Saturday, April 8, 2017

समता सप्ताहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे
माहितीपट जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रदर्शीत करणार
बार्टीच्या समतादूत प्रकल्पाकडून नियोजन
नांदेड, दि. 8  :- भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्यावतीने जिल्ह्यात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या माहितीपट शाळा, महाविद्यालये आणि गावा-गावात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यातून डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट विद्यार्थी, तरूण आणि विविध घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती समतादूत प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी दिली आहे.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास आजपासून सुरवात झाली, असून हा सप्ताह डॅा. आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत डॅा.आंबेडकर यांच्याविषयीचे माहितीपट प्रदर्शित करण्याची संकल्पना बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी मांडली. समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे तसेच विभागीय प्रकल्प संचालक डॅा. श्रीकांत देशमुख यांनी त्यासाठी राज्यभराचे नियोजन केले आहे. यात डॅा. आंबेडकर यांच्या विषयीच्या दोन माहितीपटांचा समावेश करण्यात आला आहे. फिल्मस् डिव्हीजन आँफ इंडियाने या दोन्ही माहितीपटांची निर्मिती केली आहे. सुमारे सोळा मिनिटांच्या मराठी भाषेतील माहितीपट ए.व्ही. भाश्यम यांनी तयार केला आहे. तर दुसरा विस्तृत आणि तपशीलवार असा इंग्रजी भाषेतील बाहत्तर मिनिटांचा माहितीपट जब्बार पटेल यांनी तयार केला आहे.
हे माहितीपट शाळा, महाविद्यालये, गावा-गावात तसेच कार्यालयांसाठी एकत्रितरित्या प्रदर्शित करण्याचे नियोजन असल्याचे प्रकल्प अधिकारी श्री. कांबळे यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात एकूण बावीस समतादूत आहेत. या समतादूतांकरवीही या माहितीपटांचे तालुकास्तरावर आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शन करण्यात येणार आहे.
प्रकल्प अधिकारी श्री. कांबळे, समता दूत अविनाश जोंधळे यांनी या माहितीपटांच्या जिल्हा तसेच तालुकास्तरावरील प्रदर्शनांसाठी नियोजन सुरु केले आहे. हे माहितीपट पाहण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

Friday, April 7, 2017

समता सप्ताहातून सामाजिक न्यायाच्या
योजना राबविण्याची प्रेरणा घेऊ या - संतोष पाटील
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन

नांदेड, दि. 8  :- भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक न्यायाच्या योजना परिणामकारकरित्या राबविण्याची प्रेरणा घेऊ या, त्यासाठी प्रयत्नशील राहू या, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे केले. राज्यभरात आज पासून भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय कार्यक्रमात सप्ताहाचा प्रारंभ प्रभारी जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते सामाजिक न्याय्य भवन येथे करण्यात आला.  या कार्यक्रमात ते बोलत होते.
सामाजिक न्याय भवनच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमास समाजकल्याणचे सहायक आयुक्त भगवान वीर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यु. डी. तोटावार, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, बार्टीच्या समतादूत प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे, वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक बापू दासरी आदींची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात श्री. पाटील पुढे म्हणाले की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवीत कार्य समजून घेण्यासाठी, अनेकदा उजळणी करावी लागेल. राज्यघटनेत अंतर्भूत असलेले स्वातंत्र्य-समता-बंधुता ही महान तत्व प्रणालीही समजून घ्यावी लागेल. तथागत बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून डॉ. आंबेडकर यांनी समता या तत्त्वाचा अंगिकार केला. पुढे त्यासाठी बौद्ध धर्माचा मार्गही अनुसरला. आज या समता सप्ताहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न, योजना, उपक्रमानांही जाणून घेतले पाहिजे. असे प्रयत्न, या योजना ज्या घटकांसाठी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक न्याय्य आणि विशेष सहाय्याच्या योजना परिणामकाररित्या राबविण्यासाठीची प्रेरणाही या समता सप्ताहातून घेतली पाहीजे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्री. वीर यांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत चालणाऱ्या या सामाजिक समता सप्ताहाची रुपरेषा व त्याअंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रम-उपक्रमांची माहिती दिली.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले. तसेच भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. शिवानी इंगोले यांनी सुत्रसंचालन केले. समाज कल्याण अधिकारी श्री. आऊलवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध महामंडळांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच तालुका समन्वयक, समता दूत, समाज कल्याण तसेच विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.

000000
अनोळखी महिला वय अंदाजे 65 वर्षे रंग काळा, शरीर बांधा सडपातळ, उंची 5 फुट 4 इंच, पोशाख ब्लाऊज हिरव्या रंगाचे, डाव्या हातावर गोंधलेले आहे. पण काय आहे ते समजून येत नाही. केस काळे पांढरे लांब असा वर्णनाची अनोळखी महिला मरण पावली आहे. 




जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड दि. 7 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 11 एप्रिल 2017 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

0000000
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात
अंतरंग वेलनेस क्लिनीकची स्थापना
नांदेड दि. 7 :- जागतिक आरोग्य दिनानिमित्त  गुरु गोबिंदसिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आरोग्य दिनाचे "चला बोलुया नैराश्य टाळू या" या घोषवाक्यानुसार नैराश्यग्रस्त नागरिकांच्या समुपदेशनासाठी "अंतरंग वेलनेस क्लिनिक"ची स्थापना करण्यात आली. 
जिल्हा रुग्णालयाच्यावतीने अंतरंग वेलनेस क्लिनीकच्या माध्यमातून मानसिक आजाराबाबत जनजागृती, बाह्य रुग्ण सेवा पुरवणे, ताणतणाव मुक्तीवर समुपदेशन करणे, वृद्धांना होणाऱ्या मानसिक आजारावर औषधोपचार उपलब्ध करुन देणे, गंभीर स्वरुपातील आजारावर सेवा उपलब्ध करुन देणे, सकारात्मक जीवनपद्धतीवर समुपदेशन करणे आदी बाबींचा यात समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी "अंतरग वेलनेस क्लिनीक" मधील सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. दिपक हाजारी, डॉ. साखरे, डॉ. वाघमारे तसेच बाह्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

0000000
अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामांबाबत
तक्रारींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु
नांदेड दि. 7 :-  जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तांवर रस्ता किंवा पदपथ यांच्या उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामांबाबत तक्रार व हरकत दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे. या कक्षाकडे लेखी किंवा दूरध्वनीवरुन तक्रार करता येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या प्रगटनात म्हटले आहे की , अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे सुनावणीनंतर सार्वजनिक मालमत्ता, रस्ते, पदपथ यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात येत आहे. या प्रगटनाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सार्वजनिक मालमत्तेवर अथवा रस्ता किंवा पदपाथ यावर अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात येत असल्यास, त्याच्या बांधकामाबाबत तक्रार अगर हरकत असल्यास या तक्रार निवारण कक्षाकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचा ईमेल पत्ता nandedrdc@gmail.com यावर लेखी स्वरुपात किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 235077‍ वर किंवा नि:शुल्क दुरध्वनी क्रमांक 1077 वर संपर्क साधून तक्रार दाखल करावी.

0000000
जिल्हयातील सर्व न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालत
भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा..!
नांदेड दि. 7 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, नांदेडच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नांदेड जिल्हा न्यायालयात लोकअदालतीसाठी एकूण आठ पॅनल तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रलंबित प्रकरणे व दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय यांचे पॅनलसुध्दा त्या-त्या न्यायालयात कार्यरत आहेत. दिवाणी व फौजदारी प्रकरणे, एन.आय.अॅक्ट., मोटार वाहन अपघात, भूसंपादन, महसूल व विद्युत प्रकरणे, कामगारांचे वाद, कौटुंबिक वाद व इतर तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे व दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीकरीता ठेवण्यात आली असून ती सामंजस्याने मिटविण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, जिल्हा सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील, सर्व विधिज्ञ, भूसंपादन अधिकारी, विद्युत वितरण कंपनी अधिकारी, विविध विमा कंपन्यांचे अधिकारी, मनपा अधिकारी, हे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
नांदेड जिल्हा अभियोक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे, जिल्हा सरकारी वकील अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, जिल्हा अभियोक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे, सचिव अॅड. एन.एल.कागणे व सर्व सदस्य तसेच विविध विमा कंपनी, विद्युत कंपनी, मनपा, महसुल विभाग यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली निघतील असा विश्वास  सविता बारणे यांनी व्यक्त केला आहे. या दिवशी होणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घेवून जास्तीतजास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत व आपसातील वाद सामंजस्याने मिटविण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे प्रभारी सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...