Saturday, January 11, 2020


जप्त रेतीसाठ्याचा अंतिम फेरीचा
तहसील कार्यालयात लिलाव
नांदेड, दि. 11:- नांदेड तालुक्यातील विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून मौ. पिंपळगाव निमजी या ठिकाणची 85 ब्रास रेतीसाठ्याच्या अंतिम फेरीचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली मंगळवार, दि. 14 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 11-00 वाजता तहसील कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.
जनतेनी या रेती साठ्याचे ठिकाणी रेती (वाळू) साठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसील कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे तहसीलदार नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000


रास्तभाव धान्य दुकानात
तीन महिन्यांची साखर उपलब्ध

नांदेड, दि. 11 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जानेवारी, फेब्रुवारी व मार्च 2020 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 34 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड 186.5 , हदगाव -192, किनवट -464, भोकर-32.5, बिलोली-136.5, देगलूर-118.5, मुखेड-195, कंधार-90, लोहा-51, अर्धापूर-24, हिमायतनगर-73, माहूर-206, उमरी-63, धर्माबाद-62, नायगाव-101, मुदखेड-39 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000 


      जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यात रविवार, 12 जानेवारी, 2020 रोजीपासून शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रविवार, 26 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

Friday, January 10, 2020




पालकमंत्री यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकासकामाचा आढावा
·   नागरिकांशी सबंधित विविध विभागातंर्गत प्रलंबित असलेली कामे कालबद्धरीत्या पूर्ण करावीत
                                         --- पालकमंत्री अशोक चव्हाण
       नांदेड, दि. 10: जिल्ह्यातील नागरिकांशी सबंधित विविध विभागातंर्गत प्रलंबित असलेली कामे कालबद्धरीत्या पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा तसेच विभागातंर्गत जिल्ह्यातील नागरिकांशी संबंधित विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या  सभागृहात आयोजित बैठकीत अध्यक्षस्थानावरुन श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मंत्री डी.पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, महावितरणचे अधिक्षक अभियंता संतोष वाहने, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एस.के.सब्बीनवार,  जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे आदींसह विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील विकासकामासंदर्भात महत्वाचे 50 विषय असून, या विकासाकामांच्या प्रगतीचा आढावा दर 15 दिवसांनी घेण्यात येणार आहे. तसेच सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविले असल्यास प्रस्ताव कोणत्या विभागाकडे सादर केले आहेत. याबाबतची  सविस्तर माहितीचा अहवाल सादर करावा. तसेच सदर प्रस्तावाबाबत संबंधीत विभागाने केलेल्या पाठपूराव्याबाबतची माहिती दिनांकनिहाय जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी. तसेच सर्व संबंधित विभागांनी आपल्या विभागाशी संबंधीत कामांचा प्रगतीबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावा.
या बैठकीत पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी कौठा येथील जागेत जिल्हा न्यायालीय इमारतीचे बांधकाम, नांदेड  विमानतळ सभोवताली असलेल्या मनपाची जागेची मागणी विमानतळ प्राधिकरणाने करुन विमानतळाचा विकास करावा.  नांदेड येथील एमआयडीसीची जागा संपली असून मारताळा ते कृष्णूरपर्यंत शेतीसाठी वापरात नसलेली जागेची माहिती घेवून अतिरिक्त एमआयडीसीच्या विकासाकरीता भूसंपादन करण्याचे नियोजन करावे. नांदेड शहरातील मालेगाव व  कॅनॉल रस्त्यावरील विद्यूत दिवे बसविले आहेत का ? अशी विचारणा करत, नांदेड शहरातील बाजाराकरिता जागेचा शोध घेवून त्याठिकाणी बाजारकरिता कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करावी. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांचे सुशोभिकरण करावे. भोकर, मुदखेड, धर्माबाद व उमरी येथील रेल्वे उड्डाणपूलाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, अशा सूचना सार्वजनीक बांधकाम विभागाला दिल्या. मनपा, नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील रिक्त पदांचा आढावा घेत रिक्त पदांची माहिती सादर करण्यास सांगितले. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकरिता भूसंपादनाबाबतची माहिती घेवून त्याबाबत असलेली कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. पत्रकारांसाठी जिल्ह्यात जिल्हा पत्रकार भवनाची अनेक दिवसाची मागणी होत असून, सदरच्या पत्रकार भवनाचे बांधकाम सुरु करण्यासाठी लवकरात-लवकर नियोजन करावे. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या सर्व निवडणुकीकरिता कौठा येथील निर्वाचन भवनाची निर्मिती करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची यावेळी त्यांनी माहिती घेतली. श्रीक्षेत्र माहूरगड येथील राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची माहिती घेवून संबंधित विभागाने कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयाच्या वेळेनुसार बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देवून, नादुरुस्त रस्त्यामूळे बस बंद झाल्या असल्यास सदर ख्रराब रस्त्यांची माहिती विभाग नियंत्रकांनी सादर करण्याबाबतही यावेळी सूचना दिल्या. जिल्ह्यात वीज पूरवठ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. महावितरण कंपनीने यासाठी ऑईल आणि ट्रान्सफार्मरचे नियोजन करुन वीज पुरवठा सुरुळीत करावा. सिडकोमार्फत नांदेड येथे उच्च उत्पन्न गटातील वसाहत निर्मितीसाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही संबंधित विभागाला यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.
यावेळी लेंडी प्रकल्प, माहूर काळेश्वर, होट्टल येथे केंद्र शासनाकडून प्राप्त निधी व विकास कामे, देगलूर नाका येथील उर्दू घर सद्यस्थिती, नांदेड, अर्धापूर आणि भोकर येथील ईदगाह विकास कामे, जलयुक्त शिवार अभियान, क्रिडा संकुल विकास, मुदखेड शहराजवळील स्मशानभूमी, नांदेड येथील ट्रक टर्मिनल जागाबाबतचा प्रस्ताव तसेच अर्धापूर तालूक्यातील दाभड येथील महाविहार येथील विविध विकासकामांचा आढावा घेवून प्रलंबीत कामे पूर्णत्वास नेण्याबाबत यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी संबंधीत विभागांना सूचना दिल्या.  
0000

Thursday, January 9, 2020

भोकर, धर्माबाद, उमरी व भेंडेगावमधील
रेल्वे उड्डाणपुलासाठी प्रस्ताव सादर करा - श्री. अशोक चव्हाण

मुंबई, दि. 9 :  नांदेड जिल्ह्यातील हदगाव-तामसा-उमरी महामार्गावरील भोकर शहरातील अपूर्ण रेल्वे उड्डाणपूल पूर्ण करणे आणि  धर्माबाद, उमरी, भेंडेगाव चौक व किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे नवे उड्डाणपूल उभारण्याबाबत आठ दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) श्री. अशोक चव्हाण यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्ह्यातील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी पुल बांधण्यासंदर्भात श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी अनेक सूचना केल्या. श्री. चव्हाण म्हणाले की, भोकर शहरातील लेव्हल क्रॉसिंग क्र.3 वर रेल्वे उड्डाण पुलाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षे झाले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. पुलाकडे जाणाऱ्या पोच रस्त्याचे काम राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. मात्र, रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे काम तातडीने सुरू होण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे विभागाशी संपर्क साधून लवकरात लवकर काम पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच पोच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू करावेत. या पुलाच्या कामातून बचत होणाऱ्या रक्कमेतून भोकर-नांदेड रस्त्यावरील काही भागाचे काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा.

याशिवाय धर्माबाद व उमरी येथेही रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पुलाची आवश्यकता आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा. किनवट तालुक्यातील गोकुंदा रेल्वे क्रॉसिंग, नांदेड औरंगाबाद रस्त्यावरील भेंडेगाव येथे तसेच वसमत तालुक्यातील कुरुंदा गावाजवळील चौकातही उड्डाण पुलाची आवश्यकता आहे. या सर्व ठिकाणचे प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याचे निर्देशही श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुदखेड ते भोकर हा एकपदरी रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्तावही सादर करण्याच्या सूचना केल्या.
००००




राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री नांदेड जिल्हा
तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम
नांदेड, दि. 9:-   राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री नांदेड जिल्हा तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम शुक्रवार, दि.10 जानेवारी, 2020, शनिवार, दि.11 जानेवारी, 2020 व रविवार, दि. 12 जानेवारी, 2020 या तीन दिवसांच्या कालावधीत नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार, दि. 10 जानेवारी, 2020 रोजी दुपारी 12.55 वाजता मुंबईहून 2 टी 518 या विमानाने नांदेडकडे प्रयाण. 2.30 वाजता नांदेड येथे आगमन. 3.00 वाजता विवेकनगर, नांदेड श्रीमती मंगलाताई निमकर यांचे निवासस्थानी सांत्वन भेट. 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे राखीव. 4.00 ते 6.00 वाजता नांदेड येथील नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथील उर्वरीत विकास कामांसंबधी बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6.00 ते 7.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नांदेड जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती व नांदेड येथे मुक्काम.
शनिवार, दि. 11 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता नांदेड येथून मोटारीने पाळज            ता. भोकरकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता पाळज येथील श्री गणपती दर्शनासाठी राखीव. 3.00 वाजता मोंढा मैदान, भोकर येथील नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी 7.00 वाजता महाविहार बावरीनगर, बावरीनगर, दाभड ता. अर्धापूर जि. नांदेड येथील 33 व्या आखिल भारतीय महाविहार बावरीनगर येथे आयोजित अखिल भारतीय धम्म परिषदेत उपस्थिती आणि नांदेड येथे मुक्काम राहील.
रविवार, दि. 12 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता शाळा महाविद्यालय परिसर, विवेकानंदनगर, नागेली रोड, बारड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड या संस्थेद्वारे संचलित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 2020 आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.
0000


राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा
नांदेड, दि. 9:- ग्राहकांच्‍या हक्‍कांची व ग्राहक संरक्षण कायदा याची जनतेत होण्‍याच्‍या उद्शाने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरुवारी दिनांक 09 जानेवारी 2020 रोजी दुपारी 01.30 वाजता जिल्‍हास्‍तरीय “राष्‍ट्रीय ग्राहक दिन”  जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथील, बचत भवन येथे साजरा करण्‍यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्‍यक्ष, मा.श्री. किशोरकुमार रं. देवसरकर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नांदेड यांचे हस्‍ते करण्‍यात आले यावेळी अन्‍न व औषध प्रशासन नांदेड,परिवह महामंडळ, गॅस एजन्‍सी, नांदेड, वजन व मापे विभाग, नांदेड,  अशा विविध विभागाचे स्‍टॉल चे ही उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या सुरुवातीस स्‍वामी विवेकानंद यांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्‍वलन करण्‍यात आले.
प्रास्‍ताविक श्री. लतिफ पठाण जिल्‍हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केली यावेळी, श्री मिटकरी सहाय्यक जिल्‍हा पुरवठा अधिकारी, नांदेड श्री. जायेभाये एस. पी. जिल्‍हा पुरवठा निरीक्षण अधिकारी, श्री. सारंग चव्‍हाण नायब तहसिलदार पु. तहसिल कार्यालय नांदेड, श्री माचेवाड नायब तहसिलदार (रोहयो)  , मा. श्री.पुरूषोत्‍तम अमिलकंठवार जिल्‍हाध्‍यक्ष, अ.भा.ग्राहक पंचायत विभाग, नांदेड तथा सदस्‍य अन्‍न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण निधी व्‍यवस्‍थापन समिती महाराष्‍ट़्र, श्री. भागवत देवसरकर अशासकीय सदस्‍य, जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषद, नांदेड श्री. श्रीनिवास जाधव अशासकीय सदस्‍य जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषद, नांदेड, उपस्थित होते.
          या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. काळबांडे लिपीक जिल्‍हा पुरवठा कार्यालय नांदेड व आभार प्रदर्शन लेखाधिकारी अरविंद देशमुख,  नायब तहसिलदार (पुरवठा)  सारंग चव्‍हाण, यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती जिल्‍हा पुरवठा कार्यालय, नांदेड अ.का.  एम.डी.वांगीकर यांनी केले. यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्माचारी, स्‍वस्‍तधान्‍य दुकानदार व ग्राहक बहुसंख्‍येने उपस्थित होते.
0000


वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...