Friday, May 1, 2020


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने सोहळा साजरा  
महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्री अशोक चव्हाण
यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण संपन्न
नांदेड, (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या  60 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण आज संपन्न झाला. 
कोरोना विषाणुंच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन करुन अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यात आला. 
याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







पिरबुऱ्हाणनगर, परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रुग्णांचा मृत्यू
पॉझिटिव्ह चार रुग्णांची प्रकृती स्थीर, संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
नांदेड, (जिमाका) दि. 1 :- कोरोना विषाणु संदर्भात आज शुक्रवार 1 मे 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात 1 हजार 112 संशयितांची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण घेण्यात आलेले स्वँब 985 असून त्यापैकी 962 जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे तर  7 स्वँब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 5 जणांचा स्वँब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. चार जणांचा निष्कर्ष निघाला नाही. घेण्यात आलेले स्वँब 985  त्यापैकी 6 रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आहेत.
पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा (वय 64 वर्ष) पॉझीटिव्ह अहवाल हा बुधवार 22 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता सदर रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यांसारखे गंभीर आजार होते. रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे गुरुवार 30 एप्रिल रोजी झाला असून मृताचा दफनविधी हा आसरानगर कबरस्तान येथे पाच व्यक्तिंच्या उपस्थितीत ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आला. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले होत त्या सर्व व्यक्तींचे अहवाल पहिल्यांदा निगेटिव्ह आले आहेत. त्याप्रमाणे 51 निकटवर्तीय व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वँब घेण्यात आलेले असून त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला रुग्णाचा (वय वर्ष 51 ) पॉझीटिव्ह अहवाल हा 30 एप्रिल रोजी प्राप्त झाला. या रुग्णाची प्रकृती गंभीर होती. या  रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे सदर रुग्णाचा मृत्यू गुरुवार 30 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे झाला.
नांदेड शहरातील अबचलनगर येथील एका रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार 26 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील 18 व्यक्तींचे स्वँब घेण्यात येवून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 व्यक्तींच्या स्वँब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.
श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे ­2 वाहनचालक आणि त्यांचा एक मदतनीस यांचाही स्वँब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. सदर वाहन चालक आणि मदनीस हे गुरुवार 23 एप्रिल रोजी पंजाब येथे जाऊन मंगळवार  28 एप्रिल रोजी परत आले असता त्यांना नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्याच्या सिमेवरच अडवून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. या तीन व्यक्तींचे बुधवार 29 एप्रिल रोजी स्वँब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सद्यस्थितीत या रुग्णांवर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचार सुरु आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या सर्व कोरोना बाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


पोलीस दलातील आठ अधिकारी कर्मचाऱ्यांना
पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह जाहीर ;   
पालकमंत्री  अशोक चव्हाण यांनी केला  सत्कार
नांदेड, (जिमाका) दि. 1 :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात  आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नांदेडच्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी बोधचिन्ह आणि सन्मानचिन्ह जाहीर केले आहे.याबद्दल या सर्वांचा सत्कार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन  केला.
यामध्ये प्रशांत अनंतराव पवार पोलीस निरीक्षक यांना सतत 15 वर्षे उत्तम सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार,  खामराव रामराव वानखेडे सहपोलीस उपनिरीक्षक मांडवी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना पोलीस पदक,  अशोक शिवदास देशमुख पोलीस हेडकॉन्स्टेबल नांदेड ग्रामीण याना सेवेत सतत 15 वर्षे उत्तम कामगिरीबद्दल आणि माधव मोहनराव पल्लेवाड पोलिस हेडकॉन्स्टेबल नाहरा उत्तम सेवा पंधरा वर्ष पूर्ण केल्याबद्दल, बालाजी गणपतराव सोनटक्के दहशतवादी विरोधी पथक यांनी दरोडेखोर, गुन्हेगारांची टोळी विरुद्ध केलेली कारवाई विषयी पोलीस पदक, शामसुंदर यादवराव छात्रकर  उस्माननगर, दरोडेखोर गुन्हेगारीच्या टोळीयुद्ध केलेली कार्यवाही याविषयी सन्मान सूर्यकांत व्यंकटराव घुगे ईतवारा पोलीस स्टेशन सेवेत सतत 15 वर्षे उत्तम कामगिरीबद्दल, मारुती रामराव केसगिर पोलीस मुख्यालय नांदेड पंधरा वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मान
खामगाव हद्द या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र मनोज लोहिया,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर , जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त  डॉ.सुनील लहाने, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अरुण जऱ्हाड यांची उपस्थिती होती.
00000


क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघातर्फे
“मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19” ला 51 हजारची मदत,
 पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केला धनादेश सुपूर्द
           
नांदेड, (जिमाका) दि. 1 :-  कोरोनाचा उपचारासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील विविध दानशूर व्यक्ती, संस्था भरभरुन मदत “मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19” साठी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम) महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 साठी 51 हजार रुपयाचा धनादेश तथा  पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, "लसाकम"चे महासचिव गुणवंत काळे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे, गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के,  जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले, सचिव डॉ. अशोक झुंजारे आदींची उपस्थिती होती.
00000


लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या लोकांना
त्यांच्या गावी जाण्यास कार्यप्रणाली निश्चित
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश निर्गमीत
नांदेड, दि. 1 :- लॉकडाऊनच्या कालावधीत विविध राज्यात, जिल्ह्यात अडकलेले विस्थापित कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना नांदेड जिल्ह्यात येण्यासाठी व नांदेड जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या संबंधित राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता आवश्यक असणारी परवानगी देण्यासाठी संबंधीत जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे.
नांदेड जिल्ह्यातून राज्यांतर्गत, परराज्यात वरीलप्रमाणे नमूद लोकांना जाण्यासाठी करावयाची कार्यप्रणाली पुढील प्रमाणे राहील.
संबंधित तहसिलदार हे तहसिल स्तरावर अशा लोकांची यादी तयार करतील. यादीनुसार तालुका स्तरावरील कॅम्प किंवा रवानगीच्या ठिकाणी अशा सर्वांची थर्मल व वैद्यकिय तपासणी करुन त्याबाबतचे संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे. या तपासणीत कोरोना रोगाचे लक्षणे नसलेल्या व्यक्तिंची यादी ते ज्या राज्यातील आहेत त्या राज्य, जिल्हा, तालुका, गाव या पद्धतीने तयार करण्यात यावी. प्रवासासाठी पात्र व्यक्तिंची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वय अधिकारी तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे सादर करावी. अशा याद्या तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती ज्या राज्यात जात आहेत त्या व्यक्तिच्या रहिवास पर्यंतचा रुट प्लॅन तयार करण्यात यावा. त्यानंतर ही यादी जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करावी. यादीस मान्यता प्राप्त झाल्यानंतर संबंधीत सक्षम प्राधिकारी / जिल्हाधिकारी यांना ते सादर करुन त्यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर अशा व्यक्तिंना प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाची निर्जतूकिकरण करुन रवानगीची कार्यवाही त्या-त्या ठिकाणावरुन करावी. वाहनासोबत प्रवाशांची यादी, वैद्यकीय प्रमाणपत्र, वाहन पास, रुट प्लॅन, संबंधीत प्रवाशांचे हमी प्रमाणत्र ठेवावे.
नांदेड जिल्ह्यात राज्यांतर्गत / पराज्यातून येणाऱ्या लोकांना नांदेड जिल्ह्यात येण्यास परवानगीबाबची कार्यवाही राज्यांतर्गत / परराज्यातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तिंची संबंधीत नोडल अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होणारी यादी / जोडपत्र “ब” मधील परवानगी वैद्यकीय प्रमाणपत्र, रुटप्लॅन, वाहनाची परवानगी, वाहनाचे प्रकार, प्रवासाचा कालावधी इत्यादी पत्रासह माहिती प्राप्त झाल्यानंतर अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यास समन्वय अधिकारी तहसलिदार संगायो श्रीमती वैशाली पाटील, डॉ. मृणाल जाधव, डॉ. संजय बिराजदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर संबंधितांना परवानगीचे पत्र पाठवावे. अशी प्राप्त संबंधीत तहसिलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी.
याप्रमाणे येणाऱ्या व्यक्तिंची नांदेड जिल्ह्यात प्रवेशाच्या ठिकाणी वैद्यकिय पथक गठित करण्यात यावे. ज्यामध्ये पोलीस, महसूल व वैद्यकिय अधिकारी यांचा समावेश असावा. या पथकामार्फत आलेल्या प्रत्येक व्यक्तिंची थर्मल गनद्वारे व इतर अनुषंगिक तपासणी करुन तपासणीअंती आवश्यकतेनुसार होम क्वारंटाईन किंवा आ यशोलेशन क्वारंटाईन करण्याची कार्यवाही करावी. ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे अशा व्यक्तिंची पुढील 14 दिवसांसाठी शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिक, नगरपंचायत हे पाहतील तर ग्रामीण भागात संबंधीत ग्रामसेवक हे पाहतील.
वरीलप्रमाणे सर्व संबंधीत तहसिलदार यांनी अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या सनियंत्रणेत वेळेत जबाबदारी पार पाडावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, समूह यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी  निर्गमीत केले आहेत.
00000

Thursday, April 30, 2020


कोरोना बाधित दोन रुग्णांवर उपचार सुरु
14 दिवसानंतर त्यांचे परत स्वॅब तपासणीसाठी घेणार
नांदेड, दि. 30 :- कोरोना विषाणु संदर्भात आज गुरुवार 30 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नांदेड येथे 1 हजार 112 संशयितांची नोंद झाली आहे. वरील दोन्ही कोरोना बाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. त्यांचे 14 दिवसानंतर परत स्वँब तपासणीसाठी घेण्यात येतील.
त्याची  वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे.  एकूण घेण्यात आलेले स्वँब 985 असून त्यापैकी 795 निगेटिव्ह आहेत तर 180 स्वँब अहवाल प्रलंबित  आहेत. आतापर्यंत एकूण 5 स्वँब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच 1 निष्कर्ष निघालेला नाही. एकूण घेण्यात आलेले स्वँब 985 व त्यापैकी 3 रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आहेत.
यापैकी नांदेड शहरात पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा (वय 64 वर्ष) पॉझीटिव्ह अहवाल हा  22 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे 30 एप्रिल पर्यंत प्रकृती गंभीर होती. रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू आज 30 एप्रिल 2020 रोजी झाला असून या रुग्णाचा दफनविधी हा आसरानगर कबरस्तान येथे 5 माणसाच्या उपस्थितीत ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येणार आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले असून  सर्व 80 व्यक्तींचे अहवाल  पहिले निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आज 29 एप्रिल 2020 रोजी 51 निकटवर्तीय व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वँब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
नांदेड अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल हा  दि. 26 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून सदर रुग्णाची प्रकृती स्थीर आहे. तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील 18 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले असून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 व्यक्तींच्या स्वँब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल हा  दि. 30 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून या रुग्णाची गंभीर आहे.
वरील दोन्ही कोरोना बाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. त्यांचे 14 दिवसानंतर परत स्वँब तपासणीसाठी घेण्यात येतील. त्यामुळे अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000


विद्यापीठाच्या माध्यम संकुलातील मीडिया स्टुडिओमुळे
प्रसारमाध्यमात कुशल पत्रकार  घडतील
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 30 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात  तयार होत असलेला मीडिया स्टुडिओ अत्याधुनीक व आगळा वेगळा व्हावा ,यांमध्ये तांत्रिक शिक्षण घेत असलेला विद्यार्थी उद्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा विभाग ठरावा अशी अपेक्षा पालकमंत्री  अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. 
काल पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना  तपासणी प्रयोगशाळेस भेट देण्यापूर्वी माध्यम संकुलास भेट दिली. या विभागातील मीडिया  स्टुडिओ उभारणीचे  सुरू असलेल्या  कामाची पहाणी केली.  यावेळी त्यांच्या समवेत आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव  हंबर्डे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे,  नगरसेवक बालाजी जाधव विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
मीडिया स्टुडिओ ची उभारणी, त्यातील उपकरणे, यात अद्ययावत एडिटिंग यंत्रणा, चित्रीकरण कॅमेरा, रेकार्डिग रूम आणि सध्या असलेल्या सुविधा याची माहिती घेतली. या सर्व सुविधांचा लाभ आणि उपयोग विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमात  करिअर  करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे राहील, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी  दिली. हा स्टुडिओ आगळा-वेगळा व्हावा आणि विद्यापीठाची नवी ओळख होण्यामध्ये स्टुडिओची  भूमिका महत्वपूर्ण ठरेल, यासाठी काही सूचना  कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांना केल्या आहेत.
00000000


वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...