Monday, June 27, 2022

रासायनिक खतांची खरेदी व निविष्ठांची लिकिंग

किंवा सक्ती होत असल्यास तक्रार नोंदवावी

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि.27:- जिल्हयात सध्या खरीप हंगाम पेरणीचे कामे सुरु आहेत. शेतकरी खते बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत चाचपणी करीत आहेत. जर रासायनिक खत खरेदी सोबत घाऊक खत विक्रेते शेतकऱ्यांना तसेच किरकोळ विक्रेत्यांना इतर निविष्ठांची सक्ती करीत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तात्काळ तक्रार नोंदवावी. तसेच जिल्हा तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक 9673033085 (व्हॉटसप क्रमांक) व 02462-284252 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

बाजारपेठेत आज स्थितीत जिल्हयात किरकोळ कृषि सेवा केंद्र धारकाकडे खालील प्रमाणे खत साठा उपलब्ध आहे. युरीया 18360 मे.टन, डीएपी 2481 मे.टन, एमओपी 1676 मे.टन, संयुक्त खते 14411 मे.टन, एसएसपी 8634 मे.टन असे एकूण 45 हजार 562 मे. टन साठा खत साठा शिल्लक उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी गरजेनुसार व कृषि विद्यापिठ यांच्या शिफारस मात्रेनुसार पिकांना लागणाऱ्या खतांची खरेदी करावी. एकात्मिक अन्न व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट खतांचा संतुलीत वापर करावा. विद्यापिठाने शिफारस मात्रेनुसार खत नियोजन करते वेळेस कमी खर्चात खतांचे नियोजन होईल याची काळजी घ्यावी. एकाच कोणत्याही खताची आग्रह न धरता उपलब्ध खतापासुन पिकास शिफारस मात्रेप्रमाणे खताचा वापर करावा असेही आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

 गावठाणापासून 200 मीटरच्‍या आतील

जमीन मालकांना अकृषिक परवानगीची आवश्‍यकता नाही

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि.27 :-जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठी आवश्‍यक परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि कार्यप्रणालीत सुलभता आणण्‍यासाठी शासनाने महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42-ब, 42-क,42-ड समाविष्‍ट केले आहे. या कलमान्‍वये अकृषिक आकारणी व रूपांतर कर भरणा केलेले चलन किंवा पावती ही विकास योजनेत दर्शविलेल्या वापरामध्‍ये अकृषिक झाल्‍याचे पुरावा म्‍हणून ग्राहय धरण्‍यात येईल. त्‍याबाबतीत आणखी कोणताही पुरावा आवश्‍यक असणार नाही. नागरीकांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर केले आहे. 

ज्‍या ठिकाणी प्रारूप/अंतिम विकास योजना आणि प्रारूप/अंतिम प्रादेशिक योजनेमध्‍ये प्रसिध्‍द केलेल्‍या गटातील क्षेत्रात विकास योजनेनुसार वापर निश्चित असलेल्‍या प्रयोजनासाठी तसेच गावठाणापासून 200 मीटरच्‍या आतील समाविष्‍ट गटांच्‍या जमीन मालकांना अकृषिक परवानगीची आवश्‍यकता असणार नाही. नांदेड जिल्‍हयातील प्रारूप/अंतिम विकास योजना,अंतिम प्रादेशिक योजनेमध्‍ये प्रसिध्‍द केलेल्‍या विकास योजनेनुसार वापर निश्चित असलेल्‍या स.नं/गट नं.ची यादी संबधित कार्यक्षेत्रातील तहसिलदार व तलाठी कार्यालयात तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या nanded.nic.in या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. गावठाणाच्‍या कलम 122 खालील घोषीत हद्दीपासून वापर निश्चित असलेल्‍या जमीनीचे स.नं./गट नं. च्‍या यादया तयार करून संबधित गावातील तलाठी यांचेमार्फत जमीन मालकांना अकृषिक आकारणी व रूपांतर कर भरणा करणेकामी नोटीसा लवकर पाठविण्‍यासाठी तहसिलदार यांना सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. 

नांदेड जिल्‍हयामधील प्रारूप/अंतिम विकास योजनेमध्‍ये आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्‍ये तसेच गावठाणापासून 200 मीटरच्‍या आतील समाविष्‍ट असलेल्‍या स.नं./गट नं. मधील जमीन मालकांनी स्‍वतः संपर्क साधून संबधित कार्यक्षेत्रातील तहसिल किंवा तलाठी कार्यालयात अकृषिक आकारणी व रूपांतर कर रक्‍कमेचा भरणा करावा. त्‍यानुसार केवळ अकृषिक आकारणी व रूपांतर कर रक्‍कमेच्‍या भरलेल्‍या पुराव्‍यावरून विकास अथवा बांधकाम परवानगी नियोजन प्राधिकरणाकडून दिली जाणार आहे असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित  

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  15 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 851 एवढी झाली असून यातील 1 लाख 136 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 2 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण  3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 18, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2 असे एकुण 23 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 7 हजार 405

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 87 हजार 237

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार851

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 136

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

0000

Saturday, June 25, 2022

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित   

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  50 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे कंधार येथील 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 846 एवढी झाली असून यातील 1 लाख 131 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 7 हजार 252

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 87 हजार 91

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 846

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 131

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 कृषी संजीवनी मोहिमेचा लोंढेसांगवी येथे शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कृषि विभाग  व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत कृषि संजीवनी सप्ताह-2022 चा शुभारंभ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या हस्ते सोयाबीनची बीबीएफ पद्धतीने पेरणी करून लोहा तालुक्यातील लोढेसांगवी या गावात करण्यात आला. मूल्य साखळी  दिनानिमित्त मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) समुदाय आधारीत संस्थाची मूल्यसाखळी विकास शाळा खरीप हंगाम सन 2022 अंतर्गत गोविंद प्रभू शेतकरी उत्पादक कंपनी लि. लोंढे सांगवी येथे आयोजित करण्यात आली. यावेळी बीज प्रक्रिया व जागर तंत्रज्ञानाचा अंतर्गत बीबीएफवर पेरणी करण्यात आली.  

 

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक नांदेड चलवदे,  प्रकल्प उपसंचालक आत्मा श्रीमती माधुरी सोनवणे , लोहा तालुका कृषि अधिकारी अरून घुमनवाड,  आत्माचे  तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल या सर्वांनी कृषि संजिवनी सप्ताह विषयी मार्गदर्शन केले. रोहित कंपनीचे  व्यवस्थापक टोंपे यांनी बीबीएफ यंत्राची सविस्तर माहिती दिली. सौ. लक्ष्मीबाई मारोती लोंढे यांच्या शेतावर बि.बि.एफ.द्वारे पेरणी करण्यात आली.  गोविंद प्रभु या  शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मारोती किशन लोंढे, संदीप रामजी लोंढे, दिगांबर गुणाजी लोंढे, विठ्ठल कदम, सौ.रेखा व्यकंटी लोंढे व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित  होते.

000000



यशकथा

 सुधारित यशकथा- 

लालू वाघमारेच्या विहिरीत जेंव्हा ढग उतरतात ! 

नांदेड येथून तेलंगणातल्या निजामाबादकडे जाण्याचा रेल्वे मार्गावर धर्माबाद शहर लागते. शारदा देवीच्या बासर रेल्वे स्थानकाच्या आगोदरचे रेल्वे स्थानक म्हणजे धर्माबाद. तेलंगणाच्या काठावर हा तालुका असल्याने स्वाभाविकच इथल्या देहबोलीत तेलंगणाचा अधिक प्रभाव दिसून येतो. धर्माबाद तालुक्याला गोदावरी नदीचे वरदान तर आहेच. याहीपेक्षा येथील बाभळी बंधाऱ्याने कृषि क्षेत्राला संपन्नता दिली आहे. धर्माबाद हे मिरचीच्या व्यापारासाठीही प्रसिद्ध आहे. इथली जमीन आणि पाणी सर्वांच्याच वाट्याला मुबलक आहे असे मात्र नाही. 

लालू संभाजी वाघमारे हा मुबलक पाणी आणि चांगल्या जमिनीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांपैकी एक. धर्माबाद येथून अवघ्या 10 कि.मी. पेक्षा कमी अंतरावर असलेल्या येताळा येथील शेतकरी. महाविद्यालयीन शिक्षण घेत शेतीचा छंद व आवड त्याने प्रामाणिकपणे जपली आहे. आपल्या कुटूंबातील 7 व्यक्तींचा संसार वाघमारे कुटूंब या शेतीवर चालवतात. येथील सर्वे नंबर 505 मधील 0.80 हेक्टर जमीन चांगली कसून याच जमिनीवर प्रगती साध्य करण्याचे स्वप्न लालू याने बाळगले. वडिलांना शिक्षणाचे मोल अधिक समजलेले असल्याने त्यांनी मुलांना शिक्षणासाठीचा आग्रह धरला. या आग्रहातून शेतीतूनच त्याची बहिण पशु वैद्यकीय विषयातले पदव्युत्तर शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. इतर भावडांनी शिक्षणाचा कित्ता गीरवत शेतीशी नाळ मात्र तुटू दिली नाही. 

शिक्षणामुळे त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेचा लाभ घेण्याचे ठरविले. कृषि विभागाशी रीतसर संपर्क केला. कृषि विभागाने त्याच्या सात/बारावर असलेली जमीन नीट अभ्यासून घेतली. या शेतीला पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाल्या शिवाय पर्याय नाही हे ओळखून त्यांनी त्याच्या शेतातील विहिरीची जागा आखून ठेवली. कृषि विभागाने सर्व कागदपत्रांची जुळवा-जुळव करीत लालू वाघमारे याला एक सिंचन विहिर मंजूर करून दिली. 

विहिरीचे खोदकाम व बांधकाम त्यांनी स्वत: लक्ष देऊन करून घेतले. ही योजना घेण्यापूर्वी ते फक्त खरीप पिके घेत होते. या योजनेतून त्यांना नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार, विद्युत कोटेशनसाठी 10 हजार रुपये विद्युत मोटरसाठी 20 हजार रुपये असे अनुदान त्यांना मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेअंतर्गत आता शेतीसाठी समृद्धीचा मार्ग मोकळा झाला. 

महाराष्ट्र दिनी एका आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांना लवकरात लवकर अशा विहिरीच्या निर्मितीचे काम लवकर कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. धर्माबाद येथील अधिकाऱ्यांनी याबाबत चाचपणी करून लालूच्या विहिरीच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी केले. अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत लालू वाघमारे व परिवाराने ही विहीर शर्तीने पूर्ण करून दाखविली. 

आज 25 जून रोजी पुरेशा पाऊस झालेला नसतांनाही लालूच्या शेतातील विहिरीने आपल्या पाण्यावर पाऊसाचे ढग उतरले आहेत. या पाण्यावर फळबाग आणि भाजीपाला लागवड करण्याचा मनोदय लालू बाळगून आहे. सामाजिक न्यायाच्या प्रवाहात वंचित, अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना आणता यावे यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. यात कृषी क्षेत्रासह शेतीपूरक उद्योगाच्या योजना आहेत. लाभार्थ्याच्या पात्रतेनुसार वंचित घटकातील आपल्या बांधवांना अधिकाधिक न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. येतळा येथील लालू संभाजी वाघमारे हे असंख्य लाभाधारकांच्यावतीने अभिव्यक्त झालेले एक प्रतीक आहे.   

या योजनेसाठी असे आहे अनुदान

या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (बिरसामुंडा कृषि क्रांती योजना) (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

 पात्रता

लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.  लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे. जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी. उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

नवीन विहीर याबाबीकरीता : सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र, 7/12 व 8-अ चा उतारा, तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत), लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र. (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर),अपंग असल्यास प्रमाणपत्र,तलाठी यांचेकडील दाखला- सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत) ; विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला. कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र गटविकास अधिकारी यांचे शिफारसपत्र,ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह). ग्रामसभेचा ठराव. 

शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता :

सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ). जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा. तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत).ग्रामसभेची शिफारस/मंजूरी. शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह).विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र.प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे. 

-        विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड








Friday, June 24, 2022

 मध केंद्र योजनेतील (मधमाशापालन) पात्र व्यक्ती / संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) कार्यान्वित झालेली असून पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, औद्योगिक वसाहत उद्योग भवन, एमआयडीसी एरिया शिवाजीनगर नांदेड यांचा दुरध्वनी क्रमांक 02462-240674 या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

 

या योजनेचे वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. मध्य उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संर्वधनाची जनजागृती करणे. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रता अर्जदार दहावी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 


केंद्रचालक संस्था यांची पात्रतेत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची किंवा भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी निवड प्रक्रीयेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी स्पष्ट केले आहे. 

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...