Tuesday, July 2, 2019

अनुदान योजना, बीजभांडवल योजनेसाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे आवाहन



नांदेड दि. 2 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने अनुदान योजना व बीजभांडवल योजनेचा लाभ बँकेमार्फत देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेवुन महामंडळाच्या नांदेड जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
सन 2019-2020 या आर्थिक वर्षामध्ये अनुदान योजनेचे 500 व बीजभांडवल योजनेचे 55 उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. अनुदान योजनेत प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयापर्यंत गुंतवणूक असणाऱ्या रक्कमेत 10 हजार रुपये अनुदान व उर्वरीत बँकेचे कर्ज राहील. बिजभांडवल योजनेत प्रकल्प मर्यादा 50 हजार 1 ते 70 हजार रुपयापर्यंत लाभार्थ्याचा सहभाग 5 टक्के, महामंडळाचे कर्ज 20 टक्के (10 हजार रुपये अनुदानासह) व बँकेचे कर्ज 75 टक्के राहील. या योजनेत स्थिर भांडवल निर्मितीच्या उद्योगाचे कर्ज प्रस्ताव जसे वाहन, यंत्रे व मशिनरी खरेदीसाठी उद्दीष्ट देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, व्यवसाय जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा  व शौचालय बांधल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, दुकानाचा परवाना / लॉयसन्स, वाहन कर्जासाठी टी आर लायसन्स / परमीट / बॅच , वयोमर्यादा 18 ते 50 वर्षाच्या आत असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन हिंगोली रोड नांदेड या ठिकाणी संपर्क साधावा.
000000

धारणाधिकारावर, भाडेपट्ट्याने, कब्जेहक्काने प्रदान जमिनीचे भोगवटादार 1 मध्ये रुपांतरणासाठी अधिमुल्य शासनाला अदा करण्याचे आवाहन



नांदेड, दि. 2 :- भोगवटदार वर्ग 2 धारणाधिकारावर किंवा भाडेपटटयाने अथवा कब्‍जेहक्‍काने प्रदान केलेल्‍या जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 मध्‍ये रुपांतर करण्‍यासाठी अधिसुचनेत नमुद केल्‍याप्रमाणे रुपांतर अधिमुल्‍य शासनाला अदा करावे लागेल. यासाठी इच्‍छुकांनी जिल्‍हयातील संबंधित तहसिल कार्यालयाकडे आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
महाराष्‍ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब दि. 8 मार्च 2019 अन्‍वये महाराष्‍ट्र जमीन महसुल कृषिक प्रयोजनासाठी भोगवटदार वर्ग 2 धारणाधिकारावर किंवा भाडेपटटयाने अथवा कब्‍जेहक्‍काने प्रदान केलेल्‍या शासकीय जमिनींचा धारणाधिकार भोगवटार वर्ग-1 मध्‍ये रुपांतरीत करणे ) नियम 2019 हा सुधारित नियम राजपत्र असाधारण भाग चार – ब  शासन अधिसूचना दि. 8 मार्च 2019 रोजी प्रसिध्‍द झाले आहे.
शासनाने प्रदान केलेल्‍या जमिनीबाबत आदलेल्‍या अटी व शर्तीचा भंग झाला असल्‍यास अशा जमीनी मालकी हक्‍काच्‍या होणार नाही. तथापी अटी व शर्तीचा असा झालेला भंग सक्षम प्राधिकाऱ्याने नियमानुकूल केला असल्‍यास त्‍या मालकी हक्‍कामध्‍ये रुपांतरीत करता येतील परंतु हा नियम कुळवहीवाट, वतन व इनाम कायदा, कमाल जमीन धारणा कायदयाखाली प्रदान केलेल्‍या जमिनींना लागू होणार नाही.
000000

Monday, July 1, 2019

सैनिकी मुलांचे वसतिगृह प्रवेश प्रक्रीया सुरु



            नांदेड दि. 1 :- सैनिकी मुलांचे वसतिगृह विद्यापीठ परिसर विष्णुपूरी नांदेड येथे सन 2019-20 साठी प्रवेश देण्यासाठीची  प्रक्रीया सुरु झाली आहे. 
वसतिगृह पन्नास मुलांच्या क्षमतेचे असून प्राधान्यक्रम हा युद्वविधवा, माजी सैनिक विधवा व  माजी सैनिक यांचे  पाल्य याप्रमाणे राहील. यात पदव्युत्तर व्यावसायीक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी पदव्युत्तर, बी.एड, डी.एड, पदवी अभ्यासक्रम, बारावी, 11 वी, दहावी उत्तीर्ण याप्रमाणे प्राधान्य राहिल.
माजी सैनिकांच्या पहिल्या पाल्यास  प्रथम प्रवेश दिला जाईल. जागा उपलब्ध असल्यास त्यांचे दुसरे व तिसरे पाल्यांना प्रवेश दिला जाईल. माजी सैनिकांचे सर्व पाल्यांचे प्रवेश झाल्यानंतर सेवारत सैनिकांच्या पाल्यांना प्रवेश दिला जाईल. यानंतरही जागा उपलब्ध असल्यास सिव्हीलियन पाल्यांना संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या अनुमतीने प्रवेश दिला जाईल.
            विहित नमुण्यातील प्रवेश अर्ज व माहिती विवरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे उपलब्ध असुन इच्छुकांनी बुधवार 31 जुलै 2019 पर्यंत अर्ज भरुन सादर करावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 02462-245510 वर संपर्क करावा,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी परभणी तथा नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे.
000000




हरवलेल्या इसमाचा शोध



नांदेड दि. 1 :- धनेगाव (ता. नांदेड) येथील नरबा ऊर्फे सोन्या रामराव तेलंग (वय 20 वर्षे) हा मजुरी करणारा मुलगा 22 जून 2019 रोजी दुपारी 12 वाजेपासून धनेगाव येथील राहत्या घरातून नांदेड येथून आधार कार्ड आणतो म्हणून निघून गेला. शोध घेतला असता तो सापडला नाही. मुलाचा रंग- सावळा, उंची 5 फुट 2 इंच, केस – काळे, पोशाखा- गुलाबी रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट, पायात चप्पल, भाषा- मराठी, हिंदी, बांधा- मजबुत, डोळे- पाणीदार आहेत. हा मुलगा कोणाला आढळल्यास पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड (ग्रामीण) येथे मो. 9552542329 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.  
00000

बीजोत्पादनासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे खरीप पिकांची क्षेत्र नोंदणी



नांदेड दि. 1 :- खरीप हंगाम 2019-2020 मध्ये विविध पिकांच्या बीजोत्पदनासाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड कार्यालयात बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे क्षेत्र नोंदणी सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.  
बीजोत्पदक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या बीजोत्पादन कार्यक्रमाचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे सादर करण्याच्या पीकनिहाय अंतिम तारखा पुढील प्रमाणे आहेत. मुग व उडीद - 25 जुलै, संकरीत कापूस / सुधारीत कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मक्का व तूर - 31 जूलै 2019 असून या तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा आहेत. क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपुर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर 15 दिवसात करता येईल त्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
            क्षेत्र नोंदणीकरीता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत बीजोत्पादक संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनीधीचे अधिकारपत्र, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी यांचेसह करण्यात येणार 500 रुपयाच्या बंधपत्रावरील करारनामा, स्त्रोत बीयाणे खरेदी बिल, स्त्रोत बीयाण्यांचे मुळ मुक्तता अहवाल, स्त्रोत बीयाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकऱ्याचा स्वाक्षरीत व परिपुर्ण माहिती भरलेला विहीत नमून्यातील अर्ज, बीजोत्पादकाचे महसूली दस्तावेज (7/12 व 8 अ ), बीजोत्पादकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बीजोत्पादकांमधील करारनामाची प्रत, स्त्रोत बीयाणे वाटप अहवाल, गाव / पीक व दर्जानिहाय बीजोत्पादकांच्या विहीत प्रपत्रतील याद्या 4 प्रतीत इत्यादी कागदपत्रांसह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत सादर करावेत. जेणेकरून त्यांना देय असलेल्या अनुदानाबाबत कृषि विभागास कार्यवाही करणे सोईस्कर होणार आहे. अर्जाची शुल्क 10 रुपये प्रती बीजोत्पादक व क्षेत्र नोंदणी शुक्र 50 रुपये प्रती बीजोत्पादक असून क्षेत्र तपासणी शुल्क पायाभूत बीजोत्पादनाकरीता 200  रुपये प्रती एकर व प्रमाणीत बीजोत्पादनासाठी 150 रुपये प्रती एकर याप्रमाणे आहे.
000000

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची आज बैठक ; तक्रारी देण्याचे आवाहन



नांदेड, दि. 1 :- जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही तक्रार असल्यास अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी स्वरुपात तक्रार मंगळवार 2 जुलै 2019 रोजी आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात मंगळवार 2 जुलै 2019 रोजी दुपारी 4.30 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत तक्रारीचे निवेदन लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे लागेल. हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड या नावाने सबळ पुराव्यासह दोन प्रतीत सादर करावे लागेल.
या बैठकीसाठी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेवून शासनाच्या नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहनही जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले आहे.
00000

Saturday, June 29, 2019


संगणक प्रणालीत सुधारणेचे काम सुरु
सातव्या वेतन आयोगानुसार
निवृत्तीवेतनधारकांना लवकरच वेतन
नांदेड, दि.28 :- राज्य शासनाच्या आदेशानुसार निवृत्तीवेतन धारकांच्या जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीच्या सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतनाचा पहिला हप्ता प्रदान करण्याचे काम जिल्हा कोषागारामध्ये चालू आहे. संगणक प्रणालीमधील  त्रटीमूळे मासिक निवृत्तीवेतनाच्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्यासह, प्रदानास दोन-तीन दिवस विलंब होण्याची शक्यता आहे. संगणक प्रणालीत सुधारणेचे काम सुरु असून लवकरात लवकर निवृत्तीवेतन धारकांचे वेतन आयोगाच्या  हप्त्यांसह प्रदान करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...