Tuesday, September 15, 2026
वृत्त क्रमांक
कर्मचारी चयन आयोगाच्या परीक्षेसाठी नांदेडमधील दोन परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
नांदेड (जिमाका), दि. १५ : भारत सरकारच्या कर्मचारी चयन आयोगामार्फत (एसएससी) घेण्यात येणाऱ्या सलेक्शन पोस्ट फेज-XIV परीक्षेच्या अनुषंगाने नांदेड शहरातील दोन परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत आदेश जारी केला आहे.
सलेक्शन पोस्ट फेज -XIV परीक्षा दि. १६ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत, सुट्टीचे दिवस वगळून, सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, बाबानगर, नांदेड आणि वसंतराव नाईक महाविद्यालय, वसरणी, नांदेड ही परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
परीक्षा सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, तसेच परीक्षा केंद्र परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये, यासाठी दि. १६ ते २६ सप्टेंबरदरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, लॅपटॉप आदी तत्सम साहित्य जवळ बाळगणे, वापरणे किंवा परीक्षा केंद्रात नेण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
संबंधितांना स्वतंत्र नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये हा आदेश एकतर्फी स्वरूपात जारी करण्यात आला आहे.
****
वृत्त क्रमांक
कर्मचारी सर्वंकष माहितीकोष-२०२६ साठी शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन नोंदविण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. १५ : शासनाच्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-२०२६ तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेडमार्फत सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील तसेच आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची दि. १ जुलै २०२६ हा संदर्भ दिनांक धरून माहिती ऑनलाइन आज्ञावलीत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या माहितीकोषासाठी नियमित, नियमितेतर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी तसेच तदर्थ तत्त्वावर कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. यासाठी https://mahaces.maharashtra.
ऑनलाइन माहिती नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-१ जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्वीकारली जाणार नाहीत, याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागार कार्यालयात सादर होत नाहीत, अशा कार्यालयांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांची तसेच रिक्त पदांची माहिती ऑनलाइन आज्ञावलीद्वारे नोंदविणे आवश्यक आहे.
कर्मचारी सर्वंकष माहितीकोष-२०२६ साठी आवश्यक माहिती विहित पद्धतीने ऑनलाइन नोंदवावी. अधिक माहितीसाठी उपआयुक्त, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड
दूरध्वनी : ०२४६२-२५२७७५
ई-मेल : dso.nanded88@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त अर्जुन झाडे, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड यांनी केले आहे.
****
वृत्त क्रमांक
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा
नांदेड (जिमाका), दि. १५ : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे दि. १८ व १९ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.५५ वाजता पुणे विमानतळ येथून नांदेडकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजता नांदेड शासकीय विश्रामगृह येथे राखीव.
शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता नांदेड शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत पिक परिस्थितीचा आढावा घेतील.
सकाळी १० वाजता नांदेड तालुक्यातील ग्रामीण भागात पिक परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर ते वसमत, जि. हिंगोली येथे पिक परिस्थिती पाहणीसाठी प्रयाण करतील.
***
वृत्त
गणेश मंडळाच्या माध्यमातून
शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान
माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
विविध विभागांच्या योजनांची माहिती
प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व मानाच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
‘लोकसंवाद-२०२६’मध्ये कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण आदी विभागांसह सर्वच विभागांचा सहभाग असणार आहे.
शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे, कृषी औजारांसाठी अनुदान, महिला बचत गट तसेच महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षण, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती योजना सवलती यासह विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह मोफत तपासणी, औषधोपचार व शिष्यवृत्तीशी संबंधित सुविधांची माहिती देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती आदी संस्थांच्या योजनांबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.
आंतरविभागीय समन्वयावर भर
‘लोकसंवाद-२०२६’ प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, पणन, कौशल्य विकास, सामाजिक न्याय तसेच पोलीस विभागासह संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये स्थानिक क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ प्रत्यक्ष गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांना थेट आणि अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी
शक्य असेल तेथे कार्यक्रमांचे फेसबुक किंवा युट्यूब लाईव्ह करण्यात येणार असून, सोशल मीडियावर #गणेशोत्सव२०२६ आणि #लोकसंवाद२०२६ हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंतही योजनांची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
ज्या गणेश मंडळांना या कार्यक्रमात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच मुंबई शहर व उपनगर गणेश मंडळानी माहिती व जनसंपर्क विभाग,मंत्रालय मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000
वृत्त क्रमांक
ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २२ सप्टेंबरला होणार निश्चित
१४ तालुक्यांतील तहसील कार्यालयांत प्रवर्गनिहाय सोडत
नांदेड (जिमाका), दि. १५ : ग्रामविकास विभागाच्या दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, नांदेड जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण महिलांसह निश्चित करण्यासाठी दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी तालुकानिहाय सोडत काढण्यात येणार आहे.
संबंधित तहसील कार्यालयाच्या मुख्यालयी तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी यांच्या अधिपत्याखाली ही प्रक्रिया पार पडणार असून, संबंधित उपविभागीय अधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील.
तालुकानिहाय वेळापत्रक : नांदेड, भोकर, हदगाव, किनवट, धर्माबाद, बिलोली, देगलूर व कंधार येथे सकाळी १० वाजता, तर हिमायतनगर, माहूर, उमरी, नायगाव (खै.), मुखेड व लोहा येथे दुपारी ३ वाजता सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण महिलांसह निश्चित करण्यासाठी सोडत घेण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.
****
वृत्त क्रमांक
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६ मध्ये उद्योजकांनी सहभागी व्हावे
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. १५ : उद्योग आयुक्तालयांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांच्या वतीने जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच उद्योजक व गुंतवणूकदारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून पुढील आठवड्यात होणाऱ्या या परिषदेत जिल्ह्यातील उद्योजक व गुंतवणूकदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) अमोल इंगळे यांनी केले आहे.
उद्योग मंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही परिषद होणार आहे. या परिषदेदरम्यान विविध उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात गुंतवणूक वाढविणे, स्थानिक उद्योजक व गुंतवणूकदारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
या परिषदेत नांदेड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रे, गुंतवणुकीच्या उपलब्ध संधी, उद्योजकांचे अनुभव कथन तसेच उद्योग क्षमता असलेल्या विविध क्षेत्रांतील गुंतवणूक व व्यवसायाच्या संधींबाबत चर्चा होणार आहे. यासोबतच सामंजस्य करारांच्या स्वाक्षरीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी जिल्ह्यातील उद्योग व गुंतवणूकदारांनी या परिषदेत सहभागी व्हावे. सहभाग नोंदविणे अथवा परिषदेत सहभागी होण्यासंदर्भात अडचणी असल्यास अमोल इंगळे, सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
वृत्त क्रमांक स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...
