Thursday, July 31, 2025

वृत्त क्र. 786

आजपासून जागतिक स्तनपान सप्ताहास सुरुवात 

स्तनपान ; एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी

नांदेड दि. 31 जुलै : दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. यावर्षीचा जागतिक स्तनपान सप्ताह "स्तनपान: एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी" या संकल्पनेवर आधारित आहे. स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि मातांना स्तनपानासाठी प्रोत्साहित करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. 

सुपोषित नांदेड बनवण्यासाठी आयआयटी बॉम्बे यांनी जे परिश्रम घेतले, तसेच प्रशिक्षण देऊन प्रशिक्षक बनवले. त्यांनी  संपूर्ण जिल्ह्यात त्याचा उपयोग करून सुपोषित नांदेड ध्येय, उद्देश साध्य करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्तनपानाचे महत्त्व समजून घ्यावे आणि आरोग्यदायी पिढी घडवण्यासाठी योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने  संपूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. बाळासाठी आईचे दूध हे अमृततुल्य आहे. जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला केवळ स्तनपान देणे हे त्याच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, पोटाचे विकार कमी होतात आणि दमा व ऍलर्जीसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. स्तनपान करणाऱ्या बाळांचे वजन संतुलित राहते आणि त्यांना भविष्यात मधुमेह किंवा स्थूलपणासारख्या समस्या होण्याची शक्यता कमी असते.

आईसाठी देखील स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. यामुळे प्रसूतीनंतर गर्भाशय लवकर पूर्वस्थितीत येते, रक्तस्राव कमी होतो आणि वजन कमी करण्यास मदत करते. स्तनपानामुळे आई आणि बाळात भावनिक नाते अधिक घट्ट होते. या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक गट एकत्र येऊन स्तनपानाविषयी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे, आरोग्य शिबिरे आणि माहितीपर सत्रे यांचा समावेश असेल. स्तनपानाचे महत्त्व, योग्य पद्धती आणि येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

00000

वृत्त क्र. 785

कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी धोरण जाहीर  

जमिनीची माहिती सादर करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 31 जुलै :- महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 23 मे 2025 अन्वये नैसर्गिक वाळूला एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) पर्याय म्हणून विकास करण्याच्या अनुषंगाने शासनाने धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने 28 जुलै 2025 रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे माहिती व अर्ज 14 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शासनाकडे किंवा कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे निहित असलेल्या कोणत्याही जमिनीवर मंजूर करावयाच्या खाणपट्टयाबाबत पाच एकरापर्यंतच्या क्षेत्रासाठी लिलाव करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची माहिती तहसिलदार यांनी 14 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावी. इच्छुक व्यक्तींनी mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 14 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.

यापुर्वीपासून खाणपटटा मंजूर असलेल्या खाणपटटाधारकांनी 100 टक्के एम-सॅन्ड उत्पादन करण्यास इच्छुक असल्याबाबत अर्ज mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत. याबाबत सविस्तर प्रसिध्दीपत्रक जिल्हाधिकारी नांदेड यांचे अधिकृत संकेतस्थळ (nanded.gov.in) वर प्रसिध्द केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसिल कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आले आहे.

000000

वृत्त क्र. 784

महसूल सप्ताहात जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन : जिल्हाधिकारी 

1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह होणार साजरा

नांदेड दि. 31 जुलै :  जिल्ह्यात महसूल विभागामार्फत 1 ऑगस्ट 2025 रोजी ‘महसूल दिन आणि 1 ते 7 ऑगस्ट, 2025 या कालावधीत ‘महसूल सप्ताह-2025’ साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

महसूल दिन व महसूल सप्ताहात विशेष उपक्रम राबविण्याबाबत आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्ष अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसिलदार विपीन पाटील, शंकर लाड आदीची उपस्थिती होती. 

या सप्ताहात प्रत्येक दिवशी तहसिल कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष मोहिम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदातलीचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह सर्व महसूल अधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे दिल्या.  

महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असून यात 156 गावांत गाव तीथे स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. एम-सँड’ धोरणाची अंमलबजावणी, गावातील जे मोठे रस्ते अतिक्रमण मुक्त झाले आहेत तिथे दुतर्फा वृक्षारोपण करणार, 4 ऑगस्टपासून ऑनलाईन सुनावनीस प्रारंभ. भूसंपादनाचे सॉफ्टवेअर सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या कामाला पुर्णत्वाकडे नेणार. महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मूळ सेवापुस्तके अद्ययावत करण्याचे नियोजन केले असल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिली आहे.

महसूल सप्ताहातील कार्यक्रमांचे स्वरुप 

शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन केले आहे.

शनिवार 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात येईल. रविवार 3 ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे.  सोमवार 4 ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबविण्यात येईल. मंगळवार 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे थेट लाभ हस्तांतरण झालेले नाही, त्यांना घरभेटी देऊन डीबीटीद्वारे अनुदानाचे वाटप केले जाईल.

बुधवार 6 ऑगस्टला शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करून त्या अतिक्रमणमुक्त केल्या जातील. तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेतले जातील. 

गुरुवार 7 ऑगस्टला एम सँड धोरणाची अंमलबजावणी करून नवीन मानक कार्यप्रणालीनुसार धोरण पूर्णत्वास नेले जाईल आणि ‘महसूल सप्ताहाचा’ सांगता समारंभ आयोजित केला जाईल. या महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

000000




वृत्त क्र. 783

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात उल्लेखनीय प्रगतीमध्ये किनवटचा समावेश

जिल्हाधिकाऱ्यांचा नीती आयोग व राज्यशासनाच्यावतीने 2 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सन्मान 

नांदेड दि. 31 जुलै :  नीती आयोगाच्यावतीने जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने 6 निर्देशकांपैकी 4 निर्देशक 100 टक्के पूर्ण केल्यामुळे राज्यातुन तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. याबद्दल राज्य शासनाच्यावतीने  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा आयआयएम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले. देशभरातील 500 तालुके यात सहभागी झाले. या अभियानात आरोग्य, पोषण, कृषी आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतर्गत 6 निर्देशकांचा समावेश करण्यात आला होता. संपूर्णता अभियानात राज्यातील 27 आकांक्षित तालुक्यानी सहभाग घेतला होता. यात पहिल्या क्रमांकावर चंद्रपूर - जिवती, दुसऱ्या क्रमांकावर वाशीम - मालेगाव, पालघर - जवाहर तर तिसऱ्या क्रमांकावर नांदेड-किनवट, वर्धा - कारंजा, यवतमाळ-पुसद, गडचिरोली-अहेरी, नंदुरबार-अकराणी या आकांक्षित तालुक्यानी स्थान पटकाविला आहे.

समावेशित निर्देशक 'संपूर्णता अभियाना'चे फोकस क्षेत्र

तालुक्यातील गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण 100 टक्के करणे. तालुक्यातील 30 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची उच्च रक्तदाब संदर्भात 100 टक्के तपासणी करणे. तालुक्यातील 30 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची मधुमेह संदर्भात 100 टक्के तपासणी करणे. तालुक्यातील गर्भवती महिलांना आयसीडीएसच्या पूरक पोषण आहार वितरण कार्यक्रमांतर्गत 100 टक्के पूरक पोषण आहाराचे वितरण करणे. मृदा आरोग्य तपासणी कार्ड 100 टक्के वितरण करणे. तालुक्यातील महिला स्वयं सहायता समूहाना खेळत्या भांडवलाचे 100 टक्के वितरण करणे.

संपूर्णता अभियानात किनवट तालुक्याची कामगिरी

संपूर्णता अभियानाच्या माध्यमातून आकांक्षित किनवट तालुक्याने तालुक्यातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी, उच्च रक्तदाबासाठी तपासणी, आयसीडीएस कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी आणि माती नमुना संकलन लक्ष्याविरुद्ध तयार केलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी हे 4 निर्देशक 100 टक्के संतृप्त केले आहेत.

संपूर्णता अंतर्गत राबविलेले उपक्रम

महिन्याच्या संपुर्णता अभियान मोहिमेत सदर निर्देशक संतृप्त करण्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी संदर्भात - ग्रामपंचायत निहाय उच्च रक्तदाब-मधुमेह तपासणी शिबिरांचे आयोजन, नियमित आढावा, क्षेत्रभेटी, रिक्त पदांची भरती, जनजागृती इत्यादी उपक्रम घेऊन कामास गती देण्यात आली. 

पोषण आहार संदर्भात - पोषण आहारासंदर्भात जनजागृती, पौष्टिक आहार मेळा, पोषण परसबाग निर्मिती, आयसीडीएस शिबीरे, नुक्कड नाटक,  जागरूकता रॅली, प्रदर्शने, पोस्टर बनवणे, पोषण ट्रॅकर अँप चे प्रशिक्षण, पोषण पंधरवडा व पोषण महाचे आयोजन, माता दिनाचे नियमित आयोजन, जनजागृती पर विभिन्न स्पर्धाचे आयोजन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. 

मृदा आरोग्य पत्रिका संदर्भात - शेतीशाळाद्वारे गावस्तरावर माती तपासणीच्या अनुषंगाने जनजागृती, गावनिहाय शिबिरांचे आयोजन, कृषी मित्रांची मदत, जिल्हास्तरीय लॅबशी सातत्याने पाठपुरावा, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून कॅम्पेन मोड वरती माती नमुने गोळा करणे या माध्यमातून दिलेले 1 हजार 500 चे उद्दिष्ट तीन महिन्यात 100 टक्के पूर्ण करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांचा नीती आयोग व राज्यशासनाच्यावतीने नागपूर येथे सन्मान 

या अभियानात तालुक्याने संपूर्णता प्रतिज्ञाद्वारे मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्धारित वचनबद्धता 6 पैकी 4 निर्देशक संतृप्त करून यात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल राज्य शासनाच्यावतीने  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आय आय एम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या समवेत आकांक्षित तालुका किनवटचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस व संबंधित आकांक्षित तालुका फेलो हे राज्यस्तरीय सत्कार समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर संपूर्णता अभियान सन्मान समारोह

संपूर्णता अभियान मोहिमेत योगदान दिलेल्या संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना पदक व प्रशस्तीपत्र तर तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागाचे गाव पातळीवर उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

00000




Wednesday, July 30, 2025

#रस्तासुरक्षामोहिम

वृत्त क्र. 782

जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा

नांदेड ३० जुलै :- जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त,महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाईल्ड लाईन  व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान याच्या संयुक्त  विद्यमानाने नांदेड जिल्हामध्ये एक अभिसरण कार्यक्रम आज घेण्यात आला. ज्यामध्ये बाल संरक्षण आणि बाल हक्क परिसंस्थेतील प्रमुख ,सर्व विभाग एकत्र आले होते. बाल तस्करीशी लढण्यासाठी समन्वित, आंतर-एजन्सी कृती आवश्यक आहे हे एकत्रितपणे ओळखून संवादात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात भाग घेतला. जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान नांदेड ही जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन मुलांचे संरक्षण, सुटका आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी नांदेड जिल्हामध्ये सक्रियपणे काम करत आहे. जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन, यांनी बाल तस्करी रोखण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांना येणाऱ्या आव्हानांवर चर्चा करताना, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी विद्यमान कायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची, तस्करी नेटवर्कबद्दल समुदायांना संवेदनशील करण्याची आणि सुटका केलेल्या मुलांचे वेळेवर न्याय आणि प्रभावी पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी सर्व एजन्सींमध्ये समन्वय मजबूत करण्याची तातडीची गरज यावर एकमताने सहमती दर्शविली. 

या कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी बालकाच्या संदर्भात काम करत असताना समन्वयाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून नांदेड येथील रेल्वेस्थानक व बसस्थानक येथून बालकांची तस्करी होत असल्यास सदरील हालचालींवर लक्ष ठेवून सर्व यंत्रणेला तात्काळ कार्यान्वित करण्याचे मार्गदर्शन केले.

सर्वांनी आपले महत्वाचे योगदान द्यावे. तसेच मानवी तस्करी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ए जी मोरे. आर पी एफ चे श्री मीना. जीआरपीएफचे श्रीमती स्वाती ठाकूर जनसेवा प्रतिष्ठानचे जगदीश राऊत व जिल्हा समन्वयक निलेश कुलकर्णी व आशा सूर्यवंशी, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कल्पना राठोड, चाईल्ड लाईनच्या ऐश्वर्या व दिपाली हिंगोल, रेल्वे स्थानकातील टी.सी फेरीवाले सदरील रेल्वे स्थानक परिसरात  प्रवाशांना चाईल्ड लाईन 1098 ची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

०००००



वृत्त क्र. 781

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 30 जुलै : नांदेड जिल्ह्यात  31 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात  31 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

वृत्त क्रमांक   नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण   22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार नांदेड(जिमाका), दि. 19: नांदेड तालुक्...