Wednesday, September 25, 2024

 वृत्त क्र. 865

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे

अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 27 सप्टेंबर रोजी आयोजन 

नांदेड दि. 25 सप्टेंबर : कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र बनवण्यासाठी तसेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना नौकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे  27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केले आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्ग भरती मेळाव्याचे आयोजन केले असून शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनामध्ये एकूण 100 जागेची मागणी आलेली आहे. तरी परिसरातील 18 ते 35 वयोगटातील 12 वी, आयटीआय, पदवी, पदविका, डीएड, बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) म्हाडा कॉलनी जवळ, अर्धापूर जि. नांदेड येथे मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे असे अर्धापूर आयटीआयचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी गटनिदेशक डी.एन.मोरे यांचा संपर्क क्रमांक 9404738738442 वर संपर्क साधावा .

 00000

  वृत्त क्र. 864

29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचे आयोजन

नांदेड दि. 25 सप्टेंबर :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक यांचा मोबाईल क्रमांक 8698738998/8707608283 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

देशभरात 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने उरी सेक्टर मधील अतिरेकी भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक द्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यत व्यापक प्रमाणात पोहोचविण्यासाठी तसेच जनतेस देश भक्तीची ज्वाला मोठया प्रमाणात जागविण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी माजी सैनिकांचा सन्मान करुन शौर्य दिवस साजरा करण्यात येतो.

00000

  वृत्त क्र. 863

शेतकरी गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योग  

- मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल

नांदेड दि. 25 सप्टेंबर :- जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तुर, मुग, उडीद, हरभरा, हळद, केळी, कापूस इत्यादी प्रमुख पिके आहेत. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणे या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकरी गट/ महिला बचतगट यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद कृषी विभाग उपकर योजनेच्या अर्थसाहयातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योगाची उभारणी करीत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली.

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी गटांना उद्योग उभारणी करून गटाचे विस्तारीकरण  करणे, बळकटीकरण करणे, रोजगार निर्मिती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.    

जिल्ह्यामध्ये दाल मिल उद्योग, ऑइल मिल, उद्योग, मसाला उद्योग, चिप्स उद्योग, दुग्धजन्य पदार्थ उद्योग, प्राथमिक प्रक्रिया उद्योग इत्यादी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक तालुक्यातून पुढील बचतगटांची निवड झालेली आहे. या बचतगटांना जिल्हा परिषदेमार्फत पूर्व संमती देऊन उभारणी करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे .सदर योजनेअंतर्गत शेतकरी गटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्या  अनुषंगाने रक्कम रुपये 3 लाख किंवा  75 टक्के अनुदान मर्यादित अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये पुढील बचतगटांची निवड झालेली आहे           

माहेर स्वयंसहाय्यता समूह गट जैतापूर तालुका नांदेड सूक्ष्म प्रक्रिया - पापड मशीन ,नमकीन मशीन या 

उद्योगाची उभारणी करण्यात येणार आहे.  अहिल्यादेवी होळकर शेतकरी बचत गट पिंपळकोठा तालुका मुदखेड सूक्ष्म प्रक्रिया उद्योग,-दुग्धजन्य पदार्थ तयार करणे. कै. गिरीश भाऊ  गोरठेकर पुरुष बचत गट गोरठा तालुका उमरी दाल - मिल प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात येणार आहे.जेठालाल महाराज महिला सेंद्रिय  शेतकरी बचत गट रूपा नाईक तांडा तालुका माहूर दाल मिल प्रक्रिया उद्योग.  रानी झलकारी महिला बचत गट पोटा बुद्रुक तालुका हिमायतनगर- दाल मिल शेलार मशीन प्रक्रिया उद्योग. संत सावतामाळी महिला बचत गट काठेवाडी देगलूर - मसाले प्रक्रिया उद्योग कृषी उन्नती शेतकरी  गट लोणी बुद्रुक तालुका अर्धापूर - चिप्स उद्योग, ज्योतिर्लिंग फार्मर प्रोडूसर कंपनी सापती तालुका हदगाव - मल्टीग्रेन डीस्टोन मशीन प्रक्रिया उद्योग. ग्रीन ओझोन ऍग्रो प्रोडूसर कंपनी लोणावळा बुद्रुक तालुका मुखेड - तेल घाना भुईमूग फोडणी यंत्र प्रक्रिया उद्योग. शिवानी महिला स्वयंसहाय्यता बचत गट हिप्परगा तालुका कंधार - पॅकिंग मशीन मसाला मशीन प्रक्रिया  उद्योग. अनुसया माता महिला बचत गट काजीपोड तालुका किनवट- दाल मिल प्रक्रिया उद्योग. साई समर्थ शेतकरी गट मांजरम तालुका नायगाव - दाल मिल प्रक्रिया उद्योग. जय भवानी महिला बचत गट चिंचाळा तालुका भोकर - दाल मिल प्रक्रिया उद्योग. धरणी शेतकरी उत्पादक गट जोमेगाव तालुका लोहा दाल मिल - ग्रेडिंग पॅकेज प्रक्रिया उद्योग.  अमृतालयाम शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड बेळकोणी तालुका बिलोली - सोलार ड्रायर प्रक्रिया उद्योग. धर्माबाद ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड समराळा तालुका धर्माबाद - सेंद्रिय दाल प्रतवारी पॅकिंग मशीन, ग्रेडिंग स्वच्छता मशीन. याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात 16 सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यात येणार आहे.

00000

 वृत्त क्र. 862

उगम प्रमाणपत्राचा समावेश कृषी विक्रेत्याच्या परवान्यामध्ये आवश्यक

शेतकऱ्यांनी पक्की पावती घेवूनच किटकनाशकाची खरेदी करावी 

नांदेड दि. 25 सप्टेंबर :-  कंपनीच्या उगम प्रमाणपत्राचा समावेश परवान्यामध्ये नाही अशा कंपनीच्या किटकनाशकाची खरेदी व विक्री कृषी सेवा केंद्रधारकांनी करू नये. शेतकऱ्यांनी किटकनाशक खरेदी करते वेळेस पक्की पावती घेवून संबंधित कंपनीचे नाव कृषी विक्रेत्यांच्या परवान्यामध्ये असल्याची खात्री करून किटकनाशक खरेदी करावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. 

खरेदी व विक्री कृषी सेवा केंद्रधारकांनी ज्या किटकनाशकाची खरेदी कंपनी कडून करीत आहेत. त्या कंपनीचे उगम प्रमाणपत्र संबंधित घाऊक किटकनाशक विक्रेते यांनी परवान्यामध्ये समाविष्ठ करून खरेदी करावे. संबंधित घाऊक विक्रेते यांनी किटकनाशकाची विक्री करतांना खरेदी करणाऱ्या कृषी सेवा केंद्रधारकांच्या परवान्यामध्ये संबंधित कंपनीचे उगम प्रमाणपत्र समाविष्ट असल्याची खात्री करूनच किटकनाशकाची विक्री करावी. तसेच किरकोळ कृषी सेवा केंद्रधारकांनी त्यांना ज्या कंपनीच्या किटकनाशकांची खरेदी व विक्री करावयाची आहे अशा कंपनीच्या उगम प्रमाणपत्राचा समावेश त्यांच्या परवान्यात करावा असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

 वृत्त क्र. 861

अधिकच्या नुकसान भरपाईसाठी दुसऱ्यांदा विमा कंपनीस पूर्वसूचना देण्याचे आवाहन

नांदेड दि. 25 सप्टेंबर :-  माहे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवडयात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली ही एक आपत्ती घटना मानली जाते. त्याअनुषंगाने यानंतर जर पुन्हा मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास लाभार्थी पुन्हा विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ शकतात. जेणेकरुन संबंधित लाभार्थ्यांना अधिकची नुकसान भरपाई नुकसानीच्या प्रमाणात मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दुसऱ्यांदा पूर्वसूचना देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.  

जर 25 टक्के पेक्षा पूर्वसूचना येत असतील तर अशा ठिकाणी लागू व्हायची नियमावली ही विमा कंपनीकडून बदलण्यात आलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा समितीने 25 टक्के अग्रीम देण्यासाठी मध्यावधी नुकसान अर्थात मीड सीजन ॲडव्हर्सिटी अधिसूचना लागू केलेली आहे. त्यामुळे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे वैयक्तीक पंचनामे हे वेगळे करण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र या सर्व शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई लागू झाल्यास अदा केली जाईल.

00000

 वृत्त क्र. 860 

नांदेडमधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार 

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात समावेश 

नांदेड दि. 25 सप्टेंबर :दुर्गम अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील ६३ हजार तर महाराष्ट्रातील ४ हजार ९७६ आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. यामध्ये नांदेडच्या १६९ गावांचा सहभाग आहे.

त्यामाध्यमातून राज्यामधील 32 जिल्ह्यातील 12 लाख 87 हजार ७०२ आदिवासी बांधवाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 'पीएम-जनमन' अभियानात १७ मंत्रालयांद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध २५ उपक्रमांचा समावेश असणार आहे. त्याद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, अजीविका यामधील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे. 

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सहभागी प्रत्येक मंत्रालयावर  पुढील 5 वर्षात निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातींचा विकास कृती आराखडा तयार करून उपलब्ध निधीद्वारे त्यांच्याशी संबंधित योजना कालबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्याची जबाबदारी असणार आहे. 

दरम्यान, या अभियानांतर्गत समाविष्ट असलेली आदिवासी गावे पीएम गतिशक्ती पोर्टलवर संबंधित विभागाद्वारे त्याच्या योजनेतुन मॅप केल्या जातील. पोर्टलचे भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे परीक्षण केले जाईल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. 

या सुविधा मिळणार

पक्की घरे, ग्रामीण भागात रस्ते, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सर्व घरांमध्ये वीज जोडणी, मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना, आयुष्मान कार्ड, एलपीजी कनेक्शन, आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र, आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सिकलसेल ॲनिमियाशी लढण्यासाठी केंद्राची निर्मिती, होम स्टे. 

जिल्हानिहाय गावांची संख्या

अहमदनगर- 118, अकोला- 43, अमरावती- 321, छत्रपती संभाजीनगर- 11, बीड- २, भंडारा- 14, बुलढाणा- 43, चंद्रपूर- 167, धुळे- 213, गडचिरोली- 411, गोंदिया- 104, हिंगोली- 81, जळगाव- 112, जालना- 25, कोल्हापूर- 1, लातूर- 2, नागपूर- 58, नांदेड- 169, नंदुरबार- 717, नाशिक- 767, उस्मानाबाद- 4, पालघर- 654, परभणी- 5, पुणे- 99, रायगड- 113, रत्नागिरी- 1, सातारा- 4, सोलापूर- 61, ठाणे- 146, वर्धा- 72, वाशीम- 71, यवतमाळ- 366.

0000

Tuesday, September 24, 2024

 वृत्त क्र. 859 

आरटीओ कार्यालयातील

सेवा फेसलेस सुविधेद्वारे   

 

नांदेड दि. 24 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. याकाळात नागरिकांना आपले अर्ज आधार लिंक भ्रमणध्वनी क्रमांकाचा येणाऱ्या ओटीपी क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. जेणेकरुन आपली  गैरसोय न होता कामकाजात विलंब होणार नाही. नागरिकांनी फेसलेस सुविधेचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

 

मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या 24  सप्टेंबर 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संपात प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील कामे खोळंबू नये यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

नागरिकांचे कामकाज सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्त्या केल्या आहेत. शासनाद्वारे परिवहन विभागातील 38 सेवा या नागरिकांच्या सोईसाठी व कार्यालयात प्रत्यक्ष न येता कामकाज होण्याकरिता फेसलेस स्वरुपात सेवा सुरु केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कामाकरिता या कार्यालयात प्रत्यक्ष न येता विभागाच्या https://sarathi.parivahan.gov.in लायसन्साठी व https://parivahan.gov.in/parivahan वाहनासाठी या संकेतस्थळावरुन अर्ज करु शकता, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...