Thursday, July 31, 2025

वृत्त क्र. 786

आजपासून जागतिक स्तनपान सप्ताहास सुरुवात 

स्तनपान ; एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी

नांदेड दि. 31 जुलै : दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. यावर्षीचा जागतिक स्तनपान सप्ताह "स्तनपान: एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी" या संकल्पनेवर आधारित आहे. स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि मातांना स्तनपानासाठी प्रोत्साहित करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. 

सुपोषित नांदेड बनवण्यासाठी आयआयटी बॉम्बे यांनी जे परिश्रम घेतले, तसेच प्रशिक्षण देऊन प्रशिक्षक बनवले. त्यांनी  संपूर्ण जिल्ह्यात त्याचा उपयोग करून सुपोषित नांदेड ध्येय, उद्देश साध्य करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्तनपानाचे महत्त्व समजून घ्यावे आणि आरोग्यदायी पिढी घडवण्यासाठी योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने  संपूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. बाळासाठी आईचे दूध हे अमृततुल्य आहे. जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला केवळ स्तनपान देणे हे त्याच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, पोटाचे विकार कमी होतात आणि दमा व ऍलर्जीसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. स्तनपान करणाऱ्या बाळांचे वजन संतुलित राहते आणि त्यांना भविष्यात मधुमेह किंवा स्थूलपणासारख्या समस्या होण्याची शक्यता कमी असते.

आईसाठी देखील स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. यामुळे प्रसूतीनंतर गर्भाशय लवकर पूर्वस्थितीत येते, रक्तस्राव कमी होतो आणि वजन कमी करण्यास मदत करते. स्तनपानामुळे आई आणि बाळात भावनिक नाते अधिक घट्ट होते. या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक गट एकत्र येऊन स्तनपानाविषयी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे, आरोग्य शिबिरे आणि माहितीपर सत्रे यांचा समावेश असेल. स्तनपानाचे महत्त्व, योग्य पद्धती आणि येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...