Tuesday, March 4, 2025

 वृत्त क्रमांक 255

वाहनावरील  प्रलंबित ई-चलन भरणा करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 4 मार्च  :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन धारकांना देण्यात आलेले प्रतिवेदन हे मोठया प्रमाणात प्रलंबित आहे. प्रलंबित प्रतिवेदन, ई-चलन हे तीन महिण्यानंतर कोर्टात पाठविणे आवश्यक आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून प्रलंबित प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.   

न्यायालयाकडून वाहनमालक, चालक यांना या संदर्भात जामीनपात्र व अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहनचालक- मालक यांनी त्यांच्या वाहनावरील प्रलंबित ई-चलनचा भरणा या कार्यालयात येवून किंवा ऑनलाईन पध्दतीने करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 254

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 4 मार्च  :- नांदेड जिल्ह्यात 17 मार्च 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 17 मार्च 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 वृत्त क्रमांक 253

मोटर सायकल वाहनासाठी नवी मालिका सुरु 

नांदेड, दि. 4 मार्च :- परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26 –सीटी ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांनी आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमलसह अर्ज बुधवार 5 मार्च 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

ज्या पसंतीक्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 5 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता टेक्स्ट मॅसेज दुरध्वनीद्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

Monday, March 3, 2025

 ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मार्चपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसी अँड ए), तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम)  परीक्षा दि. २३, २४ व २५ मे रोजी होणार आहेत. परीक्षेसाठी gdea.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दि. ७ मार्च रोजी रा. ८ वाजेपर्यंत भरता येईल. बँकेत चलनाने भरणा करण्याची मुदत दि. १३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आली आहे. अकोला येथील परीक्षा केंद्रावर अकोला, वाशिम, बुलडाणा हे तीन जिल्हे संलग्न आहेत.

०००

वृत्त क्रमांक 252

स्वतःच्या मुलांप्रमाणे वसतीगृहातील मुलांची काळजी घ्या : गोरक्ष लोखंडे यांचे आवाहन

 १७ जिल्हयातील मागासवर्गीयांच्या वसतीगृहांची पाहणी

नांदेड दि.३ मार्च : स्वतःच्या मुलांप्रमाणे वसतीगृहातील मुलांची काळजी घेणे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील वसतीगृहांमध्ये सुधारणेस वाव असून विद्यादानाच्या या कामांमध्ये संवेदनशीलता ठेवून काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आज येथे केले.

सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. गोरक्ष लोखंडे यांनी आयोगाचे सदस्य म्हणून आत्तापर्यंत 17 जिल्ह्यांना भेट दिली आहे. समाज कल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहात शिकूनच आम्ही देखील मोठे झालो आहे.त्यामुळे या वसतीगृहाची माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यात वाढ होण्यात काय महत्त्व असते, याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे राज्य शासनाने मागासवर्गीय वसतीगृहाच्या संदर्भात अतिशय संवेदनशील धोरण ठरवले असून विद्यार्थ्यांच्या तासिका, त्यांच्या शिकवण्या, त्यांचे प्रशिक्षण सर्व लक्षात घेऊन भोजन व निवाऱ्याची सुविधा संवेदनशीलतेने पुरवावी, असे आवाहन त्यांनी केले.

समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक वसतीगृहांची त्यांनी गेल्या दोन दिवसात पाहणी केली. यावेळी त्यांनी मुदखेड येथील वसतीगृहातील सुविधा व शिस्तीचे कौतुक केले. महाराष्ट्राला मोठमोठे अधिकारी या वसतीगृहाने दिले आहे. त्यामुळे वंचित समाजाने आपली मुले वसतीगृहात मोठ्या संख्येने दाखल होतील यासाठी प्रवेश प्रक्रिया व अन्य बाबी समजून घ्याव्यात, तसेच समाज कल्याण विभागाने या प्रक्रिया अतिशय सोप्या व सर्वांना माहिती होईल, या पद्धतीने प्रचार प्रसिद्धी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
 
  संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या काळामध्ये आयोजित कार्यक्रमातून सोप्या शब्दात संविधान जनतेला माहिती होईल. तसेच या संदर्भातील अफवा पसरणार नाही. त्याला कोणी बळी पडणार नाही, यासाठीचे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

 परस्परांच्या जात,धर्म व परंपरांचा सन्मान करताना मनातली भावना देखील स्वच्छ असली पाहिजे. कुणाच्या जाती बद्दल, कुणाच्या प्रगती बद्दल, असूया असू नये. द्वेष असू नये. ही परिस्थिती समाजात निर्माण झाल्यानंतर ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्येही कमी येईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या तीन दिवसांपासून ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या काळात त्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र अहुलवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मीनगिरे आदींशी चर्चा करून जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कामाचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी विविध सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये ही सहभाग घेतला.
000




 वृत्त क्रमांक 251

शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत पीक कर्ज व्याजात सवलत

केंद्राचा निर्णय ; आता विना तारण दोन लाखांचे कर्ज

नांदेड दि.३ मार्च : केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) धारक शेतकऱ्यांना पीक कर्ज व्याजात पाच लाख रुपये पर्यंतची सवलत मंजूर केली आहे. हे पीक कर्ज फलोत्पादन,पशुसंवर्धन तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना लागू आहे.त्याचप्रमाणे विनातारण  कर्जाची मर्यादा सुद्धा आता दोन लाखापर्यंत करण्यात आली आहे.

या संदर्भाचे आदेश शनिवारी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवर बजेट नंतर वेबिनार मध्ये देण्यात आले.

केंद्र सरकारने बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी पीककर्ज व इतर विषयावर तरतुदी केल्या आहेत. या संदर्भात माहिती देण्याच्या दृष्टीने कृषी मंत्रालयाने शनिवारी देशात विविध ठिकाणी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवर बजेटनंतर वेबिनारचे आयोजन केले होते.

नांदेड जिल्ह्यामध्ये SBI RSETI नांदेड येथे वेबिनार पार पडला. जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ऑनलाइन संवाद साधला.

 विविध योजनेची माहिती दिली. दरम्यान, केंद्र सरकार द्वारा २०२५-२६ पासून पात्र केसीसी धारकांना कर्ज व्याज सवलत योजना वाढीव मर्यादा देण्यात आल्याचे सांगितले. पूर्वी व्याज सवलत तीन लाख रुपये मिळत होती. आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेमुळे लहान व मध्यम शेतकऱ्यावरील वित्तीय ताण कमी होईल. ही योजना पीक कर्ज फलोत्पादन, पशुसंवर्धन तसेच मस्त्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना लागू आहे.

विशेष म्हणजे भारतीय रिझर्व बँकेद्वारे शेती कर्जासाठी आता विनाकारण कर्ज मर्यादा दोन लाखापर्यंत करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी SBI RSETI  संचालक श्री. अशोकनाथ शर्मा यांचे सहकार्य लाभले व  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. अनिल गचके यांचे मार्गदर्शन लाभले तसेच त्यांनी सर्वांचे आभार मानले.
000

 वृत्त क्रमांक 250

जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी विशेष मोहिम

 ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि.३ मार्च : बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांची घाई लक्षात घेता, जात पडताळणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज 31 तारखेपर्यंत दाखल करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या वतीने विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. सदर विशेष मोहिमेच्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित अर्जदारास अर्ज करतेवेळेस जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate-CVC) प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे अत्यावश्यक आहे. इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखा तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधोपचार, स्थापत्य, पशुवैद्यकिय, मत्स्य, विधी शाखा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट अशा प्रकारे बारावीच्या आधारे ज्या जेईई, नीट, सीईटी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा अर्जदारांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह विशेष मोहिम निमित्ताने दिनांक 31 मार्च, 2025 पर्यंत ऑनलाईन भरलेले परिपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

अर्जदारांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यामुळे समितीस अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे समिती निर्णय देणे अशक्य झाल्यास व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अथवा त्रुटी असलेली प्रकरणे विहीत मुदतीत निकाली न निघाल्यास व त्यामुळे अर्जदारास प्रवेशापासून वंचित रहावे लागल्यास यास समिती जबाबदार राहणार नाही.

 त्यामुळे अर्जदार/पालकांनी उपरोक्त विशेष मोहिमेच्या अनुषंगाने अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाने या बाबी आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या/घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात,

माहे फेब्रुवारी, 2025 मध्ये समितीने अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन 1750 डिजिटल जात वैधता प्रमाणपत्र अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवरती  वितरीत करण्यात आले आहेत. अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळेस आपला स्वत:चा ईमेल व भ्रमणध्वणी क्रमांक नमूद करावा, इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचा ईमेल व भ्रमणध्वणी क्रमांक नमूद करण्यात येऊ नये. अर्जदाराच्या प्रकरणात समितीने घेतलेला निर्णय अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर वरती कळवीण्यात येतो.

 अर्जदारांनी ऑनलाईन भरलेला अर्ज समिती कार्यालयातील  खीडकी क्र. 1 वर स्वत: किंवा सखे भाऊ, वडील यांच्या मार्फत दाखल करावे, इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस कार्यालयास पाठवण्यात येऊ नये.

अर्जदारांनी कोणतेही दलाल/मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींशी / समाजकंटकांशी संपर्क साधू नये व त्यांच्या दुष्कृत्यास बळी पडू नये. आपले प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी किंवा जात वैधता प्रमाणपत्र लवकर देण्यासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीकडून आपल्याला आश्वासन दिले गेल्यास व पैशाची/मेहरबानगीची (favour) मागणी केली गेल्यास आपण सजग,  चरित्रवान व देशभक्त नागरिक आहात, याची जाणीव ठेवून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (दूरध्वनी क्र. 02462-255811, टोल फ्री क्रमांक: १०६४) गुप्तरित्या तक्रार नोंदवून, अशा व्यक्तीविरुध्द कायद्यानुसार रितसर कार्यवाही होण्यासाठी शासनास मदत करावी. असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या वतीने करण्यात येत आहे.
***

वृत्त क्रमांक   जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी  नांदेड (जिमाका), दि. 17 : जिल्‍हाधिकारी कार्य...