Wednesday, September 6, 2017

निराधार योजनेच्या लाभार्थ्‍यांचे बँक खाते
काढण्‍यासाठी लोहा तहसिल कार्यालयात शिबीर
नांदेड दि. 6 :- लोहा तालुक्‍यातील संजय गांधी निराधार योजनेतील ज्‍या लाभार्थ्‍यांनी आयसीआयसीआय बँकेत खाते काढले नाही, त्या लाभार्थ्‍यांचे बँक खाते काढण्‍यासाठी 7 व 8 सप्‍टेंबर 2017 रोजी लोहा तहसिल कार्यालय येथे शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे.
      लोहा तालुक्‍यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृती वेतन योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना आयसीआयसीआय बँकेमार्फत दरमहा  600 रुपये या प्रमाणे अनुदान वाटप केले जाते. काही लाभार्थ्‍यांनी आयसीआयसीआय बँकेचे खाते काढले नाही, अशा लाभार्थ्‍यांचे बँक खाते काढण्‍यासाठी आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी तहसिल कार्यालय लोहा येथे दिनांक 7 व 8 सप्‍टेंबर रोजी येणार आहेत. ज्‍या लाभार्थ्‍यांचे बँक खाते अद्याप काढले नाहीत तसेच 29 ऑगस्ट रोजी मंजूर लाभार्थ्‍यांनी त्‍यांचे बँक खाते काढण्‍यासाठी आधार कार्ड, फोटो असल्‍यास घेऊन तहसिल कार्यालय लोहा येथे या दोन दिवसीय कॅम्‍पमध्‍ये कार्यालयीन वेळेत उपस्‍थीत राहुन बँकेच्‍या प्रतिनिधीकडून बँक खाते काढून घ्‍यावे, असे आवाहन तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी केले आहे.

00000
दिव्यांग लाभार्थ्यांची रक्कम बँकेत जमा
नांदेड, दि. 6 :-  जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था 3 टक्के अपंग कल्याण निधी 100 दिव्यांग पात्र लाभार्थ्यांची रक्कम त्यांच्या वैयक्तीक बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची यादी जिल्हा समाज कल्याण कार्यालय जि. प. नांदेड येथे लावण्यात आली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी संबंधीत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
शासकीय अध्यापक महाविद्यालयात
शिक्षक दिन संपन्न
नांदेड, दि. 6 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे या होत्या. यावेळी प्रा. डॉ. सुलभा मुळे यांनी मार्गदर्शन केले तर निता मोरे,  सातभाई, श्री. कदम, दिपक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. सुत्रसंचालन सारिका गायकवाड यांनी केले.

00000

Tuesday, September 5, 2017

वस्तु व सेवाकर अधिनियमांतर्गत
शुक्रवारी जिल्हा परिषदेत कार्यशाळा
नांदेड, दि. 5 :- वस्तु व सेवाकर अधिनियम 2017 अंतर्गत कपाती संदर्भातील कार्यशाळा शुक्रवार 8 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 वा. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अहरण व संवितरण अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

00000
जिल्ह्यातील हातमाग विणकराची माग तपासणी   
नांदेड, दि. 5 :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत हातमाग विणकरांना अर्थसहाय्य दिले आहे. या सहकारी संस्था चालू अथवा बंद आहेत याबाबत आढावा घेण्याच्या अनुषंगाने सन 2017-18 साठी जिल्ह्यातील हातमाग विणकरांची माग तपासणी 4 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर या कालावधीत करण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी कळविले आहे.
 हातमाग विणकाराची माग तपासणी करण्यासंबंधी संचालक, (वस्त्रोद्योग), नागपुर यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार या संस्थांची माग तपासणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी नियुक्त केलेल्या पथकामार्फत करण्यात येणार आहे. जिल्हयातील सबंधित सर्व हातमाग सहकारी संस्थांनी याची नोंद घेऊन तपासणी पथकास सहकार्य करावे. तसेच अधीक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांचे कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02462-284886 वर अथवा प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड  यांनी केले आहे.

000000

Monday, September 4, 2017

नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक
पातळीवरच निराकरण करावे
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 4 :- नागरिकांना तक्रारींचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनामध्ये यावे लागू नये यासाठी त्यांचे तक्रारीचे स्थानिक पातळीवरच संबंधीत अधिकाऱ्यांने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, कृषि उपसंचालक सौ. एम. आर. सोनवणे, जिल्हा अग्रणी बँकेचे दिलीप शिरपुरकर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. डोंगरे म्हणाले की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये नागरिकांना सातत्याने यावे लागू नये यासाठी तालुका किंवा स्थानिक पातळीवर त्यांचे तक्रारीचे निराकरण झाले पाहिजे. "आपले सरकार" वेबपोर्टल अधिकाऱ्यांनी नियमित पहावे. त्यावर दाखल तक्रारीचे अधिकाऱ्यांनी त्वरीत निराकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या लोकशाही दिनी दाखल नागरिकांचे अर्ज, निवेदनावर प्रत्यक्ष चर्चा करुन संबंधीत अधिकाऱ्यांना अनुषंगीक कार्यवाही करण्यासंबंधी निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.
000000


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या
पूर्वतयारीची आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 4 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 69 वा वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात आयोजित बैठकीत सर्व संबंधीत अधिकाऱ्यांकडून घेतला.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, तसेच क्रीडा, शिक्षण, पोलीस, मनपा, सार्वजनिक बांधकाम, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 69 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम 17 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील हुतात्मा स्मारकाजवळ करण्यात येणार आहे. सर्व विभागांना नेमुन देण्यात आलेली कामे यशस्वीपणे व जबाबदारीने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.

भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लॉस्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या.
000000  

वृत्त क्रमांक   जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी  नांदेड (जिमाका), दि. 17 : जिल्‍हाधिकारी कार्य...