Tuesday, May 14, 2024

वृत्त क्र. 419

 ईअर टॅगिंग शिवाय 1 जूनपासून पशुधनाची खरेदी-विक्री बंद

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास कोणत्याही सेवा- सुविधा मिळणार नाहीत

नांदेड दि. 13 :- राज्यातील सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व पशुपालकांनी भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाची माहिती अद्ययावत करावी. 1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री बंद करण्यात आली आहे. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत यांची नोंद पशुपालकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अपर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पडीले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले तसेच वनविभाग, नगरपालिका, महानगरपालिकेचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद वगळता 15 तालुक्याच्या ठिकाणी पशुचा बाजार भरतो. बाजाराच्या ठिकाणी पशुधनास आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजे. तसेच त्यांची वाहतुक व खरेदी - विक्री तसेच त्यांना देय सोयी सुविधासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनास प्राधान्याने ईअर टॅगिंग करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी  सांगितले. तसेच जिल्ह्यात पशुधनाची बेकायदेशिर वाहतूक होणार नाही यासाठी पशुसंवर्धन विभाग व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवणार नाही यांची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेला आळा घालण्यासाठी शासनाने प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. या कायद्यामध्ये कलम 38 (1) नुसार पशुधन बाजाराचे नियमन नियम 2017 जाहिर केलेले आहे. या कायद्यानुसार जिल्हास्तरीय पशुधन बाजार सनियंत्रण समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे बाजाराच्या ठिकाणी पशुधनास पुरेसा निवारा, गोठे, खाद्य, चारा, पाणी, प्रकाश, पशुधनास चढणे व उतरण्यासाठी रॅम्प, न घसरणारी जमीन, आजारी व अंपग , वयस्कर पशुधनासाठी स्वतंत्र व्यवस्था, गर्भवती प्राणी व लहान पशुधनास स्वतंत्र व्यसस्था, पशुवैद्यकीय सुविधा, चारा वैरण साठवणूक व पुरवठयासाठी व्यवस्था, पाणीपुरवठा व स्वच्छता गृहे, मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था इत्यादी विविध सुविधांची खात्री जिल्हास्तरीय पशुधन बाजार सनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते याबाबत माहिती पशुसंवर्धन विभागाने पीपीटी द्वारे सादर केली.

0000

वृत्त क्र. 418

 स्ट्रॉंग रूमच्या पाहणीला चार उमेदवारांची उपस्थिती

सीसीटीव्ही फुटेज व सुरक्षा व्यवस्थेबद्दलची दिली माहिती

नांदेड दि. १३ : १६ - नांदेड लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्याकरिता आज जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रक्रिया पूर्ण केली. चार उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती यावेळी होती.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथे लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडले. 27 एप्रिल रोजी सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतयंत्रे येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करण्यात आली आहे.  27 एप्रिलला उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक निरीक्षक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या स्ट्रॉंग रूमला सील करण्यात आले.

त्यानंतर तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्थेच्या निगराणी मध्ये स्ट्रॉंग रूममध्ये ही मतंयंत्रे सुरक्षित ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज पुन्हा एकदा स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था व स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी सर्व उमेदवारांना प्रशासनाने आमंत्रित केले होते.

23 उमेदवारांपैकी प्रतिनिधी व उमेदवार असे मिळून चार जण उपस्थित होते.तर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 27 तारखेपासूनच्या फुटेजला यावेळेस दाखवण्यात आले. तसेच आयोगाच्या निर्देशानुसार अन्य खुलासे करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.

00000

Friday, May 10, 2024

  वृत्त क्र. 417

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दोन बालविवाह थांबविले


 ·  जिल्हाधिकाऱ्यांनी केले संपूर्ण यंत्रणेचे कौतुक


नांदेड दि. 10 :- जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी व बालविवाहाला आळा घालण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या वेळोवेळीच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दिनांक 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होणार नाही यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क असतांनाच जिल्ह्यात दिनांक 10 मे रोजी बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली. प्राप्त माहितीची शहानिशा केली असता दोन्ही विवाहातील मुली अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. हे बालविवाह थांबविण्याकरिता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  आर. आर. कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही बालविवाह रोखण्यात यश प्राप्त झाले. 


जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांनी तात्काळ संबंधित कुटुंबाची माहिती घेतली. यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पाचे विजय बोराटे तसेच लोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित ग्रामसेवक तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे ऐश्वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले, निलेश कुलकर्णी यांनी कुटुंबाचे समुपदेशन करून सदरील बालविवाह थांबविला. दोन्ही बालविवाह थांबविण्यात प्रशासनास यश प्राप्त झाल्याबद्दल संपूर्ण यंत्रणेचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कौतुक केले.

0000

 वृत्त क्र. 416

उन्हाळयात प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 10 :- प्राण्याचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि अनावश्यक वेदना टाळण्यासाठी सर्व वाजवी उपाययोजना करण्याची जबाबदारी प्राणी मालकांची आहे. ही जबाबदारी व कर्तव्य टाळल्यास प्राण्यांतील क्रुरता अधिनियम 1960 मधील कलम 11 (1) च्या तरतुदीनुसार ही बाब क्रुरता ठरते. तसेच हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे उन्हाळयात वाढत्या उच्च तापमानात प्राण्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होवू नये यासाठी त्यांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त  डॉ. राजकुमार पडीले यांनी केले आहे.

 

उच्च तापमानामुळे प्राण्यांच्या शरीर व चयापचय प्रक्रीयेत बदल घडून येतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते व त्यामुळे शरीर व चयापचय प्रक्रीयेत बदल घडून येतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते व रक्त प्रवाहावर परिणाम होतो. यामुळे जनावरे कमी खाद्य खातात व पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्याचा प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. तसेच स्त्रीबीज आणि माजाच्या प्रक्रीयेवर सुध्दा परिणाम होतो. त्यामुळे विर्य गुणवत्ता, बिजांड व गर्भधारणेचे प्रमाण कमी होवून प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. याबाबी टाळण्यासाठी उन्हाळयात प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

पुरेसा निवारा 

प्राणी दिवसभर सावली असलेल्या भागात राहतील याची खातरजमा करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल साहित्यापासून निवारा तयार करावा.  प्राण्यांना नैसर्गिक सावली उपलब्ध व्हावी व त्यांचे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी निवाऱ्याची सभोवताली वृक्षारोपन करावे.

 

पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करुन देणे

उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणे ही गुरुकिल्ली आहे. प्राण्यांना उन्हाळयात सहजगत्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुरेशा प्रमाणात व नियमितपणे स्वच्छ पाणी द्यावे.

 

उष्णतेच्या तणावाची लक्षणे

थकवा येणे, जास्त श्वासोश्वासाची गरज भासणे, आळस येणे, लाळ गाळणे, हद्याचे ठोके  वाढणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. प्राण्यामध्ये ही लक्षणे दिसून आल्यास, तात्काळ पशुवैद्यकीय उपचार करावेत. प्राण्याच्या काळजीसाठी जबाबदार असलेल्या सर्व व्यक्ती संस्थानी अत्यंत उष्णतेच्या प्रतिकूल परिणामापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय उपाययोजना कराव्यात, असेही आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 415

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 10 :- नांदेड जिल्ह्यात 21 मे 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 मे 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

Thursday, May 9, 2024

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

वृत्त क्र. 414

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

 

नांदेड दि. 9 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26-सीएन ही नविन मालिका 14 मे 2024 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेल सह) अर्ज 13 मे 2024 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 14 मे 2024 रोजी दुपारी 4 वाजता टेक्स्ट मॅसेज द्वारे, दूरध्वनीद्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक  परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

0000

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 वृत्त क्र. 413

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात

बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         बाल विवाह होणार नाहीत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विभागांना निर्देश

·         ग्रामीणसाठी ग्रामसेवक तर शहरात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अधिकार

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-   अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्वाचा समजला जाणारा मुहूर्त उद्या 10 मे रोजी आहे. या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह लावले जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. तसेच बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास चाईल्ड हेल्प लाईन 1098 ला तात्काळ माहिती देण्याचेही आवाहन त्यांनी केले.

 

भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक प्रक्रीया आहे. साहजिकच शुभ मुहूर्तावर विवाह समारंभ  आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठया प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात प्रशासनाकडून सर्व संबंधित विभागांना निर्देश जारी केले आहेत. बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदेशिर ठरतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक नियुक्त असून शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागात अंगणवाडी पर्यवेक्षिका नियुक्त केल्या आहे. बालविवाह रोखणे आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक आहे.बालविवाह उघडकीस आल्यास पालकांपासून तर सर्वच सहभागी आरोपी ठरविले जातात त्यामुळे अशा प्रकरणात समाजातील सर्व सुशिक्षितांनी लक्ष वेधून असावे. समाजातील ही प्रथा बंद करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

आपल्या अधिकार क्षेत्रात बालविवाह होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व असे बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यास त्यावर तातडीने आवश्यक ती कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील संबंधित विभागांना दिले आहेत.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...