Sunday, January 26, 2020


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून
2 लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार
-         पालकमंत्री अशोक चव्हाण     
नांदेड, दि. 26 :- शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना” अमलात आणली आहे. ही योजना साधी, सोपी, सरळ असून पात्र शेतकऱ्यांचे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज खात्यात थेट देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. 
यावेळी महापौर दीक्षा धबाले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार डी. पी. सावंत, माजी आमदार अमिताताई चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आदी मान्यवर पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, नागरिक उपस्थित होते.  
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देवून पालकमंत्री श्री चव्हाण म्हणाले, भारत देश             26 जानेवारी 1950 रोजी एक प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला.  त्यामुळे या दिवसाला अनन्‍य साधारण महत्व आहे.  घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यासाठी अमूल्य योगदान लाभले. आपल्‍या महान राज्‍यघटनेचे महत्‍व सर्व नागरिकांना कळावे यासाठी महाराष्‍ट्र शासनातर्फे राज्‍यातील सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये “सार्वभौमत्‍व सविंधानाचे जनहित सर्वांचे” हा उपक्रम राबविण्‍यात येत आहे.      
महाराष्ट्र राज्याने  विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.  त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सर्वांगीण प्रगतीमध्‍ये नांदेड जिल्‍हयाने विविध क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
          
  नांदेड जिल्‍हयातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड या महाविद्यालयाने यावर्षी आरोग्य सेवेत भरारी घेतली असून यामध्ये 100 एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांच्या क्षमतेवरुन 150 एम.बी.बी.एस विद्यार्थ्यांची मान्‍यता भारत सरकारकडून प्राप्त झाली आहे. एवढेच नव्हे, तर यासोबत 35 पदव्युत्तर जागा सुध्दा वाढविण्यात यश आले आहे. या जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे व कॅन्सरचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येतात. अशा रुग्णांसाठी आपल्याच जिल्ह्यामध्ये उच्च दर्जाचे कॅन्सरचे निदान सेंटर तसेच ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे प्रस्‍तावित आहे. राज्यात चार शासकीय दंत महाविद्यालय असून त्याअनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडच्या परिसरात शासकीय दंत महाविद्यालय सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. राज्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड हे एकमेव वैद्यकीय महाविद्यालय आहे ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे युनिस्को युनिट कार्यान्वित आहे, ही जिल्‍हयासाठी भुषणावह बाब आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कै. शांताराम सगणे जलतरणीकेचे आधुनिक पध्दतीने नुतणीकरण 1.30 कोटी खर्च करुन करण्यात आले आहे. लवकरच या जलतरणीकेचे नव्याने लोकार्पण होणार आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अतंर्गत शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नुतणीकरणासाठी स्टेडियम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे रुपये 3.40 कोटी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.  स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नांदेड शहरात प्रतिदिन 220 टन निर्माण होत असलेल्या कचऱ्याचे परिमाण लक्षात घेता महापालिकेच्या मालकीच्या मौजे तुप्पा येथील 9.89 हेक्टर जागेवर अत्याधुनिक पध्दतीने घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले.
राज्य शासनातर्फे आज 26 जानेवारी 2020 पासुन ‘ शिवभोजन योजना’ राज्‍यभरात सुरु होत आहे. शिवभोजन योजनेतंर्गत भोजनालयात परिपूर्ण अशी थाळी दु. 12 ते 2 या कालावधीत अवघ्‍या 10 रुपयात देण्‍यात येणार आहे. यामध्‍ये नांदेड शहरामध्‍ये प्रायोगिक तत्‍वावर  बस स्‍थानक, रेल्‍वे स्‍टेशन, नवीन मोंढा आणि स्‍व. शंकरराव चव्‍हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्‍णुपुरी अशा 4  ठिकाणी शिवभोजन योजनेची सुरुवात होणार आहे. या योजनेचा लाभ सर्व गरीब व गरजू व्‍यक्‍तींनी घ्‍यावा असे आवाहन श्री. चव्हाण यांनी याप्रसंगी केले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या चक्रात अडकलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी राज्‍य शासनाने “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019”  निर्णय घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत केवळ राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019  पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्यांच्‍या कर्ज खात्यात थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम रुपये दोन लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. नांदेड जिल्ह्यात बँकेच्या अहवलानुसार अंदाजे 2 लाख 20 हजार 762 शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनेअतंर्गत निश्‍चीत उत्‍पन्‍न मिळण्‍याकरीता प्रति शेतकरी  कुंटुंबाला प्रति वर्षासाठी 6 हजार रुपये इतके आर्थिक साहाय्य देण्‍यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनेअतंर्गत जिल्‍हयातील साडेचार लक्ष कुंटुंबाची माहिती प्रधानमंत्री किसान संकेतस्‍थळावर भरण्‍यात आली आहे. त्‍यानुसार जिल्‍हयातील नोंदणी झालेल्‍या शेतकरी कुंटुंबाना लाभ मिळण्‍यासही सुरुवात झाली आहे.
जिल्‍हा प्रशासनाच्‍या पुढाकाराने काही उल्‍लेखनिय उपक्रम जिल्‍हयामध्‍ये राबविण्‍यात आले. त्‍यामध्‍ये  कर्करोग जनजागृति  व नियंत्रण कार्यक्रम घेण्‍यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत 18 लक्ष लोकसंख्‍येच्‍या सर्वे करण्‍यात येऊन कर्करोगाच्‍या 12300 संशयित रुग्‍णावर निदान व पुढील उपचार करण्‍यात आले. तसेच, जिल्‍हा प्रशासनाने भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम (अलिमको) यांचे समवेत जिल्‍हयामध्‍ये 10 ते 26 डिसेंबर 2019 या कालावधीमध्‍ये 16 तालुक्‍यांमध्‍ये दिव्‍यांग बांधवासाठी व जेष्‍ठ नागरिकांसाठी कृत्रिम साधनांच्‍या वाटपासाठी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामधुन 14 हजार दिव्‍यांग बांधवाना या योजनेअंतर्गत लाभ देण्‍यात आला. यामध्‍ये व्‍हील चेअर, ट्रायसिकल, स्‍मार्ट केन व कृत्रिम अवयवांचे वितरण करण्‍यात येणार आहे.  
जिल्‍हयातील रस्‍त्‍यांची परिस्थिती सुधारण्‍यासाठी युध्‍द पातळीवर काम हाती घेण्‍यात आलेले असुन जिल्‍हयातील सर्व ग्रामीण रस्‍त्‍यांना क्रमांक देण्‍याचे काम सुरु झाले आहे. जिल्‍हयातील ‘ इतर जिल्‍हा मार्गाचे’ रुपातंरण ‘प्रमुख जिल्‍हा मार्गांमध्‍ये’ करण्‍याचे काम हाती घेण्‍यात आले आहे. याव्‍दारे नांदेड जिल्‍हयामध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या रस्‍त्‍याचे जाळे विणण्‍यात येणार आहे.  
माजी मुख्‍यमंत्री स्‍वर्गीय शंकररावजी चव्‍हाण यांचे जन्‍मशताब्‍दी प्रित्‍यर्थ 15 जुलै 2019 ते 14 जुलै 2020 पर्यंत विविध कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे कार्यास उजाळा देण्‍यात येत आहे. विविध कार्यक्रमामध्‍ये त्‍यांचे स्‍मृती प्रित्‍यर्थ संदर्भग्रंथ प्रकाशित करणे, नांदेड शहरात शंकरराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍पाजवळ त्‍यांचे स्‍मारक उभारणे, नांदेड शहरात ग्रंथालय, स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र त्‍याचप्रमाणे मुलामुलींचे वसतिगृह उभारणे व भोकर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणे इत्‍यादी कामे पार पाडण्‍यात येणार आहे. तसेच जलक्रांतीचे जनक माजी मुख्‍यमंत्री स्‍वर्गीय शंकररावजी चव्‍हाण यांच्‍या  जन्‍मशताब्‍दी निमित्‍त जलसंपदा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा  क्षेत्रात उत्‍कृष्‍ट  काम  करणाऱ्या व्‍यक्‍तींना ‘ जलभूषण पुरस्‍कार’  प्रदान करण्‍यात येणार आहे.
अगदी प्रारंभीपासूनच देशातील सर्व राज्यांनी विविध क्षेत्रात प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. भारताच्या प्रगतीत महाराष्ट्राचे महत्‍वाचे योगदान असून विविध क्षेत्रात महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रभागी राहिले आहे. त्याच न्यायाने नांदेड जिल्‍हा देखील विविध क्षेत्रात उतरोत्‍तर प्रगती करुन राज्‍यात अग्रस्‍था‍नी राहीन अशी मला खात्री पालकमंत्री अशाक चव्हाण यांनी व्यक्त करुन  देशाची, राज्याची तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती करण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी  केले.
यावेळी परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या समवेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी  परेडचे निरीक्षण केले व त्यानंतर परेड संचलन झाले. संचलनात सहभागी प्लाटूनचे पथक पुढीप्रमाणे होते. केंद्रीय राखीव पोलीस बल मुदखेड, सशस्त्र पोलीस पथक (क्युआरटी) नांदेड, सशस्त्र पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड (आरसीपी), सशस्त्र पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड, सशस्त्र महिला पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड, सशस्त्र पोलीस पथक नांदेड शहर विभाग,  सशस्त्र पोलीस पथक इतवार विभाग, गृहरक्षक दल पुरुष पथक, शहर वाहतूक शाखा पथक नांदेड, गृहरक्षक दल महिला पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक  (एमएसएफ), एनसीसी मुलांचे पथक यशवंत महाविद्यालय नांदेड, महात्मा फुले हायस्कूल स्काऊट मुले व मुलींचे पथक, पोलीस बँड पथक पो. मु. नांदेड, डॉग स्कॉड युनिट डॉगचे नाव बेला, बॉम्ब शोधक व नाशक पथक बीडीडीएस, मार्क्स मॅन क्यूआरटी,  वज्र वाहन (दंगा नियंत्रण), बुलेट रायडर अग्निशमक दल,  देवदूत वाहन (मिनी रेस्क्यु फायर टेंडर), अग्निशमन दलाचे रेस्क्यु वाहन, 108 रुग्णवाहिका, मानव विकास कार्यक्रमांतर्गत योजनेची माहिती दर्शविणारा चित्ररथ, सामाजिक वनीकरण वृक्ष लागवड चित्ररथ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प चित्ररथ, निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणी पडताळणी कार्यक्रम, मतदार जागृती, पदवीधर नोंदणी चित्ररथाचा या संचलनात सहभाग होता.
पुरस्कार वितरण
            याप्रसंगी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उत्कृष्ट कर्तव्य बजावलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांस पुरस्कार वितरण करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे मा. राष्ट्रपती महोदयांकडून पोलीस पदक जाहीर झाल्याबाबत राखीव पोलीस उपनिरीक्षक पो. मुख्यालय नांदेडचे जमिल ईस्माईल सय्यद. राष्ट्रीय स्पर्धेत लॉन टेनिसमध्ये कांस्य पदक प्राप्त केंद्रीय विद्यालय नांदेडचे चि. कर्तव्य दिगंबर करंडे. 22 वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 2019 अमरावती पुरुष गट वैयक्तिक शंभर मीटर बॅक स्ट्रोकमध्ये कास्य पदक प्राप्त नांदेडचे नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांना कास्य पदक प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ दिले. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. यामध्ये अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, प्राध्यापक व विभाग प्रमुख नेत्रशास्त्र विभाग डॉ. विवेक सहस्त्रबुद्धे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एस. चव्हाण, सह. प्रध्यापक मनोविकार शास्त्र विभाग डॉ. प्रदीप बोडके, सिस्टर इनचार्ज लेबर ओटीचे श्रीमती कमल शिरिष खरात, ग्रीन कॉरीडोर यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय कामाबाबत वाहन चालक हनुमान डोईफोडे यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            राज्यस्तरीय पुरस्कार स्काऊट गाईडस पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कुनाल किशोर तावडे, मनोज खुशालराव येरेवाड, चि. वसंत उत्तम सोमशेटवार, चि. गजानन राजू पवार, श्रृती विठ्ठलराव शिंदे, अनुष्का किशोर वाकडे, जयेश जनार्धन देशमुख, जगदिश विश्वांभर बामणे, कपील चंद्रकांत येवते, अंकिता एकनाथ दळवी, आशा नागेशराव खनसोळे, दिशा बालाजी एंगडे, शिवहर शंकर स्वामी, सार्थक सारंग नेरलकर, अनु सुर्यकांत जमदाडे यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.   
            महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत उद्योग करणाऱ्या महिला बचत गटातील जय दुर्गा महिला बचतगट नाळेश्वर, अंबीका महिला बचतगट धर्माबाद, महालक्ष्मी महिला बचतगट सरसम, समृद्धी महिला बचतगट पंचशिलनगर नांदेड, मदिना महिला बचतगट मेदनकलूर ता. देगलूर, सागर महिला बचतगट दुलेशह रहेमाननगर नांदेड यांचा अध्यक्ष व सचिव यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती पार पडल्या. यात महात्मा फुले हायस्कुल विजयनगर नांदेड, खालसा हायस्कुल नांदेड, नागसेन हायस्कुल प्रभातनगर नांदेड, गुजराती हायस्कूल नांदेड, महात्मा फुले हायस्कुल बाबानगर नांदेड शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांची भेट घेवून संवाद साधला तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशीही हितगुज केली. सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पत्रकार, नागरिक आदींची उपस्थिती होती.
00000

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता
देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 26 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे सोमवार 27 जानेवारी 2020 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 27 जानेवारी 2020 रोजी औरंगाबाद विमानतळ येथून व्हीटी-टीआरआय विमानाने दुपारी 12.40 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 12.45 वा. मोटारीने नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.55 वा. नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज नांदेड येथे आगमन. दुपारी 1 वा. अभिनव भारत शिक्षण संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम. दुपारी 2 वा. मोटारीने साई-सुभाष वसंतनगर नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.10 वा. सोई-सुभाष वसंतनगर नांदेड येथे आगमन व प्रतापराव पाटील-चिखलीकर खासदार यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा. दुपारी 2.30 वा. राखीव. दुपारी 3.30 वा मोटारीने चांदोजी मंगल कार्यालय कॅनॉल रोड डि-मार्ट जवळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.40 वा. चांदोजी मंगल कार्यालय कॅनॉल रोड डि-मार्ट जवळ नांदेड येथे आगमन. दुपारी 3.45 वा. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायं. 5 वा. मोटारीने कुसूम सभागृह व्हीआयपी रोड नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.10 वा. कुसूम सभागृह व्हीआयपीरोड नांदेड येथे आगमन. सायं 5.15 वा. जेष्ठ पत्रकार कै. सुधाकरराव डोईफोडे यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम. सायं 6.15 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.25 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं. 6.30 वा. व्हीटी-टीआरआय या विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.
00000

Saturday, January 25, 2020


प्रेस नोट
मा श्री अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचे उदघाटन
गरीब आणि गरजूंना केवळ 10 रुपयात जेवणाची थाळी देणाऱ्या शिवभोजन योजनेची 26 जानेवारी पासून राज्यभर अंमलबजावणी होणार आहे.  नांदेड शहरासाठी 500 थाळी मंजूर असून, शहरात चार ठिकाणी शिवभोजन थाळीची सुरुवात होणार आहे. मा श्री अशोकराव चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री यांच्या हस्ते भारतीय स्टेट बँक समोर, नवीन मोंढा येथेदिनांक 26 जानेवारी,2020 रोजी उद्घाटन होणार आहे.मा. जिल्‍हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी 125 थाळीचे चार ठिकाणे निवडले आहे. यात बस स्थानक,रेल्वे स्टेशन, नवीन मोंढा आणि शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , विष्णुपुरी या ठिकाणाचा समावेश आहे. शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या या शिवभोजन योजनेअंतर्गत भोजनालायत प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम भात आणि 100 ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या 10 रुपयात देण्यात येणार आहे. शिवभोजन दुपारी 12 ते 2 या कालावधीत उपलब्ध होणार आहे.


शिवछत्रपती राज्य क्रीडा
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 25 :- राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. राज्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु) असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. संबंधितानी ऑनलाईन अर्जात आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या आर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रासह अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावे. ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करण्यात आलेल्या कागदपत्राशिवाय इतर कोणतेही अधिकची कागदपत्रे अर्जासोबत जोडण्यात येवू नये. ऑनलाईन व्यतिरीक्त इतर कागदपत्रे जोडलेली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कागदपत्रांचा गुणांकनासाठी विचार केला जाणार नाही याची  अर्जदारांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष व नियमावली आदी माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय 24 जानेवारी 2020 चे  अवलोकन करावे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in व  www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य पुरस्कार (संघटक/ कार्यकर्ते), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला संघटक/ कार्यकर्ते व महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहिसी पुरस्कर, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडु), एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार आहेत.
ज्येष्ठ क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/ कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी सबंधित अशा 60 वर्षावरील व्यक्तीने क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आपले जीवन  क्रीडा विकासासाठी व्यतीत केले आहे, अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीचा गौरव करण्याचा दृष्टीने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येत नसून अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीची माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील. याबाबत अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातुर विभाग लातुर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधु- 9423140617 यांच्याशी संपर्क साधाव, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विलास चव्हाण यांनी केले आहे.
00000


जिल्हाधिकारी कार्यालय समोरील
मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 25 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर शनिवार 25 जानेवारी 2020 रोजी सायं 6 वाजेपासून ते सोमवार 27 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपोषणे, आत्मदहने, धरणे,  मोर्चे, रॅली आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश 24 जानेवारी रोजी निर्गमीत केला आहे.
000000


जिल्हाधिकारी कार्यालय समोरील
मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 25 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर शनिवार 25 जानेवारी 2020 रोजी सायं 6 वाजेपासून ते सोमवार 27 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपोषणे, आत्मदहने, धरणे,  मोर्चे, रॅली आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश 24 जानेवारी रोजी निर्गमीत केला आहे.
000000


जिल्हाधिकारी कार्यालय समोरील
मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 25 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर शनिवार 25 जानेवारी 2020 रोजी सायं 6 वाजेपासून ते सोमवार 27 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपोषणे, आत्मदहने, धरणे,  मोर्चे, रॅली आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश 24 जानेवारी रोजी निर्गमीत केला आहे.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...