Monday, May 29, 2023

इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

 इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे

आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 29 :- इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रु-मार्च 2023 परीक्षेचा निकाल जाहिर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थीयापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ. 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेतअसे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखानियमित शुल्क शुक्रवार 9 जून 2023 पर्यत आहेत. विलंब शुल्क शनिवार 10 जून ते 2023 ते बुधवार 14 जून 2023 असा आहे.

उच्च माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखागुरुवार 1 जून 2023 ते गुरुवार 15 जून 2023उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख शुक्रवार 16 जून 2023 आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाइ्रन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवाररी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीनुसार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रु-मार्च 2023 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जुलै-ऑगस्ट 2023 व फेब्रुवारी-मार्च 2024 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयानी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

Saturday, May 27, 2023

वृत्त 

जनतेच्या विश्वासार्हतेला आम्ही प्राणपणे जपू - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे 

· नांदेड जिल्ह्यात विविध विकास कामांचे खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

· ही विकास कामे म्हणजे खासदार हेमंत पाटील यांच्या दूरदृष्टीचे प्रतिक

· सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्यातील सर्वसामान्य जनतेला, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांसह महानगरातील जनतेला हे सरकार आपले सरकार वाटत आहे. वृद्ध महिलांसह निराधार व्यक्तीही विश्वासाने आमच्याशी संवाद साधू इच्छित आहेत. आपले म्हणून बोलत आहेत. ही विश्वासर्हता संपादन करण्यासाठी दिवसाची रात्र करून महाराष्ट्र शासनाने विविध विकास कामांना जी गती दिली आहे त्याचे हे आदर्श मापदंड आम्ही समजतो. ज्या कष्टावर, साधेपणावर व लोककल्याणकारी भूमिकेतून हा विश्वास आम्ही मिळवला तो कोणत्याही परिस्थितीत आम्ही जपू अशी नि:संदिग्ध ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. 

नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या हदगाव तालुक्यातील तळणी-साप्ती-कोहळी-शिरड-पेवा-करोडी-उंचेगाव-भानेगाव-हदगाव रस्ता व पुलाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. भानेगाव येथे कयाधू नदीच्या जवळ आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास खासदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, भोकरच्या सहायक पोलीस अधीक्षक शफकत आमना, आनंदराव जाधव, बाबुराव कदम कोहळीकर, उमेश मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. 

आपल्या मतदारसंघातील सर्वच घटकांचा विकास व्हावा यासाठी खासदार हेमंत पाटील ज्या पद्धतीने आग्रह धरतात व विकास कामे मंजूर करून आणतात त्याला तोड नाही. वेळप्रसंगी माझ्या शेतकऱ्यांसाठी ही कामे महत्वाची आहेत, असे सांगून त्यांनी आमच्याशी भांडणही करायचे सोडले नाही, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ऊर्ध्व पैनगंगा, नदीवरील सात उच्च पातळी बंधाऱ्यांना त्यांनी मंजूर मिळवून घेतली. केवळ मंजूरीच नव्हे तर यासाठी आर्थिक तरतूद करून घेतली. यामुळे 10 हजार 610 हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल. यातून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाला अंदाजित 1600 कोटी रुपये खर्च होणार असून प्रति वर्षी 500 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. या भागात हळद उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांना अधिकचे उत्पन्न मिळावे यादृष्टिने खासदार हेमंत पाटील यांच्या आग्रहावरून वसमत येथे हळद संशोधन केंद्रासाठी शंभर कोटी रुपयांची मान्यता व केंद्र शासनाने दिले आहे. 

हिंगोली, नांदेड जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा व पाण्याची उपलब्धता इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगली आहे. यामुळे ज्यांच्याजवळ पाण्याची सुविधा आहे असे शेतकरी ऊसाच्या पिकाकडे वळले आहेत. ऊसाच्या शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे साखर कारखानदार यांच्या मर्जीवर असल्याने अनेकवेळा शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्पादनातून लाभ होईल, असे सांगता येत नाही. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पोफाळी साखर कारखानाच्या पूर्नजीवनाचा आग्रह त्यांनी धरला. अवघ्या दोन महिन्यात हा कारखाना सूरू करून इथल्या शेतकऱ्यांनाही सर्वांपेक्षा अधिक भाव दिला याचे आम्हाला कौतूक आहे. सर्वांगिन विकासाची दूरदृष्टी खासदार हेमंत पाटील यांनी जपल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना झुकते माप दिल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

शासन आपल्या दारी हा सुशासनाचा आदर्श

महानगरापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला अधिक लोकाभिमूख करून शासन आपल्या दारी हा अभियानाची जोड दिली आहे. हा उपक्रम प्रशासनातील सर्व घटक व शासनाच्या विविध विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांना पात्र असलेले नागरिक यांच्यामध्ये सवर्णमध्य साधणारा आदर्शमापदंड असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. शासनासमवेत या अभिनव योजनेसाठी प्रत्येक गावातील पाच शिवदूत यांनी पुढे येऊन या उपक्रमाला अधिकाधिक लोकाभिमूख करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 वृद्ध महिलेची मागणी समजून घेण्यासाठी

जेंव्हा खासदार डॉ. शिंदे व्यासपीठावरून उतरतात 

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हदगाव तालुक्यातील विविध कामांच्या भूमिपूजन समारंभात आपल्या भाषणापूर्वी उपस्थित असलेल्या महिलांपैकी अंजनाबाई विणकरे या वृद्ध महिलेशी व्यासपीठावरून खाली उतरून संवाद साधला. अंजनाबाईने घरकुलाची मागणी करताच त्याला होकार देत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. अंजनाबाईनेही धीटपणे खासदार डॉ. शिंदे यांना नाव व फोन नंबर मागितल्यावर खासदार डॉ. शिंदे यांनी तिला जवळ घेत आश्वस्त केले. 

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती

- खासदार हेमंत पाटील

राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा ही एकनाथ शिंदे यांनी अहोरात्र मेहनत करून यशस्वीपणे सांभाळली आहे. सर्वसामान्याच्या कुणबी कुटुंबातील एक व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतो हे त्यांनी घेतलेल्या अहोरात्र कष्टाचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दु:ख आणि त्यांच्यावर येणार प्रसंग याची जाणिव त्यांना आहे. या जाणिवेतूनच विविध शासकीय योजनांना त्यांनी लोकाभिमुखतेची जोड देऊन ग्रामीण भागातील सिंचन, रस्ते, वाहतुकीची सुविधा यावर भर दिल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. हिंगोली-नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्य वर्ग हा शेतीशी निगडीत आहे. या दोन्ही जिल्ह्यात नद्यांची संख्या व ठराविक वर्षानंतर होणारी अतिवृष्टी यामुळे अनेक गावे संपर्कापासून वंचित राहतात. आज ज्या कामाचे भूमिपूजन झाले तो या कयाधू नदीवरील पूल आता उभा झाल्यानंतर नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या गावांचा सुमारे 20 कि.मी. चा फेरा आता वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

000000

छाया :- सदा वडजे, नांदेड








 

 


Friday, May 26, 2023

 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन

 ·   खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते 27 मे रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमास खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आनंदराव जाधव, व्यंकटेश गोजेगावकर व विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 

सुमारे 66.5 कोटी रुपयांच्या या विकास कामाचा समावेश आनंदनगर चौक ते महादेव दालमिल (व्हीआयपी रोड) पर्यंत सीसी रस्ता व गटारीचे बांधकाम करणे (15 कोटी रु.), भाग्यनगर टी पॉईंट ते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यापर्यंत सीसी रस्ता व गटारीचे बांधकाम (18 कोटी रु.), आयटीएम कॉलेज ते रेल्वेस्टेशन पर्यंत सीसी रस्ता व गटारीचे बांधकाम (27.50 कोटी रु.), गोकुळनगर चौक (रेल्वेस्टेशन) ते हिंगोली गेट रेल्वे ओव्हरब्रिज पर्यंत सीसी रस्त्याचे बांधकाम करणे (6 कोटी रु.) या कामांचा समावेश आहे.

000000

सुधारित वृत्त

नांदेड जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या

विविध विकास कामांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन 

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या हदगाव तालुक्यातील वाहतुकीची सुविधा भक्कम व्हावी व तेथील विकासाला चालना मिळावी यासाठी आजवर प्रतिक्षेत असलेल्या तळणी-साप्ती-कोहळी-शिरड-पेवा-करोडी-उंचेगाव-भानेगाव-हदगाव रस्ता राज्य महामार्ग-416 कि.मी. 25/600 मध्ये कयाधू नदीवर उंचेगाव जवळ मोठया पुलाच्या जोडरस्त्यासह बांधकाम व भूमिपूजन शनिवार 27 मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत पाटील, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, बाबुराव कदम कोहळीकर व सन्माननिय लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते सकाळी 10 वा. संपन्न होत आहे. याचबरोबर भानेगाव येथे पुलाचे उद्घाटनही मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.

 

याचबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नांदेड व बिलोली येथील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत नांदेड येथे उत्तर विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन होईल. आमदार बालाजी कल्याणकर व सन्माननिय लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहील. या विकास कामांमध्ये आनंदनगर चौक ते महादेव दालमिल मुख्य रस्ता सी.सी. रस्ता करणे, भाग्यनगर टी पॉईंट ते शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यापर्यंत सी.सी. रस्ता, आय.टी.एम. कॉलेज ते रेल्वे स्टेशन सी.सी. रस्ता, रेल्वे स्टेशन गोकुळनगर ते हिंगोली गेट ओव्हर ब्रीज सी.सी. रस्ता करणे या महत्वपूर्ण योजनांचा समावेश आहे. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत हॉटेल मिडलँड नांदेड येथे खासदार डॉ. शिंदे बैठकीस उपस्थित राहतील. सायंकाळी 5 वा. बिलोलीकडे ते प्रयाण करतील. सायं 6 वा. नांदेडचे भुमिपुत्र प्रख्यात सिनेअभिनेते मंगेश देसाई यांच्या सत्कार सोहळ्यास त्यांची उपस्थिती राहील. रात्री 9 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर यांच्या निवासस्थानी राखीव. रात्री 9.30 वा. हैदराबादकडे प्रयाण करतील.

00000

बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी

राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत लातूरऔरंगाबादअमरावतीपुणेनागपूरमुंबईकोल्हापूरनाशिककोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.  

 

या परीक्षेचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना राज्यमंडळ स्तरावरुन नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

7387400970,8308755241,9834951752,8421150528,9404682716,9373546299,8999923229,9321315928,7387647102,8767753069 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थीपालक यांनी यांची नोंद घ्यावीअसे आवाहन राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

 खते, बियाणे  किटकनाशके खरेदी  विक्री करताना येणाऱ्या

अडचणीचे निराकरणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- खरीप हंगाम 2023 मध्ये बियाणेखते व किटकनाशकाबाबत शेतकरीकंपनी प्रतिनिधी व बियाणेखतेकिटकनाशके विक्रेत्यांना क्षेत्रिय स्तरावर वेगवेगळया अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खते, बियाणे  किटकनाशके खरेदी  विक्री करताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.


या नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना सकाळी 10 ते सायं. या वेळेत संपर्क साधता येणार आहे. शेतकऱ्यांनी काही तक्रारी असल्यासस्वप्नील अमृतवार, ( मो.नं.9970630379 ),  एस.एन चंद्रवशी ( मो.नं 9673033085 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अल्प असल्याने शेतकरीकंपनी प्रतिनिधी व बियाणेखते व किटकनाशके विक्रेते यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे  आहे. बियाणे खतेकिटकनाशके यांचे उत्पादनवाहतुकवितरण आणि विक्री करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत खतेबियाणे व किटकनाशके यांचा काळाबाजारसाठेबाजी रोखण्यासाठी तसेच बियाणे गुणवत्ता संदर्भात तक्रारी करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000  

 शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा रास्त भावात

मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणेखते व किटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्तभावात मिळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.  या पथकामार्फत बाजारात उपलब्ध होणाऱ्या बियाणे, खते व किटकनाशक विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर 16 असे एकूण 17 भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत.

खरीप हंगामामध्ये कृषिसेवा केंद्र चालक किंवा खाजगी एजंन्ट मार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते बियाणे  व किटकनाशके विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषि विभागाकडुन कृषि सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत असते. सर्व निविष्ठांचे व्यवस्थीत वाटप व चांगल्या प्रतिच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतीलनिविष्ठासाठी अडवणूक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे. त्याचबरोबर कृषि निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहारसाठेबाजीज्यादा दराने विक्रीअसे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादकविक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात येतील.  तसेच गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बोगस बियाणेखते व किटकनाशकांची विक्री केल्यास संबंधिताविरुध्द भरारी पथकामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषि अधिकारीकृषि अधिकारी पंचायत समितीनिरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, मोहिम अधिकारी उपविभागीय कृषि अधिकारीजिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकवजन मापे निरीक्षक यांचा समावेश आहे.

येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कृषी विभागामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येवून कृषि निविष्ठा विक्रेते व उत्पादकांच्या तपासण्या नियमित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अनियमितता आढळुन आल्यास संबंधितांचा परवाना निलंबित अथवा रद्य करण्यात येईल. त्यामुळे निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहारसाठेबाजीज्यादा दराने विक्रीबोगस खते बियाणे विक्री करु नये असे निदर्शनास आल्यास संबंधिता विरुध्द कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी असतील किंवा विक्रेत्याकडून अडवणुक होत असेल तर तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारीपंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.चलवदे यांनी केले आहे. 

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...