Friday, April 21, 2023

 "जागतिक ग्रंथ दिन" व "मराठवाडा मुक्ती संग्राम"

अमृत महोत्सवानिमित्त रविवारी भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका)दि. 21 :- "जागतिक ग्रंथ दिन" हा 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. नागरिकांमध्ये  वाचनाची आवड  निर्माण करणे व जगभरातील लेखक, पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे खास उद्दीष्ट आहे. याअनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे ग्रंथप्रदर्शन व स्थानिक विक्रेते ग्रंथ विक्रीसाठी ग्रंथप्रदर्शन मांडणार आहेत. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन रविवार 23 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या हस्ते होणार आहे. या  ग्रंथप्रदर्शनात "मराठवाडा मुक्ती संग्राम" चळवळीची माहिती देणारे अनेक ग्रंथ सुद्धा उपलब्ध राहणार आहेत. हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले आहे.

0000

भारतीय डाक विभागाच्या महिला सन्मान

बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घ्यावा

-  अधीक्षक पालेकर   

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- भारतीय डाक विभागामार्फत‍ महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे. ही योजना नारी शक्ती मोहिमेअंतर्गत घोषित करण्यात आली. महिला व मुलीच्या भवितव्यासाठी ही योजना भक्कम आधार ठरणारी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन डाकघर अधिक्षक आर.व्ही. पालेकर यांनी केले.

 

ही योजना प्रामुख्याने महिलांसाठी व मुलीसाठी आहे. या योजनेचे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले जाऊ शकते. महिला या योजनेत 2 वर्षांसाठी किमान 1 हजार रुपये ते जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत रक्कम गुंतवू शकतात. कोणतीही महिला किंवा मुलगी या योजनेत खाते उघडून 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकते. या योजनेत शासनाने घोषित केलेले व्याज दर वार्षिक 7.5 टक्के आहे. व्याज हे चक्रवाढ असून एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40 टक्के रक्कम एकदाच काढता येईल. अपवादात्मक परिस्थीतीत खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही असे डाक विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000

 सफाई कर्मचारी पूनर्वसन कायदा 2013 जनजागृती कार्यशाळा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 21 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतापर्व अभियानांतर्गत विविध योजनेच्या अनुषंगाने उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात सफाई कर्मचारी व त्यांचे पूनर्वसन कायदा 2013 जनजागृती विषयी कार्यशाळा आज घेण्यात आली.

 

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने होते तर मराठवाडा मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बी. एस. दासरी यांनी सफाई कर्मचारी व त्यांचे पूनर्वसन कायदा 2013 बाबत माहिती दिली.

 

या कार्यशाळेस जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांसह समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एम. पी. राठोड, पी. जी. खानसोळे, डी. जी. कदम, श्रीमती व्हडगीर सुकेशनी, श्रीमती गंगातीर, श्रीमती नगरवाडे, दिनेश दवने, विजय गायकवाड, कैलास राठोड, पांडूरंग दोतूलवार,कपिल जेटलावार, रामदास व्ही. पेंडकर आदींची उपस्थिती होती.

00000

 समता पर्व अभियानात जेष्ठ नागरीकांचे जनजागृती व आरोग्य शिबीर संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वा निमित्त 20 एप्रिल रोजी समाज कल्याण कार्यालया अधिनस्त कार्यरत संध्याछाया वृध्दाश्रमात जेष्ठ नागरीकांचे जनजागृती व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.

जेष्ठांना सामाजिक सुरक्षितता योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा व आरोग्य शिबिर अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, समाज कल्याण अधिकारी बि.एस.दासरी, फेस्कामचे अध्यक्ष अशोक तेरकर आदींची उपस्थिती होती.

महसूल विभागाकडून जेष्ठांसाठी दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजनांची माहिती अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांनी दिली. जेष्ठांसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल असेही  त्यांनी सांगितले.

 

यावेळी समाज कल्याण अधिकारी बि.एस.दासरी यांनी जेष्ठ नागरीकांना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. नेत्ररोग तज्ञ डॉ. तारासिंग आडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. दत्तात्रय इंदुरकरदंत शल्यचिकित्सक डॉ.दिप्ती सुर्यवंशी, नेत्रचिकित्सक अधिकारी मयुरी मंगरुळकर, नेत्र समुपदेशन श्रीमती ज्योती पिंपळे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिवसामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड अधिपरीचारीका श्रीमती प्रियंका झगडे यांनी संध्याछाया वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरीकांच्या आरोग्याची तपासणी केली.

 

संध्याछाया वृध्दाश्रमाचे अध्यक्ष पी.डी.जोशी(पाटोदेकर) वृध्दाश्रमात जेष्ठ नागरीकांचे आरोग्याची काळजी व त्यांची सुरक्षिता कशा प्रकारे घेतली जाते हे सांगितले. या कार्यक्रमास समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एम.पी.राठोड, संध्याछाया वृध्दाश्रमाच्या सचिव सौ.पाटणीमहिला आघाडी अध्यक्ष डॉ.निर्मालाकोरजयवंत सोमवाडरामदास पेंडकरकोषाध्यक्ष धर्मप्रकाश अग्रवाल व संध्याछाया वृध्दाश्रम व जिल्हयातील विविध परिसरातील जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.

00000

Thursday, April 20, 2023

 लेख                                                                                              दि. 20 एप्रिल 2023

समता पर्वाने दिले योजनांच्या अंमलबजावणीला बळ !

सामाजिक न्याय विभागातर्गत संपूर्ण राज्यात 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यावर यात भर दिला जात आहे. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाना या अभियानात विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.

 

प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक न्याय पर्वाचे उदघाटन करण्यात आले आहे. या अभियानात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देवून योजनांची जनजागृती करणे, जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहिमचे आयोजन करणे असे उपक्रम हाती घेतले आहेत. शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र देणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचविणे, महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा व शासकीय वसतीगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इतरही महापुरुषांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व पथनाटय तसेच इतर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येत आहे.

 

तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे लाभार्थी यांना प्रातिनिधीक स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनाची माहिती देणे, समता दुत याच्या मार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाट्य नाटकाद्वारे जनतेला सामाजिक योजनांची माहिती देणे व सामाजिक प्रबोधनाचे कार्य या मोहिमेअंतर्गत केले जात आहे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे, जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांच्यासाठी आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती व नागरिकांचे मेळावे घेणे, सफाई कामगार व त्यांचे पुनवर्सन कायदा 2013 अंतर्गत जनजागृती करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेणे, ऊसतोड कामगारांची नाव नोंदणी व ओळखपत्र वाटप तसेच ऊसतोड कामगारांसाठी पुर्नगामन शिबिर आयोजित करणे, त्यामध्ये आरोग्य तपासणी व धान्य महोत्सव यांचा समावेश आहे.

 

याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे, संविधान जनजागृती कार्यक्रम तसेच प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती निर्माण करणे, नवउद्योजकता शिबिर आयोजित करणे, समान संधी केंद्रमार्फत नशा मुक्त भारत अभियानअंतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्ती योजनांची जनजागृती करणे, तृतीयपंथी व्यक्तीसाठी शिबिर आयोजित करणे व ओळखपत्र वाटप करणे आदी उपक्रम या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

 

अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती करणे, शासकीय वसतीगृह, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणे, महाराष्ट्र दिन साजरा करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करणे, दिव्यांग बांधवाना व जेष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे अशा विविध उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना योजनाची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही या समता पर्वानिमित्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

 

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय,

नांदेड

00000  

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा योजनेत पात्र बचतगटासाठी 27 एप्रिल रोजी कार्यशाळा

 मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा योजनेत

पात्र बचतगटासाठी 27 एप्रिल रोजी कार्यशाळा

नांदेड (जिमाका) दि. 20 :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने याचा पुरवठा करणेबाबत योजना सुरु आहे. या योजनेअंतर्गत  सन 2022-23 या वर्षासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले होते. त्यानुसार या योजनेत एकूण 279 बचत गटांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 231 बचत गटांचे अर्ज छाननी अंती पात्र ठरले आहेत. या योजनेत पात्र ठरलेल्या बचत गटांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात गुरुवार 27 एप्रिल रोजी दुपारी 12 वा. आयोजित केली आहे. या  कार्यशाळेस या योजनेतील पात्र बचतगटांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.  

00000 

नारायणा ई-टेस्को ही शाळा अनधिकृत विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे शिक्षणाधिकारी बनसोडे यांचे आवाहन

 नारायणा ई-टेस्को ही शाळा अनधिकृत

विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे

शिक्षणाधिकारी बनसोडे यांचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड येथील नारायणा ई-टेक्नो स्कूल नावाने इंग्रजी माध्यमाची अनधिकृत शाळा शासनाची म्हणजेच शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेता सुरु आहे. या शाळेवर कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु असून या अनधिकृत शाळेत कोणत्याही पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश देवू नये, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांनी केले आहे.

नांदेड शहरातील डीमार्ट परिसरातील वाडी बु येथे नारायणा ई-टेक्नो शाळा परवानगी न घेता सुरु असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी यापुर्वीच जाहिर केले आहे. या अनाधिकृत शाळेत पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित पालक जबाबदार राहतील, असे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड यांनी कळविले आहे.

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...