वृत्त क्रमांक
एकही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेची जनजागृती करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
·
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
·
30
सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. 2 सप्टेंबर : जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तसेच नागरिकांनी विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेची व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली असून प्रारूप मतदार यादी तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची (ASDD) यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nanded.nic.in या जिल्हा संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, वय, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. मतदारांना voters.eci.gov.in किंवा ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे नाव तपासता येईल. याशिवाय 1950 या वोटर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अथवा एसएमएसद्वारेही माहिती घेता येणार आहे. प्रारूप मतदार यादीबाबत 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून त्यावर सुनावणी व निपटारा 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.
1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनी नवमतदार म्हणून नोंदणीसाठी नमुना 6 अर्ज घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. मतदार यादीतील नावाला हरकत अथवा नाव वगळण्यासाठी नमुना 7, तर नाव, वय, पत्ता आदी तपशीलात दुरुस्ती, अपंगत्वाचे चिन्हांकन किंवा मतदारसंघातील पत्ता स्थलांतरासाठी नमुना 8 अर्जाचा वापर करावा. परदेशी भारतीय मतदारांच्या नोंदणीसाठी नमुना 6-अ अर्जाचा वापर करता येईल. पात्र मतदाराचे नाव वगळले असल्यास किंवा मतदार यादीतील तपशीलात त्रुटी असल्यास संबंधित बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी अथवा उपलब्ध ऑनलाइन माध्यमातून 30 सप्टेंबर 2026 पूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
नाव, वय अथवा इतर तपशीलांतील विसंगती किंवा अनमॅपिंगबाबत मतदार
नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीच्या वेळी
जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. जन्म प्रमाणपत्र,
पारपत्र, मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र,
जात प्रमाणपत्र, शासकीय अथवा सार्वजनिक
उपक्रमांचे ओळखपत्र, निवृत्तीवेतन आदेश, कुटुंब नोंदवही, जमीन अथवा घर वाटप प्रमाणपत्र आदी
कागदपत्रे आयोगाच्या निर्देशानुसार ग्राह्य धरली जातील. मतदार यादीच्या अनुषंगाने
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे,
तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक
अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करता येईल,
अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिली.
***

No comments:
Post a Comment