Tuesday, September 29, 2026

वृत्त क्रमांक 

सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलक व भाषणांवर निर्बंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये नांदेड जिल्हा हद्दीत काही निर्बंध लागू केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा केली असून, घोषणेच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पक्षांची चित्रे अथवा चिन्हे असलेले कापडी फलक लावणे तसेच सार्वजनिक ठिकाणी भाषणे देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी निवडणूक कालावधीत नांदेड जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत करण्यात येणार आहे. संबंधितांना स्वतंत्र नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163(2) अन्वये हा एकतर्फी आदेश जारी करण्यात आला आहे.

हा आदेश 23 सप्टेंबर 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून, आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. नागरिक, राजकीय पक्ष, उमेदवार व संबंधितांनी या आदेशाचे पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

***

वृत्त क्रमांक 

धार्मिक स्थळे, रुग्णालये व शैक्षणिक संस्थांजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा केली असून, त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार, निवडणूक कालावधीत धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सर्व संबंधितांना स्वतंत्र नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश काढण्यात आला आहे.

हा आदेश नांदेड जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत लागू असून, आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

**

वृत्त क्रमांक 

निवडणूक प्रचाराच्या वाहनांवरील झेंडे व कापडी फलकांसाठी निर्बंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा 22 सप्टेंबर 2026 रोजी केली असून, त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी नांदेड जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवरील पक्ष प्रचाराचे झेंडे व कापडी फलक लावण्याबाबत जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध घातले आहेत.

या आदेशानुसार, फिरत्या प्रचार वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूस, विंडस्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही, तसेच वाहनाच्या टपापासून दोन फुटांपेक्षा अधिक उंचीवर राहणार नाही.

प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे, वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूसच लावता येईल. वाहनाच्या इतर कोणत्याही बाजूस कापडी फलक लावता येणार नाही.

तसेच, फिरत्या वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार किंवा उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही.

सर्व संबंधितांना पूर्वसूचना देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 (2) अन्वये हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

हा आदेश नांदेड जिल्ह्यात निर्गमनाच्या तारखेपासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. 

**

वृत्त क्रमांक 

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक वाहनांच्या वापरास प्रतिबंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कोणत्याही वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक मोटारगाड्या अथवा वाहनांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार, कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या अथवा वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात निवडणूक कालावधीत तीनपेक्षा अधिक मोटारगाड्या अथवा वाहनांचा ताफा वापरण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये जारी केला आहे.

या आदेशानुसार, निवडणूक कालावधीत कोणत्याही वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या अथवा वाहने वापरता येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी हा निर्बंध लागू करण्यात आला आहे.

हा आदेश 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 च्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत लागू राहणार आहे. आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत त्याची अंमलबजावणी राहणार आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधितांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

**

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात शासकीय कार्यालये, विश्रामगृह परिसरात मोर्चा, सभा व निवडणूक प्रचारास निर्बंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालये तसेच विश्रामगृहांच्या परिसरात विविध कार्यक्रमांवर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी जारी केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्याग्रह करणे तसेच धरणे आंदोलन करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

हा आदेश 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 च्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत लागू राहणार आहे. आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आदेशाची अंमलबजावणी राहणार आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधित नागरिक, राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते तसेच इतर संबंधितांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

**

वृत्त क्रमांक 

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्यात निवडणूक कालावधीत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाच्या वापरावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये जारी केले आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरही 22 सप्टेंबर 2026 रोजी पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

या आदेशानुसार, कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष अथवा पक्षाचा कार्यकर्ता सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करू शकणार नाही. तसेच फिरत्या वाहनांवरही ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या संबंधित शासन निर्णयानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर ध्वनिप्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत ठेवून करणे आवश्यक राहील. त्यानुसार सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही.

निवडणूक कालावधीत ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये तसेच निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी संबंधितांनी आदेशाचे पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हा आदेश 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील हद्दीसाठी लागू आहे. आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आदेशाची अंमलबजावणी राहणार आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिक, राजकीय पक्ष, उमेदवार, संस्था आणि संबंधितांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाच्या वापराबाबतच्या या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

**

वृत्त क्रमांक 

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 

नांदेड जिल्ह्यात शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांचा वापर नियंत्रित

नांदेड (जिमाका), दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांचा वापर नियंत्रित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांचा वापर नियंत्रित करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशानुसार, शासकीय व निवडणुकीच्या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस संबंधित विभागाची अधिकृत परवानगी अथवा सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय नांदेड जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांमध्ये प्रवेश करता येणार नाही. संबंधित विभागाच्या परवानगीशिवाय विश्रामगृहांचा वापर करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

हा आदेश नांदेड जिल्ह्यात आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधितांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

**

वृत्त क्रमांक   महाराष्ट्रात ‘राज्य वैरण विकास धोरण’ लागू चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय नांदेड (जिमाका), दि. 29 : ...