम निर्यात प्रचलन तसेच एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळा गुरुवार 29 सप्टेंबर व प्रदर्शन  गुरुवार 29 व शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत जिल्हा उद्योग केंद्र (उद्योग भवन), औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे होईल. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी या कार्यशाळा व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

निर्यातदार उद्योग घटकांना लागणाऱ्या आवश्यक बाबी जसे विविध परवानग्या नोंदणी व विविध योजना या बाबींची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी डीजीएफटी (DGFT) व  एपीइडीए (APEDA) या संस्थेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच निर्यात संबंधी येणाऱ्या अडचणी, तसेच उद्योग विभागाचे सहकार्याने उद्योग सुरु केलेल्या उद्योजकांचे उत्पादनांचे प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे, असेही जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कळविले आहे.

0000

 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान

योजनांसाठी अर्ज करण्यास 28 ऑक्टोंबरपर्यत मुदत 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी इच्छूकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत व आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 28 ऑक्टोंबर 2022 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी गो. इंगोले  मुंबई यांनी केले आहे. 

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या समान व असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. समान व असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार 2022-23 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. 

सन 2022-23 साठीच्या समान निधी योजना (Matching scemes) पुढील प्रमाणे आहे. इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना, टिप :- उपरोक्त योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामूळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.  सन 2022-23 साठीच्या असमान निधी योजना (Non Matching scemes) पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

 नांदेड जिल्ह्यात 104 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित

*      2 लाख 35 हजार 853 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 104 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. सोमवार दिनांक 26 रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन 34 हजार 238 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 2 लाख 35 हजार 853 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 21 गावे लम्पी बाधित आहेत. या 21 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 10 हजार 266 एवढे आहे. यातील 104 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 141 एवढी आहे. एकुण गावे 162 झाली आहेत. या बाधित 21 गावांच्या 5 किमी परिघातील 162 गावातील (बाधित 21 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 59 हजार 138 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 8 एवढी झाली आहे. उपलब्ध लसमात्रा 2 लाख 60 हजार एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

000000

Sunday, September 25, 2022

 नांदेड जिल्ह्यात 100 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित*

▪️2 लाख 1 हजार 615 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण
नांदेड (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 100 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. रविवार दिनांक 25 रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन 59 हजार 870 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 2 लाख 1 हजार 615 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.
लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
आजच्या घडिला नांदेड जिल्ह्यातील 21 गावे लम्पी बाधित आहेत. या 21 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 10 हजार 266 एवढे आहे. यातील 100 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 141 एवढी आहे. एकुण गावे 162 झाली आहेत. या बाधित 21 गावांच्या 5 किमी परिघातील 162 गावातील (बाधित 21 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 59 हजार 138 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 5 एवढी झाली आहे. उपलब्ध लसमात्रा 2 लाख 60 हजार एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...