Monday, September 29, 2025

 प्रेस-नोट

दिनांक :- २८.०९.२०२५

महापालिका आयुक्तांनी दिल्या पुरग्रस्त भागांना व निवारा केंद्रांना भेटी

मागील दोन दिवसात महपालिकने केले ९७० पुरग्रस्तांचे स्थलांतर

शोध व बचाव कार्यामध्ये अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे व त्यांच्या टीमचे धाड़सी कार्य

नांदेड,२८ :- नांदेड शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजिवन विस्कळीत झाले असुन नागरीकांच्या मदतीला मनपा प्रशासन धावुन जाऊन मागील दोन दिवसापासुन मतदकार्य करीत आहे. याच पार्श्वभुमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी दिनांक २८.०९.२०२५ रोजी शहरातील सखल भागातील विविध पुरग्रस्त भागांना व महापालिकेने स्थापित केलेल्या निवारा केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली आहे.

यावेळी आयुक्तांनी शहरातील नदीपात्रालगत व सखल भागात पाणी शिरल्याने महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा करण्याची प्रक्रिया व नागरीकांच्या स्थलांतरीत प्रक्रियेची पाहणी केली. याचबरोबर आयुक्तांनी महापालिकेने स्थापित केलेल्या तात्पुरत्या निवारण केंद्रास भेट देऊन नागरीकांची विचारपुस केली. मागील दोन दिवसांत महापालिका प्रशासनामार्फत एकुण ९७० नागरीकांना स्थलांतरीत करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शोध व बचाव कार्यामध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी के.जी.दासरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष कार्य पार पाडले आहे. निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या नागरीकांना महापालिकेतर्फे जेवण, पिण्याचे पाणी इत्यादी जिवणावश्यक वस्तु पुरविण्यात येत असुन सदरील ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, फवारणी, प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचाच आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष निवारा केंद्रास भेट देऊन घेतला आहे. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, निलेश सुंकेवार, शहर अभियंता सुमंत पाटील, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे यांची उपस्थित होते.

या भेटीदरम्यान मनपा आयुक्तांनी एनटीसी मिलएरिया, पाकीजा फंक्शन हॉल, लिबर्टी फंक्शन हॉल, आणि नंदगिरी किल्ला या निवारा केंद्रांना भेट दिली. महापालिकेच्या निवारा केंद्रावर आश्रय घेतलेल्या आयुक्तांनी पुरग्रस्त भागातील नागरीकांशी संवाद साधुन महापालिका प्रशासन आपणास हवी ती मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासन देऊन आयुक्तांनी नागरीकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पुराचे पाणी ओसरेपर्यंत निवारा केंद्र कोणत्याही परिस्थितीत न सोडण्याचे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले तसेच निवरा केंद्र परिसरामध्ये प्रकाश व्यवस्था, साफ-सफाई, फवारणी, इत्यादी बाबींची चोख व्यवस्था ठेवून या सर्व बाबींचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आदेशित केले. यावेळी नागरिकांनी महापालिकेमार्फत पुरविन्यात येणाऱ्या सुविधे बाबत समाधान व्यक्त केले आहे.

याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्तांनी नदीने 351 मीटरची इशारा पातळीवर ओलांडून 354.89 मीटर ही पातळी सध्या गाठली असून पुढील 24 तास हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नदी लगतच्या नागरिकांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ जवळच्या निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे असे आवाहन यावेळी मनपा आयुक्तांनी केले आहे. त्याचप्रमाणे नागरीकांनी शहरात उदभवलेल्या पुरजन्य परिस्थितीत घाबरुन न जाता मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती शाखेला किंवा जवळच्या क्षेत्रिय कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

000

जनसंपर्क विभाग,

नां.वा.श.म.न.पा.नांदेड









28.9.2025

नांदेड : 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्हाधिकार्‍यांकडून नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

- नांदेड जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 23, तर 28 सप्टेंबर रोजी 13 मंडळात अतिवृष्टी झाली. गोदावरी, मांजरा, मन्याड नद्यांच्या लाभक्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली. 67 लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे.

- नांदेडमध्ये 304 आणि लोहामध्ये 120 लोकांना मदत शिबिरात ठेवण्यात आले असून, त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. एकूण 16 मदत शिबिरे तयार करण्यात आली आहेत. 56 घरांची पडझड झाली असून, त्यांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे.

#Maharashtra #Marathwada #Nanded

https://x.com/cmomaharashtra/status/1972234529793520113?s=46&t=S0m9fgIBggcpst3bZGqn1g

28.9.2025

 



27.9.2025

 https://whatsapp.com/channel/0029VbBE21fK5cDNHN4yjv2C/1221

नांदेड येथे पाऊस, पुर पर‍िस्‍थ‍िती बाबत अदयावत व अध‍िकृत माहिती करीता सदर व्‍हॉट्स अप चॅनेलला फॉलो करावे व सर्वाना चॅनेलला फॉलो करण्‍यास कळवावे..... कोणत्‍याही अफवावर व‍िश्‍वासु ठेवू नये.



 प्रेस-नोट

दिनांक २७.०९.२०२५

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

क्षेत्रिय कार्यालय निहाय उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणुन नियुक्ती

१५ निवारा केंद्रात ३०४ नागरिक स्थलांतरित तर २१ नागरिकांचा पुराच्या पाण्यातुन केला बचाव

अग्निशमन विभागामार्फत नागरिकांचे बचाव व शोध कार्य युद्ध पातळीवर सुरू

नांदेड, २७ :- हवामान खात्याने दि. २७.०९.२०२५ रोजी नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. तथापी काल दिनांक २६.०९.२०२५ रोजी रात्रीपासून शहरात व परिसरात सतत मुसळधार पाऊस होत आहे. गोदावरी नदीच्या वरच्या भागातून सुद्धा पावसाचे पाणी विष्णुपुरी धरणामध्ये येत असल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात होत असल्याने नांदेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली या पार्श्वभूमीवर महापालिकेचे यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांना पूर परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीवर महापालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे.

सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडे असून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 2,50,000 क्युसेक च्या प्रवाहाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असुन नदीची पाणी पातळी सद्यस्थितीत 352.53 मिटर इतकी आहे. तथापी धरणात पाण्याची आवक व मुसळधार पाऊस पाहता आज रात्री पर्यंत 3,00,000 क्यूसेक इतक्या प्रवाहाने धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदी 351 मीटर इशारा पातळी ओलांडल्यानंतर 354 मीटर धोका पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी परिस्थितीचा तात्काळ आढावा घेऊन मनपा सर्व यंत्रणांना सजग आणि सुसज्ज राहण्यासाठी आदेशित केले आहे. त्याचप्रमाणे सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना आपण व सर्व टीम सतर्क ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांना सतर्कतेबाबत तात्काळ आवाहन करून, नदीकाठी असलेल्या मनपा हद्दीतील खडकपुरा, दुल्हेशाह रहेमान नगर, जी.एम.कॉलनी, गाडीपुरा कालापुल परीसर, गंगाचाळ, भिमघाट, नावघाट मल्ली परीसर, बिलाल नगर, पाकीजा नगर, शंकर नगर, वसरणी इत्यादी सखल भागातील नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये परत नदीचे पाणी शिरत असल्याकारणाने बाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी कार्यान्वित केलेली  निवारा केंद्र सुरू ठेवण्याच्या व आवश्यकतेनुसार केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवारा केंद्रांवर अन्न,पाणी व इतर आवश्यक बाबी,वैद्यकीय सुविधा तसेच प्रकाश व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभागांना आदेशित करण्यात आले आहे.

काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे श्रावस्ती नगर,चुनाल नाला, तेहरा नगर, MR कॉलोनी, भिमसंदेश कॉलोनी, पंचशील नगर, व आजू बाजूच्या परीसात मोठ्या प्रमाणात पाणी गेले असून परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर ठिकाणी शोध व बचाव कार्य करण्याची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे अग्निशमन विभागासोबत ( DRF पथक) शोध व बचाव कार्य करणेसाठी 20 जीवरक्षकांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच नावघाट पूल परत पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग लाऊन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर ठिकाणी जीवरक्षक तैनात ठेवण्यात आलेले आहेत.

महापालिकेने स्थापित केलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये आतापर्यंत एकूण 304 नागरिक स्थलांतरित करण्यात आलेले असुन त्यांना जेवण , पाणी विद्युत व्यवस्था, चटई इत्यादींची सोय करण्यात आलेली आहे. तसेच उक्त सर्व निवारा केंद्रावर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके स्थापन केली असुन सदर ठिकाणी नागरीकांची वैद्यकीय तपासणी देखील सुरु आहे. 

• शोध व बचाव कार्य

श्रावस्ती नगर व समीराबाग येथील नगरामध्ये 12 ते 15 फूटा पर्यंत पाणी विसर्ग होत होते. सदरील ठिकाणी अग्निशमन विभागाची एक बचाव पथक रबर बोट आउट बोट मशीन सहित श्रावस्ती नगर येथील 15 नागरीकांना पाण्यातील प्रवाहापासून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. येथील सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर लागलीच समीराभाग खडकपुरा कडे ही रेस्क्यू टीम रवाना झाली समीराभाग मधील पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या सहा 06 लोकांना अशा प्रकारे एकुण 21 नागरीकांचा बचाव (Rescue) करुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. 

चौकट

* नावघाट पुलावरील पालिकेची पाणी पुरवठा राइजिंग मेन लाईन पुराच्या पाण्यामुळे क्षतिग्रस्त झाली असल्याने जुन्या नांदेड शहरास पाणी पुरवठा करणे शक्य नसून सदर जलवाहिनीची दुरुस्ती पुराचे पाणी ओसरल्याबरोबर हाती घेण्यात येईल.

* बाधित क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करणेसाठी तसेच सखल भागांत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यांत्रिकी विभागातर्फे 08 जेसीबी, 02 ब्रेकर मशीन, 02 गॅस कटर, 04 बसेस, 04 आयशर गाडया, 04 पाण्याचे टँकर हि यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच स्वच्छता विभाग व इतर विभाग प्रमुख यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

* विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढत असुन परिणामी विष्णुपुरी धरणातुन अजुन जास्त पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाच्या सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना तसेच वाहनांकरीता यांत्रिकी विभाग, स्वच्छता विभाग व इतर विभाग प्रमुख यांना सदैव सतर्क राहण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले असुन मनपाच्या अग्निशमन विभाग व विशेष बचाव पथकास सुध्दा आवश्यकतेनुसार बचाव कार्याकरीता सदैव सतर्क रहाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

शहरातील कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन ‍परिस्थितीला तोंड देण्याकरिता महानगरपालिका सदैव सज्ज असुन शहरातील नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, तथापि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरीकांनी घाबरुन न जाता तात्काळ महानगरपालिकेच्या अहोरात्र सुरु असलेल्या नियंत्रण कक्षातील 02462-262626, 230721 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

जनसपंर्क विभाग,

नां.वा.श.म.न.पा.नांदेड






Saturday, September 27, 2025

  वृत्त क्रमांक 1020

नागरीकांनी #पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा #इशारा


#नांदेड दि. 27 सप्टेंबर: मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील २५ मंडळात #अतिवृष्टी झालेली असून जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सर्व धरणांमधून मोठ्या #प्रमाणावर पाण्याचा #विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील सर्व #नद्या दुथडी भरून #वाहत आहेत. सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे १६ दरवाजे उघडले असून प्रकल्पातून २,१९,२२९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात चालू आहे. गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीची #पाणीपातळी सध्या ३५३.९० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यास प्रादेशिक #हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात आज संध्याकाळपासून पुढील २४ तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावातील नागरिकांनी खालीलप्रमाणे उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

काय करावे:
गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या.

पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सूचनांचे पालन करा.

मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास क्र.(0२४६२) २३५०७७ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करून सुरक्षितस्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत प्राण्यांना बांधून ठेवू नये त्यांना खुले सोडावे. प्राणी खुले सोडल्याने ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतील. सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इ. संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.

काय करू नये
पूर असलेल्या भागात, नंदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका. पूराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर ओसरल्यानंतर प्रशासनानाने परवानगी दिल्याशिवाय पूलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. दूषित / उघड्यावरील अन्न व पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतू अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव किरण अंबेकर यांनी केले आहे.
0000

 वृत्त क्रमांक 1019 

नांदेड जिल्ह्यातील 25 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद   

 

नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना, जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना

 

नांदेड दि. 27 सप्टेंबर: नांदेड जिल्ह्यात शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड तालुक्यातील ५, बिलोली तालुक्यातील ३, मुखेड तालुक्यातील ५, कंधार तालुक्यातील ४, लोहा तालुक्यातील ५, मुदखेड तालुक्यातील २, नायगाव तालुक्यातील १ अशा एकूण २५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना व जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरितकरण्याच्या सूचना मनपा नांदेड तसेच सर्व संबंधित तहसिलदार यांना दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

 

नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पामध्ये सध्या १६०००० लक्ष क्युसेक्सची आवक सुरू असून पुढील ६-७ तासात आवक ३ लक्ष पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या विष्णुपुरी धरणातून १६०००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे व येत्या ५-६ तासात विसर्ग वाढवून २.५ लक्ष ते ३.० लक्ष क्युसेक्स करण्याची शक्यता असल्याने नांदेड शहरालगत नदीची पातळी इशारा पातळी ३५९.०० मी च्या वर जाण्याची शक्यता आहे.

 

धर्माबाद तालुक्यातील बेल्लूरपुलावरून अजून पाणी चालू आहे. अर्धापूर तालुक्यातील मौजे रोडगी येथील संतोष धोंडीबा काकडे यांच्या मालकीची एक म्हैस वीज पडून मृत पावली आहे. शेलगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे.

 

मुखेड तालुक्यातील मौजे शिकारा येथे राहत्या घरावर पिंपळाचे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. जीवित हानी झालेली नाही. मौजे देगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मार्ग बंद आहे. बाऱ्हाळी- मुक्रामाबाद-निवळी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे.बेरळी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

 

लोहा तालुक्यातील उमरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरा ते रूपसिंग तांडा परसराम तांडाकडे जाणारा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. उमरा गावापासून पुराचा प्रवाह अंदाजे २०० मीटर लांब आहे. आतापर्यंत घरात पाणी शिरलेले नाही, जीवित हानी झाली नाही. देऊळगाव व चितळी येथे ओढ्यास पूर आल्यामुळे रस्ता बंद आहे. धनज खुर्द येथील पुलावरून पाणी जात असल्याने धनज खु. गावचा संपर्क तुटला आहे. सोनखेड हद्दीतील निळा, डेरला या गावचा संपर्क तुटलेला आहे. लोंढेसांगवी आणि उस्माननगर पोस्ट हद्दीतील जोशी सांगवी यांच्यामधील पुलावरून पाणी जात आहे. डोंगरगाव येथील घोटका जाणारा पुल पाण्याखाली असून दोन मंदिरात पाणी घुसले असून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पाणी आले आहे. मंदिराजवळील एका घरातील कुटुंबाने सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. तसेच चोंडी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

दोन्ही ठिकाणांहून वाहतूक बंद आहे. धानोरा-खांबेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. भेंडेगाव येथे पुराच्या पाण्यात झाडावर अडकून पडलेल्या एका व्यक्तीस स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बाहेर काढण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. देगलूर तालुक्यामध्ये सध्या पाऊस थांबला आहे. जवळपास आठ गावांमध्ये पुलावरून पाणी जात असल्याने तात्पुरत्या स्वरूपात संपर्क तुटलेला आहे.

 

नांदेड तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळेपुलावरून पाणी जात असल्यामुळे राहेगाव गावाचा संपर्क तुटलेला आहे. वनेगाव ते वरखेड अंतर्गत पुलावरून पाणी जात असल्याने हा रस्ता बंद आहे. पर्यायी मार्ग चालू आहे. कासारखेडा मार्गे एकदरा जाणारा नाला भरल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे एकदरा गावचा संपर्क तुटला आहे. तसेच निळा एकदरा पुलाच्या बाजूच्या रस्त्याने पाणी वाहत असल्याने तोही मार्ग बंद झाला आहे. तळणी ते रेगाव रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. मौजे पिंपळगाव कोरका येथे कॅनॉल फूटल्यामुळे १ ते २ घरात पाणी आले आहे. नांदेड शहरातील मोमीनपुरा, कालापूल, बाळगीर महाराज मठ, शनी मंदिर हमालपुरा, दत्तनगर, गोकुळनगर येथे रस्त्यावर भरपूर पाणी आहे. हदगाव तालुक्यातील शेंबाळपिंपरी ते तळणी रोड बंद आहे. नायगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी आणि मन्याड नदीकाठाच्या गावांमध्ये सर्व यंत्रणा सतर्क आहे. पाणी पातळी वाढली आहे परंतु अजून कुठेही गावात पाणी शिरल्याची अथवा गावांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती नाही.

 

विष्णुपुरी पुर सद्यस्थितीत 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा.

जायकवाडी विसर्ग - 38000 क्युसेक.

माजलगाव विसर्ग - 80000 क्युसेक्स.

दिग्रस बंधारा - 200000 क्युसेक्स.

पूर्णा नदी (सिध्देश्वर + खडकपूर्णा + निम्न दुधना)- 45000 क्युसेक्स.

विष्णुपुरी - 156000 क्युसेक.

नांदेड ओल्ड ब्रिज पातळी - 348.34 मी (117000 क्युसेक).

बाळेगांव- 200000 क्युसेक.

 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील जायकवाडी प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, सिद्धेध्वर प्रकल्प, निम्न दुधना व खडकपूर्णाप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...