Tuesday, September 15, 2026

वृत्त क्रमांक

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नांदेड शहरात प्रतिबंधात्मक आदेश

१५ सप्टेंबर सायंकाळी ६ ते १७ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत आंदोलनांना प्रतिबंध

नांदेड (जिमाका), दि. १५ : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी नांदेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये नांदेड शहरातील विविध भागांत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी १४ सप्टेंबर २०२६ रोजी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चा, रॅली, सत्याग्रह आदी आंदोलनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला आहे.

प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महानगरपालिका कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा–महात्मा गांधी पुतळा परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, वजिराबाद परिसर तसेच माता गुजरीजी विसावा उद्यान परिसर यांसह संबंधित भागात राहणार आहे.

तसेच शिवाजीनगर परिसर, आयटीआय चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, कुसुम सभागृह ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड, २६ नंबर रोड तसेच शासकीय विश्रामगृह ते एसटी ओव्हर ब्रिजकडे जाणारा रस्ता या परिसरातही आदेश लागू करण्यात आला आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून उपोषणार्थी, आत्मदहनार्थी व आंदोलक येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. संबंधितांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

वृत्त क्रमांक

अधिष्ठात्यांच्या पाहणीदरम्यान गंभीर अवस्थेतील व्यक्तीस तातडीने वैद्यकीय उपचार

रुग्णालय प्रशासनाच्या तत्परतेने वेळेत मिळाली वैद्यकीय मदत

नांदेड (जिमाका), दि. १५ : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी ११ सप्टेंबर रोजी रुग्णालय परिसराची नियमित पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालय परिसरात एक व्यक्ती गंभीर अवस्थेत आढळून आली.

अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी तत्काळ परिस्थितीची दखल घेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित व्यक्तीस अपघात विभागात दाखल केले. तेथे आवश्यक प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून तातडीने उपचार करण्यात आले.

त्यानंतर पुढील उपचार व वैद्यकीय निरीक्षणासाठी संबंधित व्यक्तीस औषधवैद्यकशास्त्र विभागातील वॉर्ड क्रमांक ३३ मध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार व देखरेख सुरू आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या तत्परतेमुळे संबंधित व्यक्तीस वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध झाली. रुग्णालय परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिष्ठाता व रुग्णालय प्रशासनाकडून नियमित पाहणी करण्यात येत असून, परिस्थितीनुसार आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्यात येत आहे.

***

वृत्त क्रमांक

बारड येथे १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

छायाचित्र प्रदर्शन, तिरंगा रॅली व देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (जिमाका), दि. १५ : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो नांदेड, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि ग्रामपंचायत कार्यालय, बारड यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२६ रोजी बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथे विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात बारड गावाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या मुक्तिसंग्रामात बारड येथील ३३ स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेऊन मोलाचे योगदान दिले. या शूर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी बारड येथील हुतात्मा स्मारक येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम छायाचित्र प्रदर्शन’ हे असणार आहे. या प्रदर्शनातून मुक्तिसंग्रामाची देदीप्यमान गाथा, हुतात्म्यांचे बलिदान, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग तसेच मुक्तिसंग्रामातील शूरवीरांच्या योगदानाची माहिती नागरिकांना करून देण्यात येणार आहे.

याशिवाय जिल्हा परिषद हायस्कूल व कन्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. शाहीर वाघमारे यांच्या पथकातर्फे देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरणही करण्यात येणार आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून नव्या पिढीला त्यांच्या योगदानाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेड आणि ग्रामपंचायत कार्यालय, बारड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

****




Saturday, September 12, 2026

 🗳️ मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६

🔍 प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा 📞 मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारयादी #ECI #SIR2026 #ElectoralRoll



 🚨 भरती परीक्षा सुधारणा टास्क फोर्सचा संभाजीनगर दौरा !

परीक्षा अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद. 🗓️ २१ सप्टें २०२६ | ⏰ स. १०.३० वा. 📍 स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर. #MPSC #ExamReforms #ChhatrapatiSambhajinagar



 मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप !

३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

वृत्त  

भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सचा २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी संवाद

• विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

• सूचना, अभिप्राय स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर विशेष कक्ष

लातूर, दि. १२ (विमाका) : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी टास्क फोर्सचा संवाद दौरा होणार आहे.

या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे समिती संवाद साधणार आहे. तसेच ज्या नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी आपले लेखी अभिप्राय csn-examreformtaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवू शकतात.

या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.

सूचना आणि अभिप्राय संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी कामाच्या अनुषंगाने ही समिती भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, हा कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजासाठी खुला राहील. नागरिक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष सादर करू शकतात. 

***





वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...