वृत्त क्रमांक
हरभरा, ज्वारी, करडई, मका पीक प्रात्यक्षिकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
• शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना संधी
• महाडीबीटीच्या ‘प्रात्यक्षिक’ टाईलवर अर्ज करता येणार; प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
नांदेड (जिमाका), दि. 22 : कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान-पौष्टिक तृणधान्य, भरडधान्य (मका) आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिक घटकाचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांकडून महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अन्नधान्य, गळीतधान्य, तृणधान्य आणि कडधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे, जैविक खते, कीटकनाशके, बीजप्रक्रिया औषधे आदी निविष्ठांचा लाभ देऊन 10 हेक्टर (25 एकर) क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांना सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे.
रब्बी हंगाम २०२६-२७ साठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर ‘प्रात्यक्षिक’ या टाईलअंतर्गत अर्ज करता येणार आहे.
पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच सहकारी संस्था जवळच्या सेतू केंद्र, सीएससी केंद्र किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्जांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार असल्याने पात्र संस्थांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे कृषी विभागाने कळविले आहे.
मागील दोन वर्षांत पीक प्रात्यक्षिक योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी अथवा संस्थेची यावर्षीच्या लाभासाठी निवड करण्यात येणार नाही. तसेच शेतकरी गट किंवा कंपनीमधील केवळ फार्मर आयडी असलेले शेतकरी सदस्यच लाभासाठी पात्र असणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी पीक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment