Saturday, November 4, 2023

 वृत्त

नांदेड येथील सत्यवान अंभोरे यांना

कुणबी जातीचे पहिले प्रमाणपत्र वाटप

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड येथील पहिले कुणबी जातीचे ओबीसी प्रर्वगाचे प्रमाणपत्र आज सत्यवान दिगंबरराव अंभोरे यांना देण्यात आले. माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यातील पहिले कुणबी जातीचे ओबीसी प्रर्वगाचे प्रमाणपत्र देण्यात आले. सत्यवान दिगंबरराव अंभोरे यांना उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. यावेळी अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी काम करणारे स्वराज्य संघटना राज्य उपाध्यक्ष तथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकरपदाधिकारी संकेत पाटीलश्याम कोकाटेसदानंद पुयडसुभाष कोल्हे, यांची उपस्थिती होती.

000000




फायदेशीर शेतीसाठी शेतकऱ्यांनी

सेंद्रिय व जैविक निविष्ठा वापरण्यावर भर द्यावा

-    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) दि. 4 :- उपलब्ध असलेल्या शेतीतून कमी खर्चात अधिकचे उत्पन्न काढणे ही काळाची गरज झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या मर्यादित वापरासह, किटक नाशका ऐवजी सेंद्रीय व जैविक खते व औषधी वापरण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.   

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कृषी विभागा अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान,  राष्ट्रीय कृषी विकास योजना महाराष्ट्र मिलेट सन 2023-24 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व सार्वभौम ग्रामसभेचे आयोजन कृषी विभाग व गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच भोकर तालुक्यातील मौ. जामदरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माचे संचालक अनिल गवळी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संदीप जायभाये, संदीप डाकुलगे, भूमाजी टेकाळे यांची उपस्थिती होती.

 

यावेळी गावातील महिलांनी दारूबंदी विषयी मागणी केली. गावातील अडी- अडचणी सोडवण्यासाठी या ग्रामसभेचा मुख्य उद्देश असून तसेच सार्वभौम  ग्रामसभा याविषयी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी मार्गदर्शन केले. 

रब्बी हंगाम पिके तसेच पिकाच्या वाण निवडी पासून ते खत व पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे संदीप जायभाये यांनी केले.

 

महाराष्ट्र शासनाचा पुढील काळात 13 लाख पेक्षा अधिक क्षेत्र हे सेंद्रिय शेती खाली आणण्यासाठी आपला मानस असून तो आपल्या माध्यमातून पुढील कालावधीत पूर्ण  करण्याचे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा अनिल गवळी यांनी केले. 

सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून आपण स्वतः सेंद्रिय शेती करत  आहोत असे मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी संदीप डाकुलगे यांनी आपल्या मनोगत सांगितले. शेतकऱ्यांनी रासायनिक व खतांचा व औषधांचा वापर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी न करता जैविक औषधांचा व खतांचा वापर करावा. तसेच जैविक खते व औषधी स्वतः तयार कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 

गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य माऊली महाराज पार्डीकर यांनी मनुष्याने निर्व्यसनी राहावे, आत्महत्या करू नये, कृती करावी, सेवा करावी असा संदेश दिला. शेतकरी हा दिवसेंदिवस आळशी होत चाललेला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढत आहेत. आत्महत्या पर्याय नसून शेतकऱ्यांनी स्वावलंबी बनावे, व्यसन सोडून आत्मविश्वासाने जगले पाहिजे. शासनाच्या योजनेचा चांगला प्रकारे वापर करून प्रगतशील बनले पाहिजे, असे मत बाबुराव महाराज भांगे पार्डीकर यांनी व्यक्त केले.

 

राष्ट्र संतांचे विचार सर्वांनी अमलात आणावे. ईश्वर हेचि माझे घर म्हणून विश्वाची सुधारणा करायची असेल तर प्रथम गावाची सुधारणा करणे आवश्यक आहे असे गोविंद महाराज साबळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले.

0000

 नांदेड येथे भेसळयुक्त

28 हजार 220 रुपये किंमतीचा साठा नष्ट

·         अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने अन्न पदार्थामध्ये भेसळ होवू नये म्हणून विक्रेत्यांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने धडक कारवाई करुन कार्यवाही करण्याचेही निर्देश दिले आहेत.  

 

त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बाजारात विक्री होणाऱ्या दुधजन्य पदार्थाची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने 2 नोव्हेंबर रोजी  मे. रामजी दत्तराव पवार यांचे दूध भांडार, देगलूर नाकानांदेड या पेढीतून खवा व दही या अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेवून तपासण्यात आले. त्यात खव्याचा उर्वरित साठा 69 किलोकिंमत 19 हजार 320 रुपयेतर दह्याचा उर्वरित साठा 178 किलोकिंमत 8 हजार 900 रुपये असा एकूण 28 हजार 220 रुपये  किंमतीचा साठा त्यांनी जप्त केला. हा साठा भेसळीच्या संशयावरून तसेच अस्वच्छ वातावरणात साठवणूक केल्यामुळे नष्ट केला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न सुरक्षा अधिकारी  सतीश हाके यांच्या मदतीने सहायक आयुक्त संजय चट्टे व रामचंद्र भरकड यांच्या मार्गदर्शनाखाली केलीअसे अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000




Friday, November 3, 2023

कृपया सुधारित वृत्त _

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी

सर्व यंत्रणांनी कार्यक्षम काम करावे

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 3 नोव्हेंबर पासून कुष्ठरोग शोध अभियान व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. कुष्ठरोग आणि क्षयरोगाचे निर्मूलन व्हावे व ज्याचे आजार प्राथमिक टप्प्यात आहेत, अशा रुग्णांवर वेळीच उपचार करुन या रोगाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने ही मोहिम अत्यंत महत्वाची आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महानगरापर्यत यादृष्टीने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी परस्पर समन्वय साधून शोध मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरोग शोध अभियान व क्षयरुग्ण शोध मोहिम, नियमित लसीकरण, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, एड्स नियंत्रण, गाभा समिती याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, अशासकीय सदस्य डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर व आरोग्य विभागातील अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य आदीची उपस्थिती होती.

 

कुष्ठरोग, एड्स, क्षयरोग सारखे आजार रुग्णांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करतात. यात उपचार घेण्यासाठी त्यांची मानसिकता टाळाटाळ करते. यादृष्टीने अशा रुग्णांना सामाजिक लाभासह उपचार व समुपदेशनावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल्या. कुपोषण होवू नये यासाठी प्रत्येक अंगणवाडीत लहान बालकांची तपासणी वेळोवेळी झालीच पाहीजे त्यासाठी वैद्यकीय अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी वेळेावेळी अंगणवाड्यांना भेट देवून पाहणी केली पाहिजे. शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे पोषक विषयक निर्देशाची तपासणी झाली पाहिजे. सॅम व मॅम श्रेणीतील बालकांना वैद्यकीय अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी महिन्यातून दोन वेळेस भेट देवून कुपोषणातून सक्रीयपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. आगामी वर्षापासून पहिल्या वर्गापासून कुपोषण विषयक तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

आरोग्याच्या बाबतीत तालुकास्तरावर कार्यशाळा घेवून स्थानिक पातळीवर असलेल्या शालेय व्यवस्थापनापासून सर्व संबंधित यंत्रणांना सक्षम करण्याचे त्यांनी सूचित केले. प्रत्येक नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी शासन दुर्गम भागातील वाडी वसतीपासून महानगरातील विविध वसतीपर्यत कटिबध्द होवून काम करत आहे. आरोग्य विभागाच्या अनेक योजना यासाठी साकारल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेपासून तालुका पातळीवरील संबंधित यंत्रणांनी आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासह जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

सर्व शासकीय आरोग्य मोहिम व उपक्रमामध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे. त्यादृष्टीने सर्व तालुक्याच्या ठिकाणी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना अशा मोहिमा व उपक्रमांची माहिती देवून यात त्यांचा प्रभावी सहभाग करुन घेता येईल. यादृष्टीने तालुका पातळीवरील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजन केले पाहिजे असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.  या आवाहनाला प्रतिसाद देत किनवट सारख्या आदिवासी बहूल तालुक्यात आम्ही आवश्यक त्या प्रशिक्षणासाठी सहभाग देवू असे डॉ. अशोक बेलखोडे यांनी साने गुरुजी रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट केले.

00000






Thursday, November 2, 2023

 वृत्त 

ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीच्या

मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंध आदेश   

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्‍ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्‍याने स्‍थापित व सन 2022 मध्‍ये चुकीची प्रभाग रचना झाल्‍याने निवडणुका न होऊ शकलेल्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदानाच्‍या दिवशी मतदान केंद्र परिसरात रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून ते मतदान संपेपर्यन्‍त तर मतमोजणीच्‍या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात सोमवार 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरु झाल्‍यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.  

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्‍या (सदस्‍य पदासह थेट सरपंच पदाच्‍या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच ग्रामपंचायतीमधील रिक्‍त जागांच्‍या पोट निवडणुकांसाठी ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2023 व ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2023 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय्य वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहण्‍यासाठी रविवार 5 नोव्हेंबर रोजी ज्‍याठिकाणी मतदान होणार आहे त्‍या ठिकाणापासून तसेच सोमवार 6 नोव्हेंबर 2023 रोजी ज्याठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतिरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतिरिक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता या आदेशाद्वारे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. 

ग्रामपंचायत पोटनिवडणूक  

मुखेड तालुक्यातील डोंगरगांव, सलगरा खु, जांब खु, पिंपळकुठा. देगलूर तालुक्यातील भक्‍तापुर. बिलोली तालुक्यातील बावलगाव. लोहा तालुक्यात कापसी खु, धानोरा म. उमरी तालुक्यात हस्‍सा, इज्‍जतगांव आमदापुर. कंधार तालुक्यात बामणी प क, बोरी (खु), मंगलसांगवी. अर्धापुर तालुक्यात दाभड, लोणी खु. माहूर तालुक्यात भोरड, वसरामतांडा, गोकुळ गोंडेगाव, टाकळी. भोकर तालुक्यात गारगोटवाडी दि.,चिदगिरी, पांगरपहाड, पांधरा, बेल्‍लोरी धा, लोणी या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. 

ग्रामपंचाय सार्वत्रिक निवडणूक   

नांदे तालुक्यातील नागापूर. मुदखेड तालुक्यातील वाई, हदगाव तालुक्यातील गवतवाडी, तळ्याचीवाडी, लोहा / लोहा तांडा. किनवट तालुक्यातील भुलजा, पिंपळगांव (की), कोठारी (ची), खंबाळा, दरसांगवी (ची), परसराम  नाईकतांडा. माहूर तालुक्यात चोरड (जुनापाणी). धर्माबाद तालुक्यात हसनाळी. नायगांव खै. तालुक्यात लालवंडी. मुखेड तालुक्यात कर्णा. लोहा तालुक्यात देवला तांडा. देगलूर तालुक्यात गोगला गोविंद तांडा, अंबुलगामरतोळी या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

00000

Wednesday, November 1, 2023

 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान

योजनांसाठी 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 1 :-  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी इच्छूकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत व आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन मुंबईचे ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे. 

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांगातर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या समान व असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयमुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. समान व असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार 2023-24 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. 

सन 2023-24 साठीच्या समान निधी योजना (Matching scemes) पुढील प्रमाणे आहे. इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना 25 लाख रुपये. टिप :- उपरोक्त योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामूळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.  सन 2023-24 साठीच्या असमान निधी योजना (Non Matching scheme) पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य (फर्निचर खरेदी 4 लाख रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लाख रुपये). "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य- 2 लाख 50 हजार रुपये व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण 2 लाख रुपये.  महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य 6 लाख 20 हजार रुपये व इमारत विस्तार 10 लाख रुपये. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य 1 लाख 50 हजार रुपये/ 2 लाख 50 हजार रुपये/ 3 लाख रुपये.  बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य 6 लाख 80 हजार रुपये याप्रमाणे आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

 वृत्त

 

शाळेतील सुधारात्मक बदलासाठी लवकरच

लोकसहभागातून माझी शाळा अभियान

 

·         मराठी व उर्दू माध्यमाच्या एकुण 2 हजार 196 शाळांसाठी जिल्हा प्रशासनाची साद

·         विद्यार्थ्यांच्या मनातही जाणीव जागृतीचे रूजतील संस्कार

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- दुर्गम-डोंगराळ, शहरी, आदिवासी वाड्यापाड्यांमधील गोरगरीब मुला-मुलींना त्यांच्या हक्काच्या शिक्षणासाठी कटिबद्ध होत अनेक पिढ्या जिल्हा परिषदेच्या शाळांनी घडविल्या. खाजगी शिक्षण संस्थांच्या तुलनेत अत्यल्प व मुलींसाठी मोफत शिक्षण या शाळांमधून विविध शासकीय सुविधांसह अव्याहत दिले जात आहे. याच शाळांमधून असंख्य मुले अनेक क्षेत्रात पुढे आली. असंख्य अधिकारी झाले, उत्तम शेतकरी झाले व काही शेतीपूरक व्यवसायातील उद्योजकही झाले. याच शाळांमधून अंतरराष्ट्रीय खेळाडूही घडले, यशस्वी राजकारणी म्हणूनही अनेकजण पुढे आले. असंख्य पिढ्या घडविणाऱ्या या शाळांच्या भिंती आणि दरवाजे आता लोकसहभागासाठी सिद्ध झाल्या असून या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारणात्मक सेवासुविधा द्वारे परिवर्तनासाठी प्रत्येकाला यात आपला सहभाग नोंदवून शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करता येईल.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी लोकसहभागाच्या दृष्टिने एक आर्त साद घातली आहे. शासन अत्यंत जबाबदारीने व कटिबद्ध होऊन शिक्षणासाठी कार्यरत आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला जिल्हा परिषद व्यवस्थापनांतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या एकुण 2 हजार 196 शाळा ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. याचबरोबर जिल्हा परिषदेमधील शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांनी आपल्या शासकीय सेवेसमवेत प्रत्येक विद्यार्थ्यांशी एक बांधिलकी जपली आहे. विद्यार्थी व शिक्षकांमधील परस्पर विश्वासर्हतेतून, कष्ट परिश्रमातून अनेक शाळांमध्ये अनेक चांगले शैक्षणिक उपक्रम पुढे आले. या उपक्रमांना सशक्त करून आणखी अभिनव उपक्रमाची लोकसहभागातून जोड मिळावी व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारात्मक बदलासाठी इच्छूक प्रत्येकांना जुळता यावे या पवित्र उद्देशाने हा अभिनव माझी शाळा उपक्रम राबविला जाईल.

 

या उपक्रमासाठी कुठेही रोख रक्कमेचा वापर होणार नाही, हे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे. या ऐवजी शैक्षणिक दृष्टिकोणातून, शाळांच्या अत्याधुनिकरणासाठी कोणाच्या मनात ज्या काही लहान-मोठ्या संकल्पना असतील त्या वस्तु अथवा इतर स्वरूपात देतांना त्या-त्या गरजू शाळांची जी काही प्रमुख गरज असेल त्यावर अधिक जिल्हा प्रशासनाचा भर राहिले, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. लोकसहभागातून जोडू इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्ती/संस्था, कार्पोरेट कंपन्या, सहकारी संस्था यांच्याकडून ज्या शाळांना मदतीची गरज भासते आहे अशा शाळांकडून विहित कार्यपद्धतीनुसार प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. माझी विद्यार्थी यांचा यात चांगला सहभाग राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रशासनातील सर्व अधिकारी सुद्धा सक्रियपणे या मोहिमेत सहभागी होणार आहेत. समाजातील नागरिकांनी आपआपल्या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना नेमकी मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक   जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण नांदेड (जिमाका), दि. 17: मराठवाडा मुक्ती संग्राम ...