Friday, April 8, 2022

लेख  

होट्टल : मंदिर नव्हे ती आहे एक समृद्ध विरासत !

प्रत्येक भू-भागाला स्वत:चे असे एक वैशिष्ट्य असते. त्या वैशिष्ट्यांच्या जोरावर तो भू-भाग नावारुपास येतो, ओळखला जातो. ही वैशिष्ट्य नैसर्गिक संसाधनापासून समृद्ध होत येतात. निसर्गाची जी पाच तत्वे आहेत ही सर्वत्र समान असतातच असे नाही. या पाच तत्वांच्यापलीकडे निसर्गही किती सारी आपली जैवविविधता, पाऊल खुणा घेऊन असतो, याचा आपल्याला माग काढता येणार नाही. आपल्या गोदावरीचाच काठ आणि भूप्रदेश लक्षात घेतला तर खूप सारी विविधता आणि समृद्धता आपल्या लक्षात येईल.

एरवी ज्या प्रदेशात बारमाही जलस्त्रोत आणि समृद्ध जमीन आहे तोच भू-भाग उत्तम अशी एक धारणा आपली असते. यात चुकीचे काही असण्याचा प्रश्न नाही. परंतू ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे, डोंगरांच्या रांगा अधिक आहेत, विरळ वनसंपदा आहे, पाण्याचे दुर्भिक्ष आहे तो भू भाग संपन्न नाही, असे म्हणता येणार नाही. आपल्या गोदावरीचा काठ आणि तिच्या भोवताली असलेल्या डोंगररांगा याचे उत्तम उदाहरण आहे. गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांच्या काठाने मराठवाड्याला सूपीक आणि भरघोस पीक देणारी जमीन दिली आहे. हा काठ सोडून थोडे अंतर दूर झालात की जमिनीचा पोत माळरान आणि खडकांना पोटात घेतलेला पदोपदी आढळतो. अशा नैसर्गिक स्थितीत सातवाहन काळापासून मराठवाड्यातील गोदावरीच्या काठाने दिलेली भरभराट नजरेआड करता येत नाही. सातवाहन राजाने व्यापाराला उत्तेजन दिल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यांनी दळणवळण व्यवस्था सुरक्षित ठेवली. प्रतिष्ठान, धान्यकटक, कल्याणी, तेर आदी व्यापारी केंद्र यामुळे विकसित होऊ शकली. यातील काही व्यापारी मार्ग मराठवाड्यातून जात होते.

सातवाहन पासून चालुक्य, राष्ट्रकूट काळातही हा व्यापार सुरू होता. मराठवाड्यातील सर्वच भागात संपन्नता होती, असे भू भागावरुन म्हणता येणार नाही. अजिंठ्यापासून वेरूळ पर्यंत, वेरुळ पासून जालनाच्या काठाने विदर्भाकडे, बीड जिल्ह्यापासून लोह्यापर्यंत, लोहा-कंधार पासून मुखेड पर्यंत, माहूर पासून किनवट व पुढे तेलंगणा पर्यंत, देगलूर पासून थेट तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सिमेपर्यंत लहान-मोठ्या अनेक डोंगररांगा मराठवाड्याच्या भूमीने आपल्या अंगाखांद्यावर जपल्या आहेत.

या डोंगररांगा त्या-त्या काळातील जनजीवनाच्या उपयोगितेला फारशा सहाय्यभूत नव्हत्या. याला कारण म्हणजे पाण्याची कमतरता व दुसरा भाग म्हणजे आत असलेला डेक्कन ट्रॅप ! पाषाना शिवाय दुसरे काय ? या दगडातही कधी काळी हजारो वर्षांपूर्वी आपल्याच मानव वंशाचे घटक असलेल्या व्यक्तींनी याच पाषणातून कला सौंदर्यदृष्टि प्रत्ययास दिली. यासाठी त्यांनी केवढी साधना केली असेल ? पाषाणात खूप साऱ्या आकारांना शोधून प्रत्येक शिलाच्या आकारानुसार त्यात अप्सरांपासून नर्तीकांपर्यंत, देवाधिकांपासून प्राणीमात्रा पर्यंत शिल्प साकारणे हे तर प्रत्यक्ष जन्माला घालण्या पेक्षा कितीतरी आव्हानात्मक ! काय ध्येय घेऊन ही माणसे आयुष्यभर त्या दगडांच्या सानिध्यात राहिली असतील ? कित्येक वर्षे त्यांनी यासाठी कष्ट उपसून एवढ्या मोठ्या वैभव संपन्नतेचा वारसा पुढे केला असेल ?

हा समृद्ध वारसा चालुक्याच्या काळापर्यंत व पुढेही आपणास हामखास आढळतो. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, खानापूर, बाऱ्हाळी आदी भागात चालुक्याच्या काळात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकलेने परिपूर्ण असलेली मंदिरे उभारली गेली. देगलूर पासून 8 किमी अंतरावर असलेले होट्टल हे अशाच एका समृद्ध शिल्पकलेचा वारस असलेले ठिकाण ! राष्ट्रकुटानंतर या भागावर राज्य केले ते कल्याणी, चालुक्यांनी. नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्याशी या घराण्याचा असलेला संदर्भ आपल्याला अनेक शिलालेखातून लक्षात येतो. मंदिर उभे करणे, एखादा तलाव उभा करणे, पाण्याची बाराव उभी करणे याकडे केवळ नागरीकरणाच्या सुविधेच्या नजरेतून पाहणे उचित ठरत नाही. त्या-त्या काळातील राज्य चालवणाऱ्या व्यक्तींनी सौंदर्य व सांस्कृतिक कला, कौशल्याला पुढच्या पिढीपर्यंत सतत वाहते कसे ठेवता येईल याचा ध्यास घेऊन ही निर्मिती केली असेल यात शंका नाही. आपल्या पूर्वजांकडून मिळालेला हा एक समृद्ध वारसा म्हणून पहावे लागेल. यातील शिलालेख हे सणावळ व नावाच्या नोंदीचे एक संदर्भ म्हणून पाहणेही चुकीचे आहे. यात त्या काळातही ऐतिहासिक संदर्भासह किती सारे आव्हाने घेऊन हे वैभव त्यांनी उभे केले असेल याची तपश्चर्या आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यातील सांस्कृतिक मूल्य आपण लक्षात घेतले पाहिजेत. यातील देवादिकांच्या भक्ती समवेत, जी कल्पकता, जी कला कौशल्यता, जे वास्तू स्थापत्य यांच्या निर्मात्यांनी जपले, अभ्यासले ते आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.

होट्टल आणि होट्टलचा सारा परिसर हा अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प वैभव घेऊन मंदिरांनी गजबजलेला म्हणून याची नोंद आहे. होट्टलच्या परिसरात अनेक ठिकाणी त्याचे संदर्भ आढळतात. होट्टलच्या परिसरात जी मंदिरे उभी आहेत त्या मंदिराच्या भिंतीवर एकादशरूद्र, चंडिका, शैव, वैष्णवद्वारपाल, गणेश, काली, शत्रू मर्दिनी, रती, नर्तीका, पुटलिका, शिव नटराज असे कितीतरी सुस्थितीत असलेली शिल्पे आपणास पहावयास येथे आढळतात. चालुक्याची उपराजधानी म्हणूनही होट्टलकडे पाहिले जाते. होट्टल हे एक विद्या केंद्र, पाठशाळा यांनी परिपूर्ण होते, असे सांगितल्या जाते.

मराठवाड्याच्या सांस्कृतिक वारसांपैकी तेलंगणा आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेला होट्टल येथील समृद्ध सांस्कृतिक वारसा हा नव्या पिढीपर्यंत पोहचला पाहिजे. या भागातील असलेले हे समृद्ध ऐतिहासिक संदर्भानी परिपूर्ण दालन नव्या पिढीकडून अभ्यासले गेले पाहिजे. ही एक समृद्ध विरासत आहे. ही विरासत लोकसहभागातून, सर्वांच्या कर्तव्य तत्पर जबाबदारीतून जपली गेली पाहिजे. या स्थळाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ठ मूल्यही आहे. हे मूल्य इथल्या लोकांनी जपून ठेवले आहे. या भागात या निमित्ताने पर्यटनाला जर चालना देता आली तर त्या लोकांच्याही उपजिविकतेला आधार होईल. ही सांस्कृतिक धरोहर दरवर्षी एक कटिबद्धता घेऊन पुढे प्रवाहित होईल, हा व्यापक उद्देश ठेऊन “होट्टल महोत्सव” सुरू करण्यात आला आहे. यात महाराष्ट्र शासनासह, पर्यटन विभागासह, इथले इतिहासप्रेमी, इन्टॅक सारखी ऐतिहासिक वारसा जपणारी संस्था, स्थानिक नागरीक यांचा मोलाचा वाटा आहे.

हा महोत्सव येथील पर्यटनाला चालना मिळावी, यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, स्थानिक कलावंतांना आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध व्हावे यादृष्टिने शासनाचा पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन याकडे पाहते आहे. ही कटिबद्धता या समृद्ध वारसेला जपण्याची आहे. हा महोत्सव समृद्ध वारसेसह लोकसहभागतीचे एक आदर्श मापदंड म्हणूनही ओळखल्या जाईल. चला आपणही या महोत्सवाचा एक भाग होऊ यात.

 

-        विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

 





 

Thursday, April 7, 2022

 खरीप हंगामासाठी ग्राम कृषी विकास आराखडे तयार करावेत

-         विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांचे निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यातील प्रत्येक गावांच्या कृषी विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. त्यादृष्टीने यंदाच्या खरीप हंगामात गावांचे सर्व समावेशक ग्राम कृषी विकास आराखडे तयार करावेत. सर्व कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत यांची योग्य ती खबरदारी घेण्याचे लातूर कृषी विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी दिले. आज कुसुम सभागृहात आयोजित खरीप हंगाम 2022 पूर्व तयारी कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले.

 

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी.चलवदे, कृषि उपसंचालक श्रीमती एम. आर. सोनवणे उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम. तपासकर, एस. बी. शितोळे. कृषी विकास अधिकारी चिमणशेट्टे,  कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डी. ए. देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी बी.व्ही वीर, एम.के. आसलकर, श्री. भोर यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांची उपस्थिती होती.

 

खरीप हंगामाचे नियोजन जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर केले जाते. यात गावांच्या गरजांचा  आवश्यक त्या प्रमाणात समावेश होत नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी यांचा समावेश असलेली ग्राम कृषी विकास समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.  सदर समिती गावातील जमीन, पर्जन्यमान, सिंचन सुविधा, उपलब्ध साधनसामग्री, दळणवळण, माती परीक्षणावर आधारित जमीन प्रकार आदी बाबींचा विचार करुन येत्या खरीप हंगामासाठी ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करेल असे दिवेकर यांनी स्पष्ट केले.

 

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी, सोयाबीनची बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, खत बचत मोहीम, जैविक खतांचा वापर, बीज प्रक्रिया इ. मोहीमद्वारे संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, असेही दिवेकर म्हणाले.  कार्यशाळेत  विविध मोहिमांची माहिती पुस्तिका, ग्राम कृषी विकास आराखड्याचे मार्गदर्शिकाचे कृषी सहाय्यक यांना वाटप करण्यात आले.

 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग  योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, पोकरा समुह सहाय्यक यांची उपस्थिती होती.

 

00000



जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत

ऑनलाईन वेबीनारचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी शुक्रवार 8 एप्रिल 2022 रोजी गुगल मिट या ॲपवर दुपारी 3 वा. वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हे वेबिनार सर्वांसाठी खुले असून जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अनुषंगाने नागरिकांच्या अडीअडचणी व शंकांचे निराकरण करण्यासाठी नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. 

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदारांना शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर कारणांसाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. त्याअनुषंगाने सामाजिक समता सप्ताह निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी व गरजू अर्जदारांना विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच अर्ज कसा करावा, त्यासोबत कोणते पुरावे सादर करावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी नागरीकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जाणार आहेत. 

या वेबिनारचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपण गुगल मिट Google Meet डाऊनलोड करुन Join With a code हा पर्याय निवडून ümeet.google.com/ctv-pjxz-oop हा समाविष्ट करावा. संबंधित सर्व अर्जदार, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिकांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.

000000


विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव

11 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate-CVC) प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे अत्यावश्यक आहे. सन 2021-22 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका (डिप्लोमा) तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज समितीकडे त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह चालू वर्ष सोमवार 11 एप्रिल  2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांनी केले आहे. 

शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थी-पालक यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करुन समितीकडे मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात. जेणेकरून समितीस प्राप्त अर्जावर मुदतीत नियमानुसार कार्यवाही पूर्ण करुन समितीस निर्णय/जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करता येईल. तथापि बहुतांश विद्यार्थी इ. 12 वी परीक्षा झाल्यानंतर /पदविका अभ्यासक्रमांचे विद्यार्थी तृतीय वर्षाची परीक्षा झाल्यानंतर/निकाल लागल्यानंतर किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अंतिम क्षणी समितीकडे प्रस्ताव सादर करतात. अशा प्रकरणी समिती निर्णय होण्यास अवधी लागू शकतो व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. 

वैधता प्रमाणपत्राकरिता अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा व तो ऑफलाईन 15 दिवसात समितीस सादर करावा. अर्जदार यांनी ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या ई-मेलवर जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होणार असल्याने अर्जदाराने स्वत:चे/पालकांचे अचूक ई-मेल नमुद करण्याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, व विशेष मागास प्रवर्ग यांचे जातीचे प्रमाणपत्र देणे व पडताळणी करणे अधिनियम 2000 चे कलम 8 अन्वये जातीचा दावा सिध्द करण्याची जबाबदारी ही अर्जदार यांची आहे.  अर्ज अपूर्ण आढळल्यास तशी कारणे नमूद करुन जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन, नियम 2012 मधील कलम 17 (2) व 17 (3) अन्वये निकाली काढली जातील. 

अर्जदारांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यामुळे समितीस अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन वैधता प्रमाणपत्र/समिती निर्णय देणे अशक्य झाल्यास व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अथवा त्रुटी असलेली प्रकरणे विहीत मुदतीत निकाली न निघाल्यास व त्यामुळे अर्जदारास प्रवेशापासून वंचित रहावे लागल्यास यास समिती जबाबदार राहणार नाही. त्यामुळे अर्जदार/पालकांनी समितीकडे वेळेत म्हणजे दि. 11 एप्रिल 2022 पूर्वी अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाने या बाबी आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या/घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहनही  जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त अनिल शेंदारकर यांनी केले आहे.

0000000


वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...