Monday, December 1, 2025

 वृत्त क्रमांक 1254

नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2025

 मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान

मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सांय. 5.30 या  

मतदानासाठी प्रशासन सज्ज; 

मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क अवश्य बजवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड, दि. 1 डिसेंबर :- नांदेड जिल्ह्यातील ११ नगरपरिषद / नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 या कालावधीत मतदान करता येणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.  

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, मुदखेड, उमरी, भोकर, किनवट व लोहा,कुंडलवाडी या नगरपरिषद/नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध  करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभुमीवर नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधण्याकरिता https://mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल.  निवडणुकीची मतमोजणी बुधवार 3 डिसेंबर, 2025 रोजी होणार आहे. 

000000

 ​ वृत्त क्रमांक 1253

नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी आज सुट्टी   

नांदेड दि. 1 डिसेंबर :- राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना 26 नोव्हेंबर 2025 व ऊद्योग, ऊर्जा, कामगार व खनिजकर्म विभाग शासन परिपत्रक 28 नोव्हेंबर 2025 नुसार ही सुट्टी जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, मुदखेड, उमरी, भोकर, किनवट व लोहा,कुंडलवाडी या नगरपरिषद / नगरपंचायत येथील मतदारसंघात ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.

मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग​ ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत​ असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी​ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी मतदारसंघातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील.​ (जसे राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर​ आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना​ तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानक्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी​ घेणे आवश्यक राहील.

सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने या आदेशाचे​ अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांना मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त​ न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्य विरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अहवान सहायक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांनी केले​ आहे.

0000

 वृत्त क्रमांक 1252

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! 

शेती उत्पादनवाढीसाठी फार्मर कप स्पर्धा 2026 

शेतकरी बांधवांनो, फार्मर कपमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

प्रशिक्षण, स्पर्धा आणि बक्षिसाद्वारे शेतकऱ्यांचे सशक्तीकरण 

प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण

नांदेड, दि. 1 डिसेंबर : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि शेतीतील खर्च कमी करणे हा उद्देश ठेवून नांदेड जिल्ह्यात पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील या स्पर्धेसाठी विविध उपक्रमांची तयारी सुरू आहे. 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत. शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असेल.

खरीप 2026 हंगामासाठी विविध पिकांवर आधारित ही स्पर्धा घेण्यात येणार असून, गटशेतीवर आधारित या उपक्रमासाठी उमेद आणि कृषी विभागाच्यावतीने तालुकास्तरावरील प्रशिक्षण अलीकडेच पूर्ण झाले आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. गत चार वर्षांपासून ही स्पर्धा राज्यातील 46 तालुक्यांमध्ये राबविण्यात येत होती. मात्र यावर्षी हा उपक्रम राज्यातील 351 तालुक्यांमध्ये विस्तारण्यात आला आहे, ही विशेष बाब आहे.

शेतकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा तसेच नोंदणीसाठी कृषी विभाग व उमेद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

00000



वृत्त क्रमांक 1251

कंधार व लोहा ग्रामीण गुंठेवारीचे प्रस्ताव उपविभागीय कार्यालय कंधार येथे दाखल करावेत

नांदेड, दि. 1 डिसेंबर : कंधार व लोहा तालुक्यांतील गुंठेवारी विषयक प्रस्ताव स्वीकृत करून त्यावरील कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, नांदेड यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभाग कंधार यांना प्रदान केले आहेत. कंधार व लोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्तानव दाखल करण्यापस 31 डिसेंबर 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कंधार येथे गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करावेत, असे उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनी कळविले आहे.

कंधार व लोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील 31 डिसेंबर 2020 पुर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड व त्यावरील बांधकाम नियमित करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव निर्धारित मुदतीत उपविभागीय अधिकारी कंधार कार्यालयात दाखल करुन जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमन, श्रेणीवाढ व नियंत्रण), 2021 अन्वये महाराष्ट्र शासनाने दिनांक 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेल्या अनधिकृत भुखंड व अनधिकृत भुखंडावरील बांधकामांना नियमीत (नियमाधीन) करण्यास मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्द वगळता उर्वरित ग्रामीण भागातील अशा अनधिकृत भुखंडांच्या नियमितीकरणासाठी शासनाने विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात आले असून, प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

दि. 30 नोव्हेंबर 2025

वृत्त क्रमांक 1250

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

नांदेड, दि.30 नोव्हेंबर : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा नुकताच घेण्यात आला. या बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच ‘मैत्री’ आणि ‘नॅशनल डेअरी स्कीम’ अंतर्गत कार्यरत सेवादाते उपस्थित होते.

बैठकीत नांदेड जिल्ह्यातील पशुप्रजनन कार्य, दुग्ध उत्पादन वाढीसाठी विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प (टप्पा 2) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबी तसेच किसान क्रेडिट कार्ड, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन कायदा इत्यादी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रजननक्षम गाय व म्हैसवर्गीय जनावरांच्या वंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन करून कृत्रिम रेतनाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिल्या. जास्त दूध उत्पादन देणाऱ्या जनावरांची निर्मिती करण्यासाठी लिंगवर्गीकृत रेत मात्राचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला. दुग्ध उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पशुधनातील लसीकरणाची स्थितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था दोलायमान झाल्यामुळे पशुसंवर्धन व्यवसाय हाच शाश्वत आर्थिक लाभ देऊ शकतो, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. पुढील काळात स्वतः आणि अधिनस्त सर्व यंत्रणा पशुसंवर्धन क्षेत्राला प्राधान्य देऊन शेतकरी व पशुपालकांना आवश्यक सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले. दरमहा पशुसंवर्धन विभागाचा नियमित आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

नांदेड जिल्ह्यातील कृत्रिम रेतनाचे कार्य दुप्पट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नियंत्रित प्रजनन कार्यक्रमाची प्रगती पाहून “एक गाव – एक फार्म” या संकल्पनेवर आधारित प्रकल्प राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025–2026 अंतर्गत चारा उत्पादन योजनेतून मका, ज्वारी व बाजरी बियाण्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पाडिले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, डॉ. विजय काटकाडे, डॉ. अरविंद गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. सोनकांबळे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. प्रविण चव्हाण, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी श्री. अनिल चव्हाण, नॅशनल डेअरी स्कीमचे प्रकल्प समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर सोनटक्के, विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश खिल्लारे तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000







वृत्त क्रमांक 1249

रब्बी हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा 

नांदेड दि. 1 डिसेंबर :- राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2025 साठी आयोजित करण्यात आल्या आहेत.  रब्बी हंगाम सन 2025 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.  

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.  

पिक स्पर्धेतील पिके

रब्बी पिकात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांचा समावेश आहे. 

पात्रता निकष

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवशक्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येल.  पीकस्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. 

कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ).  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. सातबारा, 8-अ उतारा. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास. पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक, पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत.   

अर्ज करण्याची मुदत

खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढील प्रमाणे राहील.  ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस . ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  पिकासाठी 31 डिसेंबर 2025 राहील. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. 

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम तिनशे रुपये राहील व आदिवासी गटासाठी रक्कम एकशे पन्नास रुपये राहील. सहभागी शेतकऱ्यांनी प्रवेश शुल्क स्वतः 0401 पिक संवर्धन 104 शेती क्षेत्रापासून प्राप्त जमा रक्कमा (00) (02) पीक स्पर्धा योजनेखालील जमा रक्कमा 0401047301 या शिर्षामध्ये शासकीय कोषागारात विहीत मुदतीत जमा करावे.  

बक्षिसाचे स्वरूप

पहिले, दुसरे, तिसरे यानुसार तालुका पातळीवर  5 हजार,  3 हजार, 2 हजार त्याप्रमाणे जिल्हा पातळीवर 10 हजार, 7 हजार, 5 हजार तर राज्य पातळीवर 50 हजार, 40 हजार, 30 हजार रुपये बक्षिस सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस स्वरुपात दिले जाईल. 

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागाचे www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर किंवा संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन कृषि कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक 1248

नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायत निवडणूक मतदार संघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

नांदेड, दि. ३० नोव्हेंबर : राज्य शासनाने राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदानाचा दिवस, मंगळवार, दि. 2 डिसेंबर, 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील  नगर परिषद/नगर पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात अधिसूनेद्वारे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

ही सार्वजनिक सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना लागू राहणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे. 

***

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...