Wednesday, December 11, 2024

वृत्त क्र. 1185

सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर

डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार

शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी

नांदेड, दि. 11 डिसेंबर :- माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 33 टक्केच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधित शेतकरी संख्या व नुकसान भरपाईची रक्कम कोटी रुपयात आहे.

नांदेड तालुक्यासाठी 34 हजार 641 बाधित शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 85 लाख रुपये, अर्धापूर तालुक्यासाठी 32 हजार 448 बाधित शेतकऱ्यांसाठी 32 कोटी 97 लाख रुपये, कंधार तालुक्यासाठी 73 हजार 650 बाधित शेतकऱ्यांसाठी 71 कोटी 27 लाख रुपये, लोहा तालुक्यासाठी 80 हजार 840 बाधित शेतकऱ्यांसाठी 84 कोटी 40 लाख रुपये, बिलोली तालुक्यासाठी 36 हजार 99 बाधित शेतकऱ्यांसाठी 46 कोटी 47 लाख रुपये, नायगाव तालुक्यासाठी 56 हजार 172 बाधित शेतकऱ्यांसाठी 56 कोटी 64 लाख रुपये, देगलूर तालुक्यासाठी 61 हजार 123 बाधित शेतकऱ्यांसाठी 50 कोटी 95 लाख रुपये, मुखेड तालुक्यासाठी 79 हजार 603 बाधित शेतकऱ्यांसाठी 55 कोटी 92 लाख रुपये, धर्माबाद तालुक्यासाठी 28 हजार 795 बाधित शेतकऱ्यांसाठी 27 कोटी 26 लाख रुपये, उमरी तालुक्यासाठी 34 हजार 38 बाधित शेतकऱ्यांसाठी 32 कोटी 70 लाख रुपये, भोकर तालुक्यासाठी 43 हजार 59 बाधित शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 19 लाख रुपये, मुदखेड तालुक्यासाठी 30 हजार 812 बाधित शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 35 लाख रुपये, हदगाव 74 हजार 228 बाधित शेतकऱ्यांसाठी 82 कोटी 27 लाख रुपये, हिमायतनगर 34 हजार 533 बाधित शेतकऱ्यांसाठी 44 कोटी 61 लाख रुपये,  किनवट तालुक्यासाठी 57 हजार 702 बाधित शेतकऱ्यांसाठी 80 कोटी 42 लाख रुपये, माहूर तालुक्यासाठी 26 हजार 172 बाधित शेतकऱ्यांसाठी 35 कोटी 12 लाख असे एकूण नांदेड जिल्ह्यातील 7 लाख 83 हजार 915 शेतकऱ्यांसाठी 812 कोटी 386 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

दिनांक 1.1.2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

00000

वृत्त क्र. 1184

उद्योग भवन येथे सोमवारी निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन

                                                                                                                                                                       नांदेड, दि. 11 डिसेंबर :- जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड मार्फत निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी  उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे स. 9 ते दु. 2 वाजेपर्यंत आयोजित केली आहे.

या कार्यशाळेस जिल्हयातील सर्व उद्योजक, औद्योगिक संघटना, शेतकरी कंपन्या, इच्छुक युवक-युवती तसेच सध्या कार्यरत निर्यातक्षम उद्योग घटक यांनी सहभागी व्हावे. तसेच सर्वानी या कार्यशाळेचा प्रचार, प्रसार व्हॉटसअप ग्रुप, सोशल मिडीया, स्थानिक नामांकित वर्तमानपत्रे इ.वर शेअर करावा. नांदेड जिल्हयाच्या विकासासाठी सर्वांनी सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य सचिव तथा महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या कार्यशाळेचा उद्देश हा राज्यामध्ये निर्यात क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्हयाला उत्तरदायी बनविण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र (District as  Export Hub) उपक्रमाला प्रोत्साहन देणे हा आहे. 

उद्योग संचालनालयाच्या संनियंत्रणाखाली जिल्हयामध्ये या कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व  उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधीत उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातसंबंधी कामकाज करणारे घटक इ. चा सहभाग असणार आहे. या कार्यशाळेत विदेश व्यापार महानिदेशालय (DGFT), पुणे येथील तज्ञांची टीम निर्यातबाबत सादरीकरण करणार आहेत. 

या कार्यशाळेस जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे मार्गदर्शन मिळणार असून या समितीचे सर्व सदस्यदेखील सहभागी होणार आहेत. निर्याती संदर्भात अडी-अडचणी, विविध योजनांबाबत प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असून तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

00000

वृत्त क्र. 1183

कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत

नांदेड, दि. 11 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारित एकरकमी योजना 31 मार्च 2025 पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड- 431605 किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 220865 वर संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

 वृत्त क्र. 1182 

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या

विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेडदि. 11 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उपकंपनी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळसंत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व संतसेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या तिन्ही महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणाकरिता बेरोजगारांसाठी, स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजु व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषी लग्न व पारंपारीक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादनव्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसाय करीता या महामंडळाच्या नांदेड जिल्ह्याकरीता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालय स्तरावरून उद्दीष्ट प्राप्त झाले आहे.

 

एक लाखापर्यंतची थेट कर्ज योजना

या योजनेत अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावाअर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावेपरतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हप्त्यांमध्ये राहिलनियमीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही परंतू थकित झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

 

20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना

या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील. 20 टक्के रक्कम ही महामंडळाची असून त्यावर द.सा.द.शे. टक्के व्याज आकारण्यात येते व टक्के सहभाग हा लाभार्थ्यांचा आहे. या योजनेची कर्ज मर्यादा रुपये लाखापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 लाख रुपयापर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधारलिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तसेच लाभार्थ्यांने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन छायाचित्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

 

गट कर्ज व्याज परतावा योजना

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 ते 50 लाख रुपयापर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थ्याचे वय 18 ते 45 वर्षे असावे. गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्या देतील. उमेदवाराचे बचतगटभागीदार संस्थासहकारी संस्थाकंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) एलएलपीएफपीओ अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 ते 20 लक्ष रुपयापर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदाराची कुटुंबिक वार्षीक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपये असावे. विद्यार्थी बारावीत 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाण‍िकरणानुसार महामंडळाकडून अदा केले जाईल.

 

महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना  

ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालीत साधन केंद्र (CMRC) मार्फत राबविल्या जात आहे. इतर मागास प्रवर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्यात लाख रुपया पर्यंत कर्ज बँकेमार्फत उपलद्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधारलिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

 

या विविध कर्ज योजना बँकेमार्फत असून लाभार्थ्यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर www.msobcfdc.org ऑनलाईन अर्ज भरावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळेसमोर नांदेड-431605 दूरध्वनी क्र. 02462-220865 अथवा www.msobcfdc.org या वेबसाइट संपर्क साधावा. या योजनेचा लाभ इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तिने जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावाअसे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

Tuesday, December 10, 2024

 वृत्त क्र. 1181 

माळेगाव यात्रेतील भाविकांना सर्व सोयी-सुविधा

मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे

- आमदार प्रताप पाटील चिखलीकर  

·  माळेगाव यात्रेच्या तयारीसाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज

·  माळेगाव यात्रेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक

· आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी सर्व विभागांचा घेतला आढावा 

नांदेड, दि. 10 डिसेंबर :- नांदेड जिल्ह्यासह आपल्या शेजारील राज्य व जिल्ह्यातील अनेक भाविक दर्शनासाठी माळेगाव येथे दरवर्षी येतात. दक्षिण भारतातील माळेगाव येथे सर्वात मोठी यात्रा दरवर्षी भरते. असंख्य लोकांचे माळेगाव येथील श्री खंडोबा कुलदैवत असून  येथील जत्रा ही मागील अनेक वर्षांपासून भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविकांला सर्व सोयी-सुविधा प्राप्त होतील यादृष्टीने संबंधित यंत्रणानी सूक्ष्म नियोजन करावे , असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. माळेगाव येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकराच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. 

श्री क्षेत्र माळेगाव येथील यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नियोजनाच्या दृष्टीने आज माळेगाव येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, माळेगावचे सरपंच हनमंत धुळगंडे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, पशुवैद्यकिय विभागाचे उपायुक्त डॉ. घुले व वरिष्ठ अधिकारी व माध्यम प्रतिनिधी तसेच मोठया प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

यात्रेच्या परंपरेप्रमाणे येथील पशुप्रदर्शन, शंकरपट याकडे भाविकांचा अधिक ओढा आहे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत यांचे आयोजन करण्यात येणार आहे. पशुधनाच्या व कृषि विभागाच्या विविध स्टॉलसह विविध स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत. यात्रेत सीसीटीव्ही, फिरते शौचालय, सुरक्षा व्यवस्था, शालेय मुलांसाठी माळेगाव येथे सहलीचे आयोजन करण्यात यावे, वाहन व्यवस्था तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी वाहन व्यवस्था करण्यात यावी याबाबत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.  यात्रेसाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. 

यात्रेतील भाविकांसह सर्वांना पिण्याचे पाणी, बाजारात विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची तपासणी करण्याबाबत अन्न व औषध पुरवठा विभागाला सूचना दिल्या. यात्रेतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षतेच्यादृष्टिने सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. यात्रेतील सामाजिक सलोखा, शांतता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यात्रेत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस विभाग दक्ष आहे. याचबरोबर माळेगावच्या ग्रामस्थही अधिक दक्षता घेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. 

29 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 या कालावधीत विविध महोत्सव व उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी महावितरण, पाणी पुरवठा, राज्य परिवहन महामंडळ, शिक्षण विभाग, बीएसएनएल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, समाज कल्याण, महिला व बालविकास विभाग, बांधकाम विभाग आदी विभागांनी करावयाच्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

00000









 वृत्त क्र. 1180 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 10 डिसेंबर :- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी हिंगोली येथून सायं. 6 वा. विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. गुरुवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठक. दुपारी 1 वा. विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 1.30 वा. विश्रामगृह नांदेड येथून परभणीकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्र. 1179

मोटार सायकल नोंदणीसाठी नविन मालिका सुरू 

नांदेड, दि. 10 डिसेंबर :- परिवहन्नेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एम एच 26-सीएस ही नविन मालिका दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाही. त्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत Text message / दूरध्वनीद्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले. 

0000

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...