Monday, November 17, 2025

 वृत्त क्रमांक 1215

नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक

अध्यक्षपदासाठी एकुण 212 तर सदस्यपदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र दाखल   

आज होणार नामनिर्देशनपत्राची छाननी   

नांदेड, दि. 17 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी सोमवार 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 17  नोव्हेंबर 2025 पर्यंत नांदेड जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी एकुण 212 तर सदस्य पदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आली आहेत.   

नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी आज 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी दिली आहे. 

नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निहाय सोमवार 10 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटच्या दिनांकापर्यंत एकुण नामनिर्देशनपत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे.     

कुंडलवाडी नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 10 तर सदस्यपदासाठी एकुण 155 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

किनवट नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 28 तर सदस्यपदासाठी एकुण 267 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

लोहा नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 5 तर सदस्यपदासाठी एकुण 106 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

हदगाव नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 182 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

उमरी नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 7 तर सदस्यपदासाठी एकुण 104 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

भोकर नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 32 तर सदस्यपदासाठी एकुण 208 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

मुखेड नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 12 तर सदस्यपदासाठी एकुण 122 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

हिमायतनगर नगरपंचायत  

अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

धर्माबाद नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 15 तर सदस्यपदासाठी एकुण 160 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

कंधार नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 8 तर सदस्यपदासाठी एकुण 120 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

मुदखेड नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 206 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

देगलूर नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 11 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. 

बिलोली नगरपरिषद  

अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 145 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

00000

 वृत्त क्रमांक 1214

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खांबेगाव येथे श्रमदान करुन जलतारा उपक्रमाचा शुभारंभ

जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जावून शेतकऱ्यांशी साधला संवाद

नांदेड, दि. 17 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्याला एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित आहे.  या जलतारा उपक्रमाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील खांबेगाव येथे करण्यात आला. 

यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, नायब तहसिलदार मेकाळे, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, उपकृषी अधिकारी लक्ष्मण हांडे, उपकृषी अधिकारी मोहनराव देशमुख, सहाय्यक कृषी अधिकारी, सरपंच  संदीप पोळ, मनरेगा विभाग लोहा, खांबेगावचे ग्रामपंचायतचे उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ, शेतकरी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी तसेच वॉटर संस्थेची टीम आदीची उपस्थिती होती. 

Catch the Rain-where it Falls, when it Falls या संकल्पनेनुसार पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी शेतातच मुरवून भूजलपातळी वाढवणे, जमीन चिभडण्याचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मनरेगा विभाग व भारत रुलर लाइव्हलीहुड फाऊंडेशन (बीआरएलएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात सहा तालुक्यांत हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प सुरु आहे. लोहा आणि नांदेड तालुक्यात वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे. प्रकल्पातील 36 गावांचे सविस्तर प्रकल्प आराखडे पाणलोटच्या संकल्पनेनुसार व मनरेगातील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कामांना प्राधान्य देवून तयार करण्यात आले आहेत. 

जलतारामुळे शेतातील पाणी एकवटल्या जाते अशा उताराच्या ठिकाणी किंवा जेथे जमीन जिभडल्या जाते अशा ठिकाणी  5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल खड्डा करुन त्यात मोठे व मध्यम दगड भरुन जलतारा तयार केला जातो. एका जलतारामधून सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमीनीत मुरविण्याची क्षमता आहे. ज्यामुळे विहिर-बोअरवेलचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते. जलतारा हा मनरेगाच्या एनआरएम कामाच्या प्रकारामध्ये येतो. त्यामुळे जलताराची कामे जिल्ह्यातील ग्रामपंचायत यांनी केल्यास कामाचा कुशल व अकुशलचे प्रमाण राखता येईल व मजुरांच्या हाताला काम मिळेल. नैसर्गिक संसाधन संवर्धन करण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पाअंतर्गत ग्रा. पं. हळदव येथे सुरु असलेल्या विविध उपक्रमांना भेट देवून प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांनी निसर्ग संवर्धनासाठी सेंद्रीय शेतीचा अवलंब करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. 

00000











वृत्त क्रमांक 1213

मोटार सायकल वाहनांसाठी नवीन मालिका सुरु

नांदेड, दि. 17 नोव्हेंबर :- परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26-सीझेड ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे.  ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ईमेलसह अर्ज 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहे. तसेच या अर्जासोबत संबंधित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश डीडी सुध्दा सादर करावा. विहित केलेल्या दिनांक व वेळेनंतर पसंतीक्रमासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 19 नोंव्हेंबर 2025 रोजी 4  वाजता टेक्स्ट मॅसेज दुरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1212

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी

इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक

नांदेड दि. 17 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य फलक (ऑडीओ व्हिज्युअल डिसप्ले), ई-वृत्तपत्रे, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे आदींचा समावेश होतो. 

निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती स्थापण्यात आली आहे. या समितीत जिल्हा पोलिस अधीक्षक, उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडणे आवश्यक आहे. अर्जाचा विहित नमुना महाराष्ट्र शासनाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या अधिसूचनेसोबत दिलेला आहे.

00000

दि.15 नोव्हेंबर 2025

 वृत्त क्रमांक 1211

आज रविवार सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे भरता येणार

नामनिर्देशनपत्रे ऑनलाइन, ऑफलाइन दोन्ही पध्दतीने भरता येतील

नांदेड दि.15 नोव्हेंबर :- नगर परिषद, नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा 4 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्दी केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत. परंतु संगणक प्रणालीमध्ये स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तसेच नामनिर्देशन पत्रे सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत, अशा परिस्थितीत संगणक प्रणालीवरील भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोगाने पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. 

दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये तीनही दिवस (रविवार 16 नोव्हेंबर 2025) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळ (ऑनलाईन) तसेच पारंपारिक (ऑफलाइन) पध्दतीनेसुध्दा नामनिर्देशन पत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील, असे नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त गंगाधर इरलोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Friday, November 14, 2025

 वृत्त क्रमांक 1210

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्या अर्जावर कार्यवाही करण्याच्या कालावधीत वाढ

नांदेड, दि. 14 नोव्हेंबर :- उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे १४ नोव्हेंबर, २०२५ पत्रान्वये पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तारीख वाढवून दिली असून सुधारित कार्यक्रम जाहिर केला आहे.
हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दिनांक २८ नोव्हेंबर, २०२५, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दिनांक ०३ डिसेंबर, २०२५, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक ०३ ते १८ डिसेंबर, २०२५, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दिनांक ०५ जानेवारी, २०२६, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दिनांक १२ जानेवारी, २०२६ असा केला असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
***

 वृत्त क्रमांक 1209

दहावी परीक्षेचे अर्ज सादर करावयाच्या

विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ  

नांदेड दि. 14 नोव्हेंबर :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ देण्यात आली आहे. शुल्क प्रकारात विलंब शुल्क (मुदतवाढ) साठी आवेदनपत्र भरावयाची मुदत 11 ते 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत, विलंब शुल्काने आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आरटीजीएस-एनईएफटीद्वारे भरणा करावयाचा कालावधी 11 ते 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत, माध्यमिक शाळांनी आरटीजीएस-एनईएफटीची पावती-चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची मुदत 19 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे 'Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी स्कूल प्रोफाईल School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट SUBMIT केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन (School Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी UDISE + मधील PEN-ID मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोट असणे आवश्यक आहे. सदर UDISE + मधील PEN-ID वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे.

पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना अनिलाईन पध्दतीने भगवयाची आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी. सर्व माध्यमिक शाळांनी Website द्वारे प्राप्त ऑनलाईन चलनावर नमूद केलेल्या ICICI बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून RTGS / NEFT द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा व चलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या application status मध्ये "Draft" to "Send to Board" व Payment status मध्ये "Not Paid” to “Paid" असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा "Send to Board" व "Paid" Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. 

माध्यमिक शाळांना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड करून एक किंवा एकापेक्षा अधिक चलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक चलन स्वतंत्रपणे भरण्यात यावे. जेणेकरून त्यात समाविष्ट विद्यार्थ्यांचे Status Update होईल. 

आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाऊनलोड करून चलनावरील virtual account = RTGS/NEFT द्वारे भरावयाचे आहे. माध्यमिक शाळांनी RTGS/NEFT द्वारे भरणा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच account number व IFSC code चूकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्या खात्यात जमा झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याची जवाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. 

माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना पुनःश्च मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...