Wednesday, June 27, 2018


शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून
महाविद्यालयांनी शुल्क वसुली करु नये
नांदेड, दि. 27 :- ई-स्कॉलरशिप प्रणाली अंतर्गत शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी  योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क वसुली केली जाणार नाही याची महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज अद्याप महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत अशा विद्यार्थ्यांचे अर्ज विनाविलंब समाज कल्याण कार्यालयास सादर करण्याबाबत महाविद्यालयांनी योग्य कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या www.mahaeschol.maharashra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे संबंधीत महाविद्यालयास सादर करणे आवश्यक आहे. सुधारीत शासन निर्णय 17 मे 2018 अन्वये निर्वाह भत्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिक्षण फी व इतर फी ची रक्कम थेट महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काही महाविद्यालय सक्तीने शुल्क आकारत असल्याबाबत विद्यार्थ्यांमार्फत तक्रारी प्राप्त झाल्या असून भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी परीक्षा फी योजनेअंतर्गत शासन निर्णय दि. 1 नोव्हेबर 2003 अन्वये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सक्तीने शुल्क वसुल करणाऱ्या महाविद्यालयाविरूध्द कठोर स्वरूपाची कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय क्र. इबीसी-2003/प्र.क्र. 301/मावक-2 दि. 1 नोव्हेंबर 2003 अन्वये सविस्तर सुचना दिल्या आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

Tuesday, June 26, 2018

कृषि विभागाच्यावतीने
1 जुलै रोजी कृषि दिनाचे आयोजन
        नांदेड , दि. 26:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त कृषि विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कै . यशवंतराव चव्हाण सभागृह , जिल्हा परिषद, नांदेड येथे दिनांक 1 जुलै, 2018 रोजी सकाळी 11- 00 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            तरी या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
****
सामाजिक न्यायासाठी प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव असावी
-- प्रा.किरण सगर
नांदेड दि. २६:- दिनदुबळ्या व वंचित घटकांच्या सामाजिक न्यायासाठी प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस व मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर यांनी केले आहे. 
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवनात आयोजित राजर्षी शाहू महाराज यांच्या 144 व्या जयंती निमित्त व्याख्यान प्रसंगी प्रा. सगर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाज कल्याण उपायुक्त शेख जलील हे होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, बापू दासरी , रामचंद्र देठे यांची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा पाया रचला असे सांगून प्रा.किरण सगर पुढे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज कृतीशील विचारवंत असल्याने त्यांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षण जाहीर केले, त्यामुळे त्यांच्यावर टिकाही झाली. जातीनिहाय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली, घोड्याच्या तबेल्यात जसे सशक्त घोडे दुर्बल घोड्याना चारा खाऊ देत नाहीत तशीच स्थिती बहुजन समाजातील उपेक्षित घटकांची झाली होती हे चित्र राजर्षी शाहूनी बदलून दाखवले होते, या उपेक्षित समाजासाठी त्यांनी उन्नतीच्या योजना राबवल्या. 
राजर्षी शाहू महाराजांच्या राजवटीत शेतकरी सुखी होता, तो आत्महत्या करत नव्हता, समाजाचे हक्क व कर्तव्याप्रती योग्य समुपदेशन झाले पाहिजे, सद्सदविवेक पध्दतीने न्याय मिळवता आला पाहिजे असेही ते म्हणाले.
अध्यक्षपदावरून बोलतांना समाज कल्याण उपायुक्त शेख जलील म्हणाले की,  शासनाकडून आवश्यक त्या योजना राबवून सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जात असून राजर्षी शाहू महारांजाचे विचार अंमलात आणले जात आहेत 
समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी प्रास्ताविकात राजर्षी शाहू महाराजांवर प्रकाश टाकून व्याखानाचा विषय "राजर्षी शाहू महाराज  यांचा शैक्षणिक व समतावादी दृष्टिकोण " हा असल्याचे सांगितले.
जयंती निमित्त आयोजित निबंध आणि वक्तत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली.
प्रारंभी दीप प्रज्वलित करून महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन बापू दासरी यांनी केले, व्याखानास शहरातील नागरिक, विद्यार्थी, समतादूत उपस्थित होते. 
****
मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथे आयोजन
नांदेड, दि. 26:- मा. मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांच्यावतीने व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायाधीश तथा अध्यक्ष प्रमुख जिल्हा श्री. एस. पी. कुलकर्णी यांचे आदेशान्वये दि. 26 जुन 2018 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अध्यक्षास्थानी न्या.श्री. डी. टी. वसावे हे होते.
न्या.श्री. डी. टी. वसावे अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, प्रत्येकाने आपले प्रकरण मध्यस्थी व तडजोड करणे महत्वाचे आहे, कारण कोर्टामध्ये प्रकरणांसाठी वेळ व पैसा जात असतो. त्यासाठी मध्यस्थीने वाद मोकळया मनाने मिटविण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर आपले आयष्य भांडणात जाईल.
जो माणुस माफ करतो, तोच मोठा होतो. मध्यस्थीसाठी जे प्रकरण तडजोड करण्यासाठी येतात त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत करण्याचे आश्वासनही दिले. तसेच पक्षकारानी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या व त्यांच्या शंकाचे निरसन न्या. वसावे यांनी केले.
दिनांक 14 जुलै 2018 रोजी होणऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त तडजोड पात्र प्रकरणे
मध्यस्थीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच लोकअदालतीच्या पॅनलवर काम करीत असतांना नियमांचे, वेळेचे पालन करणे आवश्यक आहे. पॅनल सदस्यांनी वेळेवर हजर राहुन लोकअदालत यशस्वी करण्यात सहकार्य करणे आवश्यक आहे.
यावेळी न्यायाधीश श्री. डी. टी. वसावे यांनी सहयोग योजनेबाबत उपस्थित विधीज्ञांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण केले. तसेच विधी सेवा प्राधिकरणतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरजू घटकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपल्या हातून समाजसेवा करण्याची ही एक संधी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी विधीज्ञ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे कर्मचारी उपस्थित होते.
****


Monday, June 25, 2018



राजर्षी शाहु महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
समता दिंडीस उत्स्फुर्त सहभाग
नांदेड, दि. 25 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या 144 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने " समता दिंडी "चे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला व राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
समाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकणारा चित्ररथ आणि सामाजिक न्याय बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या घोषणांमुळे दिंडी लक्षवेधी ठरली. या दिंडीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, तसेच विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते आय.टी.आय. नांदेड येथून समता दिंडीची सुरुवात करण्यात आली. समता दिंडीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आला.  
यावेळी समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशोक गोडबोले , शिक्षणाधिकारी (माध्य) अशोक देवकरे, समता दूतचे प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदिंची यावेळी उपस्थिती होती.
*****

क्रीडा प्रबोधिनी सरळ प्रवेश आणि
 क्रीडा कौशल्य चाचणी (फुटबॉल-मुली) आयोजन 
नांदेड, दि. 25 :- राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत मुलींना फुटबॉल खेळासाठी क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे प्रवेश देण्याकरीता सरळ प्रवेश प्रक्रीया व खेळ निहाय कौशल्य चाचण्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील जास्तीतजास्त फुटबॉल (मुली) खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार  यांनी केले आहे.
सरळ प्रवेशाकरीता पात्रता पुढील प्रमाणे आहे. राज्यस्तरावर पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरसहभाग असलेल्या खेळाडूंची सबंधीत खेळाच्या अधिकृत कौशल्य चाचणीद्वारे गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाणार आहे. वयोमर्यादा 19 वर्षे. 
क्रीडा कौशल्य चाचणी पात्रता- राज्यस्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंची सबंधित खेळाच्या अधिकृत कौशल्य चाचणीद्वारे गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाणार आहे.वयोमर्यादा 19 वर्षे. 
खेळाडुची उपस्थिती :-27 जून 2018 रोजी सायं 5 वाजेपर्यंत, वसतिगृह शिवछत्रपती क्रीडा   संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे. खेळाडूंची निवास व्यवस्था- क वसतिगृह वसतिगृह शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे. फुटबॉल सरळ प्रवेश चाचणी तसेच फुटबॉल कौशल्य चाचणी व प्रवेश चाचणी- 28 जून 2018 मुख्य स्टेडीयम, शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे  बालेवाडी येथे होईल असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 00000

सामाजिक न्याय दिनानिमित्त
समता दिंडी व कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, दि. 25 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून जिल्हा, तालुका व गाव पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्याकडून जिल्हास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासून आयटीआय नांदेड येथून समता दिंडीची सुरुवात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथे समता दिंडीचा समारोप होईल. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
या कार्यक्रमास प्रा. डॉ. किरण सगर, प्रख्यात विचारवंत व उपाध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली आहे. 
0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...