Wednesday, November 15, 2023

 वृत्त 

विकसीत भारतासाठी दुर्गम भागातील

आदिवासींच्या विकासावर शासनाचा प्रामुख्याने भर

- पालकमंत्री गिरीश महाजन 

· विकसीत भारत संकल्प यात्रा मोहिमेचा किनवट येथे शुभारंभ 

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- आजवर जे वंचित घटक विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत, अशा दुर्गम आदिवासी भागातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर आपण भर देत आहोत. प्रत्येक व्यक्तींच्या गरजेनुसार ज्या योजना त्यांना योग्य असतील अशा योजना साकारलेल्या आहेत. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत, स्वयंरोजगारापासून कृषी पर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी आहे. शासकीय योजनाप्रती सकारात्मकता ठेऊन त्या-त्या योजनांचा लाभ घेतल्यास भारताला विकसीत देशाच्या क्रमवारीत येण्याला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. 

विकसीत भारत संकल्प यात्रेच्या किनवट येथील शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, गोकुंदा येथील सरपंच अनुसया सिडाम, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, सुधाकर भोयर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

आदिवासी समाज हा राना-वनात राहणारा आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजानेही मोठे योगदान दिले आहे. भगवान बिरसा मुंडा, तंट्ट्या भिल्ल, तेलंगा ख‍डीया, वीर नारायण सिंह, जत्रा भगत, अल्लूरी राजू, बुधू भगत या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले आहे. जल, जमीन, जंगल यांच्या रक्षणासाठी आदिवासी बांधवांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. आदिवासींच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या आदिवासींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्याच्या कामास निश्चित गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून विकसीत भारत संकल्प यात्रा होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी कटिबद्ध होऊन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपण देवू शकलो, असे ते म्हणाले. प्रत्येक वाड्या-पाड्यांवर आदिवासी वस्तींवर शुद्ध नळाचे पाणी पोहोचले पाहिजे यासाठी हर घर नल से जल ही योजना त्यांच्याच दूरदृष्टीतून साकारली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 50 लाखांपेक्षा अधिक आदिवासींना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुमारे 1 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक कुटुंबियांना शासन शौचालय देवू शकले. शासकीय योजनांद्वारे झालेले हे मोठे परिवर्तन आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

0000

छाया :- सदानंद वडजे, नांदेड.







 

Tuesday, November 14, 2023

 वृत्त 

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते किनवट येथे

विकसीत भारत संकल्प यात्रा मोहिमेचा शुभारंभ 

नांदेड, (जिमाका) दि. 14 :- सन 2047 मध्ये भारतीय स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरा करतांना आपला भारत हा विकसीत देशांच्या यादीत असेल, हे ध्येय दृष्टीपथात ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहिम हाती घेतली आहे. जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा शुभारंभ 15 नोव्हेंबर 2023 रोजी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट येथील या मोहिमेचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 वा. होणाऱ्या या समारंभास सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.    

शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जे लाभार्थी पात्र आहेत मात्र त्यांच्यापर्यंत योजना पोहचू शकल्या नाहीत त्या लाभार्थ्यांना विविध विकास योजनांचा लाभ देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्याचा प्रमुख उद्देश या मोहिमेअंतर्गत ठेवण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ही मोहिम राबविली जाईल. या यात्रेच्या माध्यमातून आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या योजनाचा लाभ, अर्ज भरुन घेणे याबाबीचा यात समावेश असणार आहे.

0000

Monday, November 13, 2023

 वृत्त

 

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहनांची तपासणी

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे 8 ते 12 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 208 वाहनांची प्रदुषण नियंत्रण तपासणी करण्यात आली. यात 31 दोषी वाहनांवर कारवाई करून 10 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

 

केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 115 व 116 मधील तरतुदीनुसार मान्यता प्राप्त वायु प्रदुषण तपासणी केंद्राकडून वाहनाची वायु प्रदुषण विषयक तपासणी करून वाहनाला प्रमाणपत्र देण्याविषयी तरतुद आहे. 

 

मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी प्रदुषणकारी वाहनांवर कारवाई करून वायुप्रदुषणाला आळा घालण्याच्या हेतुने विविध विभागांना 15 डिसेंबर 1999 रोजी निर्णयाद्वारे निर्देश दिले आहेत. तसेच SUO MOTO जनहित याचिकेद्वारे 6 नोव्हेंबर 2023 रोजी आदेशामध्ये परिवहन विभागास प्रतिवादी केले आहे. सदर आदेशातील परिच्छेद क्र. 7 (i) अन्वये वाहनांची पीयुसी तपासणी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार करण्याबाबत आदेशीत केलेले आहे. 

 

त्याअनुषंगाने या मोहिमेमध्ये प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्या वायुवेग पथकाद्वारे 8 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत 208 तपासलेल्या वाहनांपैकी 31 दोषी वाहनांवर कारवाई करून 10 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

0000  

 वृत्त

 

जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- नांदेड जिल्‍हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात दि. 17 व 20 नोव्हेंबर 2023 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल विष्णुपुरी नांदेड, राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युतनगर नांदेड, शामल एज्युकेशन कॅम्पस देगावरोड समोर  नांदलादिग्रस, खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 17 नोव्हेंबर व 20 नोव्हेंबर 2023 रोजी या दोन दिवशी सकाळी 5 ते रात्री  9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त

 

गोदावरी काठावरच्या संधीकाळाला

ईश्वर घोरपडे यांच्या राग भटियारने उजाळा

 

·         नांदेडकरांनी अनुभवले भटियार रागातील सूरमयी उमलणे

·         दिवाळी पहाटच्या दुसऱ्या दिवशीही नांदेडकरांची भरभरून दाद

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- गोदावरीचा काठ सकाळच्या किरणांच्या प्रकाशात असतांना याला साक्षीदार होणे हीच मुळात मोठी पर्वणी कोणासाठीही ठरू शकते. अशावेळी सुर्यांची किरणे काठाला स्पर्श करणाऱ्या काळात राग भटियारचे सूर रसिकांना ऐकण्याची संधी मिळणे म्हणजे तो संधीकाळ किती लाखमोलाचा असू शकेल याची अनुमती आज नांदेडच्या रसिकांनी अनुभवली. निमित्त होते दिवाळी पहाट-23 आणि सकाळच्या या कोमल रागाला तेवढ्याच कोमलतेने उमलणारे गायक होते पुणे येथील ईश्वर घोरपडे.

 

संधीकाळाला प्रकाशाच्या मध्यम लयीने जसा उजाळा मिळावा तसा उजाळा ईश्वर घोरपडे यांनी करम करो करतार… या मध्यलय रूपक तालातील बंदिशीने गोदावरी काठावरील दिवाळी पहाटच्या मैफलीला दिला. यानंतर धृत एकतालातील उल्लंघ्य सिंधो हा श्लोक अलगत सादर केला. निवृत्ती महाराजांचा जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, संत तुकारामांचा अमृताची फळे अमृताची वेली हे अभंग त्यांनी सादर केले. या अभंगाच्या भावार्थात एक एक पदर जसा उलगडून दाखवावा तशी अनुभूती रसिकांना देत दिवाळी पहाटची ही मैफल त्यांनी नाट्य गिताकडे नेली. सुरत पिया की, छेडियल्या तारा हे नाट्य गीत सादर करून ऐकुन वेणुचा नाद ही गवळन सादर करून त्यांनी सावळे परब्रम्ह या भैरवीच्या तालात सर्व रसिकांना तल्लीन करून ही मैफल अधिक उजळून टाकली.

 

ईश्वर घोरपडे यांना प्रशांत गाजरे यांनी तबल्यावर, नचिकेत हरिदास यांनी संवादिनीवर, विश्वेश्वर कोलंबीकर यांनी पखावजवर एकात्म साथ दिली. मंजिरीवर सचिन शेटे यांनी साथ दिली. जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरूद्वारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती नांदेडच्यावतीने आयोजित दिवाळी पहाट 2023 कार्यक्रमातील आजच्या घोरपडे यांच्या कार्यक्रमाचे निवेदन स्वयंवर प्रतिष्ठानचे प्रमुख प्रा. सुनिल नेरलकर यांनी केले.

00000








Saturday, November 11, 2023

 मानवी संवेदनांना अधोरेखीत करत किन्नरांना

Friday, November 10, 2023

जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे जन्म मृत्यू नोंदवह्या असल्यास तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

 जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे जन्म मृत्यू

नोंदवह्या असल्यास तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि.10 :-  मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत गावातील जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे गाव नमुना क्रमांक 14 (जन्म मृत्यू नोंदवह्या) उपलब्ध असतील तर त्यांनी अशा नोंदवह्या संबंधित तालुक्याचे तहसिल कार्यालयात रितसर जमा कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहेत.

 

मराठा समाजातील व्यक्तींना, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेवून कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्राच्या अनुषंगाने 1967 पूर्वी कार्यरत पोलीस पाटील यांचेकडील गाव नमुना क्रमांक 14 (जन्म मृत्यू नोंदवह्यामध्ये कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा जात नोंदी आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुने पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांनी अशा नोंदवह्या उपलब्ध असल्यास तहसिल कार्यालयास जमा कराव्यात असे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...