Wednesday, October 1, 2025

वृत्त क्रमांक 1045

बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड दि. 1 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रु-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

नियमित विद्यार्थ्यांची अर्ज UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत भगवयाची आहेतव्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी सर्व शाखाचे पुनर्परिक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय. आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची अर्ज त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून भरावयाच्या तारखांना पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

शुल्क प्रकारात उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्रकला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocatioanl Stream) शाखांचे नियमित विद्यार्थीसर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीश्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI ( औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची अर्ज भरावयाच्या तारखा बुधवार 1 ऑक्टोबर ते

सोमवार 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्याल यांनी 8 सप्टेंबर 2025 ते उपरोक्त नमूद कालावधीत नियमित शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणा करावे. शुल्क जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये "Draft" चा "Send to Board" व Payment Status मध्ये "Not Paid चा "Paid" असा बदल झाला आहे का याची खातरजमा करावी.

 

शुल्क जमा केलेली आरटीजीएस/एनईएफटीद्वारे पावती/चलनासह विद्यार्थ्याच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळाप्रमुखप्राचार्य यांनी नोंद घ्यावी. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईलमध्ये कॉलेजसंस्था मान्यताप्राप्त विषयशिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.

 

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन मधून प्रिलिस्ट उपलब्ध करून दिलेला असेलकनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख, प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

 

बारावी परीक्षेची अर्ज ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

 

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्र UDISE + मधील PEN-ID वरुन भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.  DISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल. पुनर्परिक्षार्थीनावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीश्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी. आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी)व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्याची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्याची अर्ज प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पद्धतीने भगवयाची आहेत. ज्या विद्यार्थ्याचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000

 

कृपया सुधारीत वृत्त घ्यावे, ही विनंती.

वृत्त क्रमांक 1044

प्रत्‍येक पीक कापणी प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावा - जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले  

नांदेड दि. 1 ऑक्टोबर : पीक कापणी प्रयोगाच्‍या नियोजनाप्रमाणे प्रत्‍येक प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावेत असे निर्देश जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. मंगळवार 30  सप्टेंबर रोजी सायंकाळी कृषी, महसूल व ग्राम विकास (जिल्‍हा परिषद) विभागाच्‍या अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्‍यात आली. खरीप हंगाम सन २०२५-२६ साठी सर्व संबंधीतांना पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्‍यात आले आहे.

यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगांना आधारभूत धरण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे पीक कापणी प्रयोगात कोणत्‍याही प्रकारची चूक होणार नाही. पीक कापणी प्‍लॉटची आखणी, कापूस पिकांबाबत आवश्‍यक वेचनी, भात, सोयाबीन, ज्‍वार, तूर इत्‍यादींबाबत सुकविण्‍याचे प्रयोग,उत्‍पादन मोजणी तंत्र तसेच प्रयोगाची आवश्‍यक छायाचित्रे, नोंदी संकलित कराव्‍यात. सर्व प्रयोग शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसारच पार पडतील याबाबत सर्व संबंधीतांनी दक्षता घेण्‍याच्‍या सूचना यावेळी देण्‍यात आल्‍या. पीक विम्‍यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्‍यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्‍यन्‍य साधारण महत्‍व असल्‍याने सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी नेमून दिलेल्‍या गावातील सर्व प्रयोग सीसीई ॲपवर अचूकपणे पार नोंदवले जातील यासाठी आवश्‍यक दक्षता घेण्‍याबाबत त्‍यांनी सूचना दिल्‍या.

जिल्‍हयात सर्वत्र अतिवृष्‍टी झाल्‍यामुळे खरीप पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्‍याने सोयाबीन, कापूस, ज्‍वार , तूर पिकांचे कापणी प्रयोग शिल्‍लक आहेत.जिल्‍हयाभरात ५५८ गावांत एकूण ३३१२ कापणी प्रयोगांचे नियोजन करण्‍यात आले आहे. ग्रामस्‍तरीय समिती, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्‍यात आली आहे.त्‍याच गावातील प्रगतीशील शेतकरी, पोलिस पाटील व ग्रामपंचायत निर्देशीत सदस्‍य यांनी देखील अचूक निष्‍कर्ष  नोंदवले जातील यासाठी नियोजीत कापणी प्रयोगास वेळेवर उपस्थित राहण्‍याचे आवाहन केले.

याबैठकीस जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्‍तप्रसाद कळसाईत, निवासी उपजिल्‍हाधिकारी किरण अंबेकर,तहसिलदार विपीन पाटील, तंत्र अधिकारी गोविंद देशमूख, सुप्रिया वायवळ यांचेसह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

00000

वृत्त क्रमांक 1043

गोदावरी नदीच्या संभाव्य पूर परिस्थितीबाबत 

नांदेड पाटबंधारे मंडळाचे नागरिकांना आवाहन

नांदेड दि. 1 ऑक्टोंबर : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ऑक्टोबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविली आहे. गोदावरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा सध्याचा वेग लक्षात घेता सदरचा विसर्ग शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पस्थळी 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेनंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पस्थळी 3.50 लक्ष ते 4.00 लक्ष क्सुसेक्स विसर्ग नदीपात्रात वाहणार आहे. सदर विसर्ग 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ राहण्याची शक्यता आहे. नांदेड शहरात गोदावरी नदीची इशारा पातळी 351 मीटर व धोका पातळी 354 मीटर आहे. सदरील विसर्गामुळे धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने नागरीकांनी संभाव्य उपाययोजना कराव्यात व तशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अ. आ. दाभाडे यांनी केले आहे. 

आज 1 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वा. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामधून 2:00 लक्ष क्युसेक्स इतका विसर्ग चालू आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वा. जायकवाडी धरणातून 3.00 लक्ष क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आले आहे. जायकवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग चालू आहे. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचे 17 दरवाजे 28 सप्टेंबर 2025 पासून पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धरणात येणारी आजची आवक सरासरी 2.00 लक्ष क्युसेक्स असून त्यात आज दुपारी 1 वाजेपासून वाढ होण्यास सुरवात झाली आहे. 

पावसाच्या परिस्थितीत काही बदल झाल्यास, प्रकल्पस्थळी येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेवून हा विसर्ग कमी अथवा जास्त होण्याची शक्यता आहे. काही समाजमाध्यमाद्वारे नागरिकांमध्ये विसर्गाबाबत चुकीची अथवा अवास्तव माहिती पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वस्तुनिष्ठ माहितीसाठी पूर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. 02462-263870 या क्रमांवर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1042

सेवा पंधरवड्यानिमित्त नांदेड येथे भटक्या विमुक्तांना विविध दाखले वाटप

नांदेड दि.१ ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत 'सेवा पंधरवाडा' निमित्त नांदेड आणि अर्धापूर तालुक्यातील भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि नांदेड तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे आयोजन उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत उपविभागीय कार्यालय, नांदेड आणि तहसील कार्यालय, नांदेड यांच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करून त्यांना आवश्यक असलेले विविध दाखले देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात भटक्या विमुक्त जातीचे नेते देविदास हादवे यांनी समाजाच्या विविध समस्या आणि अडचणी मांडल्या. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते भटक्या विमुक्त जातीतील  नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, रहिवासी दाखला आणि इतर आवश्यक दाखले वाटप करण्यात आले. यामध्ये वासुदेव, मसणजोगी, मुस्लिम मदारी, गाडी वडार, वाघे, गोसावी आणि गोंधळी समाजातील जवळपास १५० नागरिकांची उपस्थितीत होती.

यावेळी, समाजातील वंचित घटकांसाठी 'सेतू' मार्फत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नांदेड शहरातील सेतू केंद्र चालक विजय जोंधळे आणि अर्धापूरचे शिवप्रसाद पत्रे यांचा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.वाडी तांड्यावरील व वस्तीबाहेर राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीना शासनाच्या विविध योजना लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला परभणीचे जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पांचगे, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

०००००





प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १३:२२ वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

000000

 वृत्त क्रमांक 1041

2 लाख 90 हजार क्यूसेकच्या महापुरावर विष्णुपुरी प्रकल्पातून नियंत्रण

नांदेड दि. 1 ऑक्टोंबर : नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी, तीन तालुक्यांतील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि नांदेड एमआयडीसीच्या विकासासाठी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून विष्णुपुरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मागील पंचवीस वर्षांपासून गोदावरी नदीला एवढा मोठा पूर कधीच आला नव्हता. साधारणतः दरवर्षी एक लाख ते सव्वा लाख क्यूसेक एवढा पूर येत असे. परंतु यंदा प्रथमच तब्बल 2 लाख 90 हजार क्यूसेक एवढा प्रचंड महापूर आल्याने प्रशासनासमोर अभूतपूर्व आव्हान उभे राहिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीमुळे व विष्णुपुरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे विष्णुपूरी प्रकल्पाच्या पूरपरिस्थतीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे.

17 दरवाजे प्रथमच पूर्णपणे उघडले

पूर्वी पूरनियंत्रणासाठी केवळ सव्वा लाख ते दीड लाख  हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यासाठी काही दरवाजे उघडले जात असत. 2006 मध्ये सर्वाधिक 12 दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु यंदा आलेल्या महापुरामुळे प्रथमच विष्णुपुरी प्रकल्पाचे 17 चे 17 दरवाजे पूर्णपणे उघडावे लागले. हे मोठे संकट समोर असताना प्रशासनाने वेळीच निर्णय घेतला आणि पुराचे पाणी सुरक्षितपणे सोडण्यात यश मिळवले.

नादुरुस्तीत असलेले पाच दरवाजे मोठे आव्हान

प्रत्यक्षात प्रकल्पातील पाच दरवाजे मोठ्या नादुरुस्तीत होते. त्यामुळे एवढ्या महापुराच्या वेळी ते कार्यान्वित करणे हे पाटबंधारे विभागासमोर मोठे संकट होते. अशा परिस्थितीत कार्यकारी अभियंता दत्तात्रय रा. सावंत, चारुदत्त बनसोडे, अशोक चव्हाण, नवनाथ पिसोटे (उपअभियंता) तसेच सहाय्यक अभियंता शिवम ससाने यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. रात्रंदिवस प्रयत्न करून, अवघ्या काही तासांत नादुरुस्त दरवाज्यांची दुरुस्ती करण्यात आली. परिणामी 17 पैकी एकही दरवाजा अडथळ्याविना कार्यान्वित करण्यात आला.

शेतजमिनी पाण्याखाली जाण्यापासून वाचल्या

या निर्णायक आणि तातडीच्या कारवाईमुळे महापूराचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने सोडण्यात आले. त्यामुळे बॅकवॉटरची समस्या निर्माण झाली नाही. हजारो एकर शेती पाण्याखाली जाण्यापासून वाचली. अन्यथा गोदावरीच्या काठावरील अनेक गावे व शेती पूर्णपणे जलमय झाली असती.

प्रशासन आणि जनतेकडून कौतुक

या यशस्वी पुरनियंत्रणामुळे मोठा अनर्थ टळला. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच प्रशासनाने कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. विष्णुपुरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि जबाबदारी कौतुकास्पद ठरली आहे.

पंचवीस वर्षांनंतर आलेल्या एवढ्या प्रचंड महापुराच्या वेळी विष्णुपुरी प्रकल्पाची भूमिका अतिशय निर्णायक ठरली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे व कौशल्यामुळे नांदेड जिल्हा एका मोठ्या आपत्तीपासून वाचला आहे.

00000




 वृत्त क्रमांक 1040

ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे 

नांदेड, दि. 1 ऑक्टोबर : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी भारतीय परंपरा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केले. 

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व  महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मराठवाडा प्रादेशिक विभाग (उ) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अशोक तेरकर, मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ महिला आघाडीचे अध्यक्षा निर्मला कोरे यांची उपस्थिती होती. 

ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय भवन येथे कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये त्यांना असलेल्या कौटुंबिक व सामाजिक समस्यांची नोंद या कक्षामध्ये घेण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या वयोश्री व तीर्थ दर्शन योजनेचा मोठ्याप्रमाणात लाभ घेतला. राज्य शासनाच्या सर्वसमावेशक धोरणामध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण-2013 ची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, उपचार शिबिरे मोठ्याप्रमाणात राबविले जात आहेत. या शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सोयी-सुविधांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

या कक्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या असलेल्या कुटुंबिक तसेच इतर समस्यांची नोंदणी करावी. या प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज कल्याणचे सेवानिवृत्ती समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी केले तर आभार लक्ष्मण गायके यांनी मानले.

000












वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...