Tuesday, June 7, 2022

 नांदेड जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोना बाधित 

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 139 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे  1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 804 एवढी झाली असून यातील 1 लाख 109 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 3 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 असे एकुण 1 कोरोना बाधित आढळला आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 2 असे एकुण 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 3 हजार 826

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 83 हजार 375

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 804

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 109

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळा, मदरसामध्ये

शिक्षण योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- केंद्रपुरस्कृत अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळा व मदरसामध्ये शिक्षण योजना एसपीक्यूईएमएम व  आयडीएमआय  या योजना येतात. या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळांसाठी पायाभूत विकास योजना व मदरसातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आर्थिक तरतूद मागणीचे प्रस्ताव गुरुवार 30 जून 2022 पर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद नांदेड  कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

00000

 कौशल्य साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा

-  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

· रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या युवकांची पहिली तुकडी पुणे येथे रवाना

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- शैक्षणिक गुणवत्तेसमवेत कौशल्याची जोड असेल तर रोजगाराच्या संधी अधिक विस्तारतात. प्रत्येकाने आपल्या कुशल कौशल्यातून ओळख निर्माण करावी व नाविण्यपूर्ण कामावर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.

 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या 90 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना पुणे येथे आज प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा समन्वयक इरफान खान, परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक परमेश्वर राजबिंडे, कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत कंपनीच्या प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी भविष्यात असे रोजगार मेळावे घेतले जातील. जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी केले.  

 

स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 1 जून 2022 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यात एकुण 9 नामांकीत कंपन्यानी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत महिंद्रा अँड महिंद्रा, पुणे या कंपनीसाठी एकुण 367 एवढया विद्यार्थ्यांची मुलाखत घेवून 90 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. या कंपनीमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महिंद्रा अँड महिंद्रा (प्रा.लि.) चाकण पुणे येथे कंपनीच्या वाहनातून जाण्याची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  

0000








Monday, June 6, 2022

 छत्रपती शिवरायांचा लोक कल्याणकारी

समृद्व वारसा जपण्यासाठी कटिबध्द होवू

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

शिवस्वराज दिन उत्साहात साजरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्वार्थाने सुराज्य होते. प्रजेच्या कल्याणाचा वसा त्यांनी आयुष्यभर जपला. बहुजन हिताय, बहुजन सुखाय याची प्रचिती रयतेने अनुभवली. लोक कल्याणाचा, शेतकरी, कष्टकरी, बहुजनाच्या हिताचा समृद्व वारसा ग्रामीण भागापर्यत या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने पोहचवित आहोत. या दिनाच्या निमित्ताने सर्वानी प्रेरणा घेत लोककल्याणाप्रती कटिबध्द होण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभ संदेशात केले.


 

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज शिवस्वराज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे व मान्यवरांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात आले. यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले.


जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मनपाचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशान विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कृषी अधिकारी टि.जी. चिमनशेट्टे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 


छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत आहेत. आई जीजाऊच्या मार्गदर्शनाखाली बालपणापासूनच त्यांनी शौर्याचे धडे गिरवत स्वराज्याचे तोरण बांधले. हे राज्य सुखी व्हावे, हे राज्य रयतेचे व्हावे यासाठी त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे 6 जून 1674 रोजी स्वराज्याचे तोरण बांधले. एका समृध्द्व नितीचा, जनकल्याणाचा वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हा वारसा प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत, पंचायत समिती मार्फत, जिल्हा परिषदेमार्फत आपण आज सर्वांपर्यत अप्रत्यक्षरित्या पोहचवित आहोत. या दिनापासून आपण सर्वजण प्रेरणा घेवू या शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शुभेच्छा दिल्या.    

याप्रसंगी शाहीर रमेश गिरी व संचानी महाराष्ट्र गीत सादर केले. फत्तेपुर येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

000000

Sunday, June 5, 2022

 विशेष लेख : 

गावोगावी पोहचावी

“शिवस्वराज्य दिना” ची प्रेरणा

 

6 जून 1674 शिवराज्याभिषेक दिन

आजच्या पवित्र दिवशी म्हणजेच 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर स्वराज्याभिषेक झाला. हा स्वराज्याभिषेक केवळ रायगड किल्ल्या पुरता मर्यादित नव्हता. हा स्वराज्याभिषेक महाराष्ट्राच्या दऱ्या-कोपऱ्यात सर्वसामान्यांच्या मनात, प्रजेच्या मनात असलेल्या आवडत्या राज्याचा स्वराज्यभिषेक होता. हा राजा प्रत्येक रयतेला आपला वाटत होता. तो त्यांच्या नि:पक्ष भूमिकेमुळे. हा राजा प्रत्येकाला आपला वाटत होता तो त्यांच्या लोकल्याणकारी दूरदृष्टीमुळे.

 

लोककल्याणकारी राज्यासाठी कटिबद्धता

रयतेला, प्रजेला, बहुजनांना हे राज्य आपले आहे, अशी विश्वासर्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनात निर्माण केली. महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा असलेली लोककल्याणकारी राज्याची भूमिका व प्रेरणा राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला घेता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आजचा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद सर्व एकत्र जमून आज स्वराज्याची संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध होत आहेत.

 

दुग्धशर्करा योग !

यावर्षी हा “शिवस्वराज्य दिन” साजरा करतांना आणखी योगायोग जुळून आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेचे हे हिरक महोत्सवी वर्षे आहे. याचबरोबर मराठवाडा मुक्तीचेही हे अमृत महोत्सवी वर्षे आहे. ग्रामीण स्वायत्ततेच्या दृष्टीने आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्यादृष्टीने त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. आजवरच्या हीरक महोत्सवी वाटचालीत आपल्या पंचायतराज व्यवस्थेने एक मैलाचा टप्पा गाठला आहे. लोकसहभागासाठी, प्रत्येक गावातील लोकांना आपली ग्रामपंचायत वाटावी, प्रत्येकाच्या विकासाचे प्रतिबिंब त्या ग्रामपंचायतीमध्ये उमटावे यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतींना अधिकार बहाल केले.

 

लोकसहभागातून विकास आराखडा

या अधिकारातूनच प्रत्येक ग्रामपंचायतीला विशेष महत्व आले आहे. गावच्या विकासाचा आराखडा हा लोकसहभागातून, गावातील सर्वांच्या चर्चेतून जर आखला गेला तर त्या गावात होणारे परिवर्तन हे दिर्घकाळ टिकणारे असते याचा प्रत्यय आपण घेतला आहे. कोणत्याही विकास योजनांमध्ये जो पर्यंत लोकसहभागाचे प्रतिबिंब पडत नाही तो पर्यंत त्या विकास योजनेला खरा अर्थ प्राप्त होत नाही. ही योजना माझी आहे, ही योजना माझ्या गावाच्या विकासासाठी आहे असे ज्या गावात वाटते त्या गावांमध्ये विकासाच्या योजना या अधिक जबाबदारीने पूर्ण होतात. जबाबदार लोकशाहीचे, कार्यपद्धतीचे हे द्योतक आहे.

 

प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था

राज्यातील प्रत्येक भागात, प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहचावी, सर्वसामान्यांना विकासाच्या योजना मिळाव्यात यासाठी शासन धडपडत असते. ज्या उद्देशाने योजना साकारतात तोच उद्देश घेऊन शेवटच्या पातळीवर, गावपातळीवर त्याची अंमलबजावणी होणे हे सशक्त लोकशाहीचे लक्षण मानले जाते. आजच्या घडीला अनेक गावात लोकसहभागातून जलसंधारणाची, पाणलोटाची चळवळ रूजू पाहते आहे, हे त्या-त्या गावातील लोकांच्या प्रगल्भतेचे आणि जाणिवजागृतीचे प्रतिक आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ही त्या जाणिव जागृतीने झाली तर त्यातील नेमका आशय ही लोकांपर्यंत पोहचतो. हा आशय पोहचविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणांची आहे. येथील प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन, पंचायत राज व्यवस्था यासाठी कटिबद्ध आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील गण आणि गट

नांदेड जिल्ह्यात सन 2017 नुसार या त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत 63 गटांची संख्या आहे. पंचायत समितीचे 126 गण आहेत तर 1 हजार 310 या ग्रामपंचायती आहेत. हीच गट आणि गण संख्या 1962 मध्ये 45 आणि 90 वर होती. लोकसंख्या वाढीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या गटसंख्येत वाढ झाली. पंचायत समितीच्या गणात वाढ झाली. सन 1980 साली नांदेड जिल्ह्यात 1 हजार 185 ग्रामपंचायती होत्या. त्यात भर पडून आजच्या घडीला ही संख्या 1 हजार 310 एवढी आहे. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक असलेली ही संख्या जिल्ह्याच्या पंचायतराज व्यवस्थेचे आपण वैभव समजले पाहिजे.

 

असा साजरा व्हावा दिन

या वैभवाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांपर्यंत शिवस्वराज्य दिनाच्यानिमित्ताने सकारात्मक लोकसहभागाची मूल्य रुजावी यादृष्टीने शासनातर्फे 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करतांना महाराष्ट्र शासनाने भगवा स्वराज्य ध्वज संहिता, शिवशक राजदंड स्वराज्य गुढी संहिता याबाबतची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतींना पाठविण्यात आली आहे. ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेले भगवी जरी पताका असावी. हा ध्वज तीन फूट रूंद आणि सहा फूट लांब या प्रमाणात असावा. म्हणजे लांबी ही रूंदीपेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.

 

शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीतकमी 15 फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान 5 ते 6 फुटाचा आधार द्यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शिवशक राजदंडावर हा स्वराज ध्वज बांधून तो सकाळी 9 वा. उभारून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून याची सांगता करावी. त्याच दिवशी सूर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्य गुढी खाली घेऊन भगवा स्वराज ध्वज सन्मानाने व्यवस्थीत घडी करून ठेवून द्यावा, असेही शासनाच्या निर्देशात स्पष्ट केले आहे.

 

-        विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड 

Saturday, June 4, 2022

 नांदेड जिल्ह्यात दोन व्यक्ती कोरोना बाधित 

तर एक कोरोना बाधित झाला बरा

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 176 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे  2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 803 एवढी झाली असून यातील 1 लाख 109 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 2 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, देगलूर 1 असे एकुण 2 कोरोना बाधित आढळले आहे. आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 1 असे एकुण 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 3 हजार 443

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 83 हजार 359

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 803

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 109

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 भोकर येथील रेल्‍वे भुयारी पुलावरील

कामांमुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- भोकर येथील रेल्‍वेच्या भुयारी पुलाच्या काम करण्‍यासाठी आंबेडकर चौक (भोकर) -प्रफुल्‍ल नगर (मुदखेड रोड) दरम्‍यानचा रेल्‍वे गेट नं. 3 मधुन जाणारा रस्‍ता सर्व प्रकारच्‍या वाहतूकीस प्रतिबंधीत केला आहे. यासाठी पर्यायी मार्ग (जाण्या-येण्यासाठी) आंबेडकर चौक (भोकर)- प्रफुल्‍लनगर (मुदखेड रोड) दरम्‍यानच्‍या नव्‍याने तयार झालेल्‍या उड्डान पुलावरुन वळविण्यात आला आहे.

 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  दिनांक 4  ते 13 जून 2022 या कालावधी पर्यंत वर नमुद केलेल्‍या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्‍यास मान्‍यता दिली आहे. संबधीत विभागाने पुढील उपाययोजना कराव्यात. पोलीस निरीक्षक भोकर यांनी कायदा व  सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती उपाययोजना करावी. उपमुख्‍य  अभियंता, दक्षिण मध्‍य रेल्‍वे नांदेड यांनी रस्‍ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्‍त्‍यासाठी आवश्‍यक असलेले बोर्ड चिन्‍ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी, असे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...