Monday, May 6, 2019

प्रलंबीत करातील जुन्या थकबाकीतून
मुक्तीसाठी तडजोड कायदा  
नांदेड, दि. 6 :- मुंबई विक्रीकर कायदा 1959 व महाराष्ट्र मुल्यवर्धित कर कायदा 2005 तसेच विक्रीकर विभागामार्फत राबविण्यात जाणाऱ्या विविध कायद्यांतर्गत प्रलंबीत कर, व्याज, दंड तसेच प्रलंबीत लेट फी यांचा ठरावीक प्रमाणात भरणा केल्यास उर्वरीत रक्कम तडजोड कायद्याअंतर्गत माफ करुन घेण्याची संधी महाराष्ट्र शासनाने सर्व नोंदीत व अनोंदीत व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.
यात प्रमुख दोन टप्पे असून पहिला टप्पा एप्रिल 2019 ते जून 2019 पर्यंत व दुसरा जुलै 2019 असून यामध्ये प्रलंबीत थकबाकीपैकी आवश्यक असणाऱ्या विवादीत कर, व्याज व दंडाची ठरावीक रक्कम भरणा करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास व्यापाऱ्यांना मोठा लाभ मिळून जुन्या वसुलीबाबत सुटकारा मिळू शकतो.
विवादीत कर व दंडासाठी वैधानिक आदेशाविरुद्ध अपिल दाखल केलेली असेल किंवा नसेल तरीही निर्धारीत रकमेचा भरणा करुन या योजनेचा लाभ घेता येतो. वैधानिक आदेश जरी पारीत नसले तरीही व्यापारी स्वयंनिर्धारण करुन अविवादीत व विवादीत रक्कम भरल्यास काही प्रमाणात विवादित एकूण व्याज व दंडाच्या रक्कमेत सेटलमेंट कायद्यांच्या तरतुदीप्रमाणे सवलतीचा लाभ घेऊ शकतो. अपिलामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या प्रकरणामध्ये अविवादित व विवादीत रक्कमेत व्याज, दंडा काही प्रमाणात भरल्यास 2009-10 व पुर्वीच्या आर्थिक वर्षाची प्रलंबित थकबाकी असल्यास ज्यादा सवलत कायद्यामध्ये अंतर्भूत आहे. एप्रिल 2010 नंतरच्या कालावधीसाठी तुलनेने कमी सवलत आहे.
1 जुलै ते 30 जुलै या कालावधीत अविवादित व विवादीत रकमेचा भरणा करुन अर्ज केल्यास मिळणारी सवलत ही पहिल्या चरणापेक्षा कमी असल्याने सर्व व्यापाऱ्यांना पहिल्या म्हणजेच 30 जून 2019 च्या आत अत्यावश्यक रकमेचा भरणा करुन त्वरीत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
जीएसटी विभागाची अधिकृत वेबसाईट mahagst.gov.in मधील whats new वर या कायद्याची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची पद्धत सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.
जीएसटी भवन माझगाव तसेच राज्यातील सर्व जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योजनेबाबत माहिती तसेच ऑनलाईन पद्धीने अर्ज करण्यासंदर्भात व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश राज्यकर आयुक्त राजीव जलोटा यांनी दिले आहेत. या तडजोड कायद्यातील तरतुदी विषयी काही अडचणी सुचना व प्रश्न असल्यास vatamnesty2019@gmail.com या मेलवर विचारण्यात याव्यात अथवा नजीकच्या जीएसटी कार्यालयास भेट दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000

हिमायतनगर, धर्माबाद येथील
परिवहन कार्यालयाच्या मासिक शिबिराच्या तारखेत बदल
नांदेड, दि. 6 :- दरमहा आयोजित होणारे नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मासिक शिबीर तांत्रिक अडचणीमुळे हिमायतनगर येथील 17 मे 2019 ऐवजी गुरुवार 16 मे 2019 रोजी तर धर्माबाद येथील 16 मे 2019 ऐवजी शुक्रवार 17 मे 2019 रोजी होणार आहे. याबाबत हिमायतनगर व धर्माबाद तालुक्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 6 :- वेतन पडताळणी पथकाचा मे 2019 चा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे.
हे पथक नांदेड जिल्ह्यातील शासकीय सेवकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी 8 मे 2019 ते 10 मे 2019 या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे वेतन पडताळणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
00000

Tuesday, April 30, 2019

महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ उत्साहात संपन्न
संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न केलेल्या
हुतात्म्यांना वंदन करणारा दिवस
-         पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 1 :- संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक हुतात्म्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांचे आपण ऋणी असून या हुतात्म्यांना वंदन करणारा हा दिवस आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलन आणि उत्साहात समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुत्याळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी आर. के. परदेशी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती. 
ध्वजवंदनानंतर आपल्या शुभेच्छापर संदेशात पालकमंत्री श्री कदम म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस असून 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली. भाषावाद, प्रांतरचना झाल्यानंतर गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्य वेगळी झाली. देशात जवळपास 29 राज्य अशी भाषावाद, प्रांतरचनेनुसार स्थापन झालीत. राज्याच्या सिमेवरील अनेक मराठी बांधव आजही संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी सातत्याने मागणी करत असून निश्चितपणे मराठी बांधवांना न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.  
आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगारांना त्यांचे न्याय हक्क सन 1889 ला मिळाले आणि त्या दिवसापासून जवळपास 100 देशात हा कामगार दिवस साजरा केला जातो, असे सांगून त्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
समारंभात सुरवातीला पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री कदम यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील आणि सेकंड परेड कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक शहादेव पोकळे यांच्या नेतृत्वात राज्य राखीव पोलीस बल हिंगोली, सशस्त्र पोलीस पथक नांदेड प्लाटूनसह, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, सशस्त्र पोलीस पथक साधना प्रशिक्षण विभाग नांदेड,  शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, मिनी रेस्क्यू फायर टेंडर संचलनात सहभागी झाले.
पालकमंत्री रामदास कदम यांचे हस्ते अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात आदर्श तलाठी पुरस्कार मनोजकुमार जाधव (तलाठी सज्जा हातणी ता. लोहा), पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेतील पोलीस महासंचालक यांनी सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी, कर्मचारी नांदेड ग्रामीणचे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चॉदखान जब्बार खान, चालक दहशतवाद विरोधी पथकाचे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्रसिंघ हिरासिंघ, वाचक शाखेचे पोलीस हवलदार वामन कोकाटे, पोलीस स्टेशन अर्धापुरचे नईमखान मैनोद्यीन खान, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे मिर्झा ईब्राहिम बेग, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे नथू भोसले, दशहतवाद विरोधी पथकाचे महम्मद तय्यब म. अब्बास, काझी महम्मद अदिलोद्यीन, गुन्हे अन्वेषण विभागाचे संजय राखेवार, पो. स्टे. वजिराबादचे पोलीस नायक उमाकांत दामेकर, दहशतवाद विरोधी पथकाचे सतीश मुधोळकर, राज्य गुप्तवार्ताचे विलास शिंदे, नागरी हक्क संरक्षण विभागाचे महिला पोलीस नायक सविता केळगद्रे यांचा समावेश होता. त्यानंतर पालकमंत्री कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांनाही शुभेच्छा दिल्या. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
0000000

Monday, April 29, 2019


                        उष्मघातापासून बचाव करण्याचे उपाय

   लातूर,दि. 29 :-  तहान लागलेली नसली तरीसुध्‍दा जास्तीत जास्‍त पाणी पिण्‍यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत; बाहेर जातांना गॉगल्‍स, टोपी, छत्री/बुट व चपलाचा वापर करण्‍यात यावा, प्रवास करताना पाण्‍याची बाटली सोबत घ्‍यावी. उन्‍हात काम करीत असलेल्‍या व्‍यक्‍तींनी डोक्‍यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्‍यात यावा तसेच ओल्‍या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्‍यात यावा. शरीरातील पाण्‍याचा प्रमाण कमी होत असल्‍यास ओआरएस, घरी बनविण्‍यात आलेली लस्‍सी, तोरणी, लिंबू पाणी, ताख इत्‍यांदीचा नियमीत वापर करण्‍यात यावा.
           अशक्‍तपणा, स्‍थुलपणा, डोकेदुखी. सतत येणारा घाम इत्‍यादी उन्‍हाचा झटका बसण्‍याची चिन्‍हे ओळखावित व चक्‍कर येत असल्‍यास तात्‍काळ डॉक्‍टरांचा सल्‍ला घेण्‍यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्‍यात यावे. तसेच त्‍यांना पुरेसे पिण्‍याचे पाणी दयावे. घरे थंड ठेवण्‍यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्‍यात यावा. रात्री खिडक्‍या उघाडया ठेवण्‍यात याव्‍यात.  पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्‍यात यावा. तसेच थंड पाण्‍याने वेळोवेळी स्‍नान करण्‍यात यावे.  कामाच्‍या ठिकाणी जवळच थंड पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.
        सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्‍यासाठी कामगारांना सुचित करण्‍यात यावे.पहाटेच्‍या वेळी जास्‍तीत जास्‍त कामाचा निपटारा करण्‍यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्‍ये मध्‍ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्‍यात यावा. गरोदर, कामागार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्‍यात यावी. रस्‍ताच्‍या कडेला उन्‍हापासून संरक्षणाकरीता शेट उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्‍यात यावी.
काय करू नये –   
        लहान मुले किंवा पाळीव प्राण्‍यांना बंद असलेल्‍या व पार्क केलेल्‍या वाहनात ठेऊ नये.   दुपारी  १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. गडत, घटृ व जाड कपडे घालण्‍याचे टाळावे बाहेर तापमान अधिक असल्‍यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.
      उन्‍हाच्‍या कालावधीत स्‍वयंपाक करण्‍याचे टाळण्‍यात यावे. तसेच मोकळया हवेसाठी स्‍वयंपाक घराची दारे व खिडक्‍या उघडी ठेवण्‍यात यावी. आपल्‍या घराममध्‍ये, कामाच्‍या ठिकाणी अथवा इमारतीमधून बाहेर पडण्‍याचे मार्ग (Escape      Route) जाणून व समजून घ्‍या.आग लागल्‍यास’ लगेच अग्निशमन दलाला फोन (101) करा. जमिनीवर लोळून आग विझविण्‍याचा प्रयत्‍न करा.  आग लागलेल्‍या ठिकाणी असल्‍यास उभे न राहता गुडघ्‍याच्‍या मदतीने निकासा सरकावा.  तोंडावर ओला रुमाल/कपडा ठेवून धुरापासून दूर राहण्‍याचा प्रयत्‍न करा. 
        स्‍वयंपाक घरामध्‍ये विशेष काळजी घ्‍यावी. रात्री गॅस सिलेंडरचा रेग्‍युलेटर बंद करावा. दर सहा  महिन्‍यांनी गॅस नळी बदलावी, स्‍टोव्‍ह, मेणबत्‍ती इत्‍यादी ज्‍वालाग्रही वस्‍तू गॅसपासून दूर ठेवाव्‍यात. विजेच्‍या उपकरणांचा उपयोग करताना Amper ची तपासणी करावी व योग्‍य सॉकेटमध्‍ये वापर करावा. गोदामे, घरातील कोठीघर इत्‍यादी ठिकाणी कचरा तेलकट पदार्थ अथवा जळावू पदार्थ जमा करु नका, निकास मार्ग नेहमी अडथळे विरहित ठेवावे. आगीच्‍या वेळी शांत रहा, तसेच इतरांना शांत करा, आगीपासून विजेचे उपकरणे दूर ठेवा. छोटया आगी पासून संरक्षण करण्‍यासाठी पाणी व वाळूचे बकेट तयार करुन ठेवा.

****


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 29 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.  
दरवर्षी 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000


पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
नांदेड, दि. 29 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 30 एप्रिल 2019 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने रात्री 9.30 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
बुधवार 1 मे 2019 रोजी सकाळी 8 वा. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायत मैदान पोलिस मुख्यालय वजिराबाद नांदेड. सकाळी 10 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
000000

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...