Wednesday, April 27, 2022

 मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत सवलत योजना जाहीर

नांदेड (जिमाका) दि. 27 :- मुद्रांक शुल्क रकमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत देण्याचा शासनाचा मनोदय होता. त्यानुसार शासनाने 1 एप्रिल 2022 च्या आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना जाहीर केली आहे.  याबाबत लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा कॉल सेंटर 8888007777 व ई-मेल आयडी complaint@igrmaharashtra.gov.in वर संपर्क साधावा, असे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी कळविले आहे.  

ही योजना 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यत (आठ महिने) कार्यान्वित राहणार आहे. आतापर्यत शासनामार्फत सन 1994-95, 1997, 1998, 2004 व 2019 मध्ये माफी योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु नव्याने आलेली माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी  जाहीर करण्यात आली आहे हे विशेष.  या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

योजनेचे स्वरुप  

सदर योजना ही अधिसूचनेसोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद दस्तऐवजावर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची -1 च्या अनुच्छेदांतर्गत विविध कलम व तरतुदीनुसार लागू होणारी एकूण शास्ती ही अटी व शर्तीच्या अधीन राहून 10 टक्के पर्यत कमी केली आहे. ही शास्ती दि. 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीसाठी असून दि. 1 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी 50 टक्के कमी केली आहे. रोजी किंवा त्यापूवी निष्पादित करण्यात आलेल्या उक्त नमुद संलेख तथा दस्तांनाच लागू असेल.

या आदेशाखालील उक्त कपात ज्या प्रकरणी चुकवेगिरीची किंवा अडकवून ठेवण्याची किंवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु करण्यात आलेली असेल आणि ज्या प्रकरणी, उक्त अधिनियमाची कलमे 31, 32 अ, 33, 33 अ, 46, 53 (1 अ) व 53 अ यांच्या तरतुदी अन्वये 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पक्षकारावर किंवा निष्पादकावर किमान एक नोटीस बजावण्यात आलेली आहे अशा प्रकरणीच केवळ लागू असेल. तसेच या आदेशाखालील उक्त कपात ज्या प्रकरणी उक्त अधिनियमाच्या तरतुदी अन्वये कोणत्याही प्राधिकरणासमोर किंवा न्यायालयासमोर अपील किंवा पुनर्विलोकन किंवा पुनरिक्षण अर्ज प्रलंबित आहे अशा प्रकरणी देखील लागू असेल. सदर माफी योजना ही मुद्रांक तुट व शास्तीची वसुली सुरु आहे अशा प्रकरणांना लागू करण्यात आली आहे. ज्या प्रकरणात मुद्रांक चुकविल्याबाबत वसुलीची अथवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु झाली आहे अशा प्रकरणांना दंड सवलत योजना लागू करण्यात आली आहे. या माफी योजनेद्वारे विभागात सुरु असलेली दंड प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे कमी करुन मुद्रांक व नोंदणी विभागाचा या कामकाजात जाणाऱ्या वेळेत बचत करणे व न्यायालयीन प्रकरणे कमी करणे हा मानस आहे. या माफी योजनेत मुद्रांक शुल्कावरील दंड रक्कमेत सवलत दिली आहे. तथापि दस्तावरील मूळ मुद्रांक शुल्काच्या तुटींची पूर्ण रक्कम शासन जमा करणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेताना अर्जदारास विनाशर्त न्यायालयीन प्रकरण मागे घेणे बंधनकारक आहे. ज्या प्रकरणात विभागाने मुद्रांक शुल्क तुटीबाबत आदेश अंतिम केला आहे अथवा नोटीस दिली आहे त्या रकमेप्रमाणे त्याप्रमाणे मुद्रांक शुल्क तुट रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणतेही अपील अनुज्ञेय असणार नाही. यासाठी सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.  राज्यातील ज्या प्रकरणात मुद्रांक शुल्क तूट व दंड रक्कम भरणा करणे प्रलंबित आहे त्या सर्व प्रकरणात नागरिकांनी मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयात संपर्क करुन या दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशने –परिपत्रक- मुद्रांक-अभय योजना या सदराखाली 2 मार्च 2019 रोजीचा शासन आदेश नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Tuesday, April 26, 2022

 कृषी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्हा रुग्णालयाच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण ४५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमास राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे यांची उपस्थिती होती.  यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू सेवनामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सहाय्यक प्रशासन अधिकारी एस.बी.बोरा, अधीक्षक पांडुरंग बिरादार व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

या शिबिरास जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान, डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, आरोग्य समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, अधिपरिचारिका श्रीमती शिल्पा सोनाळे, इ. उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली.

0000



 वैरण लागवडीसाठी अनुदान उपलब्ध

नांदेड (जिमाका) दि. 26 :- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानातर्गंत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेसाठी प्रती हेक्टर 30 हजार रुपये प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या योजनेतर्गंत प्रती जिल्हा 15 हेक्टर क्षेत्रासाठी 4 लाख 50 हजार रुपये याप्रमाणे 34 जिल्ह्यासाठी 1 कोटी 53 लाख रुपये निधी वितरीत करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील इच्छूक पशुपालक/शेतकऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.


या योजनेतर्गंत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी/पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. प्रती हेक्टर 7.5 किलो शेवगा (पीकेएम 1) बियाणाची किंमत 6 हजार 750 रुपये व उर्वरित अनुदान 23 हजार 250 रुपये हे दोन टप्प्यामध्ये वितरीत  करण्यात येणार आहे. बियाणाचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खताची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

0000

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 108 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 802 एवढी झाली असून यातील 1 लाख 108 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे. आज उपचार घेत असलेल्या बाधितामध्ये नांदेड मनपा अंतर्गत  गृह विलगीकरणात 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.   

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 583

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 80 हजार 566

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 802

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 108

एकुण मृत्यू संख्या-हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-02

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

000000

Monday, April 25, 2022

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 27 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 802 एवढी झाली असून यातील 1 लाख 108 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे.

आज उपचार घेत असलेल्या बाधितामध्ये नांदेड मनपा अंतर्गत  गृह विलगीकरणात 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 475

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 80 हजार 458

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 802

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 108

एकुण मृत्यू संख्या-हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-02

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

000000

 पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान 

नांदेड (जिमाका)दि. 25 :- नांदेड जिल्ह्यात शांतता टिकुन रहावी यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 अन्वये आदेश निर्गमीत केला आहे. या आदेशानुसार जिल्हयात सर्व पोलीस स्टेशनचे स्वाधीन अधिकारी असलेले अंमलदार किंवा वरीष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम "अ" ते "ई" प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. हा आदेश दिनांक 12 ते 30 एप्रिल 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यत लागु राहील.

 

आदेशात म्हटले आहे, रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्या रीतीने चालावे कोणत्या रितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजे अर्चेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नांनाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकुमापेक्षा कमी दर्जाचे व त्या पुष्टी देणारे दुय्यम अधिकाऱ्यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शनपर आदेश देण्याबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यासंबंधी.

 

कोणीही हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्हयात जाहीर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. जाहीर सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बांधा येऊ शकतो अशा घोषणा देऊ नयेत.

 

हा आदेश लग्नांच्या वरातीस, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तो महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

0000000

Friday, April 22, 2022

 नांदेडच्या प्रवेशद्वारावरील

समतेचा विचार जागराचे हे प्रेरणास्थान

-        पालकमंत्री अशोक चव्हाण  

 

·        जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे

जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामींच्या हस्ते अनावरण   

·        लोकार्पण सोहळ्याला दिवाळी सणा​​चा उत्साह  

नांदेड (जिमाका), दि. 22 :- जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकाच्या कालखंडात सामाजिक समतेचा दिलेला संदेश हा तेवढाच आद्य मानला पाहिजे. त्या कालखंडातील समाजाच्या ज्या धारणा होत्या त्याला सामाजिक न्यायाच्या तत्वावर आणून परिवर्तनशील विचार त्यांनी दिला. समाजासाठी स्वत:ला वाहून घेत समाजाच्या मनपरिवर्तनाचे महान कार्य महात्मा बसवेश्वर यांनी केले आहे. त्यांचे जीवन कार्य संपूर्ण जगाच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जगाचे सामाजिक नेते असा जर उल्लेख केला तर तो चुकीचा ठरणार नाही. त्यांना मानणारा वर्ग हा व्यापक असण्याचे कारण त्यांनी जपलेले सामाजिक समतेचे तत्व आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

नांदेड महानगराच्या वैभवात भर टाकणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, हरिहरराव भोसीकर, दत्ता पाटील कोकाटे, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, माजी सभापती संजय बेळगे, प्रा. मनोहर धोंडे, किशोर स्वामी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

राष्ट्रपुरुषांच्या जीवन कार्याचा विचार समाजापर्यंत पोहचावा यादृष्टीने नांदेड महानगरात आपण निवडक ठिकाणी त्यांचे पुतळे व परिसर सुशोभीकरण केले. महापुरुषांची पुतळे हे समाजाला अव्याहत प्रेरणा देत असतात. त्यांच्या विचाराचा जागर हा सातत्याने समाजापुढे जावा हा उद्देश आपण यापाठीमागे बाळगला आहे, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारुढ पुतळा साकारून नांदेड मधील सर्व जनतेच्यावतीने अभिवादन करावे हे माझे स्वप्न होते. ते साकारतांना मधल्या काळात काही अडचणी आल्या. या अडचणींवर मात करून नांदेड महानगरात प्रवेश करतांना प्रवेशद्वारावरच महात्मा बसवेश्वरांच्या या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादाना समवेत ते समतेच्या विचार जागराचे प्रतिक व प्रेरणास्थळ म्हणून याकडे पाहिले जाईल, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

सर्वांच्या प्रयत्नांतून आणि सहकार्यातून आपण हा पुतळा, हे प्रेरणा स्थळ या ठिकाणी आपण उभारू शकलो या धारणेतून मी पाहतो आहे. श्रेयाचा इथे प्रश्न नाही उलट सगळ्याच्या हातभाराचे हे एक प्रतीक आहे. या प्रतिकासाठी माझ्यापरीने जेवढे शक्य आहे तेवढे करण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न केला, या शब्दात त्यांनी महात्मा बसवेश्वरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा आवर्जून उल्लेख करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दिलेल्या जाहीर पाठबळावरच अधिक खंबीरपणे उभे राहता आले.

लिंगायत समाजाच्या प्रश्नांबद्दल मी दक्ष आहे. समाजापुढे असलेल्या अडचणींची मला कल्पना आहे. एक पालक या नात्याने मी जबाबदारी स्विकारायला तयार असून हे प्रश्न मार्गी लावील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. आपला जिल्हा हा तेलंगणा, कर्नाटक या राज्याच्या सिमेवरचा आहे. मराठवाडा मुक्तीनंतर आपण विनाअट महाराष्ट्रामध्ये सहभागी झालो. इथल्या सामाजिक प्रश्नांचा पोत हा वेगळा आहे. हा पोत समजून घेतल्या शिवाय त्या-त्या समाजाचे प्रश्न आपल्याला कळणार नाहीत. आपण विनाअट महाराष्ट्रात सामील होऊन येत्या वर्षात 75 वर्षे होत आहेत. हा अमृत महोत्सव मराठवाडा मुक्ती समवेत आपल्या योगदानाचाही आहे, याकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील समाधान हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत माझे नांदेड मला अधिक सुरक्षित हवे आहे, असे स्पष्ट करून त्यांनी सामाजिक सलोखा व जनतेच्या सुरक्षिततेला अधिक महत्व दिले. 

महात्मा बसवेश्वरांनी समतेच्या लढ्यासह सदाचार हाच खरा धर्म ही शिकवणूक दिली आहे. ही शिकवणूक आचारणात आणून त्यांचा विचार समाजातील प्रत्येकाने दृढ केला पाहिजे. त्या काळात जाती-धर्माच्या नावावर असलेली अधिक घट्ट पकड लक्षात घेता महात्मा बसवेश्वर यांनी समतेचे जे विचार दिले ते आजही तेवढेच लाख मोलाचे आहेत. सर्वांसोबत व सर्वांना घेऊन चालण्याची शिकवण त्यांनी आपल्याला दिली आहे. लोकशाही मूल्यांची शिकवण यात असल्याचे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, शिवा संघटनेचे संस्थापक मनोहर धोंडे, ईश्वराराव भोसीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. श्री. श्री. 1008 केदारपीठ जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपले आशीर्वाद वचनपर मार्गदर्शन केले.

00000










 

 

वृत्त क्रमांक   भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय समितीशी संवाद !   विद्यार्थी , उमेदवार व संबंधित घटकांनी उपस्थित राहावे   नांदेड, दि. 19 ...