Friday, March 1, 2019

परिवहन संवर्गातील व्यवसायाशी निगडीत गॅरेज मेकॅनिक
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

नांदेड, दि. 01 :- जिल्हयातील सर्व 18 वर्ष ते 40 वर्ष या वयोगटातील परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती (लायसन्स) धारक, मॅकेनिक, खाजगी बस चालक, ट्रक चालक, टॅक्सी, ऑटोरिक्षा चालक व या व्यवसायाशी निगडीत गॅरेज मेकॅनिक यांच्याकरिता केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PMSYM) योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र व अर्जदाराने भरावयाची हप्ताची माहिती सोबत जोडलेल्या तक्त्यामध्ये दर्शविलेली आहे. तरी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी जिल्हयातील सर्व उपरोक्त लाभार्थीनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केलेले आहे.
                                                                0000

असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी योजना

नांदेड, दि. 01 :-असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन                          ( पीएमएसवायएम) योजना दि. 15 फेब्रुवारीपासून लागू करण्यासंबंधीची अधिसूचना श्रम मंत्रालयाने काढली आहे. 40 वर्षापर्यंत वयातील कामगार ज्यांचे मासिक वेतन 15 हजारांच्या आत आहे, असे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक निवृत्तीवेतन देण्यात येईल. त्यासाठी 18 वर्षाच्या कामगाराला 200 रुपये मासिक रक्कम जमा करावी लागणार आहे. ही रक्कम 60 वर्षापर्यंत भरावी लागेल, असे सहाय्यक कामगार आयुक्त , नांदेड यांनी कळविले.
0000


हमीभावाने तूर खरेदी करण्याकरिता
शेतकरी नोंदणीची मुदत 10 मार्च, 2019 पर्यंन्त

नांदेड, दि. 01 :- केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हंगाम 2018-19 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्याकरिता शेतकरी नोंदणीची मुदत शासनाकडून दि. 10 मार्च, 2019 पर्यंन्त वाढविण्यात आली आहे. तरी शेतकरी बांधवानों ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्री तूर विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.
000000

Thursday, February 28, 2019


नाव नोंदणीसाठी 2 व 3 मार्च 2019 रोजी
   विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन   
           नांदेड दि. 28 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने “वंचित न राहो कोणी मतदार” या उद्दीष्‍टाखाली जिल्‍हयातील सर्व पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट करण्‍यासाठी नागरीकांनी 3 व 4 मार्च 2019 रोजी आपल्‍या भागातील मतदान केंद्रावर जाऊन संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ यांचेकडे आपले नाव नोंदणी अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण  डोंगरे  यांनी केले आहे.
               भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. सर्व मतदारांनी या अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्‍थळ अथवा जिल्‍हास्‍तरावर स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या मतदार मदत केंद्राचा टोल फ्री क्रमांक 1950 यावर संपर्क साधुन करता येईल. तसेच संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट देऊन करता येईल.
          आगामी लोकसभा निवडणूक 2019 विचारात घेऊन मतदार नोंदणीपासुन वंचित राहीलेल्‍या नागरीकांना मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी यासाठी नांदेड जिल्‍हयाच्‍या सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2019 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले होते. मात्र तरीही ज्‍यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा नागरीकांसाठी मुख्‍य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानूसार पुन्‍हा एकदा दिनांक 3 व 4 मार्च 2019 रोजी  विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्‍यात येणार आहे. या विशेष मोहिमेच्‍या दिवशी मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहुन नागरीकांचे नाव नोंदणीबाबतचे अर्ज स्विकारणार आहेत. तसेच मतदार म्‍हणून नाव नोंदविणे अथवा वगळणी करणेबाबत https://www.nvsp.in/ या ऑनलाईन पोर्टलद्वारेदेखील अर्ज भरू शकतात.
                आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार दिनांक 2 व रविवार 3 मार्च 2019 रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कळविले आहे.
000000


राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2018 साठी
प्रवेशिका पाठविण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 28 :-  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2019 असा होता. तथापि या प्रवेशिका पाठविण्यासाठी आता 15 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येन सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  
000000


पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार
मेळाव्यास 63 उमेदवारांची प्राथमिक निवड
नांदेड दि. 28 :- सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा येथील महात्मा फुले मंगल कार्यालय येथे आज आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 63 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे रमेश केंद्रे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान यांची प्रमुख उपस्थिती होती. आयटीआय उत्तीर्ण सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य ओळखून कष्टातून स्वयंरोजगार मिळवला पाहिजे. युवकांनी इच्छा, मेहनत, आत्मविश्वासच्या जोरावर खाजगी क्षेत्रात काम करण्याचे कौशल्य दाखवून व्यक्तीमत्वाचा विकास करावा. खाजगी उद्योगात काम करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन उदरनिर्वाहासाठी खाजगी क्षेत्राकडे वळले पाहिजे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.  
उमेदवारांना कंपनीत भरावयाच्या पदासंबंधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. यावेळी फिल्ड ऑफिसर, कस्टोडियम, ट्रेनिऑपरेटर, वर्कशाप वेल्डर, हेल्पर, सहायक व्यवस्थपक, वरिष्ठ कार्यकारी, या पदाची भरती करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सुप्रिया पाटील यांनी केले. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
00000



वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...