Tuesday, November 15, 2022

 पेनूर येथील गोदावरी नदीपात्राला जिल्हाधिकाऱ्यांची रात्री अचानक भेट

▪️अडगळीच्या जागी लावलेले 6 तराफे केले नष्ट
नांदेड (जिमाका) दि. 15 :- लोहा तालुक्यातील पेनूर येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अचानक भेट देऊन अवैध वाळू उपसा करणारे साहित्य नष्ट केले. गोदावरी नदीच्या पात्राला त्यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत अडचणीच्या ठिकाणी एकुण 6 तराफे लावलेले त्यांना आढळून आले. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी हे तराफे नष्ट करण्याच्या सूचना उपविभागीय दंडाधिकारी शरद मंडलिक यांना केल्या.
उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, मंडळ अधिकारी डी. एल. कटारे, तलाठी राजु इंगळे, रायाजी, मोतीराम पवार, मारोती कदम यांच्या पथकाने हे साहित्य नष्ट केले. सदर कारवाई रात्री 12 पर्यंत सुरू होती.
पेनूर व बेटसांगवी येथे होत असलेल्या अवैध रेती विरुद्ध जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात मोठी कारवाई केली होती. अनेक तराफे नष्ट करून आलेला अवैध रेतीसाठा जप्त केला होता. या कारवाई पाठोपाठ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आता रात्री अचानक भेट देऊन केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
000000





 बिरसा मुंडा यांना अभिवादन करत मोतीरामच्या शेतात जेंव्हा विहिरीचे भूमिपूजन होते !

▪️जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर यांनी
लाभार्थी मोतिरामचा बांधावर जाऊन केला सन्मान
नांदेड (जिमाका) दि. 15 :- भारतीय राज्यघटनेने दिलेल्या हमी नुसार दुर्बलतर घटकांसाठी शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमार्फत क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील वाडी-वस्तीवर असलेल्या शेतकऱ्यांना विहिरीची योजना ही त्यांचे जीवनमान उंचावणारी ठरली आहे. आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे लाभधारक मोतिराम पिराजी तोटावाड या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अभिवादन केले. अल्पभूधारक असलेल्या मोतीराम यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला या आगळ्या अभिवादनाने समाधानासह आश्वासकता मिळायला वेळ लागला नाही.
ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांच्या मनात योजनेप्रती विश्वासार्हता निर्माण व्हावी, लाभधारकाला ती योजना आपली वाटावी व त्याचेही सकारात्मक समाधानी योगदान त्यात मिळावे या उद्देशाने जिथे-जिथे शक्य असेल तिथे मी भेट देण्याचा प्रयत्न करते, या शब्दात वर्षा ठाकूर-घुगे यांनी लाभधारकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मोतीराम यांच्या शेतातील विहिरीचे भूमिपूजन करतांना या परिवाराच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा शासकीय सेवक म्हणून आम्हालाही बळ देणारा आहे, असे त्या म्हणाल्या.
अल्पभूधारक शेतकरी असल्याने या एक हेक्टर व काही गुंठ्यात उज्जवल भविष्याचा मार्ग दिसत नव्हता. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमुळे आता या शेतीतून खूप काही मनासारखे करता येईल. आमच्या गावात पोकरा योजना असल्याने त्याचाही अप्रत्यक्ष आम्हाला लाभ होईल असे मोतिराम तोटावाड या शेतकऱ्याने सांगितले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पेरूची लागवड करण्याचे माझे स्वप्न आता साकार होत असल्याने आम्हाला प्रचंड आनंद झाल्याचे मोतिराम यांनी सांगितले.
00000








 मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी

ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हंगाम 2022-23 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात नांदेड(अर्धापूर), मुखेड, हदगाव, लोहा, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, जाहुर (ता. मुखेड), गणेशपूर (ता. किनवट), वन्नाळी ता. देगलूर, धुप्पा ता. नायगाव या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

 

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबूक इ. कागदपत्रे सबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

00000

Monday, November 14, 2022

 जिल्ह्यातील 3576 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 24 हजार 403 पशुधनाचे लसीकरण 


नांदेड (जिमाका) दि. 14 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 214 बाधित गावात 3 हजार 576 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. 

आतापर्यंत 184 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 2 हजार 315 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 1083 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 24 हजार 403 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 74 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध

           नांदेड (जिमाका), दि. 14: जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथील जुन्या वर्तमानपत्राची रद्दी, कालबाह्य अन्य नियतकालिके इत्यादींची आहे त्या परिस्थितीत विक्री करावयाची आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. त्यासाठी खरेदीदार संस्थाकडून प्रती किलो प्रमाणे खरेदी दरपत्रकाची निविदा गुरुवार दि. 24 नोव्हेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. इच्छूकांनी आपले लिफाफा बंद दरपत्रक ‘जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पार्वती निवास, खुरसाळे हॉस्पिटल, यात्री निवास रोड, बडपूरा, नांदेड -431601’ या पत्यावर कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. या संदर्भातील अटी व शर्ती या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.

      रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांना राहतील. 

Sunday, November 13, 2022

 ​मधुमेहाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी

आरोग्यपूर्ण जीवनशैली अत्यावश्यक

-         जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात नेत्र तपासणी शिबीर संपन्न  

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- संगणकीकरणामुळे बदलेली जीवनशैली ही अधिक एका जागेवर खिळवून ठेवणारी झाली आहे. सतत संगणकावर काम, यात डोळ्यांवर पडणारा ताण, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहासारख्या वाढलेल्या आजाराचे प्रमाण चिंताजनक आहे. आजच्या घडीला भारतात 90 टक्के घरांमध्ये मधुमेहाचे रुग्ण आढळून येतात. आरोग्याच्या दृष्टीने ही आव्हानात्मक बाब ठरली असून यावर मात करण्याच्यादृष्टिने लोकांनी आपली जीवनशैली अधिक आरोग्यपूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केली.

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व शासनाच्या थोडेसे माय-बापासाठी या अभियानाअंतर्गत जागतिक मधुमेह दिनाच्या औचित्याने आरोग्य विभागातर्फे मधुमेह रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय येथे झालेल्या या शिबिरास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर, नांदेड येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. शाम तेलंग, नांदेड नेत्र तज्ज्ञ संघटनेचे सचिव डॉ. आनंद पाटील, राज्य नेत्र तज्ज्ञ संघटनेचे प्रतिनिधी डॉ. विवेक मोतेवार, रेटिना तज्ज्ञ डॉ. विशाल कुलकर्णी, डॉ. माहेश्वरी, डॉ. बुरकुलवार, डॉ. साची कोटलवार, डॉ. रवी अग्रवाल, डॉ. माने,  जिल्हा अंधत्व नियंत्रण अधिकारी डॉ. रोशनी, डॉ. दहाडे, डॉ. आडे, डॉ. विभुते, डॉ. दासरवार, डॉ. पेडगावकर, डॉ. कलंत्री, डॉ. भोरगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

मधुमेहाचा थेट परिणाम दृष्टीदोषाशी संबंधीत आहे. याचे संकेत प्रत्येकाला सहज लक्षात येण्यासारखे असून यावर वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे सांगुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व शासनाच्या थोडेसे मायबापासाठी या उपक्रमाबाबत माहिती दिली. जागतिक मधुमेह दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिरासाठी नांदेड शहरातील खाजगी नेत्रतज्ज्ञांनी स्वत:हून पुढाकार घेऊन यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा गौरव केला. जिल्हा रुग्णालयातर्फे वेळोवेळी असे लोकाभिमूख उपक्रम हाती घेतले असून यात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. संतोष सिरसीकर यांनी केले.  

00000





 वृत्त 

गरजूंपर्यंत लोककल्याणाच्या योजना पोहोचवणे ही न्यायदानाची प्रक्रिया  

- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश व्ही. न्हावकर

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारतीय राज्यघटनेनुसार कायद्याचे राज्य असणे हे अत्यंत आवश्यक असण्यासमवेत त्याला लोककल्याणाची जोडही तेवढीच महत्वाची मानली गेली आहे. जो वर्ग न्यायाच्या प्रवाहात येऊ शकला नाही त्या घटकापर्यंत न्याय पोहचण्याच्या उद्देशाने शासनाने विविध लोककल्याणकारी योजना आखाव्यात यासाठी राज्यघटनेत विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अनुरूप ज्या योजना हाती घेतल्या गेल्या आहेत त्या गरजू पर्यंत पोहचणे ही सुद्धा न्याय प्रक्रियेतील महत्वाची क्रिया असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश व्ही. न्हावकर यांनी केले.


मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिपल्स कॉलेज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या लोककल्याणकारी शासकीय योजनांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा सरकारी वकील रजणजित देशमुख, अभियोक्ता संघाचे अध्यक्ष एस. एम. पुंड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी डॉ. संजय तुबाकले, न्यायालयातील सन्माननीय न्यायाधीश यांची प्रमुख उपस्थिती या समारंभास होती.


न्यायाचे अभिसरण ही एका अर्थाने साक्षरतेची प्रक्रिया आहे. जे लोक न्यायाच्या परिघात नाहीत त्यांच्या पर्यंत न्याय पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणा जेवढी सक्षम असेल त्याच प्रमाणात लाभधारकाची योजनाप्रती असलेली दृष्टी सकारात्मक असली पाहिजे. आपण ज्या योजनेचा लाभ घेत आहोत त्याची माहिती जर त्यांच्या पर्यंत व्यवस्थीत पोहचली तर योजनाची व्याप्ती खऱ्या अर्थाने वाढेल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश व्ही. न्हावकर यांनी स्पष्ट केले. कोणावर जर अन्याय होत असेल तर त्याने अन्याय विरुद्ध बोलले पाहिजे. अन्यायाचा आवाज न्यायालयापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही समाजाची असून एका अर्थाने ते जागृत समाजाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. या महामेळाव्यात जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण लोकाभिमूख योजनांबाबत माहिती देण्यासह सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. महानगरपालिकेने अत्यंत कमी कालावधीत विविध स्टॉलच्या उभारणीपासून यात पोलीस विभागातर्फे सायबर क्राईम बाबत साक्षरता व्हावी या उद्देशाने लावलेल्या स्टॉलचेही त्यांनी कौतुक केले. विशेषत: सर्वसामान्यांना आरोग्याची हमी देणाऱ्या आयुष्यमान भारत अंतर्गत केल्या जाणाऱ्या नोंदणी प्रक्रियेची त्यांनी माहिती घेतली.


आपल्या अधिकारासह कर्तव्याची भावना ही जागृत समाजाचे लक्षण

– जिल्हाधिकारी अभिजित राऊत



शासकीय योजनांपासून जे वंचित आहेत त्या वंचितापर्यंत पोहचण्याची जबाबदारी ही शासकीय यंत्रणेची आहे. एखाद्या योजनेचे फलित हे त्या संबंधित शासकीय यंत्रणेचे प्रमुख जेवढ्या जबाबदारीने आणि कर्तव्य भावनेने आपली जबाबदारी पार पाडतात त्यावर अवलंबून असते. लोककल्याणकारी योजनांची भूमिका अधिक दृढ होण्याच्या दृष्टिने हा भव्य लोककल्याणकारी योजनांचा महामेळावा महत्वाचा आहे. याद्वारे नागरिकांच्या अधिकारांसह कर्तव्याप्रती होणारी जागृती ही प्रशासनाच्यादृष्टिने अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.


लोककल्याणकारी राज्यात न्याय व्यवस्था फक्त अन्यायाला दाद देण्यापुरती नसून लोकांच्या दारापर्यंत जाऊन न्याय देणारी आहे या शब्दात त्यांनी आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल गौरउद्गार काढले. लोकअदालत व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे असे उपक्रम हे सुदृढ न्याय व्यवस्थेचे द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग अत्यंत जबाबदारीने कर्तव्य तत्पर असून महानगरपालिका व इतर विभाग प्रमुखांनी या मेळाव्यासाठी दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

 

जिल्हा पोलीस दलाचे स्टॉल ठरले आकर्षण

मोबाईलच्या माध्यमातून घरोघरी आर्थिक व बँकिंग व्यवहाराबाबत व्याप्ती वाढणे हे एका अर्थाने प्रगतीचे लक्षण मानले पाहिजे. तथापि मोबाईलची ही क्रांती हाताळतांना बँकिंग प्रणालीबाबत व फसव्या जाहिरातींना बळी पडणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढत आहे. यात आर्थिक गुन्हेगारीचा झालेला शिरकाव रोखण्यासाठी प्रत्येक मोबाईल वापर कर्त्याने सावध झाल्याशिवाय पर्याय नाही. यादृष्टिने पोलीस विभागातर्फे स्वतंत्र स्टॉल लावून जागृती करण्यात आली. याचबरोबर महिलांच्या संरक्षणासाठी भरोसा सेलचा स्टॉल महिलांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. हा सेल आमच्या मैत्रीणी सारखा असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.

 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण, कृषि, आरोग्य, महिला बचतगट, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, पशुसंवर्धन, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा महिला व बाल संरक्षण कक्ष, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, निवडणूक शाखा, भारतीय डाक विभाग, दिव्यांग योजना, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान आदी योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

00000






वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...