Wednesday, November 16, 2022

19 व 20 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन-विक्री, परिसंवाद, चर्चासत्र, वत्कृत्व स्पर्धा, कविता व कथेचे अभिवाचन

                                       19 व 20 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन

ग्रंथ प्रदर्शन-विक्री, परिसंवाद, चर्चासत्र, वत्कृत्व स्पर्धा, कविता व कथेचे अभिवाचन

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय म.रा.मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या विद्यमाने ‘नांदेड ग्रंथोत्सव 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, श्री गुरु गोबिंदसिंगजी स्टेडीयम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी शनिवार 19 व रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री असा या ग्रंथोत्सवाचा उददेश असून प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. नांदेडसह महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या प्रकाशकाची दालने याठिकाणी असणार आहेत. औरंगाबाद येथील शासकीय ग्रंथागाराचे व बालभारतीचे विशेष दालन या ग्रंथप्रदर्शनात राहणार आहे. या दालनात शासकीय प्रकाशने व दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

शनिवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता महात्मा ज्योतिबा फुले पुतळा आय.टी.आय चौक येथून कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या  दिंडीमध्ये विविध लोककला सादरीकरण लेझीम पथक, भजनीमंडळ यासह विदयार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या ग्रंथदिंडीस सौ.श्यामल पत्की, संजीव कुलकर्णी, रविचंद्र हडसनकर  प्रा.लक्ष्मण कोतापल्ले,  डॉ.अनंत राऊत, आनंद कल्याणकर, विजय बेंबडे यांची उपस्थिती राहणार आहे.  पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाटय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता भगत हे असतील.

 

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण , विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा घुगे-ठाकूर, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड. गंगाधर पटने, दत्तात्रय क्षीरसागर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांची उपस्थिती असणार आहे.

 

शनिवार 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4  यावेळेत "वाचन संस्कृती संवर्धनार्थ उपाययोजना"या विषयावर ॲड. गंगाधर पटने यांच्या अध्यक्षेतखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ.जगदीश कुलकर्णी, रणजीत धर्मापुरीकर,डॉ. कैलास वडजे, सौ. दीपा बियाणी, डॉ.शारदा कदम यांचा सहभाग असणार आहे. सायं 4 ते 6 कविता आणि कथा अभिवाचनामध्ये शांता शेळके, वसंत बापट व कवी शंकर रमाणी यांच्या कविता व अण्णाभाऊ साठे जी.ए.कुलकर्णी यांच्या कथेचे अभिवाचनाचा कार्यक्रम केशव सखाराम देशमुख यांच्या अध्यक्षेतखाली होणार आहे. यामध्ये डॉ.जगदीश कदम, सौ. आशा पैठणे, शिवा कांबळे, प्रा.महेश मोरे, प्रा.स्वाती कान्हेगावकर हे सहभागी असणार आहेत.

 

रविवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत "मराठवाडा मुक्ती संग्रामातील संवेदनांचे काठ"या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. या परिसंवाद मध्ये प्रमुख वक्ते म्हणुन प्रा.डॉ.पृथ्वीराज तौर व प्रा.डॉ. महेश जोशी, प्रतीक्षा तालंगकर सहभाग नोंदवणार आहेत. दुपारी 2 ते 4 वाजता "आजची समाज माध्यमे व वाचन संस्कृती" या विषयावर माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी वत्कृत्व स्पर्धेचे नीलकंठ पाचंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सायं 4 ते 6 यावेळेत नांदेड ग्रंथोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम धर्मादाय उपायुक्त किशोर मसने यांच्या अध्यतेखाली संपन्न होणार आहे. या कार्याक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, साहित्यिक देवीदास फुलारी, बी.जी.देशमुख, एम.जी.एम कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.गोंविद हंबर्डे उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीने  केले आहे.

00000

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 16 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून रविवार 20 नोव्हेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 19 डिसेंबर 2022 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 नोव्हेंबर 2022  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 डिसेंबर 2022  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन

 कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- शासन परिपत्रकानुसार शनिवार  19 नोव्हेंबर ते  शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 या कालावधी जिल्ह्यात कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व निमशासकीय, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आदींसह विविध यंत्रणांनी दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

या सप्ताहात शनिवार 19  नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस, रविवार 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक  कल्याण दिवस, सोमवार 21 नोव्हेंबर भाषिक सुसंवाद दिवस, मंगळवार 22 नोव्हेंबर दुर्बल घटक दिवस, बुधवार 23 नोव्हेंबर सांस्कृतिक एकता दिवस, गुरुवार 24 नोव्हेंबर महिला दिन आणि शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यावरण जोपासना दिवस साजरा करण्यात येणार आहे.

 

हा सप्ताह साजरा करण्यासाठी संबंधितांनी अल्पसंख्याक विकास विभाग 7 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन परिपत्रकाचे अवलोकन करावे व आपल्या अधिनस्त यंत्रणांद्वारे सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे. 

00000

Tuesday, November 15, 2022

 दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्याची सुविधा


नांदेड (जिमाका) दि. 15:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी अतिविलंब शुल्काने शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगी रित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने विलंब व अतिविलंब शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2022 मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. खाजगीरित्या इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑनलाईन पध्दतीने स्विकारणाच्या अंतिम मुदतवाढीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.

अतिविलंब शुल्कासह निर्धारित अंतिम मुदत याप्रमाणे आहे. माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अति विलंब शुल्क रु. 20/- प्रती विद्यार्थी प्रतीदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 पर्यत भरावयाचा आहेत. खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क +विलंब शुल्क/अतिविलंब शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क/ अतिविलंब शुल्क राहिल.(विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क नमूद केल्याप्रमाणे शुल्क भरण्यात यावे. )

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.

इयत्ता दहावी व बारावी- 2023 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. इय्यता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, प्राचार्य व संबंधित घटकांनी नोंद घेवून दिलेल्या कालावधीतच फॉर्म भरणे बंधनकारक राहील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 इयत्ता पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 15 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय शिक्षक मंडळामध्ये इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नावनोंदणी पध्दतीने प्रवेश अर्ज 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत निश्चित करण्यात आला होता. सदर कालावधी संपुष्टात आला असून आता ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे यांची सर्व विद्यार्थ्यांनी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ यांनी केले आहे.
नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी मंगळवार 8 नोव्हेंबर ते सोमवार 21 नोव्हेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरावेत. गुरूवार 10 नोंव्हेबर ते बुधवार 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे मूळ अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे, यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in
या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज करावेत, असे शिक्षण मंडळकडून सांगण्यात आले आहे.
000000
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर
नांदेड (जिमाका) दि. 15 :- आदिवासी उमेदवारांसाठीचे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जि.नांदेड या कार्यालयाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, पहिला मजला गोकुंदा, किनवट या शासकीय ईमारतीत 14 नोव्हेंबर 2022 पासून स्थलांतर झालेले आहे. सर्वानी यांची नोंद घ्यावी, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी कळविले आहे.
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...