वृत्त क्रमांक
मागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य; 262 लाभार्थ्यांची निवड
• आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव 30 सप्टेंबरपर्यंत सादर करावेत
नांदेड (जिमाका), दि. 22 : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या वतीने जिल्हा परिषद स्वउत्पन्न निधीतील 20 टक्के सेस (मागास कल्याण निधी), सन 2025-26 अंतर्गत मागासवर्गीय महिला व पुरुषांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त पात्र अर्जांमधून ऑनलाईन लकी ड्रॉद्वारे 137 पुरुष व 125 महिला, अशा एकूण 262 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्ह्यातील 16 गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. लाभार्थ्यांसाठी अर्जाचा नमुनाही उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यामध्ये योजनेच्या अटी व शर्ती तसेच अर्जासोबत जोडावयाच्या आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून, अर्जाच्या नमुन्यात नमूद केल्यानुसार सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव सादर करावा. संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या स्वाक्षरीसह पूर्ण प्रस्ताव दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment