Wednesday, September 2, 2026

 वृत्त क्रमांक 

डीजेमुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू या  : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड (जिमाका), दि. 2 सप्टेंबर : गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव एकत्रित येत असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी परस्पर सौहार्द, शांतता व सर्वधर्मसमभाव राखून सण साजरे करावेत. नांदेड जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण संरक्षणाचा वेगळा संदेश द्यावा, तसेच गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे गणेशोत्सव, दहीहंडी, पोळा व इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. 

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,  मनपा अपर आयुक्त गिरीश कदम, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी गणेशोत्सव काळात कोणालाही त्रास होणार नाही याची मंडळांनी दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करता डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. नदीच्या वाहत्या प्रवाहात गणेशमूर्तींचे विसर्जन न करता कृत्रिम तलावांचा वापर करावा. घरगुती गणेशमूर्तींचे घरोघरी संकलन करण्याबाबतही प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. उत्सव काळातील नागरिक व गणेश मंडळांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने व्हॉट्सॲपग्रुप तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार अमर राजूरकर यांनी शहरात अधिकाधिक कृत्रिम तलावांची निर्मिती करून डीजेमुक्त व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. महापौर कविता मुळे यांनी इको फ्रेंडली गणपती बसवून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. 

नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये : पोलीस अधीक्षक

गणेशोत्सव शांततेत व सर्वधर्मसमभावाने पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील संदेश व पोस्टची सत्यता पडताळून पाहावी. उत्सव काळात कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही नागरिकाने कायदा हातात घेऊ नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही व आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

विसर्जनासाठी आवश्यक तयारी पूर्ण : मनपा अपर आयुक्त

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्यावतीने आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावरील अडचणी दूर करण्यासह विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य व प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी व्यवस्था, पथदिवे, विद्युत रोषणाई तसेच विसर्जनावेळी क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मनपा अपर आयुक्त गिरीश कदम यांनी दिली.

यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव व दहीहंडीच्या अनुषंगाने विविध अडचणी व सूचना मांडल्या. या अडचणींचे योग्य नियोजन करून निराकरण करण्यात येईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. सण-उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता समितीचे सदस्य, सामाजिक नेते आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

**




No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   डीजेमुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू या  : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड (जिमाका), दि. 2 सप्टेंबर : गणेशोत्सव व ...