Wednesday, January 23, 2019


इंग्रजी माध्यमातील शाळांच्या प्रवेशासाठी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन
नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत सन 2019-20 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देणेसाठी इच्छूक पालकाकडून गुरुवार 30 जानेवारी 2019 पर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट येथून प्राप्त करुन कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन अभिनव गोयल (भा.प्र.से) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मूळ प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा दारिद्रयरेषेसाठी अर्जाचा विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत असावे. त्यासाठी तहसिलदाराचे यांचे सन 2018-19 चे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असावे. ( जन्म 1 जून 2012 ते 1 जून 2013 या कालावधीत झालेला असावा. ) पालकाचे संमतीपत्र, दोन पासपोर्ट फोटो व जन्म तारखेचा दाखला जोडावा. अंगणवाडी, ग्रामसेवक यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह असावा. विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अधिकारी, / तालुका व जिल्हा चिकत्सक यांचे  यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीता, निराधार, परितक्त्या व दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. घटस्फोटीता कार्यालयीन निवाड्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. त्याबाबत लेखी लिहुन दयावे. वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे तसेच इयत्ता पहिली व दुसरी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाचा कालावधी 7 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 पर्यंत राहिल. अर्जात खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र देण्यात यावे. वरील अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
000000


विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड, दि. 23 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
गुरुवार 24 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वा. नांदेड येथून शासकीय मोटारीने वसमतनगरकडे प्रयाण करतील.  
0000


राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त
शुक्रवारी रॅलीचे आयोजन  
नांदेड दि. 23 :- नऊ वा राष्‍ट्रीय मतदार दिवस शुक्रवार 25 जानेवारी 2019 रोजी साजरा करण्‍यात येणार असून सकाळी 7 वा. मोटार सायकल / मोपेड रॅलीचे आयोजन करण्‍यात आले आहे. या रॅलीस मान्‍यवरांचे हस्‍ते हिरवी झेंडी दाखवून महात्‍मा फुले पुतळा आयटीआय येथुन सुरुवात करण्‍यात येणार आहे.  
            या रॅलीचा मार्ग महात्‍मा फुले पुतळा–आय टी आय –गणेशनगर वाय पॉईंट – मोरचौक -छत्रपती चौक राज कॉर्नर - वर्कशॉप कॉर्नर –आनंदनगर- हिंगोली गेट -शहीद भगतसिंग मार्ग -बाफना -जुना मोंढा टॉवर–शिवाजीनगर- महात्मा फुले पुतळा ते डॉ. शंकरराव चव्‍हाण पेक्षागृह असा राहील. या रॅलीचा समारोप व राष्‍ट्रीय मतदार दिनाचे मुख्‍य कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्‍यात आले आहे. या राष्‍ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात जास्‍तीत जास्‍त नगरिकांनी / नव मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा‍ निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000



प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी ध्वजवंदनाचा
मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर
नांदेड, दि. 23 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार 26 जानेवारी 2019 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000


पुनर्वसनाच्या नागरी सुविधा विस्थापित
गावठाणाची कामे त्वरीत पूर्ण करावीत  
                     - उपाध्यक्ष माधव भांडारी

नांदेड, दि. 23:- पुनर्वसनाच्या नागरी सुविधा विस्थापित गावठाणाची कामे त्वरीत पूर्ण करावीत.  पुनर्वसनाच्या कामासाठी उपलब्ध असलेल्या निधीचा शासनस्तरावर जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानुसार मंत्रालय स्तरावर संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे कार्यवाही करण्याचे, निर्देश महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मुक्रमाबादचा स्वेच्छा पुनर्वसनासंबंधी अडचणीचे निराकरण करण्याबाबत मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष श्री. भांडारी यांनी केले.  
या बैठकीस आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार रोठाड, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, लेंडी प्रकल्पचे कार्यकारी अभियंता रा. मा. देशमुख, संतुक हंबर्डे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.    
लेंडी प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये, प्रशासकीय मान्यता, राज्यनिहाय खर्चाचा वाटा, पाणी वापर व सिंचनक्षमता, प्रकल्पाची सद्यस्थिती, भूसंपादन, प्रकल्प पुनर्वसन सद्यस्थिती स्वच्छा पुनर्वसनाची आवश्यकता, मुक्रमाबाद व ईटग्याळ, गावठाणांतर्गत संपादीत करावयाचा घरांचा तपशिल, स्वेच्छा पुनर्वसन अनुदान देण्यासंबंधिची प्रस्तावित कार्यपध्दती, मुक्रमाबाद येथील मावेजा वाटप कार्यपध्दती, गावनिहाय वाढीव कुटूंबसंख्या निश्चितीची कार्यपध्दती, प्रमुख अडचणी व उपाय, कामाचे नियोजन व आवश्यक निधी आदि विविध विषयांची माहिती सादरीकरणाद्वारे कार्यकारी अभियंता रा. मा. देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुर्नर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली. 
0000

Tuesday, January 22, 2019


पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्यावतीने नांदेड येथे
उद्या माध्यम कार्यशाळेचे (वार्तालाप) आयोजन
नांदेड दि. 23 :- पत्र सूचना कार्यालय मुंबईच्यावतीने नांदेड येथे माध्यम कार्यशाळेचे (वार्तालाप) गुरुवार 24 जानेवारी 2019 रोजी आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्तालाप कार्यक्रमात मान्यवर विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधतील.  
या कार्यशाळेचे उद्‌घाटन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता हॉटेल चंद्रलोक, हिंगोली रोड, नांदेड येथे करण्यात येईल. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, दै. प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, नांदेड डाक विभागाचे अधीक्षक एस. बी. लिंगायत, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर आदि मान्यवर पत्रकारांशी संवाद साधतील. या कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी कार्यक्रमस्थळी सकाळी 10 वाजेपर्यंत नोंदणी करावी.
000000


दरेसरसम साठवण तलावाचे महत्व पटवून
काम सुरु करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
            नांदेड दि. 22 :-  दरेसरसम साठवण तलावाच्या कामाबाबत सर्व संबंधित यंत्रणेने  कार्यक्षेत्रावर जाऊन ग्रामस्थ व संबंधीत शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन या तलावाच्या कामाचे महत्व पटवून, काम सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्देश दिले. याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.     
            जिल्हयातील हिमायतनगर तालूक्यातील दरेसरसम गावाजवळ स्थानिक नाल्यावर दरेसरसम साठवण तलाव बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे 2.510 द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण होणार असून सिंचन क्षमता 258 हेक्टर आहे. धरणाच्या खालील बाजूस तीन साखळी बंधारे प्रस्तावित असून त्यातून बारमाही सिंचनाचा लाभ दरेसरसम व आंदेगावतील शेतीला होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमाचा सूटून परिसरातील विहीरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढणार आहे.
            प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया 2007 च्या शिघ्रगणकावर आधारीत मूल्यांकणानुसार सन 2011 मध्ये मोबदला अदायगी करुन खरेदीखत करुन घेण्यात आले. आज रोजी या जमिनीचा शासनाचे नावे सातबारा आहे. मावेजाची रक्कम मान्य नसल्यामूळे संबधित बाधीत शेतक-यांनी प्रकल्पाचे कामकाज 2012 मध्ये बंद पाडले होते. त्यांच्या मागणीनूसार 2007 ते 2011 च्या शिघ्रगणकाच्या मूल्यांकणातील फरकाची रक्कम विशेष बाब म्हणून नियामक मंडळाकडून मंजूर करुन त्याबाबतचे धनादेश सदर शेतक-यांना 3 जून 2018 पासून वाटप करण्यात आले. त्यानंतर शेतक-यांच्या सहमतीने प्रकल्पाचे काम चालू करण्यात आले.
            धरणासाठी आवश्यक पूच्छ कालवा, संरक्षक बांध साठी आावश्यक 11.54 हेक्टर जमीनीची भूसंपादन प्रक्रिया सन 2018 मध्ये सुरू झाल्यामूळे त्यास भुसंपादन कायदा 2013 अन्वये 2018 च्या शिघ्रगण्कानुसार दर देण्यात आले आहे. हे दर पूर्वी संपादीत जमिनीस लागू करणे नियमबाहृय असताना या चालू दराने मावेजा मिळावा यासाठी काही शेतक-यांनी मागणी उचलून धरली.
            या प्रकल्पाचे काम सुरळीत सूरु असताना अंदाजे 50 ते 60 शेतक-यांच्या जमावाने 28 डिसेंबर 2018 रोजी व त्यानंतर पुन्हा 2 जानेवारी 2019 रोजी प्रकल्प स्थळावर येऊन काम बंद पाडले. याबाबत जलसंपदा विभागाने 3 जानेवारी 2019 रोजी पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे कामात बाधा आणणाऱ्यांवर तक्रार दाखल केली.
            बैठकीस अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, उपविभागीय पोलीस आधिकारी ए. बी. देशपांडे, हिमायतनगरचे तहसीलदार आशिषकुमार बिरादार, उपविभागीय अभियंता ए. के. कलवले, पोलीस निरीक्षक श्री. बोरसे, जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक पी. जी. देशपांडे, हिमायतनगर गटविकास आधिकारी श्री. मांजरमकर यांच्यासह संबंधीत गावाचे सरपंच, तलाठी व ग्रामसेवक आदी उपस्थित होते.            
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...