Monday, February 25, 2019


दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान
वैश्विक ओळखपत्र शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 25 :- दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत वैश्विक ओळखपत्र (दिव्यांगाचे स्मार्ट कार्ड) नोंदणीसाठी तालुकास्तरावर 26 फेब्रुवारी ते 11 मार्च 2019 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींनी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या शिबरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस. के. मिनगीरे यांनी केले आहे.   
जिल्ह्यात ज्या व्यक्तीकडे दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र एसएडीएम प्रणालीचे आहे अशा व्यक्तीने http://www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर किंवा नजीकच्या ई-सेवा केंद्रात तसेच शिबरात आधारकार्ड, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, रंगीत पासपोर्ट छायाचित्र, रेशनकार्ड घेऊन अपलोड करुन घ्यावेत. अपलोड केल्याची प्रिंट शिबिराच्या ठिकाणी जमा करावी.   
मंगळवार 26 फेब्रुवारी अर्धापूर व नांदेड तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर व श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय नांदेड. गुरुवार 28 फेब्रुवारी 2019 रोजी बिलोली व धर्माबाद तालुका- ग्रामीण रुग्णालय बिलोली व धर्माबाद. शुक्रवार 1 मार्च 2019 रोजी कंधार व लोहा तालुका- ग्रामीण रुग्णालय कंधार व लोहा. शनिवार 2 मार्च 2019 रोजी हदगाव व हिमायतनगर तालुका- उपजिल्हा रुग्णालय हदगाव व ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर. मंगळवार 5 मार्च 2019 रोजी नायगाव व उमरी तालुका- ग्रामीण रुग्णालय नायगाव व उमरी. बुधवार 6 मार्च 2019 रोजी किनवट व माहूर तालुका- ग्रामीण रुग्णालय किनवट व माहूर. गुरुवार 7 व शुक्रवार 8 मार्च 2019 रोजी देगलूर व मुखेड तालुका- उपजिल्हा रुग्णालय देगलूर व मुखेड. सोमवार 11 मार्च 2019 रोजी भोकर व मुदखेड तालुका- ग्रामीण रुग्णालय भोकर व मुदखेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
00000


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  
प्रकाशक, मुद्रकाची बचत भवन येथे बैठक
नांदेड दि. 25 :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 पुर्व तयारीच्‍या अनुषंगाने   जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्‍यक्षतेखाली नांदेड जिल्‍ह्यातील सर्व नोंदणीकृत वृत्‍तपत्रांचे प्रकाशक व सर्व मुद्रक यांची गुरुवार 28 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 4.30 वाजता बचत भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे बैठक आयोजित करण्‍यात आली आहे.
या बैठकीसाठी जिल्‍ह्यातील सर्व नोंदणीकृत प्रकाशक व मुद्रक (Publishers and Printers) यांनी उपस्थित राहण्‍याचे असे आवाहन नांदेडचे जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांचेवतीने करण्‍यात येत आहे.
00000

Sunday, February 24, 2019


प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ संपन्न  
जिल्ह्यातील 2 लाख 60 हजार 304 शेतकरी कुटुंब पात्र
पहिला हप्ता बँक खात्यात जमा करणे सुरु  
नांदेड, दि. 24 :- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेश गोरखपूर येथून आज करण्यात आला. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 60 हजार 304 पात्र शेतकरी कुटुंबांना 2 हजार रुपयाचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा केला जात आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज संपन्न झाला.
याप्रसंगी मान्यवरांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळत असून शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे सोईचे होईल व कर्ज काढावे लागणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर येथून होत असलेला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ व मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.  
उत्तरप्रदेश गोरखपूर येथे प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 हप्त्यात 6 हजार रूपये मिळणार आहेत. या पैशातून बी-बियाणे, खते, कृषी अवजारे इत्यादी शेतीशी निगडीत बाबींचा प्रश्न सुटू शकणार आहे. यामुळे देशातील जवळपास 12 करोड छोटे शेतकऱ्यांना  थेट लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर 75 हजार करोड थेट जमा  होणार आहेत, असे सांगितले.
गोरखपूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राच्यावतीने मुरबाडचे गौतम चिंतामन पवार यांनी प्रतिनिधीत्व केले असून त्यांना  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान क्रेडिटकार्ड देण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.      
या योजनेच्या रविवार 24 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात 1 हजार 575 गावापैकी आठ अ प्रमाणे एकुण खातेदार शेतकरी 7 लाख 95 हजार 800 आहेत. या योजनेत परिशिष्ट अ प्रमाणे अनिवार्य माहिती संकलीत झालेली गावांची संख्या 1 हजार 568 असून परिपूर्ण असलेले पात्र शेतकरी कुटुंब 2 लाख 89 हजार 351 एवढी आहेत. त्यापैकी 1 हजार 510 गावांची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. माहिती अपलोड केलेली पात्र शेतकरी कुटुंब 2 लाख 60 हजार 304 तर टक्केवारी 89.96 एवढी आहे, अशी माहिती देण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आली आहे.  
 प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकाची तर कृषिनिष्ठ शेतकरी भगवान इंगोले यांनी सेंद्रीय शेतीची माहिती दिली.   
कार्यक्रमास कृषि उपसंचालक माधुरी सोनवणे, तहलिसदार किरण अंबेकर, श्रीमती उज्वला पांगरकर, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, एन. टी. पाटे, कृषि अधिकारी श्रीमती पुनम चातरमल, जिल्ह्यातील विविध ठिकाणचे महिला व पुरुष, कृषि व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोभागचंद बोरा, श्री. येमूल, देसाई, संतोष बडवळे, मनोहर, शंकर पवार यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचलन व आभार कृषि सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी मानले.
00000


Saturday, February 23, 2019


कृषी सेवक मेगा भरतीची
ऑनलाईन परीक्षेबाबत आवाहन
लातूर,दि.21(विमाक):-महाराष्ट्र शासन कृषी सेवक मेगा भरती 2018-19 ची संगणक आधारित (Computer Based Online Examination) परीक्षा 22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत  आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी  www.mahapariksha.gov.in या संकेत स्थळावरुन आपले हॉल तिकीट उपलब्ध करुन घ्यावे व त्यात दिलेल्या सुचनेनुसार आपणास देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक टी.एन.जगताप यांनी केले आहे.
****


रा. प. महामंडळात
चालक तथा वाहक पदाची रविवारी परीक्षा
अफवांवर विश्वासू ठेवू नका
           नांदेड, दि. 23 :- रा. . महामंडळाचालक तथा वाहक पदाची ऑफलाईन परिक्षा रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर  विश्वास ठेवू नका अशा प्रवृत्तीच्या लोकांकडुन उमेदवारांशी संपर्क आल्यास त्याबाबत त्वरीत रा. . महामंडळाच्या संबंधीत विभाग नियंत्रक यांचेशी संपर्क साधावा.
        उमेदवारांना या भरती प्रक्रियेबद्दल ऑफलाईन परीक्षेसंदर्भात अफवा पसरवून निवड करुन देण्याचे प्रलोभन दाखवून संभ्रम निर्माण करुन देण्याचा प्रयत्न होत असल्यास अशा अफवा   प्रलोभनास उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी बळी पडु नये. तसेच स्थानिक पोलीस स्टेशन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यास राप महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन रा.. महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
------


शिल्पनिदेशकांच्या नेमणुकीसाठी मंगळवारी मुलाखती
नांदेड, दि. 23 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे शिल्प कारागीर योजनेंतर्गत शिल्पनिदेशकांची पदे तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार 26 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11.30 वा. घेण्यात येणार आहेत.
तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी ही नेमणूक असून उमेदवारांनी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे उपस्थित रहावे. तारतंत्री, जोडारी, कातारी या व्यवसायासाठी ही पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता संबंधीत व्यवसायात यंत्र / विद्युत अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीतील पदवी / पदविका व एक / दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी / एटीएस परीक्षा उत्तीर्ण, तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेश / गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर तासिका तत्वावरील नियुक्ती मिळेल. या संस्थेस यापुर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सुद्धा 26 फेब्रुवारी रोजी संस्थेत उपस्थित रहावे. मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन धर्माबाद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे. 
00000


"हत्तीरोग" उच्चाटनासाठी
सामुदायिक औषधोपचार मोहिम 
नांदेड, दि. 23 :- "हत्तीरोग" एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम नांदेड जिल्ह्यात 25, 26 व 27 फेब्रुवारी 2019 या कालावधीत ग्रामीण भागात तर शहरी, मनपा निवडक भागात 25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2019 दरम्यान राबविली जाणार आहे. या मोहिमेत डीईसी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळया खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, स्वंयसेवक येतील तेंव्हा या गोळया जेवन करुन (उपासी पोटी न घेता)  घेऊन शासनाच्या या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यासाठी 1 हजार 884 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम)  तयार करण्यात आली आहे. त्यावर 379 पर्यवेक्षक, 17 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 20 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. ही मोहिम राबविण्यासाठी 77 लाख डि.ई.सी. गोळया व 31 लाख अलबेंडॉझॉल गोळया प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत. जिल्हयात 35 लाख 61 हजार 364 लोकसंख्या पैकी 30 लाख 82 हजार 712 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकुण अपेक्षित लाभार्थी 28,42,97 आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. लोकसंख्येत नांदेड जिल्हयातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड मधील हडको, सिडको  वाघाळा व तरोडा खु व तरोडा बु परिसराचा समावेश आहे.
एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळयाचा डोस
वयोगट
डी.ई.सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा
ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ
2 वर्षापेक्षा कमी 
निरंक   
निरंक   
2 ते 5 वर्षे
1 गोळी
1 गोळी
6 ते 14  वर्षे
2 गोळ्या
1 गोळी
15 वर्षावरील
3 गोळ्या
1 गोळी
भारतात "हिवताप" खालोखाल हत्तीरोग ही महत्वाची सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोंकाना याची लागण झाली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला असून त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर राज्यात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्हयात जास्त प्रमाणात आढळते.
            बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतूची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुनः दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा, हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोपफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ) 12 ते 18 महिने आहे.
            हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकाग्रृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुध्दा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाहय जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृध्दी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2020 पर्यन्त उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी "एकदिवसीय सामुहिक औषधोपचारएम.डी.ए. (मास ड्रग अॅडमिनिट्रेशन) सर्वाना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसोत) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये.
            या एम.डी.ए. एकदिवसीय सामुहिक औषधोपचार मोहिम ही जवळ-जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपुर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे. शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम.डी.ए या एकदिवसीय डी.ई.सी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळयाचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा (डोस) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
00000

  वृत्त  भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन २१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार  छत्रपती स...