Monday, September 29, 2025

एक हात मदतीचा पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी

भारतातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी आशेचा ऋतू असतो, पण त्याच पावसाचे रौद्ररूप धरणीमातेवर संकट कोसळवते. राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, खेडी पाण्याखाली गेलीत, शेतमाल व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीमुळे शेतकरी आणि त्यांची कुटुंबे मानसिक, आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडली आहेत.

पूरस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती

1. शेतीचे नुकसान – पिके पाण्याखाली गेल्याने हंगामभराचे श्रम वाया गेलेत.

2. जनावरांचा बळी – गायी, म्हशी, बकऱ्या, बैल यांचे जीवित वाचवणे कठीण झालेले आहे.

3. घरांची पडझड – मातीची घरे, झोपड्या वाहून गेलीत, अनेक कुटुंब बेघर झालेत. 

4. आरोग्य धोक्यात – पूरपाण्यामुळे, दूषित पाणी यामुळे साथीचे रोग पसरण्याची संभावना नाकारता येत नाही.

5. मानसिक ताण – उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्यामुळे शेतकरी नैराश्यच्या विळख्यात सापडण्याची  शक्यता नाकारता येत नाही.  

वृत्त क्रमांक 1025

मुख्यमंत्री सहायता निधी — आशेचा किरण

नांदेड, २९ सप्टेंबर:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी  आपत्तीग्रस्तांना तसेच दुर्बल घटकांना तातडीची मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीची व्याप्ती वाढवलेली आहे. 

महाराष्ट्र राज्यातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

समाजाची सामूहिक जबाबदारी:

फक्त शासनाची मदत पुरेशी ठरत नाही. पूरस्थिती हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे.

सामान्य नागरिक – आपल्याला शक्य तितक्या प्रमाणात आर्थिक मदत करावी.

उद्योगपती व व्यापारी वर्ग – यांनी  मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा.

सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटना – पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष मदत करावी.

विद्यार्थी व युवक मंडळे – कपडे, औषधे, अन्नधान्य संकलन मोहिमा राबवावी.

योगदान कसे द्यावे?

1. ऑनलाईन योगदान – मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन योगदान द्यावे.  www.cmrf.maharashtra.gov.in 

2. धनादेश – Chief Ministers Relief Fund

 Account No 10972433751 IFSC Code SBIN0000300 

3. वस्तुरूपात मदत – अन्नधान्य, औषधे, कपडे, चारा इत्यादी.

4. स्वयंसेवा – बचाव व पुनर्वसन कार्यात प्रत्यक्ष सहभाग.

मदत का आवश्यक आहे?

शेतकरी व कुटुंबियांच्या जगण्याला आधार देण्यासाठी. 

पिके, घरे व जनावरांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी. 

गावोगावी शिक्षण व आरोग्यसेवा पुन्हा उभारण्यासाठी. 

पूरबाधित नागरिकांचा मानसिक आधार व आत्मविश्वास वाढविण्यासाठी. 

     पूरग्रस्त शेतकरी आज अडचणीत आहे. आपल्या कष्टाने तोच समाजाला अन्नधान्य पुरवतो, पण आपत्तीच्या वेळी त्याच्या घरात उपासमारीची वेळ येते. म्हणूनच मुख्यमंत्री सहायता निधी हा केवळ सरकारी उपक्रम नसून समाजाच्या सहभागाचा आधारस्तंभ आहे.

“शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी दिलेली मदत ही केवळ देणगी नसून भविष्यातील समाजाला उभारण्याचे कार्य आहे.” आपण सर्वांनी या कार्यात हातभार लावणे हीच खरी देशसेवा आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे किंवा टोल फ्री क्रमांक 18001232211 येथे संपर्क साधावा..

 गजानन वानखेडे

समाजसेवा अधीक्षक (वै) मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

मो.न. ९९२१९८६०४७





वृत्त क्रमांक 1024 २८ सप्टेंबर 2025

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिवसांचे वेतन

महसूल व जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी यांचा निर्णय

नांदेड, २८ सप्टेंबर:- ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ महिन्यातील भीषण पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला केले होते.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातील महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटना (जिल्हा नांदेड), महाराष्ट्र राज्य तलाठी संघ (राज्यस्तरावरून) तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना (जिल्हा) यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपला एक दिवसाचा वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच जिल्हा परिषद, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बाधितांना मदत म्हणून एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर जमा होणारा निधी मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.



 

वृत्त क्रमांक 1023 २८ सप्टेंबर 2025

भालकी येथे २४ नागरिकांचा थरारक बचाव

नांदेड, दि.२८ सप्टेंबर:- : नांदेड तालुक्यातील भालकी परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आसना नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे मौजे भालकी शिवारातील शेतांमधील आखाड्यावर तब्बल २४ नागरिक अडकून पडले होते. त्यामध्ये ३ लहान मुले, ८ महिला आणि १३ पुरुष यांचा समावेश होता.

घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच माननीय उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व  तहसीलदार संजय वारकड यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने एसडीआरएफ (State Disaster Response Force) पथकाला संपर्क केला. तात्काळ दोन बोटींसह एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा अंधारात तब्बल दहा वाजेपर्यंत चाललेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व २४ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.

बचावकार्य संपल्यानंतर सर्व नागरिकांना सुरक्षित निवारा केंद्रावर नेण्यात आले. तेथे त्यांच्यासाठी जेवण व झोपण्याची योग्य सोय प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

या धाडसी बचावकार्यात एसडीआरएफ पथकासोबत स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये मंडळ अधिकारी तरोडा शिवानंद स्वामी, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, तलाठी गोपीनाथ कल्याणकर, अविनाश करंदीकर, कृषी सहाय्यक वसंत जारिकोटे, तसेच प्रभाकर शेजुळे (सरपंच चिखली बुद्रुक), राजू धाडवे (सरपंच भालकी), गणेश धाडवे, लक्ष्मण कल्याणकर व समस्त गावकऱ्यांनी मोठी मदत केली.

प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

०००००



मौजे बोंढार तर्फे नेरली (ता. नांदेड) येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने आसना नदीला आलेल्या पुरामुळे रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांच्या शेतातील फार्मवर सहा नागरिक अडकून पडले होते. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसामुळे अखेर सर्वांचा थरारक बचाव करण्यात यश आले.

अडकलेल्यांमध्ये व्यंकट दत्ता वरपडे (40), छाया व्यंकट वरपडे (35), संस्कृती व्यंकट वरपडे (13), दिगंबर बाजीराव पाथरपल्ले (55), सुमनबाई दिगंबर पाथरपल्ले (40) व बाजीराव दिगंबर पाथरपल्ले (21) यांचा समावेश होता.

बचावासाठी तलाठी डी. एम. पाटील व रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांनी स्वतः पाण्यात उतरून रसीच्या सहाय्याने, तसेच गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे अखेर सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांचे धाडस तसेच तत्परता अधोरेखित झाली आहे.


वृत्त क्रमांक 1022 २८ सप्टेंबर 2025

 प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मौजे बोंढार तर्फे नेरली येथील सहा नागरिकांचा बचाव 

नांदेड, दि. २८ सप्टेंबर:- नांदेड तालुक्यातील मौजे बोंढार तर्फे नेरली येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने आसना नदीला आलेल्या पुरामुळे रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांच्या शेतातील फार्मवर सहा नागरिक अडकून पडले होते. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसामुळे अखेर सर्वांचा थरारक बचाव करण्यात यश आले.

अडकलेल्यांमध्ये व्यंकट दत्ता वरपडे (40), छाया व्यंकट वरपडे (35), संस्कृती व्यंकट वरपडे (13), दिगंबर बाजीराव पाथरपल्ले (55), सुमनबाई दिगंबर पाथरपल्ले (40) व बाजीराव दिगंबर पाथरपल्ले (21) यांचा समावेश होता.

बचावासाठी तलाठी डी. एम. पाटील व रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांनी स्वतः पाण्यात उतरून रसीच्या सहाय्याने, तसेच गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे अखेर सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांचे धाडस तसेच तत्परता अधोरेखित झाली आहे.

0000

वृत्त क्रमांक 1021 २८ सप्टेंबर 2025

२८ व ३० सप्टेंबर व १ व २ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी 

नांदेड, २८ सप्टेंबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी  २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २८ व ३० सप्टेंबर तसेच ०१ व ०२ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. २८ सप्टेंबर २०२५ या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व ३० सप्टेंबर २०२५ तसेच ०१ व ०२ ऑक्टोबर २०२५ हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा :

१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

१) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...