Thursday, May 14, 2020


अटी / शर्तीचे पालन बंधनकारक ;
प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून  
लग्न समारंभासाठी प्रमाणीत कार्यप्रणाली निश्चित
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश

·         वर-वधु / नातेवाईकांच्या निजी जागेतच लग्न समारंभ
·         लग्नास 20 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नाही
·         चेहऱ्यावर मास्क, सामाजिक अंतर, हॅन्डवॉश, सॅनिटायजर्सचा वापर, लग्न विधी संपल्यानंतर वस्तूचे निर्जतूकीकरण करणे गरजेचे...
            नांदेड, (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत लग्नसमारंभाच्या परवानगीबाबत विचारणा होत असून याअनुषंगाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत लग्न समारंभासाठी प्रमाणीत कार्यप्रणाली जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेशाद्वारे 13 मे रोजी निश्चित केली आहे.  
नांदेड जिल्ह्यात सर्व जाती-धर्माच्या लग्न समारंभास सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील नमूद अधिसूचना व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना विचारात घेता लग्न समारंभाच्या ठिकाणी 20 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत. लग्नाच्या ठिकाणी सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे नियम पाळणे, हॅन्डवॉश, सॅनिटायजर्सचा वापर करणे, सर्व वस्तू / ठिकाणे लग्नाचा विधी संपल्यानंतर निर्जतूकीकरण करणे गरजेचे आहे.
या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली प्रमाणीत कार्यप्रणाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील नमूद अटी व शर्ती यांचे पालन करणे बंधनकारक आहे. या अटीवर नांदेड जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रासाठी सकाळी 7 ते सायं. 5 यावेळेत वर-वधुच्या निजी निवासस्थानी किंवा संबंधिताचे नातेवाईक यांच्या निजी जागेतच लग्न समारंभास मुभा देण्यात आली आहे.
असे लग्न समारंभाच्या अनुषंगाने लग्नाचा दिनांक, स्थळ, वेळ इत्यादी बाबत पूर्व माहिती संबंधितांनी लगतच्या पोलीस स्टेशन, स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे आवश्यक आहे. या आदेशाची संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित पोलीस  निरीक्षक यांनी अंमलबजावणीची वेळोवेळी खात्री करावी. तसेच जे कोणी व्यक्ती, समुह या आदेशाचे उल्लंघन करील त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
000000

Wednesday, May 13, 2020


“विशेष श्रमिक रेल्वेने” उत्तरप्रदेश (गोरखपूर) कडे
1 हजार 464 मजूरांचे झाले रवाना
“भारत माता की जय” या घोषणा देवून आनंद व्यक्त  
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- कोरोना प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी असलेले 1हजार 464 मजुरांना हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून “विशेष श्रमिक रेल्वे” ने आज सायंकाळी 6.25 वा. उत्तरप्रदेश (गोरखपूर) कडे त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन आणि नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला. मजुरांच्या चेहऱ्यांवर आपण आपल्या गावी जात असल्याचा आनंद दिसत होता. उपस्थितांनी टाळ्या वाजवून “भारत माता की जय” या घोषणा देवून आनंद व्यक्त केला. तसेच मजूरांनी प्रवासा दरम्‍यान जिल्‍हा प्रशासनाला आभार मानत धन्‍यवाद देत होते.
यावेळी आमदार मोहन हंबर्डे, जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,  पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्‍त डॉ. सुनिल लहाने, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्‍हाधिकारी सचिन खल्‍लाळ, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, तहसीलदार अरुण जऱ्हाड, रेल्‍वे विभागाचे कालीचरण आदि संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार उत्तरप्रदेश येथील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी नांदेड येथून रेल्वे सोडण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण तयारी केली होती. या प्रयत्नामुळे मजुरांना घरी जाण्याचा दिलासा मिळाला आहे. मजुरांच्या रेल्वे तिकिटाचा खर्च प्रशासनाने केला आहे. जिल्‍हा प्रशासन व स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍यावतीने प्रवासापूर्वी मजुरांची थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, प्रवासात जेवण, नाश्ता, पाणी बॉटल तसेच आवश्यक सुविधा सोबत देऊन सामाजिक अंतर राखून मजुरांना रेल्वे बोगीपर्यंत सोडण्यात आले होते. त्यानंतर “विशेष श्रमिक रेल्वे” ने त्यांचे उत्तरप्रदेशकडे प्रयाण झाले.  
लॉकडाऊन काळात नांदेड जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या मजुरांची नांदेड येथील विविध मंगल कार्यालयात तसेच शिबिरांमध्ये राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली  होती. नांदेड तरोडा भागातील विश्वलक्ष्मी मंगल कार्यालयात परराज्यातील 85 लोकांची मागील एक महिन्यांपासून निवास व जेवण्याची व्यवस्था केली होती. त्यापैकी 65 लोकांना हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून “विशेष श्रमिक रेल्वे”ने उत्तरप्रदेश (गोरखपूर) कडे रवाना करण्यात आले.
00000







नांदेड जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा नवीन रुग्ण नाही ;
अबचलनगर येथील कोरोना रुग्ण उपचारानंतर निगेटिव्ह ;
  आतापर्यंत 1 लाख 3 हजार 142 व्यक्तींची तपासणी
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- नांदेड अबचलनगर येथील 26 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असलेला एक रुग्ण काल मंगळवार 12 मे रोजी पूर्ण उपचारानंतर त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथून सुट्टी देण्यात आली आहे.
बुधवार 13 मे रोजी सायं 5 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 3 हजार 142 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 131 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 879 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 157 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात आतापर्यंत घेतलेल्या स्वॅबपैकी एकुण 63 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या 63 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11 रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे तर पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 43 रुग्णांवर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  
पॉझिटिव्ह 5 मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.  कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


डेंग्युताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावी काळजी
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांचे आवाहन
नांदेड दि. 13 :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. 
नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यु दिन शनिवार 16 मे 2020 रोजी साजरा होत आहे. त्याअनुषंगाने सध्या उन्हाळा सुरु असल्याने जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा असल्याने नागरिकांकडून पाणी साठविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. त्याअनुषंगाने साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासोत्पत्ती होते.
डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्यतपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील पाच वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. ( घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण). सन 2016 - (776) 182 (एक). सन 2017 - (953) 200 (निरंक). सन 2018 - (1245) 378 (निरंक). एप्रिल 2019 -(1527) 473 (निरंक) तर 30 एप्रिल 2020 अखेर- (134) 59 (निरंक).
भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगणात व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरन घेवून झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.
नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल व डास चावणार नाहीत. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे.
00000


शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प जलाशयाच्या
दोन्ही तीरांवरील मोटारींचा विद्युत पुरवठा नियंत्रीत
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यातील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयाच्या दोन्ही तीरावरील मोटारींचा विद्युत पुरवठा शनिवार 30 मे 2020 पर्यंत नियंत्रीत करण्यात आला असून  जलाशयाच्या दोन्ही तीरावरील बागायतदारांनी बंद कालावधीत मोटारी बंद ठेवू जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयावरील विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा नियंत्रित करण्यासंदर्भात आढावा बैठक बुधवार 13 मे रोजी घेण्यात आली होती. या बैठकीतील निर्देशानुसार शेतीचा पाणी वापर काही प्रमाणात मर्यादीत करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या आदेशानुसार शनिवार 30 मे पर्यंत या भागातील सिंगल फेज विद्युत पुरवठा वेळापत्रकाप्रमाणे दररोज सुरु राहिल. परंतू जलाशयावरील पंपासाठीचा थ्री फेज विद्युत पुरवठा तसेच विहिर व खाजगी बोअरचा विद्युत  पुरवठा एक दिवस आड सुरु ठेवण्यात येईल.
या नियोजनानुसार पाण्याचा योग्य वापर करुन पाण्याचा नाश, अपव्यय टाळावा. विद्युत पुरवठा बंद कालावधीत अनाधिकृत विद्युत जोडणी होत असल्यास व अवैध पाणी उपसा करीत असल्याचे निदर्शनास असल्यास संबंधितांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन प्रसंगी विद्युत मोटार जप्त करण्यात येईल, असेही आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
00000

Tuesday, May 12, 2020



संभाव्‍य आपत्‍तीच्‍या काळात यंत्रणांनी,
समन्‍वय, सतर्कता, तत्‍परतेने प्रयत्‍न करावेत
- जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड, दि. 12 :-- आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, नियंत्रणासाठी एकत्रित व वेळेत प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. त्‍यामुळे संभाव्‍य आपत्‍तीच्‍या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्‍वय व तत्‍परतेने प्रयत्‍न करावेत, असे निर्देश जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
मान्सून 2020 च्या अनुषंगाने पुर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य, कृषि, महसूल विभाग उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मृद व जलसंधारण, विद्युत, अग्निशमन, शिक्षण, पशुसंवर्धन  आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा सादरीकरणाद्वारे आढावा संबंधीत विभागाकडून घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर पुढे म्हणाले की, पाझर तलाव, नद्या आणि पाण्याच्या साठवणुकीचे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प पावसाळयात फुटु नये अथवा ओव्हरफ्लो होऊन गावांना धोका होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. महानगरपालिका, नगरपरिषदांनी नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. सर्व प्रमुख यंत्रणांनी 1 जून ते 30 सप्टेंबर या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदीच्या पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व विभागांशी समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.  उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तालुकास्‍तरावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक येत्‍या आठवड्यात आयोजित करुन पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी पूर्ण करावीत. स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल संपर्क अद्यावत करावीत. शासन निर्णयाप्रमाणे आपतग्रस्तांना योग्य मदत झाली पाहिजे. दरवर्षी होणाऱ्या विजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावे. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा. आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी दिले. नगरपालिका प्रशासनाने नाली साफसफाईचे कामकाज युध्‍द पातळीवर करावेत.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्‍लाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
00000


नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 53 रुग्ण पॉझिटिव्ह ;
बारड येथे कोरोनाचा एक नवीन रुग्ण ;
आरोग्य सेतू ॲपची 1 लाख 64 हजार 455 लोकांनी केली नोंदणी
नांदेड, (जिमाका) दि. 12 :- कोरोना विषाणू संदर्भात मंगळवार 12 मे रोजी प्राप्त 24 अहवालानुसार मुदखेड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथील एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर 23 अहवाल हे  निगेटिव्ह प्राप्त झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत एकुण 53 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आली आहेत.
नांदेड जिल्ह्यात आज 12 मे पर्यंत आरोग्य सेतू या ॲपची 1 लाख 64 हजार 455 लोकांनी नोंदणी केली असून या ॲपचा फायदा  कोरोना प्रादुर्भाव पासून बचाव करण्यासाठी होत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळते, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे.
मंगळवार 12 मे रोजी सायं 5 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार  नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 698 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 2 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 730 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 188 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात घेतलेल्या स्वॅबपैकी एकुण 53 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या 53 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 12 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड, व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 33 रुग्णांवर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह 5 मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.  कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...