Monday, November 13, 2023

 वृत्त

 

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहनांची तपासणी

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे 8 ते 12 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 208 वाहनांची प्रदुषण नियंत्रण तपासणी करण्यात आली. यात 31 दोषी वाहनांवर कारवाई करून 10 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

 

केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 115 व 116 मधील तरतुदीनुसार मान्यता प्राप्त वायु प्रदुषण तपासणी केंद्राकडून वाहनाची वायु प्रदुषण विषयक तपासणी करून वाहनाला प्रमाणपत्र देण्याविषयी तरतुद आहे. 

 

मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी प्रदुषणकारी वाहनांवर कारवाई करून वायुप्रदुषणाला आळा घालण्याच्या हेतुने विविध विभागांना 15 डिसेंबर 1999 रोजी निर्णयाद्वारे निर्देश दिले आहेत. तसेच SUO MOTO जनहित याचिकेद्वारे 6 नोव्हेंबर 2023 रोजी आदेशामध्ये परिवहन विभागास प्रतिवादी केले आहे. सदर आदेशातील परिच्छेद क्र. 7 (i) अन्वये वाहनांची पीयुसी तपासणी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार करण्याबाबत आदेशीत केलेले आहे. 

 

त्याअनुषंगाने या मोहिमेमध्ये प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्या वायुवेग पथकाद्वारे 8 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत 208 तपासलेल्या वाहनांपैकी 31 दोषी वाहनांवर कारवाई करून 10 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

0000  

 वृत्त

 

जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- नांदेड जिल्‍हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात दि. 17 व 20 नोव्हेंबर 2023 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल विष्णुपुरी नांदेड, राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युतनगर नांदेड, शामल एज्युकेशन कॅम्पस देगावरोड समोर  नांदला, दिग्रस, खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 17 नोव्हेंबर व 20 नोव्हेंबर 2023 रोजी या दोन दिवशी सकाळी 5 ते रात्री  9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त

 

गोदावरी काठावरच्या संधीकाळाला

ईश्वर घोरपडे यांच्या राग भटियारने उजाळा

 

·         नांदेडकरांनी अनुभवले भटियार रागातील सूरमयी उमलणे

·         दिवाळी पहाटच्या दुसऱ्या दिवशीही नांदेडकरांची भरभरून दाद

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- गोदावरीचा काठ सकाळच्या किरणांच्या प्रकाशात असतांना याला साक्षीदार होणे हीच मुळात मोठी पर्वणी कोणासाठीही ठरू शकते. अशावेळी सुर्यांची किरणे काठाला स्पर्श करणाऱ्या काळात राग भटियारचे सूर रसिकांना ऐकण्याची संधी मिळणे म्हणजे तो संधीकाळ किती लाखमोलाचा असू शकेल याची अनुमती आज नांदेडच्या रसिकांनी अनुभवली. निमित्त होते “दिवाळी पहाट-23” आणि सकाळच्या या कोमल रागाला तेवढ्याच कोमलतेने उमलणारे गायक होते पुणे येथील ईश्वर घोरपडे.

 

संधीकाळाला प्रकाशाच्या मध्यम लयीने जसा उजाळा मिळावा तसा उजाळा ईश्वर घोरपडे यांनी “करम करो करतार…” या मध्यलय रूपक तालातील बंदिशीने गोदावरी काठावरील दिवाळी पहाटच्या मैफलीला दिला. यानंतर धृत एकतालातील “उल्लंघ्य सिंधो” हा श्लोक अलगत सादर केला. निवृत्ती महाराजांचा “जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार”, संत तुकारामांचा “अमृताची फळे अमृताची वेली” हे अभंग त्यांनी सादर केले. या अभंगाच्या भावार्थात एक एक पदर जसा उलगडून दाखवावा तशी अनुभूती रसिकांना देत दिवाळी पहाटची ही मैफल त्यांनी नाट्य गिताकडे नेली. “सुरत पिया की”, छेडियल्या तारा हे नाट्य गीत सादर करून “ऐकुन वेणुचा नाद” ही गवळन सादर करून त्यांनी “सावळे परब्रम्ह” या भैरवीच्या तालात सर्व रसिकांना तल्लीन करून ही मैफल अधिक उजळून टाकली.

 

ईश्वर घोरपडे यांना प्रशांत गाजरे यांनी तबल्यावर, नचिकेत हरिदास यांनी संवादिनीवर, विश्वेश्वर कोलंबीकर यांनी पखावजवर एकात्म साथ दिली. मंजिरीवर सचिन शेटे यांनी साथ दिली. जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरूद्वारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती नांदेडच्यावतीने आयोजित दिवाळी पहाट 2023 कार्यक्रमातील आजच्या घोरपडे यांच्या कार्यक्रमाचे निवेदन स्वयंवर प्रतिष्ठानचे प्रमुख प्रा. सुनिल नेरलकर यांनी केले.

00000








Saturday, November 11, 2023

 मानवी संवेदनांना अधोरेखीत करत किन्नरांना

Friday, November 10, 2023

जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे जन्म मृत्यू नोंदवह्या असल्यास तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

 जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे जन्म मृत्यू

नोंदवह्या असल्यास तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि.10 :-  मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत गावातील जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे गाव नमुना क्रमांक 14 (जन्म मृत्यू नोंदवह्या) उपलब्ध असतील तर त्यांनी अशा नोंदवह्या संबंधित तालुक्याचे तहसिल कार्यालयात रितसर जमा कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहेत.

 

मराठा समाजातील व्यक्तींना, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेवून कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्राच्या अनुषंगाने 1967 पूर्वी कार्यरत पोलीस पाटील यांचेकडील गाव नमुना क्रमांक 14 (जन्म मृत्यू नोंदवह्या) मध्ये कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा जात नोंदी आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुने पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांनी अशा नोंदवह्या उपलब्ध असल्यास तहसिल कार्यालयास जमा कराव्यात असे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

रब्बी हंगामात गहु, ज्वारी, हरभरा या पिकांसाठी 1 रुपयात पिक विमा

 रब्बी हंगामात गहु, ज्वारी, हरभरा

या  पिकांसाठी 1 रुपयात पिक विमा

 

नांदेड, (जिमाका) दि.10 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 मध्ये एक रुपयामध्ये पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरविण्याची अंतिम मुदत ज्वारी  जि. पिकासाठी 30 नोव्हेंबर 2023 असून गहू बा. व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. पिक पेरणीतून काढणीपर्यतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज, कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड इ. बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील गहु बा, ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागू आहे.

 

या योजनेअंतर्गत पिक, विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता, विमा लागू असलेले तालुके, पिक विमा भरण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे. गहू बा. पिकासाठी हेक्टरी 42 हजार 500 विमा संरक्षित रक्कम रुपये असून विमा हप्ता रु. 1 आहे. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हदगाव या तालुक्यासाठी लागू असून विमा भरण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे. ज्वारी जि. पिकासाठी 33 हजार 750 विमा संरक्षण असून 1 रुपयात नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यत विमा भरता येणार आहे. हरभरा पिकासाठी 37 हजार 500 विमा संरक्षित रक्कम असून नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना 15 डिसेंबर 2023 पर्यत 1 रुपयात विमा भरता येणार आहे, असे कृषी अधीक्षक कृषी कार्यालयाने कळविले आहे.

0000

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेद्वारे पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेद्वारे

 

पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा

 

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         15 नोव्हेंबर रोजी किनवट येथे मोहीमेचा शुभारंभ

 

नांदेड, (जिमाका) दि.10 :-  शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला अनुसूचित जमाती असलेल्या 110 जिल्ह्यांना ही यात्रा भेट देणार आहे. यात किनवट तालुक्याचा समावेश आहे.  किनवट येथे 15 नोंव्हेंबर रोजी या यात्रेच्या रथाचे स्वागत व मोहीमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहीमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभाग प्रमुखांनी त्या-त्या विभागाच्या योजना वंचित लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कार्तीकेएन एस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार आदीची तर सर्व तालुक्याचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

 

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहीमेचा पहिला टप्पा 15 ते 23 नोंव्हेंबर या कालावधीत किनवट येथे प्रस्तावित आहे. या कालावधीत ही यात्रा मोहीम 16 ग्रामपंचायतीना भेट देणार आहे. या मोहीमेच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नेमणूक, ग्रामपंचायतीचा रस्त्याचा नकाशा, कार्यक्रमाच्या दिवशी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे, कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमाचे फोटो व व्हीडीओ अपलोड करणे याबाबत माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी किनवट तालुक्याच्या मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांना सांगितली. तसेच या मोहीमेसाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या गठीत करुन प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावेत. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, लाभार्थी, व्यापक जनसहभाग व जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वी राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाला दिल्या.

 

विकसित भारत संकल्प यात्रा या मोहीमेचा शुभारंभ 15 नोव्हेंबर रोजी किनवट येथे होणार आहे. त्या अनुषंगाने तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या तात्काळ गठीत कराव्यात. या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला वंचित लाभार्थ्यांपर्यत पोहोचायचे आहे. त्यासाठी संबंधित विभागाने लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामावर प्राधान्याने भर द्यावा, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी स्पष्ट केले. या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या योजनाचा लाभ, अर्ज भरुन घेणे याबाबीचा यात समावेश असणार आहे. या मोहीमेच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही तसेच फोटो, व्हीडीओ संबंधित अधिकाऱ्यांनी पोर्टलवर अपलोड करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...