Sunday, March 15, 2026

वृत्त क्रमांक 320

मराठी भाषा अस्मितेचा श्वास – प्रा. मा. मा. जाधव

नांदेड दि. १५ मार्च : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि शासनासोबत जवळपास अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. हा दर्जा उशिरा मिळाला असला तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे व तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा श्वास आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मा. मा. जाधव यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. १५ मार्च) आयोजित ‘अभिजात मराठी भाषा व साहित्य’ या परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते.

डॉ. जाधव पुढे म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव होय. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती समाजातील वेदना, संघर्ष आणि दु:ख व्यक्त करणारे प्रभावी माध्यम आहे. अशा प्रकारे समाजाशी जोडलेली भाषा कायम जिवंत राहते.

या परिसंवादात वक्ते संजय जगताप यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामागील ऐतिहासिक पुराव्यांचा उल्लेख केला. दोन हजार वर्षांपूर्वीचे शिलालेख, इ.स. ९३९ चे शिलालेख, ज्योतिष रत्नमाला या संस्कृत ग्रंथातील संदर्भ, आद्यकवी मुकुंदराज यांचा विवेकसिंधु, इ.स. १२७८ मधील महिम भट्ट यांचे लीळाचरित्र, तसेच ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम गाथा यांसारख्या साहित्यसंपदेच्या आधारे मराठीच्या प्राचीनतेचे व समृद्धतेचे पुरावे अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक विलास वैद्य यांनी ‘मराठीच बोला, संतांचा विचार घरोघरी’ या कवितेद्वारे मराठी भाषेचा अभिमान आणि महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमास नांदेडचे तहसीलदार विकास बिरादार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन साहित्यिक नारायण शिंदे यांनी केले तर आभार बालाजी नार्लेवाड यांनी मानले.

0000




वृत्त क्रमांक 319

नांदेड कृषी महोत्सवात १७ मार्च रोजी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा

नांदेड दि.१५ मार्च : नवा मोंढा मैदान, नांदेड येथे १५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा कृषी महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे.

या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बाजरी, नाचणी, वरई, भगर आदी पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ स्पर्धकांनी सोबत आणावेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी कृषी महोत्सवातील नोंदणी विभागात दि. १७ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त स्पर्धकांनी या पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

Saturday, March 14, 2026

 मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषदेत ब्रिजेश सिंह यांनी पत्रकारितेतील एआय वापरावर केले मार्गदर्शन

पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे

-      प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

·         एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची

मुंबई, दि. 14 : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची क्षमता नसते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’चे उद्घाटन महासंचालक श्री. सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी एआयमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात होणारे बदल, संधी आणि आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणाले, मानव इतिहासात ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया छपाई तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मोठ्या प्रमाणावर बदलली. पूर्वी ज्ञान काही विशिष्ट गटांपुरते मर्यादित होते; मात्र छपाईमुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर प्रसारमाध्यमांचा विकास झाला. दूरदर्शन सुरू झाले तेव्हा वृत्तपत्रांना धोका वाटत होता; डिजिटल माध्यमे आली तेव्हा टीव्हीला धोका वाटू लागला. मात्र या सर्व बदलांनंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले. भविष्यातही पत्रकारिता टिकेल, मात्र जे काही काम स्वयंचलित होऊ शकते ते एआयमुळे स्वयंचलित होणार हेही वास्तव आहे, असे त्यांनी नमूद केले.

आज पत्रकारितेत एआयचा वापर वाढत आहे. जगात काही ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत असून बातम्यांचे संकलन, लेखन, संपादन, फॅक्ट-चेकिंग आणि पेज लेआउटसारखी कामे एआयच्या साहाय्याने केली जात आहेत. वित्त, क्रीडा आदी अनेक क्षेत्रांतील बातम्या मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित पद्धतीने तयार होऊ शकतात. त्यामुळे पत्रकारितेतील कामकाजाची पद्धत बदलत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी एआय कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पत्रकारांना एआयचे प्रशिक्षण देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून लवकरच ‘एआय इन जर्नलिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार असल्याचेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे ज्ञान निर्मिती, प्रसार आणि वापराची संपूर्ण पद्धत झपाट्याने बदलत आहे. पत्रकारितेतील अनेक कामे ही स्वयंचलित होत आहेत. भविष्यातही अनेक कामे स्वयंचलित (ऑटोमेटेड) होणार असली, तरी पत्रकारितेमधून सत्यता मांडण्याची जबाबदारी मात्र मानवी बुद्धिवरच राहणार आहे. त्यामुळे एआयमुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलणार असले, तरी पत्रकारितेचे मूलभूत बळ म्हणजे विश्वास असून सत्यता, विश्वास आणि संपादकीय जबाबदारी ही पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे कायम राहणार आहेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

एआयमुळे बातम्या रिअल-टाईम, गतिमान आणि वैयक्तिकृत (हायपर पर्सनलाइज्ड) होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या “अटेन्शन इकॉनॉमी” मध्ये वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या स्वरूपात सामग्री सादर केली जात आहे. काही विदेशी वृत्तसंस्था एकाच बातमीचे अनेक पर्याय तयार करून वेगवेगळ्या वाचकगटांना पाठवतात आणि कोणता प्रकार प्रभावी ठरतो याचा अभ्यास करतात, अशी माहितीही प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी यावेळी दिली.

एआयच्या मदतीने रिअल-टाइम कंटेंट, इन्फोग्राफिक्स आणि व्हिडिओ तयार होत आहेत. त्यामुळे बातम्या ‘लिक्विड’ आणि सतत बदलणाऱ्या स्वरूपात उपलब्ध होत आहेत. माहितीचा वेग प्रचंड वाढला आहे. आज एआयमुळे एक व्यक्ती दिवसाला २०-३० लेख तयार करू शकते. त्यामुळे माहितीचे प्रमाण वाढले असले, तरी त्यातील विश्वासार्हतेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे, असे श्री. सिंह यांनी सांगितले.

एआयची एक मोठी मर्यादा म्हणजे भारतीय भाषांचे आकलन. एआय तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असली तरी त्याला मराठीसह भारतीय भाषांचा संदर्भ पूर्णपणे समजत नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. बहुतेक मोठी लँग्वेज मॉडेल्स ही विकिपीडिया, रेडिटसारख्या पाश्चात्त्य स्रोतांवर आधारित असल्याने भारतीय अनुभव, संस्कृती आणि भाषांचा डेटा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र एआय विकास आणि “डेटा सार्वभौमत्व” महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एआयवर आधारित प्रणाली कधी कधी चुकीची माहिती तयार करतात. ‘हॅलुसिनेशन’मुळे नसलेले संदर्भ किंवा माहिती निर्माण होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्येही एआयने चुकीची माहिती दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एआय-निर्मित सामग्रीची जबाबदारी शेवटी संपादकीय स्तरावरच राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री. सिंह म्हणाले की, एआयमुळे माहितीचे प्रचंड प्रमाण तयार होत आहे. डिजिटल माध्यमांमध्ये “एआय स्लॉप” म्हणून ओळखली जाणारी मोठ्या प्रमाणातील हलकी सामग्री तयार होत आहे. त्यामुळे भविष्यात पत्रकारिता दोन भागांत विभागली जाऊ शकते, एक म्हणजे मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या सामान्य बातम्या आणि दुसरी म्हणजे संशोधनाधारित, तपासात्मक व दर्जेदार पत्रकारिता.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात एआयचा प्रभावी वापर

एआयमुळे “डिप फेक” सारख्या तंत्रज्ञानाचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. खोटे व्हिडिओ तयार करणे सोपे झाले असले तरी खऱ्या व्हिडिओलाही “डिप फेक” म्हणण्याची प्रवृत्ती वाढत आहे. यामुळे सत्यावर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एआय आधारित फॅक्ट चेक प्रणाली सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. संशयास्पद व्हिडिओ किंवा माहितीची पडताळणी करून ती खरी की खोटी हे तपासण्याची सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे.

याशिवाय पश्चिम देशांमध्ये विकसित होत असलेल्या “प्रोव्हेनेन्स” तंत्रज्ञानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, फोटो किंवा व्हिडिओमध्ये विशिष्ट डिजिटल स्वाक्षरी (डीएनए सिग्नेचर) समाविष्ट केली जाते. त्यामुळे मूळ सामग्रीमध्ये कोणताही बदल झाला आहे का हे सहज ओळखता येते. भारतातही अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. सिंह यांनी सांगितले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात एआयचा वापर सुरू झाला आहे. बैठकींचे मुद्दे किंवा माहिती टाकल्यानंतर त्यातून तत्काळ विविध भाषांमध्ये सामग्री तयार करता येते. त्यामुळे सरकारी माहिती आता रिअल-टाइम स्वरूपात प्रसारित करता येत आहे आणि डिजिटल माध्यमांवरील पोहोच मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यावेळी श्री. चव्हाण यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, पत्रकारितेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले असून पूर्वी एखादी बातमी करण्यासाठी रिपोर्टर, कॅमेरामन, सहाय्यक आणि चालक अशी अनेकांची टीम लागायची; मात्र आता एकच पत्रकार मोबाईलच्या माध्यमातून चित्रीकरण, लेखन, व्हॉइसओव्हर आणि एडिटिंगसारखी सर्व कामे करू शकतो. तंत्रज्ञानाची ही प्रगती थांबवता येणार नाही, त्यामुळे पत्रकारांनी एआय आणि नवीन साधनांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. गुगल, ई-मेल, सोशल मीडिया आणि मोबाईल तंत्रज्ञानामुळे संवाद आणि माहितीचा वेग प्रचंड वाढला असून भविष्यात एआयमुळे आणखी मोठे बदल घडणार आहेत. त्यामुळे अशा परिषदांमधून पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान चांगले की वाईट हे त्याच्या वापरावर अवलंबून असते, त्यामुळे एआयचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात श्री. शिर्के यांनी सांगितले की, एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख अनेकांना असली तरी त्याचे सखोल ज्ञान अशा परिषदांमधूनच मिळते. त्यामुळे या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणे पत्रकारांसाठी महत्त्वाचे आहे. राज्यात एआयचा वापर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आग्रही असून शासनाच्या कामकाजातही तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या पुढाकारामुळे शासनाच्या बातम्या पत्रकारांपर्यंत अधिक वेगाने आणि सुटसुटीत स्वरूपात पोहोचत असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी सूत्रसंचालन केले. प्रधान सचिव श्री. सिंह यांच्या हस्ते परिषदेतील वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.

००००









वृत्त क्रमांक 318


 

वृत्त क्रमांक 317

नांदेड तालुक्यातील लिंबगाव महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न

नांदेड, दि.१४ मार्च : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले,अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड,निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील दुसरे शिबिर लिंबगाव येथे उत्साहात पार पडले. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या शिबिराला परिसरातील 16 गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदेड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ हे होते. याप्रसंगी त्यांनी प्रशासन लोकाभिमुख करणेसाठी व शासकीय योजनांचा तळागाळातील जनतेने लाभ देण्यासाठी शासनाची एकाच ठिकाणी सर्व कामे होण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरामध्ये 960 डिजिटल सातबारा, 640 आठ-अ उताऱ्यांचे वाटप, विविध प्रमाणपत्र वाटप 621 अर्जदारांना व 15 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ वाटप करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमिअभिलेख, (मोजणी) तसेच दुय्यम निबंधक,प्राथमिक आरोग्य केंद्र,बाल विकास प्रकल्प विभाग,संगायो विभाग,पुरवठा विभाग,बचतगट विभागासह विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले.

तहसील कार्यालय, नांदेड यांच्यावतीने शिबिरात महसूली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये 960 ऑनलाईन डिजिटल सातबारा उतारे व 640 आठ-अ उतारे, विविध प्रमाणपत्र 621, नागरिकांना देण्यात आले. तसेच 15 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय फेरफार संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले.

शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. आपल्‍या प्रस्‍ताविकात त्यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबधित दैनंदिन प्रश्‍नांचे निराकरण करण्यात येत असल्याचे सांगीतले.

तसेच अकृ‍षिक, जिवंत सातबारा, सामाजिक अर्थसहायाच्‍या योजना आदिंची सविस्‍तर माहिती देऊन मार्गदर्शन केले व संजय गांधी निराधार योजनेचे दिव्यांग लाभार्थी यांनी दिव्‍यांग कार्ड (यूडीआयडी कार्ड) काढून घेवून सादर करावे, असे आवाहन केले.
नायब तहसिलदार सुनिल माचेवाड व स्वप्नील दिगलवार व पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लिंबगावचे सरपंच कमलबाई संजयराव कदम,जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सिमा देशमुख,गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर,उप अधीक्षक भूमिअभिलेख बळवंत मस्के,तालूका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रविण मुंडे,मेडिकल अधिकारी डाॅ.पंडित डवले,शिक्षण विस्तार अधिकारी लता कवठेकर,विस्तार अधिकारी पंचायत राजू केंद्रे,बालविकास प्रकल्प चे पंडित मॅडम,जि.प हायस्कूल लिंबगाव चे मुख्याध्यापिका एस एल शेळके मॅडम अदिची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्राम महसूल अधिकारी अश्विनी गिरडे यांनी केले व आभार प्रदर्शन लिंबगावचे मंडळ अधिकारी रुपाली वाढोरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, लिंबगाव महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी रुपाली वाठोरे, ग्राम महसूल अधिकारी डॉ महेश जोशी , चंदा पवार ,महावीर ब्रिदाळे, उदयकुमार मिसाळे व ग्राम पंचायत अधिकारी लिंबगाव डाकनवाले यांनी परिक्षम घेतले. संगांयो विभागाचे सुनिता परोडवाड, प्रितिका मुडगुलवार, संतोष वाघमारे , पुरवठा विभागाचे चंदा पवार, प्रतिभा मारतळेकर,आपले सरकार सेतू चालक कदम अशोक , गजानन घोगरे ,सुनील सूर्यवंशी , शिंदे आदिनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.तसेच मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी,संतोष अस्कूलवार, कृष्णा येलमट्टे ,मारोती कदम,रमेश गिरी,मारोती जमदाडे,मारोती जमदाडे, मारोती श्रीरामे व तालुक्यातील सर्व महसूल सेवक यांनीही उपस्थित राहून सहकार्य केले.तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. कार्यक्रमास जि प हायस्कूलच्या शिक्षिका गीता सुळे यांनी आकर्षक रांगोळी काढली होती.शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
0000







वृत्त क्रमांक 316

वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास – जेष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत

घ्रंथ हेच गुरु- महापौर कविता मुळे

नांदेड ग्रंथोत्सवाचे उत्साहात उद्धघाटन

नांदेड दि.१४ मार्च :-काय वाचावे या संभ्रमात न राहता माणसाने हाती पडेल ते वाचावे. वाचनामुळे इतिहासाचा मागोवा घेता येतो तसेच भविष्याचा कानोसा घेण्याची दृष्टी मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन तसेच ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षीय समारोपात बोलत होते.

या वेळी नांदेड महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता मुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, अनिल बाविस्कर, संभाजीराव धुळगंडे, साहित्यिक नारायण शिंदे, प्रताप सूर्यवंशी, निर्मलकुमार सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सावंत पुढे म्हणाले की, आपण मोठमोठी घरे बांधतो आणि सर्व सोयी उपलब्ध करून देतो; मात्र घरात पुस्तकांसाठी स्वतंत्र जागा ठेवत नाही. घरात पुस्तकांचा कोपरा असणे आवश्यक आहे. पुस्तकांविना घर म्हणजे श्वासोच्छ्वास थांबलेल्या शरीरासारखे आहे. वाचन ही आपली संस्कृती असून ती जपली तर वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत होईल.

महापौर सौ.कविता मुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपण आई-वडील व शिक्षकांना गुरू मानतो. गुरू जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात; परंतु जिथे गुरू मार्गदर्शन करू शकत नाहीत, तिथे ग्रंथ मार्ग दाखवतात. म्हणूनच ग्रंथ हेच खरे गुरू आहेत. आजच्या बाल व तरुण पिढीने मोबाईलपासून दूर राहून वाचनाची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, वाचन संस्कृती लोप पावत नाही, उलट विविध कार्यक्रमांतील पुस्तक स्टॉलवरील विक्री पाहता वाचनाची आवड वाढत असल्याचे दिसून येते. यापुढे ग्रंथोत्सव तालुका स्तरावर आयोजित करण्याचा विचार असून वाचकांचा गौरव करण्यावर भर दिला जाईल.

पुरपरिस्थितीमुळे राज्यातील ५६ ग्रंथालयांना नुकसान झाले असून त्यापैकी २४ ग्रंथालये नांदेड जिल्ह्यातील आहेत. या ग्रंथालयांना पुस्तके, कपाटे तसेच काही मोठ्या ग्रंथालयांना संगणक उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सकाळी महात्मा फुले पुतळा येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली.

या ग्रंथोत्सवात शासकीय स्टॉल सहित विविध १५ स्टॉल लावले आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अरविंद सूर्यवंशी यांनी केले तर आभार राज्य ग्रंथालय निरीक्षक प्रताप सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास ग्रंथालय कर्मचारी, वाचक व ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

















 विशेष लेख

 १५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस 

आधुनिक अर्थव्यवस्थेत ग्राहक हा केंद्रबिंदू मानला जातो. बाजारपेठेत वस्तू आणि सेवा तयार करणारे उत्पादक, व्यापारी, सेवा पुरवठादार यांचे अस्तित्व ग्राहकांमुळेच टिकून असते. त्यामुळे ग्राहकांचे हित, सुरक्षा आणि अधिकार यांचे संरक्षण करणे ही शासन व समाजाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी १५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ (World Consumer Rights Day) म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे आणि बाजारपेठेत न्याय्य व्यवहार सुनिश्चित करणे हा आहे.

 ग्राहक म्हणजे काय? 

ज्या व्यक्तीने स्वतःच्या वापरासाठी किंवा उपभोगासाठी एखादी वस्तू खरेदी केली किंवा सेवा घेतली, त्या व्यक्तीला ग्राहक असे म्हणतात. भारतीय कायद्यानुसार, वस्तू किंवा सेवा विकत घेणारा, त्यासाठी किंमत देणारा किंवा त्या सेवेचा लाभ घेणारा प्रत्येक नागरिक ग्राहक मानला जातो. ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठा घटक असून त्याचे संरक्षण हे लोककल्याणकारी राज्याचे कर्तव्य आहे.

 ग्राहकांचे मूलभूत अधिकार 

ग्राहक चळवळीमुळे ग्राहकांना काही मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. १९६२ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनीडी यांनी अमेरिकन काँग्रेससमोर ग्राहक हक्कांविषयी ऐतिहासिक भाषण करत चार मूलभूत अधिकार मांडले. त्यात पुढील अधिकारांचा समावेश होता –

सुरक्षेचा अधिकार (Right to Safety) – धोकादायक वस्तू किंवा सेवांपासून संरक्षण.

माहितीचा अधिकार (Right to be Informed) – वस्तूची गुणवत्ता, प्रमाण, किंमत आणि दर्जा याबाबत अचूक माहिती मिळण्याचा अधिकार.

निवडीचा अधिकार (Right to Choose) – विविध पर्यायांमधून वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार.

मते मांडण्याचा अधिकार (Right to be Heard) – ग्राहकांचे मत शासन आणि धोरण प्रक्रियेत ऐकले जाणे.

यानंतर संयुक्त राष्ट्रांनी १९८५ मध्ये ग्राहक संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारून ग्राहक शिक्षण, तक्रार निवारण, मूलभूत गरजांची पूर्तता आणि निरोगी पर्यावरणाचा अधिकार यांसारखे अतिरिक्त अधिकारही मान्य केले. 

 १५ मार्चलाच ग्राहक दिन का ? 

१५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ग्राहक हक्कांचा प्रश्न प्रथमच जागतिक पातळीवर मांडला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ १९८३ पासून जगभर १५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी ग्राहक संघटना, शासन संस्था आणि सामाजिक संघटना ग्राहक हक्कांविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करतात. 

 ग्राहक चळवळ म्हणजे काय? 

ग्राहक चळवळ म्हणजे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी चालवली जाणारी सामाजिक आणि कायदेशीर चळवळ. बाजारपेठेतील फसवणूक, निकृष्ट दर्जाची उत्पादने, अन्यायकारक व्यापार पद्धती आणि ग्राहकांची फसवणूक याविरोधात जनजागृती करणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. जगभरातील ग्राहक संघटनांनी एकत्र येऊन ग्राहकांच्या हितासाठी विविध मोहिमा राबवल्या आणि अनेक देशांमध्ये ग्राहक संरक्षणाचे कायदे लागू झाले.

 भारतातील ग्राहक चळवळीची सुरुवात

भारतामध्ये ग्राहक चळवळ १९६० च्या दशकात सुरू झाली. ग्राहक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांनी ग्राहक संरक्षणासाठी व्यापक जनजागृती केली. या चळवळीचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा १९८६ (Consumer Protection Act 1986 ) हा कायदा. या कायद्यामुळे ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक न्यायालयांची व्यवस्था करण्यात आली. 

यानंतर बदलत्या बाजारपेठेच्या गरजेनुसार भारत सरकारने ग्राहक संरक्षण कायदा (Consumer Protection Act 2019 ) लागू केला. या कायद्यामुळे ई-कॉमर्स व्यवहार, भ्रामक जाहिराती आणि ऑनलाइन व्यापार यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन तरतुदी करण्यात आल्या.ऑनलाइन वस्तू मागवली पण वस्तू मिळाली नाही,चुकीची वा निकृष्ट वस्तू मिळाली,

पैसे घेतले पण सेवा दिली नाही,भ्रामक ऑनलाइन जाहिरात करून ग्राहक फसवला, ई-कॉमर्स कंपनीने रिफंड दिला नाही,आदी सर्व तक्रारी ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत करता येतात.तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी तीन-स्तरीय ग्राहक आयोग व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे. 

 भारतातील ग्राहक दिन 

जागतिक पातळीवर १५ मार्च हा ग्राहक दिन आहे. तर भारतामध्ये २४ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारण २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. या दिवशी ग्राहक हक्कांविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. 

महाराष्ट्रातील ग्राहक चळवळ उभारण्यात प्रामुख्याने बिंदू माधव जोशी,स्वातीताई शहाणे, बापूसाहेब महाशब्दे यांच्यासह विविध संघटनांनी योगदान दिले. त्यांनी ग्राहक हक्कांसाठी विविध संघटना उभारून जनजागृती, कायदेशीर लढाया आणि संशोधनकार्य केले.

 महाराष्ट्र शासनाची भूमिका 

महाराष्ट्र शासनाने अन्न व नागरी पुरवठा हे एक मंत्रालय निर्माण केले आहे.  त्या अंतर्गत  ग्राहक संरक्षणासाठी स्वतंत्र ग्राहक संरक्षण विभाग, राज्य व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, राज्य व जिल्हा ग्राहक आयोग,( जिल्हा ग्राहक न्यायालय )राज्य ग्राहक आयोग, आणि ग्राहक संघटनांनी ग्राहक मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहेत.जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या मार्फत राज्यात ग्राहक जनजागृतीसाठी ग्राहक तक्रार निवारण केंद्रे, तसेच शालेय-महाविद्यालयीन स्तरावर ग्राहक शिक्षण कार्यक्रम राबवले जातात.50 लाखांपर्यंतच्या फसवणुकीसाठी जिल्हास्तरावरच ग्राहकांना याचिका दाखल करता येते आणि जिल्हा ग्राहक न्यायालयाकडून या संदर्भात न्याय दिला जाते. याशिवाय 50 लाख ते दोन कोटी पर्यंत राज्य व त्या पुढच्या रकमेसाठी केंद्रीय जिल्हा ग्राहक आयोगात खटलात चालवला जाऊ शकतो.जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा स्तरावर ग्राहकांच्या संदर्भातील अनेक समित्यांचे सदस्य सचिव म्हणून काम बघतात त्यांच्यामार्फत ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठका आयोजित केल्या जातात.

त्यामुळे  सध्या बाजारातील हालचाली बघता जागतिक ग्राहक दिन हा केवळ एक स्मरणदिन नसून ग्राहक सक्षमीकरणाचा संदेश देणारा दिवस आहे. बाजारपेठेतील अन्यायकारक पद्धतींना आळा घालण्यासाठी ग्राहक जागरूक असणे आवश्यक आहे. शासन, ग्राहक संघटना आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच ग्राहकांचे हित सुरक्षित राहू शकते. म्हणूनच १५ मार्चचा दिवस आपल्याला ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांची जाणीव करून देतो आणि न्याय्य व पारदर्शक बाजारपेठ निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतो.

प्रवीण टाके

उपसंचालक

विभागीय माहिती कार्यालय

कोल्हापूर

9702858777

---------



वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...