Thursday, December 1, 2022

 वृत्त क्र. 1130

 आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या

ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 1 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली  (कासराळी) येथील केंद्रवर सुरू आहे. ही ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 7 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षंकीत प्रत, आधार कार्ड प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकरऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान फोटो अपलोड करायचा आहे. या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्र. 1129 

नवउद्योजकांपर्यंत शासकीय योजना

सुलभ पोहचविण्याची आवश्यकता  

-         जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

·         उद्योजक मित्राच्या बैठकीत निर्देश

 नांदेड (जिमाका) दि. 1 :- नांदेड जिल्ह्यात उद्योजकांना उभारी देण्यासाठी आणि नवीन उद्योग निर्मितीसाठी शासनाच्या विविध योजना नवउद्योजकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. याचबरोबर या योजनासंदर्भात उद्योजकांच्या मनात असलेल्या शंकांचेही तात्काळ निरसन करून त्यांच्या प्रस्तावाला शासनाशी निगडीत प्रक्रिया गतीमान करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, प्रवीण खडके, औद्योगिक संघटनेचे शैलेश कराळे, आनंदे बिडवई, महेश देशपांडे, हर्षद शहा, एकनाथ जाधव तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

जिल्ह्यातील अनेक पदवीधर युवक-युवती आपल्या उद्योग व्यवसायाबाबत संधीच्या प्रतिक्षेत आहेत. नवीन स्टार्टअपच्या दृष्टिने अनेकांनी प्राथमिक माहिती व आवश्यक ती तयारीही करून ठेवलेली आहे. अशा गटांना शासनस्तराशी निगडीत जर काही अडचणी असतील तर त्या त्वरीत दूर करून त्यांना प्रोत्साहन देण्यासह योजनांचे बळ उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली. यादृष्टीने जिल्हास्तरावर परिसंवादाचे आयोजन करण्याबाबत जिल्हा उद्योग केंद्राला त्यांनी निर्देश दिले. 

आपला नांदेड जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सिंचनाच्या सुविधा अनेक भागात आहेत. अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांनी फलोत्पादनापासून इतर दर्जेदार कृषि उत्पादन घेतले आहे. कृषिपुरक उद्योगाच्या निर्मितीसाठी जे काही तांत्रिक कौशल्य व त्याबाबतची माहिती देण्यासाठी विद्यापीठ पातळीवर व कौशल्य विकास विभागातर्फे केंद्र असून याचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगासंबंधी ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्याला उद्योजक मित्रांची  बैठक घेण्याचे त्यांनी उद्योग विभागाला सांगितले.

00000

 संविधानातील समान न्यायाचे तत्व तळागाळापर्यंत पोहचावे

- न्यायाधीश दलजित कौर

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ग्रामपंचायत पातळीवर संविधानाचा जागर

 

नांदेड, दि. 1 (जिमाका) :- भारतीय राज्यघटनेने प्रत्येक घटकांच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोन बाळगला आहे. समान न्यायाचे तत्व हे त्यात सामावलेले आहे. जे विकासापासून वर्षोनुवर्षे दूर राहिले त्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कायद्याचे बळ योजनांना दिले आहे. याची व्याप्ती लक्षात घेता संविधान दिन व समता पर्वाच्या कालावधीत संविधानाप्रती अधिक जनजागृती करण्यावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे भर देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर यांनी दिली. ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 

दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याचबरोबर 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन पर्यंतचा कालावधी हा सामाजिक समता पर्व म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने ग्रामीण तंत्रनिकेतन नांदेड येथे हा उपक्रम घेण्यात आला.

 

एक नागरिक म्हणून संविधानामुळे प्रत्येकाला अधिकार मिळालेले आहेत. त्या अधिकाराबाबत व नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्याबाबत ग्रामपातळीपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रथमच जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींमध्ये विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने संविधानाचा जागर करण्यात आला.

 

संविधानाचा जागर ग्रामपातळीपर्यंत व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. यात लिंबगाव, सायाळ, वाडी (बु), नेरली, विष्णुपुरी, धनगरवाडी, वाजेगाव, आणेगाव, बळीरामपूर, बाभुळगाव, डोणगाव अशी 11 गावे निवडण्यात आली. या ग्रामपंचायतींमध्ये ॲड. नय्युमखान पठाण, ॲड. मंगेश वाघमारे, ॲड. वृषाली जोशी, ॲड. विजयमाला मनवर, ॲड. दत्ता कदम, ॲड. दिपाली डोनगावकर, ॲड. नविद पठाण यांनी त्या-त्या गावात जाऊन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उद्देशिका ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली.  

00000





 अंगणवाडी बळकटीकरणासाठी

सेवाभावी संस्थाना देता येईल योगदान

-    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

§  लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र सक्षम होण्याच्या दृष्टीने शासनाच्यावतीने लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येत आहे. अंगणवाडी दत्तक धोरणातर्गंत कॉर्पोरेट कंपन्या व त्यांचेमार्फत राबविण्यात येणारा सीएसआर कार्यक्रम, अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था, विविध ट्रस्ट, संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्यक्ती, कुटूंब, समूह या सर्व घटकांनी या धोरणात सहभाग घेवून योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

अंगणवाडी केंद्र दत्तक घेण्यास इच्छुक घटक अंगणवाडी केंद्रात स्वेच्छेने सुविधा देऊ शकतील. यात भौतीक सुविधा, शैक्षणिक सुविधा, वृध्दी संनियंत्रणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणे अथवा दुरुस्ती करुन देणे, प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम, आरोग्य तपासणी व सुविधा, इतर सहाय्य या सुविधाचा समावेश आहे. 

अंगणवाडी दत्तक धोरणामध्ये सहभाग घेणाऱ्या इच्छूकांना आदर्श अंगणवाडी योजनेमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधाच्या धर्तीवर 1 लाख 50 हजार रुपयाच्या मर्यादेत सुविधा उपलब्ध करुन देता येतील. अंगणवाडी केंद्रामध्ये किरकोळ दुरुस्ती व अन्य ऐच्छिक कामांसाठी 50 हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रकमेच्या मर्यादेत सुविधा उपलब्ध करुन देता येतील. अंगणवाडी केंद्राना सहाय्य करण्यासाठी इच्छूकांनी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना comicdsawcadoption@gmail.com या ईमेलवर तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी किंवा तरंग सुपोषित महाराष्ट्राचा 8080809063 किंवा जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी श्री. सोनवणे यांचा मो.क्र.8888766444 वर संपर्क साधावा, असे कळविले आहे.

0000

Wednesday, November 30, 2022

 संविधान विषयावर स्पर्धा संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- संविधान दिन ‍26 नोव्हेंबर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर या कालावधीत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने संविधान विषयावर जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात आज भित्तीपत्रक, पोस्टर्स, बॅनर, चित्रकला स्पर्धा तर अधिनस्त मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह निवासी शाळा येथे भित्तीपत्रक, पोस्टर्स, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवा कार्यकर्ते प्रतिनीधी, कर्मचारी वर्गांची कार्यशाळा घेण्यात आली, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

 जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन

व वाटप शिबिराचे शनिवारी आयोजन  

 

नांदेड (जिमाका) दि 30 :- नांदेड जिल्हयात तालुकानिहाय महाविद्यालयस्तरावर शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी एक दिवसीय जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांनी सन 2022-23 या वर्षातील प्रवेशीत इयत्ता 11 वी व 12 विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत आयोजित तालुकानिहाय शिबिराच्या ठिकाणी संबंधित तालुक्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रतिनिधी तसेच महाविद्यालयात स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राचे नियुक्त प्रमुख प्रतिनिधींनी मंडणगड पॅटर्न प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी माहितीसह उपस्थित रहावे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले, उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार 26 नोव्हेंबर संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2022 पर्यंत 'समता पर्व' साजरे केले जात आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने सन 2022-23 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे समितीकडे दाखल केलेल्या जाती दावा पडताळणी प्रस्तावांमध्ये समितीने दिनांक 28 नोव्हेंबर पासून ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत वैध केलेल्या प्रकरणात संबंधित अर्जदार यांना समक्ष जात वैधता प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. तसेच सर्व महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राचे नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधींना मंडणगड पॅटर्न प्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

तालुकानिहाय शिबिराचे आयोजन

नांदेड जिल्ह्यात शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत धर्माबाद व बिलोली तालुक्यासाठी लाल बहादूरशास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच बरोबर भोकर, हिमायतनगर, किनवट तालुक्यासाठी श्री शाहू महाराज महाविद्यालय बोरगाव रोड भोकर येथे, देगलूर तालुक्यासाठी देगलूर महाविद्यालय देगलूर, नायगाव तालुक्यासाठी जनता हायस्कुल नायगाव येथे, लोहा व कंधार तालुक्यासाठी श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथे, हदगाव व माहूर तालुक्यासाठी पंचशिल महाविद्यालय हदगाव येथे, मुखेड तालुक्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे. नांदेड, अर्धापूर, व मुदखेड तालुक्यासाठी यशवंत महाविद्यालय नांदेड येथे तर उमरी तालुक्यासाठी कै. बाबासाहेब देशमुख बोरटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमरी येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अनिल शेंदारकर उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.   

00000

 नेहरू युवा केंद्राच्यावतीने जिल्हा युवा मंडळ

पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि 30 :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने दरवर्षी युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संलग्नित युवा मंडळासाठी पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुक मंडळानी 15 डिसेंबर 2022 पर्यंत विहित नमून्यात  नेहरू युवा केंद्र] राज निवास घर नं.21 मालेगाव रोड जैन मंदिर समोर, शिवराय नगर तरोडा (खु ) नांदेड येथे अर्ज सादर करावेत.

 

दिनांक 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षात युवा मंडळाने केलेल्या युवा विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्र नांदेड कार्यालयातर्फे आरोग्य शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, विविध शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन, सामाजिक कार्यक्रम इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या संलग्नित युवा मंडळाना हा पुरस्कार देण्यात येतो.

 

पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्रक असे आहे. जिल्ह्यातील संलग्नित ग्रामीण भागातील युवा मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ, सेवाभावी संस्था, व्यायामशाळांनी अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र, घटना, आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा अहवाल, लेखा परीक्षणाचा अहवाल व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिफारशीसह सर्व मंडळानी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे. अर्जाचा नमुना नेहरू युवा केंद्र या कार्यालयात उपलब्ध आहे. या योजनचा लाभ जास्तीतजास्त युवा मंडळानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी युवा केंद्र अधिकारी चंदा रावळकर  यांनी केले आहे.

0000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...